शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

संक्रमण...?

गुळावर तिळाची
व्हर्च्युअल भक्ती,
व्हॉट्सऍप संक्रमणात
गोड बोलण्याची सक्ती…



सर्व व्हॉट्सऍप तथा समस्त व्हर्च्युअल वर्कर्सना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
आणि संक्रमणाच्या निमित्ताने वैभवच्या शब्दात एक (प्र?)वचन…

तुम्ही व्हॉट्सऍपवर आहात ना...? 
...मग मी तुमचा आहे!

मी तुम्हाला रोज सकाळी फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन…
वारंवार माझा डीपी बदलून या क्षणी मी कसा आहे ते दाखवेन!

मी पिंग करेन, नज करेन, 
अहोरात्र तुम्हाला जज करेन…
तुम्ही कुठलाही मेसेज फॉर्वर्ड केलात 
की मी वाचण्याआधी छान म्हणेन, 
त्या ओळी  तुमच्या स्वत:च्या असतील तर महान म्हणेन…!

सतत नमस्कार, सतत हसरा चेहरा, 24x7सस्मित सेवा…
पण तुम्ही व्हॉट्सऍप वर आहात ना…? हां… मग मी तुमचा आहे…!

मी शॉर्ट बोलतो पण स्वीट बोलतो,
मला पूर्ण शब्द टाईप करायचा वीट येतो…
मला कानामात्रा, वेलांटी, उकार यांच्याशी घेणं देणं नाही… 
म्हणणं कळल्याशी मतलब, हं स्मायली चुकली नाही पाहिजे
नाहीतर मात्र गहज़ब!

मी सर्व गृपमधे हजर आहे,
माझी सगळ्यांच्या वाढदिवसांवर नजर आहे…
मला माहीत नाही हे बरोबर की चूक आहे,
पण मी सर्वात आधी RIP लिहायला उत्सुक आहे…!

मला अहोरात्र हे सिध्द करायचं आहे 
की प्रत्येक विषयावर मला ओपिनियन आहे,
मी एकटाच नाही माझ्यासोबत
व्हॉट्सऍपवरचा प्रत्येकजण आहे…!


मी आहे एकटेपणावरचा उतारा,
मी व्हर्चुअल लाटांसाठी व्हर्चुअल किनारा… 
मी इथेच असतो, कुठे कुठे जात नाही,
ही गर्दी खरी… ख-या गर्दीत ती बात नाही…!

ही माणसं, ह्या आयडीज, हे स्टेटस मेसेजेस 
हेच माझं विश्व आहे…
एकदां माझं म्हटल्यावर कोण बघत बसतो 
कोण दीर्घ आणि कोण ऱ्हस्व आहे…!

ही माझी एक्स्टेंडेड फॅमिली आहे…
हल्ली यातच माझी ओरिजिनल फॅमिली सामावली आहे!
हां , तिचा एक वेगळा असा ग्रुप आहे…
पण का होईना आम्हाला अजून एकमेकांचं अप्रूप आहे…!

त्यात आई आहे, ताई आहे
आणि आयुष्यात कधीही प्रत्यक्ष न भेटलेले
रक्ताचे अनेक नातेवाईक आहेत
पण त्यांनाही भेटू कधीतरी… काय घाई आहे…!

सध्या श्वास घ्यायला वेळ नाही,
इतकी माणसं जपायची म्हणजे पोरखेळ नाही…
नाही म्हणायला अधून मधून डोळे दुखतात, बोटं दुखतात… 
मन 'बास झालं हे खोटं जग' म्हणत आभासी वेशीवर अडतं
पण पुढच्याच क्षणी फोनवरती देवदर्शन घडतं…!

पाठोपाठ येतात अनेक पायरेटेड भक्तीरसपूर्ण गाणी…
देवाची करणी अन नारळात पाणी…!
मग मी प्रसन्न मनाने ती विंडो मिटतो
आणि इतर विंडोत तोच देव पेस्ट करत सुटतो…!

मी इथेच असतो, मी फक्त इथलाच आहे…
पण तुम्ही व्हॉट्सऍप वर आहात ना…?
हां…मग मी तुमचाच आहे…!

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

लाजरा...!


राजेंद्रकुमार ते सुनील दत्त असल्या न-नटांचे पडद्यावरील दर्शन जिच्या चेहऱ्यातल्या गोडव्याने आणि सहज अभिनायातल्या नजाकतीने सुसह्य केले ती '…बहारोंकी मलिका…' पडद्याआड जात नाही तोवर 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा'यला आसुसलेला कवि ज्याचा '… तुमचं आमचं सेम असतं…' हा विश्वास आम्हाला मजनू व्हायची हिम्मत देऊन गेला… त्यानेही त्याच्या कवितेइतक्याच सहजतेने निरोप घेतला. दृश्यानुभव जरी संग्रहित स्वरुपात शिल्लक असला तरी जिवंत श्रवणानुभव आता पुन्हा नाही आणि पु. लं. चे किस्से 'पीएल असा होता…' सांगणारा आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला शेवटचा माणूसही…


यांनी आम्हांस काय दिले याची जंत्री मोठी असली तरी एका शब्दात सांगायचे तर… आनंद!
आमचे जगणे अनेक तऱ्हेने समृध्द करून गेलेल्या या दोन कलावंतास शब्दसुमनांजली…

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

गीत...!

शनिवार, दि. १९ डिसें. २०१५ ला एस-ओ-एस व्हिलेज पुणे आयोजित
करिअर फ़ेअर मध्ये युवामनाच्या 'हौसला अफजाई' साठी केलेली रचना…
   

सौदा इथे सगळ्याचाच
काहीच मिळत नसते फुकट,
यशाला नसतो शॉर्ट-कट अन
वाट सत्याची नेहमीच बिकट

गुंड असतात मुळात भ्याड
सूज्ञ जमवीत नाहीत झुंड,
अन्यायाविरुध्द कुठल्याही
अन निर्भयतेने थोपट दंड

कधी उन तर पाऊस कधी
चुकणार ना सृष्टीचे चक्र,
ग्रह-ताऱ्यांना भुलू नकोस
कोण मार्गी, कुठला वक्र

देव-दानव कुणि नको
निर्लेप जग आयुष्य,
दोघांनाही असूयेने
वाटू दे, व्हावे मनुष्य…!

प्रत्येक क्षणातून तू
शिकून घे नवे काही,
आला क्षण गेला क्षण
हा क्षण फिरुनी नाही

निर्धारांना चढव धार
प्रयत्नांचे इमले रच,
कितीही वाटले कठीण
खाऊ नको मुळी कच

स्वप्न बघ आभाळाचे
अन घे गरुडभरारी,
निवडलेल्या वाटेवरून
फिरू नकोस माघारी

अंधार कितीही दाटला तरी
रात्र संपून पहाट होईल,
रोज नव्याने उगवून सूर्य
गीत वसुंधरेचे गाईल…!

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

जगत...!


जगत में झूठी देखी प्रीत
अपने ही सुखसों सब लागे,
क्या दारा क्या मीत...!

गुरु नानक जयंतीच्या शुभकामना

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

सांज...!


तिन्ही सांजा सजल्या
वाती दिव्यात रुजल्या
उर्मीच्या धपापण्यात
अन जाणीवा भिजल्या…!

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

दुर्गभक्ती...!


गडावरची सांज साजरी
कथा पणतीच्या शक्तीची
दिपोत्सवाच्या उन्मेषाने
नविन गाथा दुर्गभक्तीची ..!

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

बे-घर...?


आज 'बालदिन' नव्हे का? नाही, 'साजरे'पणा खूप झाला; हल्ली कुठलीही गोष्ट सहज, स्वाभाविकतेने आणि हळूवार अशी घडतच नाही… एकदम धाड्कन आणि दणक्यात साजरी वैगरेच होते. मग शेयर, मग लाईक, मग कॉमेंट, मग रिप्लाय… अशी एक 'आशानां मनुष्यानां कचिद् (अतूट) आश्चर्य शृंखला'…! ते असो. तर या सर्वव्यापी साजरीकरणातून थोडा वेळ काढून आपल्या या बाळांना म्हणजेच पुढच्या पिढीला आपण काय (शिल्लक) ठेवणार आहोत याचाही थोडा सम्यक विचार करू या का…?

दिवाळी संपली. या दिवाळीत मेसेजेस, स्माईली आणि इमोजी (आणि नमोजीही) तर खूप आले… फोनवर, त्यांना 'लाईकू'न अगदी अंगठा दुखू लागला एवढे! पण पाहुणे फार कमी, अगदी नगण्यच! लिव्हिंग रूम मधला सोफा काढून टाकावा का विचार करतोय… हो, त्या जागी एक चांगली अभ्यासिका होऊ शकेल, अगदी मला हवी होती तश्शी…! नाहीतरी घर ज्यासाठी असावे त्या, सणावाराच्या निमित्ताने का होईना होणाऱ्या, भेटीगाठी कितीशा उरल्यात?

नवश्रीमंत मित्र / नातेवाईक दिवाळी फराळ, भेट पाठवतात पण दाराची बेल त्यांचा ड्रायव्हर वाजवतो… त्यांना यायला वेळ होत नाही म्हणे! लग्न, समारंभ घड्याळाला बांधलेल्या कार्यालयात पाहुण्यांची वेळेची सोय पाहून होतात, संगोपन भाड्याच्या वा हक्काच्या पाळणाघरात, वाढदिवस मॅकडोनाल्ड किंवा पिझ्झा हट मध्ये, तब्येतीची चौकशी हॉस्पिटल मध्ये आणि शुश्रुषा, जमलीच तर, 'अथश्री' किंवा 'निवारा' नावांच्या वात्सालयांमध्ये! निरवानिरवी साठी वैकुंठात सर्वसिद्ध मर्तीकासह झटपट विद्युतदाहिनीही निरंतर भडकते आहेच.…

प्लास्टिक मनी आल्यापासून खर तर घरात पाहुणेच काय चोर देखील यायचे बंद झालेत. काय नेणार चोरून… फ्रीज, सोफा, टीवी, लॅपटॉप… आणि कुठे आणि कसा विकणार तो, OLX आणि QUIKR शी कॉम्पीटीशन करून…? तस तर आता Security Press आणि टांकसाळीशिवाय (असते का हो ही हल्ली? नाही, खणखणीत नाण्याचा आवाज ऐकून खूप काळ लोटला म्हणून विचारलं!) चलन फक्त ATM मध्येच असते म्हणून तर होम डिलिवरीवाला सुद्धा पार्सल बरोबर swap मशीन घेऊनच येतो…

घर ही कल्पनाच बदलून गेलीय. ऑफिस मधल्या वर्क स्टेशन सारखं घर एक स्लीप स्टेशन झालंय… रोजच्या धकाधकीचा रिटायरिंग बेस! विश्राम आणि सावधान (तैय्यार) या दोनच अवस्थांसाठी घराची गरज उरलीय, त्याची समाजाशी नाळच तुटल्यासारखी झालीय… हरवलेल्या संवादासारखी! आपल्या पिढीला हे कटू सत्य पचवायलाच हवे की आपले बालपणीचे घर नाही उरले आता…

तेव्हां आता प्रश्न फक्त घरांच्या रचनेचा तेवढा उरलाय… घराच्या रचनेतून 'लिविंग' रूम कायमचीच हद्दपार करू यात का… निदान, जगण्यात लिविंग किती उरलेय आणि सर्व्हायविंग किती याचा शोध लागेपर्यंत तरी…? नाही, स्क्वेअर फुटाला १०,०००+ देण्याचा आणि द्यावे लागणारच म्हणून कमावण्याचाही प्रश्न आहेच, म्हणून म्हणतोय… 

बघा, ही दिवाळी तर गेली… पुढची येईपर्यंत विचार करून ठेवा… आणि निर्णय कळवायला विसरू नका… आणि हो, दरम्यान 'देखते रहिये बिग बॉस के घरमे और क्या क्या होनेवाला है'… निदान मंदना तरी बेघर होऊ नये म्हणून… काय?

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

'भाऊबीज'...!


सांगता दिवाळीची करण्या
उजळते पणतीस वाती…
धन स्वास्थ्य वैभव प्रीती
जपायची अक्षय्य नाती…!

[छायाचित्र सौजन्य : सुधीर वैद्य ब्लॉग - https://spandane.wordpress.com/]

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

पारवा...!


गोडी सहजीवनाची वाढवी
रंगल्या मैफिलीतला मारवा
संसाराची तप्तपदी साहवी
घुमता मुग्ध प्रणयी पारवा…!

स्वरमयी पहाट सुगंधीत
मल्मली स्पर्शाचा गारवा
उन्मनी क्षणांची आठवण
अन हवाहवासा हा पाडवा…!

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

अष्टलक्ष्मी...!


आदिलक्ष्मी धान्यलक्ष्मी
धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी
संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी
विद्यालक्ष्मी धनलक्ष्मी

जीवनस्पर्शी रूपे लक्ष्मीची
उजळती दीप अमावस्या
पूजन असावे अष्टावधानी
हीच लक्ष्मीची खरी तपस्या…!

आपणां सर्वांस दीप अमावस्या तथा अष्टलक्ष्मीच्या
संतुलित आराधनेसाठी शुभकामना!