मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

ज्ञान गुन सागर...!


न बले विद्यते तुल्यो न गतौ न मतौ परः

बल, बुद्धि आणि गतिमध्ये वानरवीर, कपिश्रेष्ठ हनुमंताची बरोबरी करणारा दुसरा कुणीही नाही. 

प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करून आपल्या प्राणप्रिय सीतेस त्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी समुद्राच्या दक्षिण तटावर पोहचले. अशोकवनात शोकमग्न सीतेला आपल्या आगमनाची सूचना व लवकरच तिच्या होणाऱ्या मुक्तीचा व राम-सीता पुनर्मिलनाचा दिलासा देण्यास कुणास धाडावे असा प्रश्न त्यांना पडला. दक्षिण तटापासून लंकेची भूमी शंभर योजने दूर. एवढे अंतर एका दमात लांघून जाण्यायोग्य कोण वीर आपल्या सेनेत आहे या विचारात प्रभू असतांना वानर योध्यांनी वेगवेगळ्या योजने उड्डाणांचे दावे केले पण ते शंभराच्या जवळपासही पोहचणारे नव्हते. अशा अत्यंत नाजूक वेळी हनुमंत मात्र काहीही न बोलता एका शिळेवर चिंतातूर बसलेला पाहून प्रभू रामास मोठा विस्मय झाला आणि त्यांनी जांबुवंताकडे पृच्छा केली. तेव्हां जांबुवंत म्हणाले, ‘हे प्रभो, या सर्वशक्तीशाली आणि महाप्रतापी अशा वानरसेनेचा सेनापती होण्याची योग्यता आणि शंभर योजने उड्डाणाचे सामर्थ्य केवळ हनुमंताकडे आहे परंतु त्याला बालपणी मिळालेल्या शापाने त्यास आपल्या सामर्थ्यांचा विसर पडला आहे. त्याला त्याच्या सामर्थ्यांचे स्मरण करून देताच तो उड्डाणास सिद्ध तर होईलच शिवाय त्याचे सामर्थ्य कलाकलाने वाढू लागेल!’

असा कोणता शाप हनुमंताला भोगावा लागला आणि का?

मारुतीच्या शैशवात एके सकाळी माता अंजनी आपल्या वायुपुत्रासाठी फळे आणण्यासाठी वनात गेली असता थोडी दूर निघून गेल्याने, मातृवियोग आणि भूक याने कासावीस झालेला बाल हनुमान उघड्या अंगणात आला आणि उगवत्या सूर्याला पाहून त्याला या गरगरीत लालचुटुक फळाचा फारच मोह पडला. हे फळ निश्चितच मधुर असणार या विचाराने तो त्याच्या दिशेने आकाशात झेपावला. एवढे छोटेसे बालक सहस्त्रावधी योजने उड्डाण करतांना पाहून या दैवी बालकास कुणीतरी रोखावे म्हणून सगळ्यांनी इंद्राचा धावा केला. इंद्र वायुपुत्राची वाट अडवेपर्यंत बच्चमजी सूर्यापर्यंत फक्त पोहचलेच नव्हते तर त्यांनी तो तेजोनिधी लोहगोल गट्टम केला होता! सूर्याच्या तेजाने सुफलित झालेली पृथ्वी आणि प्रदिपित झालेले आकाश या सगळ्यावर अंध:कार दाटला आणि हाहा:कार माजला. काळ जणू थांबला! आता निरुपाय झाला म्हणून इंद्राने बाल हनुमानाच्या डोक्यावर वज्राने प्रहार केला आणि त्याच्या मुखातून गगनराज भास्कराची सुटका झाली. परंतु चक्क दिनमणी व्योमराज मुखात ठेवल्याने बाल हनुमंताचे दोन्ही गाल लालबुंद होवून टम्म सुजले ते कायमचे आणि त्या वज्राघाताने तो तात्काळ मूर्च्छित झाला.

सूर्याच्या दिशेने आपल्या पराक्रमी पुत्रास उडतांना पाहून पवन राजाने त्याच्या रक्षणासाठी त्याच्या मागे धाव घेवून, सूर्याच्या तेजाने तो करपू नये म्हणून अतिशय शीतल हिमरूप धारण केले होते. आपला पुत्र मूर्च्छित झालेला पाहताच वायू भयंकर कोपित झाला आणि आपल्या पुत्रासह एका गुहेत जावून बसला. वायुने आपले कार्य थांबविल्याने सर्व चराचर सृष्टी आणि प्राणीमात्रांचे प्राण कंठाशी आले आणि आता सर्व काही संपणार अशी परिस्थिती दिसू लागली. वायुराजाची मनधरणी करून त्याचा राग शांत व्हावा व सृष्टीचे कार्य पुन्हा सुरळीत व्हावे म्हणून देवादिकांनी ब्रह्माची आळवणी केली. स्वत: ब्रह्मदेव देवता, गंधर्व, नाग आणि गुह्यक आदि प्रजांना बरोबर घेऊन गेले. तेथे त्यांना वायुदेवाच्या मांडीवर सूर्य, अग्नी, सुवर्ण यांच्याप्रमाणे अंगकांती असणारे हनुमान दिसले. ब्रह्मदेवाला दया आली. त्याने त्या शिशुच्या अंगवरूनही हात फिरवला. ब्रह्मदेवांच्या हाताचा लीलापूर्वक स्पर्श होताच शिशु हनुमान जागे झाले. बालक जिवंत झालेले पहाताच वायुदेव प्रसन्न झाले. ते चराचरात पूर्ववत संचार करु लागले. या बालकाच्या द्वारा भविष्य़ात देवांचीच बरीच कार्ये सिद्धीस जाणार होती हे ओळखून ब्रह्मदेवांनी तेथे आलेल्या सार्‍या देवतांना त्या बालकाला वर देण्यास सांगितले.

इंद्राने वर दिला की हा आपल्या वज्राने सुद्धा मारला जाणार नाही. सूर्याने त्यांना आपल्या तेजाचा शंभरावा भाग तर दिलाच पण असेही सांगितले की आपणच या बालकाला शास्त्रज्ञान देऊ की ज्यामुळे य़ा बालकाची शास्त्रज्ञानात कोणीही बरोबरी करू शकणार नाही व हा उत्तम वक्ता होईल. आपल्या पाशाने या बालकाचा मृत्यु होणार नाही असा वरुणाने वर दिला. आपल्या दंडाने हा अवध्य व निरोगी होईल असा यमाने वर दिला. आपल्या गदेने हा कधी युद्धात ठार मारला जाणार नाही व याला युद्धात कधी विषाद होणार नाही असा वर कुबेराने दिला. शंकरांच्या आयुधांनी हा मारला जाणार नाही असा शंकराने वर दिला. विश्वकर्मा म्हणाला की आपण जेवढी दिव्य अस्त्रे बनवली आहेत, त्यांच्यापासून अवध्य होऊन हा बालक चिरंजीवी होईल. हा दीर्घायु, महात्मा तसेच सर्व प्रकारच्या ब्रह्मदण्डांपासून अवध्य होईल असा वर देऊन ब्रह्मदेव वायूला म्हणाले, “मारुत ! तुमचा हा पुत्र मारुति शत्रुसाठी भयंकर आणि मित्रांसाठी अभयदाता होईल. युद्धात कोणीही याला जिंकू शकणार नाही. हा इच्छेनुसार रूप धारण करू शकेल, जेथे इच्छा असेल तेथे जाऊ शकेल, याची गति याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तीव्र अथवा मंद होईल तसेच ती कुठेही अडणार नाही. हा कपिश्रेष्ठ अत्यंत यशस्वी होईल. हा युद्धस्थळी रावणाचा संहार आणि भगवान्‌ श्रीरामचंद्रांची प्रसन्नता संपादन करण्यासाठी अनेक अद्‌भुत तसेच रोमांचकारी कर्मे करील”.

सामर्थ्य प्राप्त झाले की मग ते शारीरिक असो वा आर्थिक असो त्यामुळे प्राणी उन्मत्त होतो. हनुमानही याला अपवाद ठरले नाहीत. वर मिळल्यामुळे हनुमान निर्भय होऊन महर्षिंच्या आश्रमांत परत परत जाऊन उपद्रव करीत होते. हे शान्तचित्त महात्म्यांची यज्ञोपयोगी पात्रे फोडून टाकत असत, अग्निहोत्राचे साधनभूत स्त्रुक, स्त्रुवा आदि तोडून टाकीत आणि ढीगावर ठेवल्या गेलेल्या वल्कलांना चिरून, फाडून टाकीत असत. ते अवध्य असल्यामुळे सर्व ऋषीही विवश होऊन त्यांचा हा उपद्रव सहन करत होते. वायूने या आपल्या बालकाला वारंवार समजावले. पण हनुमानांचे उपद्रव देणे थांबले नाही. तेव्हा भृगु व अंगिरांच्या कुळात जन्मास आलेल्या ऋषींनी यांना शाप दिला की, “वानरवीरा ! तू ज्या बळाचा आश्रय घेऊन आम्हाला कष्ट देत आहेस त्याचा आमच्या शापाने मोहित होऊन तुला दीर्घकाळपर्यंत विसर पडेल. तुला स्वतःच्या बळाचा पत्ताच लागणार नाही. जेव्हा कोणी तुला तुझ्या कीर्तीचे स्मरण करून देईल, तेव्हा तुझे बळ वाढेल.” तेव्हा त्यांना आपल्या बळाचे विस्मरण झाले व ते मृदुल प्रकृतिचे होऊन विचरण करू लागले. अर्थात जरी ते आपल्या बळाने गर्विष्ठ झाले होते तरी त्यांचा उपद्रव हा खट्याळ बालकाला शोभणारा होता, म्हणून ऋषींनी त्यांना दिलेला शाप अतिशय सौम्य स्वरूपाचा होता.

अशी कथा वाल्मिकी रामायणातील उत्तराकांडात येते.

प्रत्येक माणसालाही काही एक सामर्थ्याचा वर जरूर मिळालेला असतो पण आपल्याच विकार-आवेगांच्या मस्तीत जीवास त्याचा विसर पडतो. योग्य स्थळी, योग्य वेळी, योग्य महानुभावाच्या माध्यमातून आपल्यातील या क्षमतेचे भान आल्यास आपल्या जीवितकार्याची जाण साधारण मानवास देखील होवू शकते. चिरंजीव हनुमंताची पात्रता मर्त्य मानवाच्या अंगी नसल्याने, प्रभू रामचंद्राच्या कृपेने जांबुवंतासारखा 'जागल्या' त्याच्या नशिबी नसला आणि कुणास गुरु करण्याचा विनय देखील आपल्याच मस्तीत जगणारा मनुष्य दाखवू शकत नसला, तरी एक गोष्ट जन्मत:च सगळ्याच मनुष्यप्राण्यांना निसर्गाने बहाल केलेली आहे, त्याच मानवी वैशिष्ट्याला आपण आपला वाटाड्या बनवू शकलो तर आजच्या जगातील बऱ्याचशा समस्या चुटकीसरशी सुटतील. त्या आपल्या अंतरी सदोदित वास करणाऱ्या पथदर्शकाचे नाव... विवेक! आणि त्यास सहवेदनेची जोड मिळाल्यास मनुष्यत्व शंभरच काय सहस्त्र योजने देखील झेप घेवू शकेल...

बघा पटतंय का... आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर, सहवेदनेच्या भावाने आणि विवेकाच्या साथीने, घेऊ या शोध आपल्यातील सुप्त क्षमतांचा...?

शुभम भवतु !

मंगळवार, २८ मार्च, २०१७

नवउन्मेष...!


रेशमी शेल्याने नटली बांबू काठी
कडुनिंबाचा साज, साखरेच्या गाठी...
तांब्याची झळाळी शोभे आभाळी
चैत्र पालवीला आज नवी नव्हाळी ...!

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात नववर्षारंभी गुढी पाडव्याच्या नवउन्मेषी शुभेच्छा...!

गुरुवार, २३ मार्च, २०१७

म. टा.


'वर्तमानपत्रातील सर्वात वाचनीय गोष्ट म्हणजे अग्रलेख' हे बाळकडू आम्हाला पाजणारे, वृत्तपत्रीय लिखाणाचा वस्तुपाठ घालून देणारे आणि 'पत्र नव्हे मित्र' या बिरुदाने महाराष्ट्र टाईम्सला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे तळवलकर सर केवळ मटालाच नाही तर अवघ्या पत्रकारितेला पोरके करून गेले. निर्भीड, निष्पक्ष, मार्मिक, विचक्षण, मर्मग्राही, साक्षेपी, द्रष्टा तथा व्यासंगी ही विशेषणांची रत्नमाला ज्यांच्या गळी शोभावी अशी; जांभेकरांपासून सुरु होऊन, आगरकर, गोखले, टिळकांनी आचार्यांकडे सोपवलेली मराठी बाण्याच्या पत्रकारितेची परंपरा आज अगदी खंडित झाली नसली तरी स्तब्ध झालीय एवढे नक्की! आजच्या डिजिटल युगातही वर्तमानपत्राशीवाय दिवस सुरु न होणाऱ्या आमच्या पिढीला या संस्कारकर्त्याची उणीव सदोदित भासेल... गुरुतुल्य श्री. गोविंद तळवलकर सरांना अखेरच्या दंडवताची मन:पूर्वक शब्दसुमनांजली!

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।

मंगळवार, १४ मार्च, २०१७

तुका आकाशाएवढा...!


बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी ।
कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥

विचार करितां वांयां जाय काळ ।
लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥

तुका म्हणे तुम्ही करा घटापटा ।
नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥

तुकाराम बीज दिनाच्या सर्व भाविकांस शुभेच्छा!

सोमवार, १३ मार्च, २०१७

रंगोत्सव...!


भस्म हीण सारे करु
उज्ज्वल ते शिरी धरू
होळीच्या रंगात रंगून
सत्त्वरूपी सारे उरू...!

होळी आणि रंगोत्सवाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !

शनिवार, ११ मार्च, २०१७

पोकळी...


नसण्याची अभोगी लाट
असण्याचा भारवाही थाट
दुनियादारी तर कधीच
ठोकारलेली...!

जगण्याची विरक्त ओढ
मुक्तीची आसक्ती थोर
स्वार्थ-भावाची लढाई
गोंजारलेली...!

ना जाणिवेचा उजेड लख्ख
ना नेणिवेचा अंधार गच्च
अन सहवेदना तेवढी
टोकारलेली...!

बुधवार, ८ मार्च, २०१७

...म्हणून...!


ती आहे म्हणून...
अजूनही सूर्य मावळतो, चंद्र उगवतो...
ती आहे म्हणून...
अजूनही चातक चांदण्यात नाहतो...!

ती आहे म्हणून...
अजूनही नदी वाहते, समुद्र गाजतो...
ती आहे म्हणून...
अजूनही कोंब अंकुरता भ्रमर गुंजतो...!

ती आहे म्हणून...
अजूनही वारा वाहतो, दरवळ दूर पसरतो...
ती आहे म्हणून...
अजूनही पक्षी गातो, मोर विभोर नाचतो...!

ती आहे म्हणून...
अजूनही तो गूज मनीचे सांगतो...
ती आहे म्हणून...
अजूनही आवेगात विवेक नांदतो...!

ती आहे म्हणून...
अजूनही भान जगण्याचे, सावध दृष्टी...
तिच्या सृजनाचा अविष्कार...
मी, तू, हरेक जीव अन अवघी सृष्टी...!  

जागतिक महिला दिनाच्या सर्व पुरुषी मानसिकतेला मन:पूर्वक शुभेच्छा...!

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मीच...!


२७ फेब्रुवारी रोजी जन्मलेले, मुळचे गजानन रंगनाथ शिरवाडकर, दत्तकविधानाने विष्णू वामन शिरवाडकर झाले आणि आपल्या अलौकिक प्रतिभेने महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज! महाराष्ट्रातील लोकहितवादी मंडळाचे प्रवर्तक आणि नाशिकमधील अनेक साहित्यीक, सांस्कृतिक चळवळींचे प्रणेते असलेल्या तात्यारावांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी भाषा दिवस साजरा करणे हे शारदेच्या उत्सवासाठी प्रत्यक्ष माऊलीने पसायदान मागण्याइतके समर्पक व औचित्यपूर्ण ठरावे.

तथापि, कुठल्याही संकल्पनेचा केवळ एक ‘दिन’ साजरा न होता त्या संबंधी जाणीव जागृत होवून ती वर्धिष्णू रहावी आणि त्यासाठी सदोदित सतर्क व कृतीशील असावे या भावनेने आजच्या मुहूर्तावर, नेटकरांना; ज्या भाषेबद्दल प्रत्यक्ष ज्ञानदेव, “माझा मर्‍हाटाचि बोलू कवतिके। परि अमृतातेही पैजेसिं जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके। मेळविन। असा नि:संदिग्ध विश्वास बाळगतात तिची एक चुणूक दाखवावी म्हणून कुसुमाग्रजांच्या साहित्य सागरातून केवळ ५ रत्ने निवडून आणली आहेत.

कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा आवाका किती होता याचे केवळ भान यावे म्हणून, एक नितांत सुंदर तरल मनोहर प्रेमकाव्य ‘नाते’, विशुद्ध आणि विशाल जीवनदर्शन ‘माझे जगणे होते गाणे’, राजकारणावर अत्यंत मार्मिक आणि तेवढेच चिंतनीय भाष्य करणारी ‘अखेर कमाई’ या तीन उत्कट अविष्कारांसोबत दोन अत्यंत गहन, विचारी आणि मानवी आयुष्याचे मर्म उलगडून दाखविणाऱ्या आणि पूर्ण अधिकारवाणीने केलेल्या सूचना किंवा इशारा... ‘जपून’ आणि प्रेम’!


...एकमेवाद्वितीय कुसुमाग्रज...

१. नाते

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही I
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही II

व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो I
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वाहत जाई II

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला I
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही II

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा I
मंज़िल की जयाची तारांगणात राही II

२. माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे...

३. अखेर कमाई - कुसुमाग्रज

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले...

ज्योतिबा म्हणाले, 
शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा...
शिवाजीराजे म्हणाले,
मी फक्त मराठ्यांचा...
आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौद्धांचा...
टिळक उद्गारले,
मी तर फक्त चित्पावन ब्राम्हणांचा...

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान....
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती...!


४. जपून

इथे सांडले सोक्रेटिसच्या
विखार पेल्यातले I
गौतम गांधींच्या नेत्रातील
करुणाश्रू शिंपले II
रक्त सुळाने या जमिनीवर
येशूचे ओतले I
दलदलीत या टाक प्रवासी
जपुनी जरा पाऊले II

५. प्रेम

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं...!

...सागरी सेतू बांधण्यासाठी आपल्या ताकदीनिशी मदत करणाऱ्या खारीस प्रभू रामचंद्राने कौतुकाने कुरवाळले होते म्हणतात... कुसुमाग्रज समजावून घेतांना, मराठीच्या वैभवशाली आणि दैवदुर्लभ हस्तिदंती महालाच्या कुठल्याशा पायरीचा लहानसा दगड होण्याचा प्रयत्न 'इत्यादी' हा आमचा खारीचा वाटा, ज्ञानराजांपासून कुसुमाग्रज, सुरेश भट आणि त्या सर्व ज्ञात अज्ञात साहित्यकारांस सादर समर्पण ज्यांनी आमच्यात माय मराठी रुजवली, जोपासली आणि तिचा लळा लावून आम्हाला तिच्या पालखीचे भोई होण्याचे अहोभाग्य मिळवून दिले...

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी!

 

रविवार, २९ जानेवारी, २०१७

मन माझे...!


चन्द्र हसला होता गालात
अन चांदणे सांडले होते...
मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

आठवांचा पूर येता
वेदनेचा डोंब उसळला...
हिशोब न जाणताच मी,
गणित प्रेमाचे मांडले होते...!

...मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

सुखाचे वावडेच असावे
असे माझे जगणे नव्हते
जवाएवढ्या सुखाला माझ्या
पण जाणिवेने कांडले होते...!

...मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

प्रजासत्ताक ...!


सांभाळतो हरेक येथे
अस्मितेचा षंढ माज
सनातनी ठरतो ज्याला
राष्ट्रप्रेमाची दैवी खाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

जातीच्या तप्त तव्यावर
आपापली पोळी भाज
अस्वस्थ वर्तमानास शोभे
लोकशाहीचा जंगलराज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

त्यांच्या निवडीस ना मूल्य
पण 'हिंद'पे वांझोटा नाज
ना गांधी कामास ये आता
स्वात्यंत्रवीर गुमनाम आज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

संस्कृती न राखू आम्ही भले
राखू प्रतिष्ठेचा बेगडी बाज
कर्म न ये कामास आमच्या
शोभतो पण लांच्छीत ताज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

स्वार्थाच्या कारणास आम्हा
ना भय ना कसली लाज
सगळे त्याज्य पचवूनीही
समुद्र ना विसरतो गाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

कधी 'साहेब' तर 'भाई' कधी
आम्हांस ना निषिद्ध व्याज
दुनियादारीच्या पखालीने
तू संस्कृतीस 'श्रीजल' पाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II