रविवार, २२ जानेवारी, २०२३

सुखेनैव...!


जाणीव लाभली जन्मजात तशी
संवेदनेची झुलू लागली डहाळी
प्रयासे नित्य जोजवली संवेदना
लाभण्या कल्पनेस मूर्त झळाळी

अमूर्त भासे जे अशक्यही कधी
साकारेल खचित हा ध्यास हवा
लांघण्या वेस मर्यादेची, केवळ
श्वास नको अढळ विश्वास हवा

स्वप्ने लाभो मनुष्या अन सामर्थ्यही
साकारण्या रोमांचक सुखचित्र नवे
अन प्रगती'शील' माणसा आकळो
सुखेनैव जगण्यास नेमके काय हवे.

रविवार, १५ जानेवारी, २०२३

कणभर तीळ...!


वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !

तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर !
"तिळा , तिळा , कसली रे गडबड ?"
"थांबायला वेळ नाही .
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !"
"ऐक तर जरा , पहा तर खरा ,
"बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !"
"बघू या गंमत , करू या जंमत !
चला रे जाऊ याच्याबरोबर ."

तीळ चालला भराभर.
वाटेत लागले ताईचे घर .
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
"घाल मला पाकात, हलवा कर झोकात."

ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत .
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा गेले घाबरून!
पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही , हुय नाही , हासे फसफसा !
पाकाने खुलतोय , काट्याने फुलतोय !
कणभर तिळाचा मणभर नखरा !"

अरे , पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी , पांढरा हलवा कुठून आला ?
"वाटाण्या , फुटाण्या , शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत ?
कणभर तिळाची मणभर करामत !
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला !

- लीलावती भागवत 
(आठवणीतील कविता)

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

मूल्य...!

राजा पराक्रमी होता, अजेय होता, प्रजाहितदक्षही होता. एका मोठ्या ऐतिहासिक विजयानंतर राजाने महायज्ञ करायचे ठरविले. यज्ञात कर्मकांडाबरोबर दानधर्माचेही प्रयोजन होते आणि त्याचे स्वरूप भव्यदिव्य होते. सोने-चांदी, पशुधन-नाणी कशा कशाची कमतरता नव्हती. प्रजा येत होती, खाऊन-पिऊन-लेऊन-घेऊन तृप्त होत होती. राजाचे तोंडभरून गुणगान करून भरभरून आशीर्वाद देऊन सुखावत होती. चैतन्याचा, आनंदाचा उत्सवी पूर ओसंडून वाहत होता. कशाला म्हणून कमी नव्हती. राजाच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दाटले होते. 

तेवढ्यात राजाची नजर एका मुंगूसावर गेली. हा काही वेगळाच दिसणारा मुंगूस दानासाठी रचून ठेवलेल्या साहित्यात लोळून पुन्हा वळून आपल्या शरीराकडे पहात होता. राजाला या शुभकार्यात विघ्न आणणाऱ्या मुंगुसाचा मनस्वी रागही आला आणि त्याच्या उपद्व्यापाबद्दल कुतुहुलही वाटले. सोन्याची शेपटी असलेल्या या मुंगुसाला राजाने थोडे दरडावूनच विचारले, ‘काय रे, काय चाललेय तुझे? तुला खायला काही हवे असेल असेल तर धान्यांची कोठारं उघडी आहेत, त्यातून हवे ते पोटभर खा, इथे यज्ञात का लुडबूड करतो आहेस?’

मुंगूस म्हणाला, ‘क्षमा असावी, महाराज ! मी काही उपद्रवमूल्य जोपासणारा व्यावसायिक लाभार्थी प्राणी नाही. एका रात्री एका गावात, काही खायला मिळते का बघावे म्हणून एका झोपडीत शिरलो. अगदीच अन्नान दशा झालेले कुटुंब त्या झोपडीत राहत होते. त्या घरातल्या माउलीने घरातील चार माणसांसाठी मोठ्या मुश्किलीने दोन भाकऱ्या थापल्या होत्या आणि पाण्याबरोबर अर्धी-अर्धी भाकरी गिळावी असा विचार करत असतांना झोपडीचे दार वाजले. दारात एक अभ्यागत उभा होता आणि चार दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या अभ्यागताला, मिळालेच तर, दोन घास हवे होते.

घरच्या माउलीने विचार केला आपण अर्ध्याच्या जागी चतकोर खाऊ पण पाहुण्याला उपाशी नको ठेवायला. भुकेल्या पाहुण्याने अधाशीपणाने अर्धी भाकरी खाल्ली आणि आशेने पाहू लागला. पाहुणचारात कमी नको, आपण आणखी एक दिवसाने काही मरत नाही असा विचार करून घरधन्याने उरलेली अर्धी भाकरी पाहुण्याला देऊ केली. पाहुण्याने तातडीने ती देखील फस्त केली आणि लोटाभर पाणी पिऊन चालता झाला.

इकडे कुटुंबातील चौघांनी रात्रभर भुकेने तडफडून प्राण सोडले. ‘आता इथे खायला काय मिळणार?’ अशा विषण्ण विचाराने मी झोपडीतून बाहेर पडतांना माझे शेपूट चुलीजवळ रेंगाळले. माउलीने भाकरी थापतांना त्या पिठाचे काही कण तिथे चुलीजवळ सांडले होते. त्या कणांच्या स्पर्शाने माझे संपूर्ण शेपूट सोन्याचे झाले.

आता अशा शरीर मूंगूसाचे आणि शेपटी सोन्याची अवस्थेचे काय करावे, त्यापेक्षा सगळे शरीरच सोन्याचे करून घ्यावे म्हणून मी जिथे कुठे यज्ञयाग, दानधर्म चालला आहे असे समजते तिथे जाऊन पाहतो. तिथल्या दानवस्तूत लोळून पाहतो. वाटते, कणभर पीठाने जे साधले ते हिरे-मौक्तिक, सोने-नाण्याने कसे साधणार नाही? पण कसे कुणास ठाऊक, कितीही भव्यदिव्य, झगमगता, खैरातींची लयलूट असलेला लाख मोलाचा दानधर्म चालला असला तरी माझ्या शरीराचा एक केसही काही सोन्याचा होत नाही.

असे का होत असावे, महाराज…?’

-----------------------------------------------------

‘दि अल्केमिस्ट’, ‘व्हेरोनिका डिसाईड्स टू डाय’, ‘ब्रिडा’ च्या निमित्ताने, परिचय आणि सख्य एकदमच झालेल्या, ‘पावलो कोएलो’ यांच्या पूर्वी, ब्राझील आम्हाला माहित होता तो अलौकिक, एकमेवाद्वितीय आणि लिजेंड असलेल्या ‘पेले’ यांच्यामुळे. त्यांना श्रद्धांजलीच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल बरेच काही लिहून आले, बरेच काही नव्याने समजले. 

बहुतेकांना माहित नसलेली आणि आजही कुठेही वाचण्यात न आलेली पेलेंबद्दलची एक आठवण: पेले जेव्हा पहिल्यांदाच व्यावसायिक फुटबॉल सामना खेळले तेव्हा त्याबद्दल त्याना मानधनाचा चेक देण्यात आला. चकित होऊन तो स्वीकारतांना पेले लहान मुलाच्या औत्सुक्याने आणि आश्चर्यमिश्रित आनंदाने उद्गारले, ‘...म्हणजे मला याचे पैसे देखील मिळतील?’ [मला यातून जो आनंद आणि आत्मिक समाधान मिळते तेच पुरेसे होते!]

-----------------------------------------------------------------------------


वरील दोन्ही गोष्टीतून काही बोध वैगरे घेण्याची काहीही सक्ती नाही. वर्षाअखेरी काही वेगळे कानावर पडले तर नववर्षाच्या मुहूर्तावर त्या दिशेने निदान विचार तरी सुरु करता येईल, एव्हढेच…


बाकी सगळे सुरु, बंद करण्यासाठी नववर्ष संकल्प आहेतच, त्यासाठी मनापासून शुभेच्छा… !


शुभम् भवतु !

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

मौनाध्याय...!



लिहावे म्हटले काही
तर नेमके सुचत नाही,
मन रमवावे म्हटले जरा
काही काही रुचत नाही

'मना'ची घालमेल अन्
शब्दांचे हे मौनाध्याय,
सुचावा याला कधीतरी
असा ही काही पर्याय

मेघदूत सुचो वा गीताई,
कुंठीत मती मुक्त व्हावी
एक ओवी जगण्यासाठी
मुक्तीची वस्त्रे ल्यावी...!

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

‘उपयोग ...?’


विंदांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २४ ऑगस्ट २०१७ ते २३ ऑगस्ट २०१८ या वर्षात,  विंदांची 'रोज एक कविता' असा उपक्रम राबवितांना मला फक्त १०० च कविता सादर करता आल्या. उर्वरित २६५ कवितांपैकी, ही हृदयात घर करून बसलेली कविता आज काळ-वेळ न बघता कोंब फुटावा तशी उफाळून वर आली असावी...!

कवितेच्या बाबतीत, 'केल्याने होत आहे रे...'  हे समर्थवचन जसे गैरलागू तसेच, सोंग किंवा आव आणून करण्याचीही ती गोष्ट नव्हे. निखळ प्रचिती, प्रच्छन्न उपरती आणि प्राणांतिक अनुभूती या शिवाय कविता साधणे (आणि लाभणे!) अशक्य. आज अशाच काही प्रत्ययांमुळे ही 'मना'च्या कोपऱ्यात दडी मारून बसलेली कविता ठसठसलीं असावी.

असो. विंदांच्या अगदी साध्या शब्दातल्या या निखळ 'प्रापंचिक' अभिव्यक्तीच्या आणि आपल्या अनुभूतीच्या मध्ये फार जागा न अडवता सादर आहे,,,

‘उपयोग काय त्याचा ?’

शब्दांत भाव नाही, ना वेध अनुभवाचा ; 
रचना सुरेख झाली ! उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले ;
नवरी पळून गेली ! उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी, सुग्रास अन्न झाले ;
अरसिक जेवणारे, उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना, शस्त्रे सुसज्ज झाली ;
नेता कचखाऊ निघाला, उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले, झाली दिगंत कीर्ती ;
स्नेही न एक लाभे ! उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले, सगळीकडे सुबत्ता ;
स्वातंत्र्य फक्त नुरले ! उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक, यात्रा कित्त्येक केल्या ;
शांती न प्राप्त होता, उपयोग काय त्याचा ?

विंदा करंदीकर

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

अभ्यंग...!

गंध दरवळता आसमंती

सुरमई पहाट सोनपिवळी

अभ्यंगाचा स्पर्श मखमली 

देई नात्या नवी झळाळी !

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

पुरुषोत्तम वैगरे...

२२. अति तिथं माती

(चक्रमादित्य महाराजांचा दरबार. महाराज प्रवेश करतात.)
सेवक : समशेरबहाद्दर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जयजयकार असो’ 
(सर्वजण जयजयकार करतात.) आस्ते कदम महाराज... आस्ते कदम... 
महाराज : (सिंहासनावर बसून) बसा मंडळी, बसा. (प्रधानास) काय प्रधानजी, 
कशी काय आहे राज्याची हालहवाल ?
प्रधानजी : (हात जोडून) आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत.
श्रीमंत लोक सुखात आहेत.
महाराज : छान ! उत्कृष्ट ! बरं, चोरीमारी वगैरे ?
प्रधानजी :  छे ! कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत.
महाराज : फारच छान. बरं, रोगराई वगैरे ?
प्रधानजी : बिलकुल नाही ! चार-दोन साथीचे रोग आले. त्यांत शे-पाचशे माणसे गेली.
बाकी सगळे जिवंत आहेत.
महाराज : वा ! वा ! प्रधानजी, आमच्या राज्याची हालहवाल एकूण उत्तम आहे म्हणायची !
बर. आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता ?
प्रधानजी : एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत. त्यांच गाण ऐकावं सरकार. 
महाराज : त्यांच नाव काय म्हणालात ?
प्रधानजी : गानसेन.
महाराज : बरं बरं, बोलवा त्यांना. 
(गवईबुवा येतात. नमस्कार करतात.)
गवई : महाराजांचा विजय असो !
महाराज : गवईबुवा, तुम्हांला काय येतं ? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता ?
नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा.
गवई : महाराज, मी वादक नाही. गवई आहे. संगीत गातो.
महाराज : बरं बरं, म्हणा काहीतरी.
(गवईबुवा मांडी घालून बसतात. हातवारे करून बेसूर आवाजात एक गाणे म्हणतात. महाराज खूश होतात)
महाराज : वा ! गवईबुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस
पाहिजे ?
गवई : महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत.
संगीतकलेसाठी काहीतरी करा.
महाराज : अवश्य, अवश्य ! काय बरं करावं? (विचार करतात. मग टाळी वाजवून)
हां, कल्पना सुचली, प्रधानजी-
प्रधानजी : आज्ञा महाराज.
महाराज : संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे.आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा –
आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. कुणीही साधं बोलायचं नाही.
सगळं गातगातच बोललं पाहिजे.
प्रधानजी : ठीक आहे, सरकार.
महाराज : जो कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा.
मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून
लिहून घ्या.
प्रधानजी : आत्ताच दवंडी दयायची व्यवस्था करतो.
(हळूहळू रंगमंचावर अंधार होतो. त्या अंधारातच प्रथम दवंडीचा आवाज व नंतर दवंडीवाल्याचे गाण्यात
ओरडणे ऐकू येऊ लागते.)
दवंडीवाला : (गाण्याच्या चालीवर)
ऐका हो तुम्हि ऐका !
ऐका हो ऐका !!
आजपासुनी सर्व बोलणे,
 व्हावे केवळ गाणे गाणे.
 केवळ गाणे आणि तराणे,
 चालणार नच इतर फलाणे.
 राजाज्ञा जो मोडिल कोणी,
 देउ सुळावर त्यास तत्क्षणी.
 ऐका हो तुम्हि ऐका !!
 (दवंडी संपते. रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारेकरी हातांत भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात.)
पहिला : (हसत) छे छे ! हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा !
जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गाताहेत. साध बोलणं नाहीच कुठे.
दुसरा : महाराजांची आज्ञा आहे ना ! कोण मोडणार ?
पहिला : काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे । त्यांनीसुद्धा गायचं म्हणजे काय हे !
दुसरा : लोक अगदी त्रासून गेले आहेत.
पहिला : शू
 ! कुणी गद्य बोललं, तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपणसुद्धा नाही बोलायचं, 
(गात) गद्य कोण बोलतो, 
त्यास मी पकडतो 
अन् सुळावरी चढवतो.
दुसरा : ए, ते बघ, ती दोघ नवरा-बायको भांडत इकडेच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया.
साधी भांडताहेत की गाण्यातच ?
पहिला : चल तर लवकर.
(दोघे बाजूला उभे राहतात. नवरा घाईघाईने येतो. मागून बायको येऊन त्याचा हात धरते. 
दोघेही गाण्यातच बोलतात.)
बायको : तेल संपले, तूप संपले, मीठ संपले; 
स्वयंपाक आता मी करू कशाचा?
नवरा : (रागावून) ए माझे आई, नकोस खिंकाळू !
हा चाललो बाजाराला,
आणून देतो माल तुला.
बायको : (हातात पिशवी देत) अन् येताना शेर-दोन शेर, 
तुम्ही वांगी आणा छान सुरेख.
नवरा : (बायको गेल्यावर स्वतःशीच गुणगुणत)
आणितो मी तेल, तूप, मीठ, वांगी.
आणखी ती काय सांगी ?
(आठवत आठवत नवरा जातो. दोघेही पहारेकरी हसत हसत पुढे येतात.)
पहिला :  कमाल आहे बुवा ! भांडणसुद्धा गाण्यात करायचं !
दुसरा : आता है नवरोजी गेले बाजारात. तिथे ही गर्दी माणसांची ! प्रत्येकजण गाण्यातच बोलतोय !
पहिला : खरच, बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही ?
दुसरा : अरे, गंमत म्हणजे काय? नुसती मजा चाललीय मजा ! समज तू दुकानदार अन 
मी गिन्हाईक. मग मी विचारायच – 
(गात) दुकानदारदादा, अहो दुकानदारदादा, तुम्ही कसा दिला कांदा ?
पहिला : (दुकानदाराची नक्कल करत, गात) रुपयास चार शेर रावसाहेब, रुपयास चार शेर..
दुसरा : (गात) दया तर आम्हा एकच शेर, घालू नका हो कचराकेर.
पहिला : (गात) माल अमुचा पांढराफेक, कांदे किती हे स्वच्छ सुरेख !
दुसरा : (गात) चार आणे नाहीत फार, मांडून ठेवा आज उधार.
पहिला :  (गात) नाही नाही, नाही चालणार, आज रोख उद्या उधार.
(दोघेही खूप हसतात. मग नेहमीच्या आवाजात बोलतात.)
पहिला :  कारे, बाजारात ही गंमत! मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल ?
दुसरा : राजवाड्यात? अरे, तिथे तर साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत! सगळं रागदारीत चाललंय.
पहिला :  चल, तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे. चल, चल लवकर. 
(‘गद्य कोण बोलतो’ हे गाणे म्हणत दोघेही जातात. रंगभूमीवर थोडा वेळ अंधार. मग राजवाडा दिसतो.
लोक महाराजांचा गाण्यात जयजयकार करत आहेत- जयजयकार महान, आपुला जयजयकार महान.)
महाराज :  (गाणे म्हणत प्रवेश करतात.) आलो आलो मी. राणी कुठे आमची ?
राणी : (गात) ही इथे महाराज मी.
महाराज : (गात) आज तुझे तोंड सुकले कशाने ?
राणी : (गात) या पडशाने मज गांजियले.
(सटासट शिंकते.)
महाराज : (गात गात आज्ञा करतात.) जा जा जा झणी घेऊन या वैद्या.
(एक सेवक ‘महाराज, महाराज’ अशा गाण्यातील हाका ऐकू येतात.)
महाराज : (घाबरून गातात) अरेऽऽ काय झालेऽऽ ?
सेवक : (गडबडीने प्रवेश करून गातो.) महाराजऽऽऽ प्रधानजी
महाराज : (गात) अरेऽऽ, काय झालं ? बोल लवकरी.
सेवक : (गात व ताना घेत) महाराजऽऽ
महाराज : (गात) अरे बोल ना झडकरी
सेवक : (गात) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (गात) पुढे बोल गद्ध्याऽऽ
सेवक : (ताना घेत तीच ती ओळ घोळून घोळून म्हणतो) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (चिडून नेहमीच्या सुरात) आता बोलतोस लवकर का मुंडकं उडवू तुझं ?
सेवक : (गातगातच) आपुला प्रिय राजवाडा, जळुनि खाक झाला.
महाराज : (घाबरून) काय ? माझा राजवाडा जळला? मेलो, ठार मेलो मी, अन् मूर्खा,
तू हे आता सांगतोस ?
सेवक : (नेहमीच्या आवाजात) क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना सगळं
गाण्यात सांगायचं म्हणून. 
महाराज : खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी - (प्रधानजी समोर येतात.) प्रधानजी, लोकांना
म्हणावं नेहमीप्रमाणे बोला.
प्रधानजी : जशी आज्ञा सरकार राजवाडा सुखरूप आहे आपला. थोडक्यात वाचला.
आग विझवली.
महाराज : फारच छान, उत्कृष्ट ! आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला. 
हे पाहा, आता जो कोणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल, अशी दवंडी लगेच पिटवा.
प्रधानजी : हां हां महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा । क्षमा असावी. 
महाराज, आपण ही आज्ञा परत घेतलीत तर उपकार होतील. नाहीतर अति तिथं माती होईल.
महाराज : शाबास प्रधानजी, पटल आम्हांला रद्द केली आम्ही आमची आज्ञा, खरं आहे तुमचं, 
अति तिथं माती आहे… कुणी बरं म्हटलंय ?
प्रधानजी : पण आज्ञा रद्द झाली ना ?
महाराज : झाली म्हणजे काय? झालीच !
– द. मा. मिरासदार

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

आवाहन...!

खेड्यामधले घर कौलारू...! गौरी देखावा: वैभव पुराणिक, नासिक

अंगणी तुडुंब विहीर, दारी तुळशीवृंदावन हवे
जगण्याच्या उर्मीला पडावे दररोज स्वप्न नवे...!

परसाच्या आंब्याचे तोरण प्रवेशद्वारी सजू दे
स्वागताच्या रांगोळीची संस्कृती मनी रुजू दे...!

गणगोत सारा भेटो पुन्हा एकाच हाके सरशी
झुलो लगडून झोपाळा बसण्या थंडगार फरशी...!

असू दे जगणे आधुनिक पण सुटू नये गाव
सापडू दे माणसां पुन्हा आत दडलेला भाव...!

'व्हॉट्सॲप'वाल्या पिढीला शुभंकरोती शिकव
'थ्री बीएचके विथ टेरेस' आईबापासह टिकव...!

माणसाला माणूस कधीही होऊ नये पारखा
शेजार लाभो सर्वां जीवाभावाच्या मित्रासारखा...!

नेत्यांना सुबुद्धी दे करण्या समाजकारणाचा गजर
दिशा कितीही दाटल्या तरी स्वच्छ राहू दे नजर...!

द्वेष सरो, स्नेह ऊरो, हीन सारे जळू दे
जगण्याचे मर्म खरे माणसांला कळू दे...!

एवढीच तुज विनवणी अन् एवढेच तू दान दे
उद्यामागे धावणाऱ्यां थोडे आजचे भान दे...!

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

संचित...!

 चित्र:  वैभव  पुराणिक, नासिक

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

चष्मा एका प्रतलाचा
रंग अनेक अदृष्य
भान राखून मितींचे
मौनातून व्हावे भाष्य

काय देणे काय घेणे
हिशोबाची वही बंद
संचिताच्या मार्गावर
चालण्याचा उरो छंद

चोरवाटा आडवाटा
विसरुनी हेवेदावे
संवेदना जागवून
स्वत:कडे परतावे

मन आत्मा की शरीर
कोठे शोधावे मीपण ?
अज्ञाताच्या वाटेवर
सारे प्रवासी आपण

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

 शब्द: दिनेश चंद्रात्रे, धुळे

वाढदिवसाचे औचित्य साधून आपापल्या भावनांना चित्राक्षरांचा साज चढविणाऱ्या
सन्मित्रांच्या या भावगर्भ, अर्थगर्भ, सूचक तथा समर्पक अभिव्यक्तींनी
माझा अर्धशतकोत्तर प्रथम वाढदिवस अधिकच समृद्ध आणि सुफल झाला नसता तरच नवल...!
बालमित्रांच्या 'आभाराचा भार कशाला...?' नाही का गुरुजी ?

सादर प्रणाम !

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

कृष्णसखा...!

चित्र सौजन्य: वैभव पुराणिक, नासिक 

पंचेंद्रियरुपी पांडवांना
षडरिपूंच्या कौरवांशी लढतांना
सगळ्यात अवघड युद्ध
लढावे लागते ते कर्णाशी
कारण...
कायम उपेक्षल्याने
आत्म्याच्या अतृप्त वासनांना
आणि मनस्वी दुखावल्याने
मैत्रीच्या कोंदणात
विखार जोपासणाऱ्या
धुरंधराला जिंकणे सोपे नसते,
विवेकी सारथ्याशिवाय !
म्हणूनच...
विकार सांभाळायला
आणि कर्णाचा अर्जुन व्हायला,
सख्याच्या रुपातला
कृष्ण भेटायला हवा,
कृष्ण भेटायलाच हवा...!

जन्माष्टमीच्या शुभेच्छा...!