शुक्रवार, १७ जुलै, २०१५

बायोस्कोप… आमचाही!


आज 'बायोस्कोप - चार दिग्दर्शक, चार कवी, एक चित्रपट' हा मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच आणि त्या कल्पनेइतकाच काव्यात्म, भावगर्भ आणि 'गुलजार' दृश्यानुभव मराठी 'कवी-मना'ला भुरळ घालून गेला. त्या निमित्ताने बऱ्याच आधी लिहून ठेवलेल्या चार अनवट रचना 'इत्यादी' वर पोस्ट कराव्याशा वाटल्या. का… कुणास ठाऊक? उत्तरचं तर शोधतोय…


हे कबीरा…!

लाभ हो जाये लोभ
राग का होता रोग
जोड दिया गर भाग में
तो बन जाता भोग I

आस बन जाये ओस
बाल कहने लगे बोल
जुट जाये जब आमसे
तो कहलाता ओम I

एक मात्रा का खेल है
अर्थ दिये पलटाये I
छोटीसी लकीर दे
रामको रोम में मिलाये II


मना रे…!

मनाला न कळे मना काय हवे
शोधू जाता हाती रोज विश्व नवे …

मनाचे ओझे मनाचाच भार
रोजच्या द्वंद्वात नित्य जीत हार…

मनाच्या महाली मनाचीच सभा
नितिसवे पहाऱ्या विवेकही उभा…

मनाची प्रज्ञा मनाचेच खूळ
मायेच्या साऱ्या हेच एक मूळ…

मनाच्या आभाळात मनाचीच झेप
अनादी अनंतात उगाच एक खेप…

मनाच्या समाधाना मनाची कविता
कधी मेघदूत कधी भगवद्गीता…!


पावसाचे गाणे

पावसाच्या सरी
पावसाचे गाणे…
भुई-नभाचे जणू
माय-लेकाचे नाते I

पाऊस चिंब ओला
पाऊस थेंब-थेंबी…
सृष्टी ओली-हिरवी
पावसाचे गीत गाते I

पाऊस ग गारुडी
पाऊस धुंद-फुंद…
तन-मन निथळता
वय लया जाते…!


गझल

क्षण गोठून रहाता दिवस निघून गेले
दु:खाची भरली पिंपे, सुख रिचून गेले  IIधृ II

सांगेन म्हणे मी कथा माझ्या व्यथांची
पण ओठांवरती का शब्द थिजून गेले  II१ II

मी विणतो रोज ठिगळे ज्या गोधडीची
उसवल्या धाग्यांचे ते वस्त्र विरून गेले  II२ II

मलाच ना उमगली का रीत जगण्याची
त्यांच्या पटावर फासे अन फिरून गेले  II३ II

मरणाची माझ्या पसरली ती अफवाच होती
तरीही जे माझे होते, डोळे भिजून गेले  II४ II

भेटतो जो जो तिला तो परतून येत नाही
अशा मुक्तीच्या वाटेवर जगणे शिणून गेले  II५ II

सुखाचीच होती बाधा जणू जीवाला
दु:ख आपले होते, रंध्री भिनून गेले  II६ II

बुध्दी-विवेकाचे हरघडी द्वंद्व विचाराशी
मन ओढाळ होते म्हणूनी रिझून गेले  II७ II

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा