गुरुवार, दि. ४ जानेवारी २०१७च्या पुणे टाइम्स पुरवणीत 'मुलगी वाढवतांना...' या शीर्षकाखाली केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून सदर विषयातील आमची भूमिका व अनुभव पुणे टाईम्स टीमला इमेलद्वारा पाठविले होते, ते शनिवार, दि. १३ जानेवारी २०१८ च्या पुणे टाइम्स पुरवणीत संपादित स्वरुपात असे प्रकाशित झालेत...
तथापि अतिरिक्त संपादनाने मूळ लिखाणाचा बराचसा गाभा हरविला असे वाटल्याने आम्ही तसे मटा पुणे टाईम्स टीम व संपादकांना इमेलने कळविले परंतु त्यांस या क्षणापर्यंत तरी काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्हाला अनेक हितचिंतकांनी अभिनंदनाचे फोन / मेसेज केले असता झाला प्रकार आम्ही सांगितला तेंव्हा बहुतेकांनी मूळ लिखाण वाचण्याची इच्छा दर्शवली म्हणून मूळ लेख येथे देत आहोत. मटामधील छापील मजकुरावरील आपल्या अत्यंत मनस्वी व प्रेरणादायी प्रतिक्रियांबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत, मूळ लिखाणाबद्दलची आपली मते जाणून घ्यायला देखील आम्हाला आवडेल...
ती...
माझ्या शालेय जीवनात जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा इतिहासातील आणि वर्तमानातील इंदिरा गांधी या स्त्रियांच्या अलौकिक कर्तुत्वामुळे माझ्या मनात स्त्री विषयी आत्यंतिक आदरभाव तयार होण्यास मदत झाली. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशा बोधवचनांनी संस्कारक्षम मनाची मशागत केली. माझ्या स्वत:च्या आयुष्यात आई ते पत्नी अशा विविध भूमिकात माझी काळजी घेणाऱ्या सर्वच स्त्रियांची सहनशक्ती, कामाचा उरक आणि पुरुषांच्या तुलनेत पदोपदी जाणवणारी जगण्याची शहाणीव या सगळ्याचा एकत्रित परिणाम माझ्या स्त्री-विषयक मानसिक जडणघडणीत झाला. परिणामी मी, प्रेमात देखील पडण्यापूर्वी, एक निर्णय पक्का करून टाकला कि मला एकच अपत्य असेल आणि ती मुलगीच असेल! माझ्या सखी सहचरणीने स्त्री-सुलभ समजूतदारपणाने म्हणा किंवा उदारमतवादाच्या परंपरेने म्हणा, या विचाराला सहर्ष अनुमोदन देवून माझा दृढनिश्चय अधिकच बळकट केला! एवढी पार्श्वभूमी लाभलेल्या माझ्या मन:शक्तीला आव्हान देण्याचे धाडस न करता नियतीने माझी आंतरिक तळमळ ओळखून मला कन्यारत्नानेच सन्मानित केले!
माझ्या मुलीच्या जन्माप्रीत्यर्थ ‘पेढे’ वाटणाऱ्या मला जगरहाटीची मुळीच समज नाही हे प्रसूतिगृहातील अनुभवी परिचारिकेने तेथेच जाहीर करून टाकले! या क्रौंच पक्ष्याच्या रूपकाने मानवी साखळी अखंडित ठेवणाऱ्या समाज प्रतिनिधीच्या प्रतिक्रियेने, माझा आधीच दृढ असलेला निश्चय ‘वज्रादपि कठोर’ झाला आणि माझ्या नवजात कुलदिपिकेप्रती पहिल्या क्षणापासून ‘मृदुनि कुसुमादपि’ ठरला. अशा मनोभूमिकेतून जन्मलेल्या माझ्या वारसाला ‘मुलींसारखे’ वाढवण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात म्हणून तिला केस छोटे करून मुलाचे कपडे घालणे असले भंपक प्रकार आम्हाला कधीही करावेसे वाटले नाही. उलट तिच्या लांब केसांच्या दोन शेंड्या बांधण्यात मला जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय होता आणि तिच्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे डिझायनर कपडे शिवण्याचा तिच्या आईचा उत्साह, ती आज कॉलेजला गेली तरी कमी झालेला नाही. दहावी आणि बारावी अशा दोन्ही पातळीवर नव्वदच्या पुढे मार्क मिळवून देखील कला शाखा निवडून, तत्वज्ञान विषयात प्रथम येणे आणि वयाच्या १९ व्या वर्षी, स्वत:च्या महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर काही सेवाभावी संस्थांच्या समाजकार्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणे, पुरुषही हाताळायला कचरतात अशा ‘एलजीबीटीक्यू’सारख्या संवेदनशील विषयांवर प्रबोधनपर माहितीपट बनविणे किंवा ‘लैंगिक अत्याचार विरोधी समितीचे कार्य’ अशा जाणीव जागृतीसाठी पथनाट्य सादर करणे, भरत नाट्यम शिकणे – जर्मन शिकविणे, गडकिल्ल्यांच्या ट्रेकच्या निमित्ताने रानोमाळ भटकंती करणे आणि यातून वेळ मिळेल तेव्हा घरी धावती भेट देणे – हे सगळे ती तिच्या चॉइसने आणि स्वत:च्या हिमतीवर करते याचे कारण तिला मिळणारा अवकाश!
‘प्रत्येक जीव हा स्वयंभू असतो आणि त्याने आपल्या क्षमतांचे पूर्ण विकसन करून आपले जीवित कार्य अत्यंत निष्ठेने करीत समाजाच्या घडणीत आणि राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान द्यावे’ हा गर्भसंस्कार झालेली माझी मुलगी आज मलाच, ‘एलजीबीटीक्यू’मधील बारकावे, ‘ह्युमन सायकॉलॉजी’चे कंगोरे समजवून सांगतांना, ‘जेन्डर डीस्क्रीमिनेशन’ वर तावातावाने बोलते तेव्हा एक वर्तुळ पूर्ण होतेय असा अत्यंत सार्थक भाव मनाचा कोपरा उजळतो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा