बुद्धिबळाच्या खेळात प्यादी मरण्यासाठी असतात
आणि हत्ती-घोडे-उंट लढण्यासाठी मात्र वजीर राजाला वाचविण्यासाठी असतो कारण राजा
स्थानबद्ध असला तरी पटावरचा सर्वोच्च पदाधिकारी असतो. वजीराचे काम बहुआयामी
असल्याने त्याची प्रतिभाही बहुमुखी असते आणि धूर्तपणा, मुत्सद्देगिरी आणि चलाखी हे
त्याचे स्थायीभाव असणे क्रमप्राप्तच असते. एवंगुणविशिष्ट व्यक्तित्व हे विचारी आणि
विखारी असणे नीतीला धरूनच असल्याने ते जसे रणनीती आखून शत्रूचा पाडाव महालात बसून
करू शकते तसेच प्रसंगी राजसत्ता देखील पलटवू शकते हे ध्यानात ठेवणे उचित.
बुद्धिबळात जिंकण्यासाठी वजीराला नामोहरम करून राजाला चेकमेट करावे लागते, हत्ती
मारूनही फारसे काही हाती लागत नाही तिथे एकदोन प्याद्यांची काय पत्रास? एक चाल
पुढे सरकल्याने, अभेद्य वाटणाऱ्या शत्रूच्या भिंतीला त्यानिमित्ताने भगदाड तर पडले
एवढ्या माफक यशाचे सीमित समाधान मानणे अवाजवी नसले तरी ‘दिल्ली अभी बहुत दूर
है...!’ याचे सतत भान बाळगणे जास्त आवश्यक आहे...
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या (गुन्हा अजून सिद्ध व्हायचा
असल्याने – संशयीत) मारेकऱ्यांना अटक हे वृत्त वाचले आणि डॉक्टरांच्या हत्येच्या
केसचा तपास कासवगतीने का होईना सुरु आहे आणि पाच वर्षांनी का असेना मारेकरी सापडले
याचे समाधान असले तरी प्याद्यांनीच पाच वर्षे खिंड लढवली असेल तर वजीर कधी हाती
लागणार ही बाब चिंतनीय खरीच! अर्थात राज्यघटनेच्या चौकटीत राहून संपूर्णत:
संवैधानिक मार्गाने न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा आणि त्यातील दिरंगाईचा शांततापूर्वक
निषेध करण्याचा मुलभूत हक्क घटनेनेच दिला असल्याने अंधश्रद्धेचे भूत उतरविण्यासाठी
प्रयत्नशील राहण्यास ना कुठल्या मांत्रिकाची गरज आहे ना मंत्र-तंत्राची, स्वतंत्र
भारताचा स्वयं-प्रज्ञ नागरिक असणे आणि आपल्या सामाजिक कर्तव्यांसह मुलभूत हक्कांचीही
जाणीव असणे पुरेसे आहे.
डॉक्टरांच्या हत्येला २ वर्षे पूर्ण होऊनही तपासात काहीच प्रगती नव्हती तेव्हा मी माझ्या इंग्रजी ब्लॉगवर लिहिलेली पोस्ट इथे वाचू शकता - Justice.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा