रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

वय...?

Disclaimer: The video is used for conceptual purpose and the creativity about the concept of 'AGE' only. 
The Blogger has no intention, expectation from or relation with the brand endorsed in this commercial.

‘Sir if you don’t mind me asking… how old are you?’

कानाच्या आजूबाजूचे, दाढी-मिशीत लपू न शकणारे आणि दुर्गम ठिकाणी असल्याने ‘डाय’ करतांना सराईत चोराच्या शिताफीने ब्रशच्या फटकाऱ्यातून अलगद निसटणारे, ‘धुपमें सफेद’ न केलेले केस चेहऱ्यावर वागवणाऱ्या कुठल्याही मर्त्य मनुष्याची या प्रश्नातून सुटका नाही! विशेषत: जेव्हा तो ‘त्याच्या वयाला न शोभेलसे’ आणि ज्यांनी त्या गोष्टी करण्याचा जणू काही मक्ताच घेतलाय अशा तरुणाईला नको त्या धाडसांनी आवाहन आणि आव्हानही देत असतो. काही छिद्रान्वेषी (माझा एक ‘चिरतरुण’ सन्मित्र यासाठी विशिष्ट खान्देशी विशेषण वापरतो, ते येथे देणे कदाचित अप्रस्तुत ठरावे!) लोक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना हमखास ‘किती वर्षांचा घोडा झालास रे...?’ अशी प्रेमळ आणि त्यांची प्रसंगोत्पात विनोदबुद्धी दर्शविणारी विचारणा करतात. (हे ‘मार्मिक’ लोक असा प्रश्न ‘घोडी’लाही विचारतात का माहीत नाही, अधिक अभ्यास हवा!) त्यामागे त्यांची तुमच्याबद्दलची आपुलकी, माया आणि स्नेहच ‘दाखवायचा’ असला तरी अशावेळी मला, कुणी महत्त्वाकांक्षेने आणि हौसेने घेतलेली गाडी दाखवायला आणि पेढे द्यायला आला तर ‘हल्ली पेट्रोल केवढ महाग झालंय आणि प्रदूषण तर विचारूच नका...!’ म्हणणारे बर्वे काका आठवतात. असो.

मुद्दा असा की, तुम्हाला तुमचा वाढदिवस आठवतो का? आता हा काय प्रश्न झाला, असे तुम्ही म्हणाल. पण तसं नव्हे, प्रत्येक वाढदिवस आठवतो? हां, याला म्हणतात गुगली... की दुसरा? बरं ते विसरा आणि आठवा प्रत्येक वाढदिवस. आईबाबांनी नवीन कपडे, बूट आणले तो वाढदिवस आठवतो, खुपसारे गिफ्ट मिळाले तो वाढदिवस आठवतो, खूप मित्रांनी जमून वाढदिवस साजरा केला तो आठवतो, तिने रात्रभर जागून तुमच्या वाढदिवसासाठी ‘खास’ भेटवस्तू बनवली किंवा दिवसभर खपून खास ‘तुमच्या आवडीचा’ पदार्थ बनवला तो आठवतो, आउटींगला जाऊन वर्षासहल करीत साजरा केलेला वाढदिवस आठवतो की विपश्यना करून साजरा केलेला? हे थोडेसे वानगीदाखल प्रकार झाले, असे अजून पुष्कळ माझ्या आठवणींच्या पोतडीत आहेत. आणि यातील प्रत्येक वाढदिवस संस्मरणीय, अविस्मरणीय आहे. तरी देखील एवढे पुरेसे नाही म्हणून की काय, ‘देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी...’ याचाच प्रत्यय दरवर्षी येतो आणि आयुष्यात खरंच एका वर्षाची वाढ झाली आहे, घट नव्हे याचा अत्यंत सुखद अनुभव येतो...

म्हणजे बघा ना... 
तुमचा वाढदिवस ‘लागला’ त्या दिवशी मध्यरात्र उलटल्यावर साधारण दीड वाजता शुभेच्छा देणारा ‘पहिला मानाचा गणपती मीच’ असा पुणेरी मित्र तुम्हाला आहे? 
एरवीही बनविण्यास अत्यंत किचकट आणि वेळखाऊ, दुसऱ्या एका ‘वारकरी’ सन्मित्राच्या भाषेत ‘फार उस्तवार करायला लागते...’ अशा ‘सुरळीच्या वड्या’ हेच नेमकं तुमचं ‘पक्वान्न’ असल्याने त्याचाच भोग लावायचा म्हणून तुम्हाला सकाळी नाश्त्याला मिळते?


साधारण डझनभर फोन कॉलवर तुम्ही सरासरी प्रत्येकी २५ मिनिटे असे दिवसभर बोलत असता आणि त्यातही तुमच्या प्रबोधनाचा किंवा, ‘आता तरी वयाला शोभेलसे वाग...’ असा सूर न लागता तुमच्या गुणदोषांसह तुम्ही प्रिय आणि ‘हवे’ आहात हे ऐकायला मिळते? 
‘तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फेसबुकने किंवा डायरीने आठवण करून देण्याची गरज नाही, तुझ्याप्रमाणेच तुझा वाढदिवसही डोक्यात जातो...’ अशी तारीफ वजा टोमणा देणारा प्रच्छन्न मेसेज तुम्हाला येतो...? 
बरं, मेसेजवरून आठवलं, तुम्हाला पहाटे पहाटे वाढदिवसाच्या शुभेच्छांचा एसेमेस (SMS) अजूनही येतो...? 
आणि रात्री पावणेबाराला, ‘झोपला नाहीस ना बे, अजून १५ मिंट आहेत तेव्हा आपण एकदम वेळेत फोन केलाय xxxx’ असा रात्रीची नित्योपासना करणारा मित्र ‘श्रावण आहे’ म्हणून फोनवर कावलेला तुम्ही ऐकलाय...? 
सकाळच्या सुरळीच्या वड्या कमी होत्या की काय म्हणून स्वत:च्या बेकिंग स्किल्सला धार चढवत ‘जस्ट केक्स’च्या तोंडात मारेल असा होममेड केक सजविण्यात किचनमध्ये रमलेल्या मायलेकी बघितल्यात...?


आईला आपलं मूल कसही असलं तरी चांगलंच वाटत या भाबड्या नैसर्गिक न्यायाने सुनेच्या स्टेट्स मध्ये ‘मेनी शेड्स ऑफ हसबंड’ ठेवणाऱ्या बायकोला, ‘माझा मुलगा रुबाबदार आहे म्हणूनच तुला आवडला ना...’ असं विचारणाऱ्या सासूच्या भावनेतली माया बघायची, प्रौढी किंवा अतिशयोक्ती नाही! 
आणि सगळ्या सोहळ्याचे मूक साक्षीदार न होता, प्रत्येक क्षण आपल्या स्मार्टफोनमध्ये टिपतांना अखंड कॉमेंट्री करणारे आणि ताबडतोब ते फोटो ग्रुपवर टाकून किती लोकांनी लाईक केले आणि काय कॉमेंट्स केल्या हे लहान मुलाच्या कुतुहलाने बघणारे आणि आईनेही ते लगेच बघावे म्हणून हट्ट करणारे वडील किती लोकांना लाभले असतील...? 
केरळ पूर-पीडितांच्या मदतकार्यातून वेळ काढून, या सर्व विविधगुणदर्शन कार्यक्रमाचे संयोजन, सुत्रसंचलन करण्याबरोबरच आपल्याही सगळ्या मित्रमैत्रिणींच्या शुभेच्छा देखील आपल्या बाबांना पोहचविणाऱ्या आणि लीलया मल्टीटास्कींग करणाऱ्या कुलदिपिकेबद्दल सांगावे तितके कमीच...! 

हे झाले प्रत्यक्ष जगातील चालत्या बोलत्या, याची देही याची डोळा प्रचीती घेता येणाऱ्या सुहृदांचे; आभासी, व्हर्च्युअल जगाचे अर्थात सोशल मिडियाचे काय सांगावे? त्यावरील सगळ्या शुभेच्छांची गणती शेकड्यांनीच होईल. आणि त्यात वैविध्यही किती...? केवळ संबोधनाचेच दहा प्रकार! अगदी सर, साहेब, ‘जी’ पासून थेट भाई, 'दा' आणि काकापर्यंत. नशीब कुणी 'मामा' केला नाही, नाही तर माझाही सचिन कुंडलकर झाला असता. कुणी शॉर्टकटमध्ये HBD करून विषय संपवतो तर कुणी मुक्त मनाने आभाळभर शुभेच्छा देऊन 'हमारीही मुठ्ठीमें आकाश सारा...!'ची ग्वाही देतो. कुणी शुभेच्छा द्यायला उशीर झाला म्हणून 'बी लेटेड' अशी फोड करून 'संधी' घालवतो तर कुणी केवळ व्यक्तीलाच नाही तर त्याच्या परिवारालाही आपल्या अभीष्टचिंतनात स्थान देतो. बाकी गुरुवर्यांकडुन फेसबुकवर शुभेच्छा मिळण्याला कृतार्थता म्हणत नसतील तर कशाला म्हणावं...? 


बाय द वे, ‘दुर्लभं भारते जन्म मानुष्यं तत्र दुर्लभम्।।‘ या शास्त्रवचनाचा अर्थ ‘मुळात भारतात जन्माला येणे दुर्लभ आहे आणि त्यातही मनुष्य जन्म मिळणे तर अतिदुर्लभ’ असा असण्याचे कारण म्हणजे भारतात जन्म घेण्याचे अनेकविध फायदे अर्थात प्रीव्हीलेजेस आहेत. यातील एक छोटासा अत्यंत स्वार्थमूलक फायदा म्हणजे इथे जन्मलेल्या प्रत्येक मनुष्यास दोन वाढदिवस साजरे करण्याची संधी मिळते – तारखेने आणि तिथीने! तसंही, 'प्रत्येक माणूस दोनदा जन्मतो - पहिल्यांदा तो जन्म घेतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा 'कशासाठी?' हे त्याला उमजते तेव्हा' अशा तत्वज्ञानाची ही पुण्यभूमी. त्यामुळे हे सगळे रामायण झाले ते कालच्या तारखेने येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तिथीने पुढच्या महिन्यात येणाऱ्या आणि जन्माचे प्रयोजन आणि कोहं चे उत्तर देणाऱ्या जन्मदिवसाचे महाभारत (की मेघदूत?) अजून घडायचे आहे. अर्थात त्याबद्दल एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण मिळणार नाही कारण मुळात तिथीने वाढदिवस लक्षात ठेवणारी आणि त्याच दिवशी औक्षण करून पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा अट्टाहास करणारी पिढी, सोशल मिडीयावर नसल्याने, लवकरच प्रलुप्त (extinct) होण्याच्या मार्गावर आहे!


नमनाला घडाभर तेल म्हणतात, इथे गाडाभर अगोदरच खर्ची पडलयं तेव्हा आटोपते घ्यावे हे उत्तम. आधीच्या पोस्टमध्ये ‘समारोप’ केला होताच, आजचे हे आभार प्रदर्शनाचे ‘गोड’ काम! अलीकडे फार तरुण वयात सुद्धा डायबेटीसचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने बहुतेक मंडळी ‘गोड’ कार्यक्रम टाळून उत्सवमूर्तीच्या मागे लागतात हा अनुभव ताजा आहे. तेव्हा मुळात समारोपालाच जिथे शुकशुकाट झाला तिथे आभार प्रदर्शन फार ताणू नये एवढी प्रगल्भता वाढत्या वयाने आली नाही तर व्यर्थ तो ‘वाढ’दिवस!

एरवी जगाच्या एकंदर परिस्थितीबद्दल आणि प्रेम, बंधुभाव, संवेदनशीलता, सहवेदना असल्या मुलभूत मानवी गुणवैशिष्ट्यांच्या ऱ्हासाबद्दल चिंतीत असणारा मी, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या या विश्वरूप विराट दर्शनाने कमालीचा सुखावलो आणि भारावलो याचे सारे श्रेय माझ्या सर्व स्नेही-सुहृदांचे, अर्थात तुम्हा सगळ्यांचे! यातील प्रत्येकाचा उल्लेख येथे शक्य नसला तरी कधी संधी मिळाली आणि तेवढा प्रतिभाविस्तार झालाच तर मला देखील माझे हे सारे ‘गणगोत’ जगासमोर आणायला निश्चितच आवडेल. आजच्या आभार प्रदर्शनात ज्यांचा सूचक उल्लेख झाला त्यांचा त्यांना आणि इतर संबंधितांना उमजला असेलच... यथावकाश सगळ्यांचाच होईल याची खात्री बाळगावी...! एकूणात काय आज मला मी खूपच श्रीमंत असल्यासारखे वाटते आहे आणि सुरवातीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून,

‘I am A Grateful LIFE and Hundreds of Relations Old and a Very Long Way to Go By All Means…!’ असे सांगावेसे वाटते…

प्रपंच या मराठी चित्रपटासाठी गीतकार ग. दि. माडगुळकर यांची ही फारशी प्रकाशात न आलेली रचना, या निमित्ताने...

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी...!

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी...!

महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविणारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी...!

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण ही न लगे, न लगे पस्तावाची पाळी 
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा