गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

दशानन...!


आज विजयादशमी, दसरा – दीपावली नामे तेजाच्या उत्सवाचे पहिले पाऊल! महिषासुरमर्दीनीने असुराचा, रामाने रावणाचा वध केला, पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली आपापली शस्त्रे पुन्हा धारण केली आणि कौत्साने आपले गुरु वरतंतू यांच्या गुरुदक्षीणेच्या अपेक्षेची पूर्तता केली अशा विविध धार्मिक, पौराणिक, अलौकिक धारणांचा संदर्भ असलेला, हिंदू मान्यतेनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी, एक मुहूर्त.

तथापि आजच्या संदर्भात या सर्व संकल्पनांचा सांकेतिक अर्थ लक्षात घेऊन सीमोल्लंघन का व कसे करायचे याचा जरा साक्षेपाने विचार करायला हवा. महिषासुरमर्दिनी, श्रीराम, पांडव आणि कौत्स हे शौर्य, सत्य, न्याय आणि निष्ठा यांची प्रतिके आहेत तर महिषासुर, रावण, कौरव आणि वरतंतू ही क्रौर्य, असत्य, अन्याय आणि दुराभिमान यांची प्रतिके आहेत. या सर्व प्रतीकांमधून जे समान सूत्र सांगितले आहे ते म्हणजे शौर्याचा क्रौर्यावर, सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर, सुष्टांचा दुष्टांवर म्हणजेच नीतीचा अनीतीवर आणि विवेकाचा विकारावर विजय! आणि असा विजय मिळविण्यासाठी आपल्याला ज्या सीमांचे उल्लंघन करावे लागते त्या सीमा म्हणजे आपल्या मनुष्यत्वाने आपल्याला बहाल केलेल्या मर्यादा.

या सर्व अनिष्ट प्रवृत्तींच्या रूपकामध्ये रावणाची दहा तोंडे ही मनुष्याच्या दहा विकारांची प्रतिमाने आहेत – काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, मानस, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यापैकी षडरिपू आपल्या परिचयाचे आहेत परंतु उर्वरित चार सकृतदर्शनी विकार किंवा वैगुण्ये न वाटता सामर्थ्य किंवा गुणवैशिष्ट्ये वाटतात. ती तशी भासतात कारण आपण त्यांचा तसा विचार कधी करीत नाही. आता असे पहा – विकृत मानस, भ्रष्ट बुद्धी, विचलित चित्त आणि विखारी अहंकार, अशा विशेषणांची जोड दिल्यास त्यांच्यातील अनिष्ट भाग त्वरित भासमान होतो. तेव्हा या सर्वच गुणवैशिष्ट्यांच्या सकारात्मक उपयोजनासाठी आवश्यक असतो तो ‘विवेक’!

माझे नाव-गाव-जात-धर्म, माझे कुटुंब-समाज-राज्य-राष्ट्र, माझी इच्छा-आकांक्षा-कामना-महत्वाकांक्षा, माझे सुख-दु:ख-लाभ-हानी, माझे आचार-विचार-निष्ठा-धारणा, माझी मान-मर्यादा-पत-प्रतिष्टा, ही त्या सूक्ष्म षडरीपुंची स्थूल प्रकटने आणि याच मनुष्यत्वाच्या सीमा-मर्यादा ज्यांचे या निमित्ताने, या शुभ मुहुर्तावर उल्लंघन करून विजयोत्सव साजरा करायचा! आपल्याला ज्या दशाननाचा वध करायचा आहे तो बाहेर इतर कुणी नसून या दशरिपूंच्या रूपात आपल्याच आत वसतो आहे आणि त्याचा वध करण्याचा आपला 'रामबाण' आहे विवेक, सद्सद्विवेक - चांगल्या-वाईटाचे भान!

आमच्या लहानपणापासून ‘दसरा’ ज्या आठवणींशी जोडला गेला आहे त्या म्हणजे झेंडूच्या फुलांची तोरणे, सरस्वतीची प्रतीकात्मक रांगोळी आणि तिचे पूजन, नवीन कपडे, गाव वेशीवरच्या देवीचे दर्शन आणि आपट्याच्या पानांना ‘सोने’ मानून त्याचे आदानप्रदान. यातील शेवटच्या ‘विधी’चा ‘शास्त्रार्थ’ आमच्या बालमनालादेखील तत्वत: कधीच पटला नाही आणि त्याचे समर्थन न पटल्याने तो करू नये याकडे नेणतेपणापासूनच असलेला आमचा कल जाणतेपणी दृढ झाला आणि हा ‘विधी’ आमच्या प्रातिनिधिक ‘विजयोत्सवा’तून कायमचा हद्दपार झाला. ‘नवीन कपडे’ हे नव-मूल्य-व्यवस्था आणि ‘एकावर एक (किंवा दोन, तीन) फ्री’च्या चंगळवादात आपले अप्रूप कधीच गमवून बसले तर देवी गाव वेशीवर न रहाता गावाच्या केंद्रस्थानी (आणि दूरदर्शनवरही) आल्याने दर शुक्रवारी दर्शन देवू लागली.

या सर्व संक्रमणात टिकून राहिला तो सरस्वती चिन्हाच्या पूजनाचा संस्कार आणि झेंडू फुलांच्या माळांचा सोपस्कार. आजही दसरा म्हटलं की या दोन गोष्टी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे मन:पटलावर उमटतात आणि आपट्याच्या पानांचा स्पर्श बोटांना जाणवतो.

आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी सवंगड्यांना गळाभेट देवून आणि वडिलधाऱ्यांना पदस्पर्श करून दसऱ्याच्या शुभेच्छा देण्याची एक सुसंकृत पद्धत होती. अलीकडे बऱ्याचशा घरात वडीलधारेच नसतात, खुद्द आपल्याच जन्मदात्यांना ज्येष्ठतेचा मान देण्यात संकोच वाटतो तिथे दुसऱ्याच्या पालकांना वंदनीय मानणे अगदीच ओल्ड फॅशन्ड आणि आप्तेष्ट (म्हणजे काय रे भाऊ?) वगैरेंना भेटण्यास वेळ कुठाय? हर घडी वाढत्या समृद्धीच्या मुदलाचे घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या व्याजाचे देणे कोण देणार...? आणि तसही निरुप'योगी' माणसांना भेटून काय साध्य होणार...? 

तेव्हा म्हणा 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल अनंतकोटी फेसबुक अन ब्रह्माण्डनायक व्हॉट्सॲप महाराज की जय' आणि पाठवा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा अगदी ताबडतोब, विनाखर्च आणि फोनपोच!

कारण, ‘व्हॉट्स ॲप’पे शेअर और 
‘फेसबुक’पे लाईक कर रहे हो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा