शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

दुभंग...!


तेव्हा शाळांमध्ये शिक्षक होते पण मूल्य शिक्षणाचा तास नव्हता,
शिकून शहाणे होत विद्यार्थी अन शिकल्याचा फक्त भास नव्हता.
खडू-फळा, पाटी-पेन्सिल कलाभान शाळेचे अविभाज्य अंग होते,
मनोरंजन कृष्ण धवल असले तरी जगण्यात इंद्रधनुष्यी रंग होते.

सत्यमेव जयतेची जाहिरात नव्हती तो आचरणाचा भाग होता,
अनीती, लबाडी नी मतलबी दांभिकतेचा साऱ्यांनाच राग होता.
ओसंडून वाहणारा पैसा नव्हता पण जगण्याला सुभग अर्थ होता,
माणसे जपतांना क्षुद्र देवघेवीचा व्यावहारिक हिशोब व्यर्थ होता.

एकाच वर्तमानपत्रात सगळ्या वार्ता बातम्यांची मिळायची न्यूज,
दहा दैनिकांमधून कोसळायचे नाही बातमीशून्य अतिरेकी व्हयूज.
दूरदर्शन एकच एक होते जे रोज द्यायचे नेमके संकीर्ण समाचार,
कठपुतळ्यांच्या माध्यमातून चालत नसे चोवीस तास अनाचार.

तेव्हा घरांमध्ये माणसेच असायची
, झाले नव्हते त्यांचे कन्झ्युमर’,
विनोदबुद्धीही भद्र होती बोकाळला नव्हता ओंगाळवाणा हयुमर’.
अर्ध पुतळे मानवी होते, चौथरा आणि प्रेरणा दोन्ही होत्या भक्कम,
विक्रमी निर्माणांसाठी लागत नसे सामाजिक जबाबदारीची रक्कम.

साध्याभोळ्या सज्जनांचा देव सोन्याच्या पिंजऱ्यात बंदी नव्हता
,
भाबडा सत्वशील भक्तही देवाचा असा रगेल, छंदी फंदी नव्हता.
राम जन्मायचा दर वर्षी आणि कथेतून भोगायचा निमूट वनवास,
अज्ञातवासात राहून प्रकटायचा नाही, येताच निवडणुकीचा वास.

स्वर-रंग-गंध मुक्त आणि भाव सहज तथा परवडण्यासारखे होते
,
जात-धर्म-लिंग विषमता हे तर मानव्यच खरवडण्यासारखे होते.
साध्या साध्या बोलण्यालाही टोकदार तात्विक अभिनिवेश नव्हता,
विद्यार्थी आणि शासकीय सेवकांशिवाय कुणालाही गणवेश नव्हता.

तेव्हा माणसे एकमेकास चक्क भेटायची अन बोलायची भीड नव्हती,
कनेक्टेड फील करण्यासाठी स्मार्टफोन अन फेसबुकची नीड नव्हती.
ज्ञान वसे चर्चा, पुस्तके, ग्रंथातून आणि माहितीतही होता इनोसंस,
व्हॉट्सअॅप विद्यापीठ अजून व्हायचे होते 'इंस्टीट्युट ऑफ इमिनंस'.

चिंता असतील पण नव्हती भिती, आतला आवाज जागा होता,
सर्व लोकांना जोडणारा सुखदु:खाचा एकच समान धागा होता.
घरे छोटी आणि खोल्या लहान, दिखाव्याला पण नव्हती स्पेस,
अवघ्या जगण्याचीच झाली नव्हती निर्बुद्धजीवघेणी रॅट रेस.

चरितार्थ, उदरनिर्वाह, उपजीविका इतके काही कनसाईज नव्हते,
पॅकेज’, ‘डील’, ‘इएमआयसाठी वाट्टेल तसे कॉमप्रोमाईज नव्हते.
जगण्यामध्ये लाख उणीवा असतील पण समाधान काठोकाठ होते,
आत्मग्रस्त विकासाच्या हव्यासाने विग्रहाची वाढ पाठोपाठ होते.

मनोरंजनात देखील मूल्ये होती झाला नव्हता त्याचाही बाजार
,
शरीर निरोगी ठेवण्यासाठी धडपड आणि मनाला लाख आजार.
आज दुनिया मुठ्ठीमेआणि स्वच्छंद विहारास खुला आसमां है’,
पण किती लोक बाणेदारपणे म्हणू शकतात मेरे पास मां है’...?

घरं आज काठोकाठ भरलीयत दिखाव्याच्या सर्व साधन सुविधांनी
,
मनं असेनात का एकलकोंडी आणि भयग्रस्त अविश्वास, दुविधांनी.
भोगवादी जगण्यात असल्या नाही शिल्लक कुठेही अभंगाचा अंश,
अशा 'नवश्रीमंती' समृद्धीला म्हणूनच छळतो नित्य दुभंगाचा दंश!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा