सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

‘पात्र’...!


सत्वशील एकवचनी राम सांगे
महाल नको पर्णकुटी बांधाव्या
भक्त म्हणे मर्यादा पुरुषोत्तम
चला, त्याचा पुतळा उभारू या...!

बुद्ध म्हणाला अप्प दीपो भव:
तूच हो दीप मार्गास तुझिया
ते म्हणाले बुद्ध देवहोता
त्याचा पुतळा उभारू या...!

राजे वदले स्वराज्य घडवू
सारे एक होऊनी लढू या
ते म्हणाले जाणता राजा
त्याचा पुतळा उभारू या...!

फुले म्हणे टाकुनी गुलामगिरी
शिका उत्क्रांतीच्या पातळ्या
ते म्हणाले हा तर महात्मा
त्याचा पुतळा उभारू या...!

टिळक गरजले, स्वराज्य हा
जन्मसिद्ध हक्क मिळवू या
ते म्हणाले हे लोकमान्य
त्यांचा पुतळा उभारू या...!

गांधी विनवती सत्याचरणाने
स्वावलंबनाची कास धरू या
ते म्हणाले अरे, हा तर संत
याचा पुतळा उभारू या...!

आंबेडकर म्हणती सर्वांनाच हवे
स्वातंत्र्य, समता, बंधुता जगाया
ते म्हणाले हा खरा शिल्पकार
याचाही पुतळा उभारू या...!

सरदार होते मौन जाणीवेने
राष्ट्रधर्मास जागून आपल्या
ते म्हणाले हा तर उपेक्षित
याचा भव्य पुतळा उभारू या...!

----------------------------------------------------------

रात्री सारेच पुतळे पुसती एकमेकास
याच साठी का केला होता अट्टाहास?
'भारत' कुठे ज्यासाठी भोगला कारावास?
'इंडिया'मध्ये आपण उरलो फक्त इतिहास?

कर्ण असहाय्य म्हणून अर्जुन दिग्विजयी,
शुक्राचार्य धर्माचरणी अन अधर्मी द्रोण?
सामाजिक जबाबदारीही कुणाची नी
ती निभाविण्यास पात्रठरते कसे कोण...?

कुणाचे भक्तहे अन अनुयायीकुणाचे
'हारघालता पुतळ्यास ती विचारांची होते
आपल्या मार्गाने चालण्याहून हार घालणे सोपे
कठपुतळ्यांना कसे कळावे अंती हार त्यांचीच होते!

----------------------------------------------------------

टीकाकार रामदासाने नवीन वात्रटिका फाडली
'खुजेपणा लपविण्यासाठी नामी युक्ती काढली
नेत्यांची कमी होताच पुतळ्यांची उंची वाढली...'
भक्त म्हणती, 'पहा, याने पुन्हा खोडी काढली...!'

-------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा