बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

'सलाम'...!


हवांपे लिख दो 
हवांओंके नाम 
हम अनजान परदेसीयोंका 
'सलाम'...!

भारतीय वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकने बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त - बातमी

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

हौतात्म्य...?

 

युद्धभूमीवर शहीद होईन जेव्हा,
रक्षा माझी पोहचवाल घरी तेव्हा?

आजोबांना काय सांगाल, मी काय सांगू? 
म्हणाल, 'नाही आता तो, नका जीव टांगू?' 

आजीला म्हणावं, 'करत रहा लाडू रवाळ गोड,
मित्रांची त्याच्या खाण्याची जाणार नाही खोड!' 

ताईला सांगाल, 'नको काळजी निद्रानाशाची?'
सूर्यास्तानंतर आता चिरनिद्रा माझ्या ध्यासाची!

छोटूला म्हणांव अभ्यासात घाल चल लक्ष,
माझ्या वस्तू वापरण्यास नको राहूस दक्ष! 

अन बाबांना सांगा आता आणि वाकू नका,
त्रास देण्यास नसेन मी, नाही कुठला हेका! 

मांडाल पदके माझी ओळीने माझ्या छातीवर? 
सांगाल आईला लढलो प्राणपणाने या मातीवर? 

आणि हो, देश बांधवांना म्हणा नको आसवे माझ्यासाठी
सैनिक मी, जन्मच मुळी घेतला देशावर उधळण्यासाठी!

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

आत्मबद्ध...!


मला माझ्यातूनच आता मुक्ती हवी आहे,
जाणीव जुनी, जगण्याची सक्ती नवी आहे!

बाजार माणसांचा विकण्यास शील सजलेला,
प्रजाती तीच असली तरी ही व्यक्ती नवी आहे!

कोंडला त्याला बडव्यांनी खोल गर्भगृहात,
नव्या भाविकांची प्रभावी भक्ती नवी आहे!

जिंकण्यास युद्ध येते अजून कृष्णनीतीच कामी,
साम-दाम-दंड-भेद जुनेच पण युक्ती नवी आहे!

फासे पटावरील ओळखीचे भासता परंतु,
आता जिंकणारी मायावी शक्ती नवी आहे!

मला माझ्यातूनच आता मुक्ती हवी आहे,
जाणीव जुनी, जगण्याची सक्ती नवी आहे!

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

राजा आणि मंत्री...!


शेक्सपिअरच्या अजरामर कलाकृतींना आपापल्या भाषांमध्ये आणि अभिव्यक्तींमध्ये साकारण्याचा मोह जगभरातील कलावंतांना झाला. हिंदीमध्ये विशाल भारद्वाजने 'मैकबेथ'वरून मकबूल, 'हॅम्लेट'वरून हैदर आणि 'ऑथेल्लो'वरून ओम्कारा असे चित्रपट काढून शेक्सपिअरची अभिजातता हिंदीत आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.

१९६२ साली आलेल्या 'ऑथेल्लो' या नाटकासाठी कुसुमाग्रजांनी एक रचना केल्याचे समजते. 'राजा आणि मंत्री' अशा अत्यंत समर्पक नावाची ती विचक्षण रचना आज नव्याने स्मृतीपटलावर उजळण्याचे कारण म्हणजे आजच्या सर्व प्रमुख स्थानिक व राष्ट्रीय वृत्तपत्रांचे वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक संदर्भांचे मथळे!

'जगाच्या पाठीवर'मध्ये गदिमा म्हणून गेले, 'उद्धवा, अजब तुझे सरकार!' आणि 'ऑथेल्लो'च्या निमित्ताने कुसुमाग्रज काय म्हणतात पहा...

शकार झाला राजा तेव्हा ठकार झाला मंत्री
प्रकार झाले नाना त्यांची किती करावी जंत्री

मंत्री सांगे उपमंत्री से तुमान आकाशास शिवा
शिंप्याचे जे वेतन होईल हिस्सा मजला त्यात हवा

राजा वदला उजेड रविचा हजार हौदांमधे भरा
दिवे तयाचे रात्री लावा, का तेलाचा खर्च करा ?

मंत्री म्हणाला हवी कशाला रखवाली ही चहूकडे
द्या सगळे धन माझ्या जवळी इथेच करतो सैन्य खडे

राजा वदला पगार कसला काम करावे भक्तीने
उपास पडले पर्वा नाही,पुण्य लाभते सक्तीने

मंत्री कळवी प्रजाजनांना आत्म्याचे दारिद्र हरा
राजा सांगे असार जीवित परलोकाचा मार्ग धरा

मंत्री म्हणाला माती राजाची हिमाचलाहुनी तुंग असे
राजा वदला या मंत्र्याच्या पगडीखाली शिंग असे !

संदर्भ - 'स्वगत' - कुसुमाग्रज कविता संग्रह - मौज प्रकाशन.