शेक्सपिअरच्या अजरामर कलाकृतींना आपापल्या भाषांमध्ये आणि अभिव्यक्तींमध्ये साकारण्याचा मोह जगभरातील कलावंतांना झाला. हिंदीमध्ये विशाल भारद्वाजने 'मैकबेथ'वरून मकबूल, 'हॅम्लेट'वरून हैदर आणि 'ऑथेल्लो'वरून ओम्कारा असे चित्रपट काढून शेक्सपिअरची अभिजातता हिंदीत आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.
१९६२ साली आलेल्या 'ऑथेल्लो' या नाटकासाठी कुसुमाग्रजांनी एक रचना केल्याचे समजते. 'राजा आणि मंत्री' अशा अत्यंत समर्पक नावाची ती विचक्षण रचना आज नव्याने स्मृतीपटलावर उजळण्याचे कारण म्हणजे आजच्या सर्व प्रमुख स्थानिक व राष्ट्रीय वृत्तपत्रांचे वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक संदर्भांचे मथळे!
'जगाच्या पाठीवर'मध्ये गदिमा म्हणून गेले, 'उद्धवा, अजब तुझे सरकार!' आणि 'ऑथेल्लो'च्या निमित्ताने कुसुमाग्रज काय म्हणतात पहा...
शकार झाला राजा तेव्हा ठकार झाला मंत्री
प्रकार झाले नाना त्यांची किती करावी जंत्री
मंत्री सांगे उपमंत्री से तुमान आकाशास शिवा
शिंप्याचे जे वेतन होईल हिस्सा मजला त्यात हवा
राजा वदला उजेड रविचा हजार हौदांमधे भरा
दिवे तयाचे रात्री लावा, का तेलाचा खर्च करा ?
मंत्री म्हणाला हवी कशाला रखवाली ही चहूकडे
द्या सगळे धन माझ्या जवळी इथेच करतो सैन्य खडे
राजा वदला पगार कसला काम करावे भक्तीने
उपास पडले पर्वा नाही,पुण्य लाभते सक्तीने
मंत्री कळवी प्रजाजनांना आत्म्याचे दारिद्र हरा
राजा सांगे असार जीवित परलोकाचा मार्ग धरा
मंत्री म्हणाला माती राजाची हिमाचलाहुनी तुंग असे
राजा वदला या मंत्र्याच्या पगडीखाली शिंग असे !
संदर्भ - 'स्वगत' - कुसुमाग्रज कविता संग्रह - मौज प्रकाशन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा