वाढदिवसांनी खचाखच भरलेला
फेब्रुवारी तसाही उत्साहाचा, धावपळीचा आणि गडबडीचा असतोच. या वर्षी कौटुंबिक
सोहळ्यांना सामाजिक क्षेत्रातील कामांची जोड मिळाल्याने उण्या-पुऱ्या २८ दिवसांचा
फेब्रुवारी ४० दिवसांचा भासला नसता तरच नवल. त्यात स्थानिक, राज्य, राष्ट्र आणि जागतिक
स्तरावरील आर्थिक, राजकीय अन ऐतिहासिक घडामोडींची भर! अर्थात ट्रम्प पुतीनना किंवा
किमला काय म्हणाले आणि त्यांनी त्यांना (?) काय प्रतिसाद दिला याहून आमच्या
कामवाल्या मावशी दोन दिवस न आल्याने घरातील महिला काय म्हणाल्या याकडे अधिक लक्ष
दिले तर पोटापाण्याची सोय होवू शकते एवढा क्षुद्र स्वार्थ जपण्याचे किमान
व्यवहारज्ञान आम्हाला असल्याने आम्ही ट्रम्पकडे खर म्हणजे थोडा कानाडोळाच केला.
त्याचा वचपा काढण्यासाठी ते त्यांच्या ‘न्यूक’चे टोक नॉर्थ कोरिया कडून आमच्याकडे
तर हलवणार नाहीत ना अशा धास्तीने काही काळ आमची झोप उडाली होती पण या दोन
बाहुबलींचा एका गोल मेजाच्या दोन विरुद्ध स्पर्शरेषांना (मराठीत
टैन्जंट) टेकून, वर्तुळ या आकाराला आणि गोलमेज परिषद या संकल्पनेला एकसमयावच्छेद करून
निष्प्रभ करणारा कॅमेरा-फेसिंग फोटो पहिला आणि आम्ही सुटकेचा (नि)श्वास
सोडला!
बाकी ‘अभिनंदन’ला इतक्या
अल्प काळात आपल्या मायदेशात बिनशर्त अन अ-क्षत परत धाडून कुणी कुणावर राजकीय
कुरघोडी केली याबद्दल आमच्या पानवाल्या आणि भाजीवाल्या मध्ये मतभेद असले तरी,
‘अरे, कौनू फर्क नाही पडता इनको, इधर सबको विलेक्शनकी पडी है और उधर फटी पडी है,
क्या साब...’ म्हणणारा परीट मला जास्त मध्यममार्गी आणि विवेकी वाटतो. उत्तरेकडचा
असल्याने राजकारणाची जाण हा देखील, त्याच्या इस्त्रीच्या लांबड्या टेबलप्रमाणे,
त्याचा ‘ठेका’ आहे. असो! न असू द्यायला आपण काही ‘राज’कारणी नाही! शिवाय
वेळीप्रसंगी आपल्या डागाळलेल्या आणि चुरगळलेल्या वस्त्रांचा कायापालट करून आपली
प्रतिमा संवर्धन करण्यात आणि आपली तिळाएवढी सामाजिक प्रतिष्ठा जपण्यात त्याचा
मोलाचा हात असतो हे विस्मरून कसे चालेल...?
हा महिना म्हणजे अक्षरश:
रोलर कोस्टर राईड होता यात काहीच वाद नाही. नेहमीच वेगवेगळ्या निमित्ताने अनेक लोकांशी
भेटीगाठी या होतच असतात. परंतु बहुदा त्यामागे काही वैयक्तिक स्वार्थ, समाईक
उद्देश असतो, मग तो अगदी ‘निधी उभारणी’च्या गोंडस नावाखाली होणारा प्रचार, प्रसार,
प्रसिद्धी का असे ना. पण या महिन्यात खरोखरच काही सम्यक उद्दिष्टांसाठी काही खऱ्याखुऱ्या
मोठ्या माणसांना भेटण्याचा योग आला आणि गडकरी साहेबांच्या भाषेत ‘चहा पेक्षा
किटलीच गरम’ याचा पुरेपूर प्रत्यय देखील! काही नेहमीच्याच माणसांचा मोठेपणा
वेगळ्याच संदर्भात जाणवला आणि अतिपरिचयात अवज्ञा तर घडली नाही ना अशी शंका देखील
आली. आणि अर्थातच काही संभावित मोठ्यांचा छोटेपणा, खरतर क्षुद्रत्व, नेहमीप्रमाणे
खूप खूप खुपले. हे सगळे असले तरी आम्ही या सर्व बऱ्या-वाईटातून जे मिळाले असे
नेहमीच समजत आलो आहो ते नक्कीच मिळाले – खूप काही शिकायला मिळाले!
अक्कलखाते वाढून त्याचा
उदरनिर्वाहाला उपयोग नाही आणि ‘तुमच्यासारख्या तरुणांची देशाला गरज आहे’ किंवा
‘खूप मोठे आणि चांगले काम करताय’ या शब्दांनी धीर येत असला, बळ मिळत असले आणि अहं
सुखावत असला तरी एक तारखेला येणाऱ्या बिलांना तो मोठेपणा दाखवता येत नाही ही
वस्तुस्थिती बदलत नाही. सर्वच हाडाच्या ‘कढीपत्ता’ कार्यकर्त्यांची ही खंत आम्हाला
नवी नाही. किंबहुना स्वानुभवामुळे आम्ही त्यांच्या या कुतरओढीशी अगदी तादाम्य
देखील पावू शकतो पण परिस्थिती बदलू शकत नाही ही आमची वैयक्तिक खंत! पण आमचे
(नेहमीचेच) रडगाणे हे या लिखाणाचे उद्दिष्ट नव्हे, तेव्हा कुणा शायराच्या...
‘कुछ रीश्तोंमें मुनाफा
नहीं होता
मगर जिंदगीको अमीर बना
देते है !’
...या फीलॉसॉफिकल ओळी आठवून
पुढे चलावे हे उत्तम!
गेल्या महिनाभरात बरच काही
गमावलं आणि खूप काही कमावलं. आता यात नवीन काय असं कुणीही म्हणेल. ‘याला जीवन ऐसे
नाव!’ अशी दार्शनिक प्रतिक्रिया देखील मिळेल. पण बहुतेक माणसांचे पाय मातीचेच
असतात पण क्वचित काही माणसे अगदी वेगळ्याच मातीची घडलेली असतात आणि आपण या दोन
टोकांच्या मध्ये हिंदोळण्यात नेमकं काय साधतो आहोत असा नेहमीचाच सैद्धांतिक प्रश्न
पडल्याशिवाय रहात नाही. ‘कोहम’ ने सुरु झालेला प्रवास ‘सोहम’ पर्यंत नेण्यासाठी
‘मैत्र’ आवश्यक असते हे निश्चित पण व्यवहार जेव्हा ‘मैत्र’चा मुखवटा घालून समोर
येतो तेव्हा नेमका कुठला धर्म पाळावा या भ्रमात पडून किंकर्तव्यदिग्मूढ व्हायला
होते. आमचे असे वारंवार अर्जुन होणे आता समस्तांच्याच अंगवळणी पडले असल्याने तेही एक असो!
आत्मरत समाजाच्या मृतवत संवेदना
जागवून त्याला आपल्या सभोवतालचे साक्षेपी भान यावे या चिरंतन प्रयासात अजून
इतस्तत: भरकटण्यापूर्वी या लेखाचा मूळ उद्देश जो की ‘बाबा’ची अर्थात अनिल अवचटांची
कविता या निमित्ताने आठवणे, पाठवणे आणि साठवणे... बऱ्याच दिवसांपासून हे ‘जिंदगीको
अमीर बनाने’ वालं काम बाकी होत, आज मौकाभी है, दस्तूर भी और तकाजा भी...
बिनहिशोबी लोकांचेही,
वेगळे काही हिशोब असतात,
कॉम्प्यूटरच्या तुमच्या
आमच्या, डोक्यात ते उमटत नसतात.
...धुंदावलेल्या
कॉफीहाउसात, सिगारेटच्या उबेमध्ये,
किंवा बियरच्या निथळत्या
फेसाबरोबर,
अथवा, लायब्ररीच्या जाड
भिगातून,
आस्तिक्यवाद ते
मार्क्सबाबापर्यंत
आमच्या गप्पा बेभान
रंगतात;
तेव्हा सायकलला लावून
झोळी,
खांद्यावर मावळत्या
दिवसाची मोळी,
ते कुठेतरी क्षितिजावरून,
घरट्याकडे परतत असतात;
कदाचित एखादा पराभव विणत.
पण तरीही त्यांच्या
दिवसाला
आशेच्या रवळ्या पडतच
असतात,
बिनहिशोबी लोकांचेही,
वेगळे काही हिशोब असतात II १ II
आमची डिग्री, फ्रेमच्या
कोंदणात
चकमक चकमक मिरवत असताना,
आम्ही खुराड्यातल्या
भविष्यभीतीने,
वाराआधीच नामोहरम
होताना...
त्यांची डिग्री केव्हाचीच,
हरवून फाटून गेलेली असते.
डिग्रीचे ओझे टाकून
दिल्यानेच
ते कसे नेहमी मोकळे
भासतात,
बिनहिशोबी लोकांचेही,
वेगळे काही हिशोब असतात II २ II
कॅमेराच्या क्लिक् क्लिकाटात
आमची
‘सोशल सर्विस’ खुलते.
टीव्हीचा
मूव्ही अडून बसला
तर
ओठावरची लिपस्टिक रुसते.
आमची
यादी संपते तिथून,
त्यांचा
प्रदेश सुरु होतो...
त्यातल्या
बातम्या अन हेडलायनींचं
आमच्या
पेपरांना वावडं असतं.
आमचे
‘सोशल सायंटिस्ट’ लोक
तिथं
फारसे फिरकत नसतात...
लठ्ठ
आकाराचे परदेशी चेकही,
त्यांच्या
प्रदेशात पोहचत नसतात,
आणि
खांद्यावर थाप मारल्याच्या बदल्यात
शिक्क्यातून
मैत्री ते वदवत नसतात,
बिनहिशोबी लोकांचेही,
वेगळे काही हिशोब असतात II ३ II
आमच्या
जगण्यातले सारेच क्षण
आम्ही
गाळून पारखून घेतो.
अक्स्माताची
त्यातली गरळ
सरळ
सरळ फेकून देतो.
आणि ते
तर सदाचे तिकडे
आमच्या
दृष्टीने दिशाहीन वेडे
कुठल्याशा
परिवर्तनाची धरून आशा,
रखरखीत
रस्त्याचे सोसत चटके,
चालताना
हरायचं नाकारत असतात,
बिनहिशोबी लोकांचेही,
वेगळे काही हिशोब असतात II ४ II
त्यांनी
जेव्हा आपलं जगणं
टांगून ठेवलं खुंटीवर...
वास्तवाच्या छिन्नीने अन
जळमटं ठोकली पोथीवर.
तेव्हा आमचे पोकळ
संताप
त्यांच्या हातात निखारे
बनले,
तेव्हा आमचे अनाडी विचार,
त्यांच्या कवेत राबू
लागले.
तरीही त्यांच्या शर्टावर,
‘पहुंचे हुए’ रंग नसतात.
बिनहिशोबी लोकांचेही,
वेगळे काही हिशोब असतात II ५ II
ते कधी त्यांची दु:खं
माईकवरून सांगणार नाहीत.
त्यांच्या घराची उसवली
शिवण,
चुकूनही समोर आणणार नाहीत.
पण आम्हीच आमच्या मेकपचे
थर
स्वत:हून अगदी स्वच्छ
धुवून,
आमच्या संवेदनांवर जमलेली
बुरशी सारी साफ करून,
जर त्यांच्या जवळ गेलो,
तर त्यांना निदान कळेल
तरी;
की ते तितके एकटे नाहीत,
आमचे सारे सारे रंग
फक्त नटव्या सरड्याचे
नाहीत.
बहुतेक त्यांना आभाराची
भाषणं करता येणार नाहीत,
आणि त्यांच्या आठवणींचे
खंडही प्रकाश पाहणार
नाहीत.
मात्र, त्यांच्या श्रांत
रात्रीला
मऊ उबेचा किनारा असेल,
आणि त्यांच्या निमित्ताने
आमचाच चेहरा आम्हांला
दिसेल. II ६ II
कविता स्त्रोत – अनिल अवचटांचे ‘मितुले आणि रसाळ’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा