शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

प्रिय लतादीदी...



प्रिय लतादीदी,

अवघ्या मानवी भावविश्वाला व्यापून उरलेल्या स्त्रीचा बुलंद पण लाघवी आवाज असलेल्या आपल्या स्वरप्रतीभेला शत शत प्रणाम! आपला पडद्यामागून येणारा आवाज नसता तर स्नेहल-सोज्वळ नूतन, खट्याळ-चुलबुली मधुबाला, धीरगंभीर मीनाकुमारी, नृत्यनिपुण वैजयंतीमाला आणि वहिदा पासून शर्मिला टागोर, हेमामालिनी, शबाना, स्मिता ते अगदी श्रीदेवी, माधुरी, जुही आणि काजोल या रुपेरी पडद्याच्या सर्व झगमगत्या तारका त्यांच्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह देखील अपुऱ्या राहिल्या असत्या. जगभरात हिंदी सिनेमाची ओळख आहे ती, इतर कुठल्याच सिनेमांमध्ये न आढळणाऱ्या, गाण्यांमुळे आणि भारतीय चित्रपटातील गाण्यांचा मानबिंदू आहे... लता मंगेशकर!

षड्जं व‍दति मयूर: पुन: स्‍वरमृषभं चातको ब्रूते
गांधाराख्‍यं छागोनिगदति च मध्‍यमं क्रौञ्च ।।
गदति पंचममंचितवाक् पिको रटति धैक्‍तमुन्मदर्दुर:
शृणिसमाहतमस्‍तक कुंजरो गदति नासिक या, स्‍वरमंतिमम् ।।

संगीत दर्पणमधील या श्लोकात षडज ते निषाद या सप्तसुरांचा संबंध जसा मोरापासून हत्तीपर्यंत पशुपाक्षांशी जोडला आहे तद्वतच आपला आवाज रुपेरी पडद्यावरील बहुदा सर्वच अभिनेत्रींच्या चेहऱ्याला लाभला आहे. परमेश्वरानंतर चराचरात भरून काही शिल्लक असेल तर तो, गंधर्व किन्नरांना हेवा वाटावा असा, आपला साक्षात ईश्वरस्वरूप दैवी आवाज!

केशवसुतांनी ‘आम्ही कोण?’ याचे रसभरीत वर्णन करतांना म्हटलेले,

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!   

या ओळी आज कुणाचे चपखल वर्णन करीत असतील तर ते आपले... खरंच लतादीदी तुम्हाला वगळले तर तो सप्ततारांकित रुपेरी पडदा अक्षरश: क्षणार्धात गतप्रभ होईल, आपली प्रभा गमावून बसेल आणि कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा सिनेमा आपल्या आवाजाशिवाय कवडीमोल होईल यात तिळमात्र शंका नाही. आपण केवळ हिंदी सिनेमालाच नाही तर या सृष्टीला जे दिले आहे ते ‘नक्षत्रांचे देणे’च आहे! तेवढे पुरेसे नाही म्हणून की काय, ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले...’ या भावाला मूर्त स्वरूप देणारे आणि आपण आपल्या वडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यास तत्पर आहात याची साक्ष देत, कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या ‘जीवघेण्या’ स्पर्धेला पुरून उरत दिमाखात उभे आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर शुश्रुषालय!

प्रतिभेचे धनी असू शकतील, दैवी गुणांची पखरण झालेले देखील काही सापडतील, स्वत:च्या अंगभूत कौशल्याला नित्य सरावाने पैलू पाडून नावाजलेल्यांची संख्या देखील कमी नाही पण हे सारे महानुभाव ज्या एकाच नावाचे निस्सीम भक्त आहेत आणि ज्या नावाने आपला बहुमान व्हावा म्हणून पुरस्कार आणि विक्रम देखील आतुर असतात ते एकच नाव या आसमंताला व्यापून उरते आणि ते म्हणजे... लता मंगेशकर!

गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, विश्वमोहिनी...
लतादीदींना ९० व्या वाढदिवसाच्या स्नेहादरपूर्वक शुभेच्छा आणि
निरामय शतकोत्तर जीवनासाठी कोटी कोटी शुभकामना...!

लतादीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त, वर उल्लेख केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत जिच्या नावाचा उल्लेख राहून गेला त्या डिंपल कपाडियाच्या भावविभोर अभिनयाने सजलेले, लतादीदींनी स्वरसाज चढविलेले माझे सर्वात आवडते गीत... ‘दिल हूम हूम करे...’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा