रविवार, ३० मे, २०२१
गॉसिप...!
रविवार, २३ मे, २०२१
या चिमण्यांनो...
'बर झालं गरुडदादा तू भेटलास. अरे, एक भलामोठा काळा पक्षी केव्हापासून माझ्या मागे लागलाय आणि, 'हे कसे शक्य आहे, हे कसे शक्य आहे...' असे म्हणून मला घाबरवतोय...'
'काळजी करु नकोस, मी तुला लांब त्या उंच डोंगरकपारीत नेऊन ठेवतो. तू तिथे विश्रांती घे, तोपर्यंत तो पक्षीही तू सापडत नाहीस म्हणून कंटाळून निघून जाईल. मग तू सावकाश खाली उतर आणि जा आपल्या घरट्यात परत. चल, बस माझ्या पाठीवर, मी आत्ता पोहोचवतो तुला उंच डोंगरात...'
'पक्षीराज, मी स्वतःच्या इच्छेने काही करत नसतो, मी फक्त आज्ञापालन करतो!' काळा पक्षी उत्तरला.
'म्हणजे ? मी समजलो नाही !' गरुडाने विस्मयाने विचारले.
'अहो, पक्षीराज मी काळदूत आहे, माझा मालक काळ जेव्हा सांगेल तेव्हा, जिथे सांगेल तिथे आणि ज्यांचे सांगेल त्यांचे प्राण हरण करणे हेच माझे काम !'
अजूनही निटसा उलगडा न झालेला गरुडाने विचारले, 'पण मग त्यासाठी चिऊताईला घाबरवायची काय गरज...?'
शनिवार, २२ मे, २०२१
वि-भक्त...!
https://ibpf.org/seclusion-being-on-the-other-side-of-the-door/ |
आता मी माझा नाही
पण म्हणून तुमचा आहे असेही नाही
दिंडीत नाचलो म्हणून वारकरी झालो नाही
पिंडीत साचलो म्हणून धारकरी झालो नाही
याच्या विनोदाला हसतो म्हणून उजवा होत नाही
त्याच्या मांडणीला फसतो म्हणून डावाही होत नाही
माझ्या असण्याचे वाटप लशीइतके स्वस्त नाही आणि
माझे नसणे पोकळी निर्माण करण्याएवढे ध्वस्त नाही
मला गृहीत धरून चालणे ही असू शकेल त्यांची भूक
किंवा निर्णयाच्या क्षणी अवसानघात करेल अशी चूक...?
कळपांना वळण लावून थेट करता येते सरळ
बुद्धिभेद करून ओकायला लावता येते गरळ
सारेच प्राणी-मात्र आज्ञा मानतीलच असे नाही
काही मूर्खांना वाटते असावे आपले मत काही
तुमच्यात बसतो-हसतो म्हणून माझा कणा मोडत नाही
गारूड्याचे दुध प्यायला म्हणून नाग फणा सोडत नाही
रचणाऱ्यांना जेव्हा जडेल अपौरुषाची व्याधी
उतावळा अभिमन्यूच भेदेल चक्रव्यूह कधी
हल्ली माझ्यात मी नसेनही
पण म्हणून मी तुमच्यातलाही होत नाही...!
रविवार, १६ मे, २०२१
अग अग लशी...
शनिवार, ८ मे, २०२१
शीर्षकगीत...!
भारताचा ५००० वर्षांचा इतिहास एका ग्रंथात सामाविणे
हीच मुळात थोर कामगिरी. हे शिवधनुष्य पेलले पंडित जवाहरलाल नेहरू या स्वतंत्र भारताच्या
पहिल्या पंतप्रधानांनी –
‘डिस्कव्हरी
ऑफ इंडिया’
अशा अत्यंत सूचक
व समर्पक ग्रंथाच्या रूपाने! कुठल्याही परंपरेचा बडेजाव किंवा सांस्कृतिक अभिनिवेषाशिवाय
भारताचा भूतकाळ अत्यंत साक्षेपी पद्धतीने मांडण्याच्या आणि तो भारताच्या आजबरोबरच उद्याशीही
जोडून देण्याच्या त्यांच्या या द्रष्टया प्रयत्नाला सोन्याचे कोंदण दिले ते श्याम बेनेगल
या अत्यंत प्रतिभावंत, मर्मग्राही आणि विचक्षण दिग्दर्शकाने! आणि, आम्हाला आमच्या संस्कारक्षम
वयात अतिशय प्रगल्भ अशा संस्कारांनी मूल्यशिक्षणाची जी पर्वणी लाभली तिच्यात एक अमूल्य
भर पडली –
‘भारत एक
खोज!’ उण्यापुऱ्या ५२ भागांच्या
या मालिकेने आमचे शालेय जीवन तर
समृद्ध केलेच पण आम्हाला आपल्या स्वत:च्या संपृक्त इतिहासाची जाणीव करून देवून आमचे
जगण्याचे भान विस्तारले, आम्हाला शोध घेण्याची, स्वतंत्र, वेगळा विचार करण्याची सवयही लावली
आणि गोडीही!
मुळातच संहितेपासून सादरीकरणापर्यंत
अगदीच विलक्षण असलेल्या (आपादमस्तक निळ्या रंगात रंगविलेला कृष्ण – सलीम घोस, नसीरउद्दीन
शाह यांनी साकारलेले शिवाजी महाराज आणि ओम पुरींनी जीवंत केलेला औरंगजेब, हे आजच्या
भारतीय सामाजिक अवकाशाच्या संदर्भात निषेधार्य ठरणारच नाही असे नाही!) या प्रयोगातून
आमची साहित्यिक-सांस्कृतिक वाढ तर झालीच पण त्यानिमित्ताने आम्हाला दृकश्राव्य माध्यमाची
एक वेगळीच जाण विकसित व्हायला मदत झाली. अत्यंत मर्यादित साधन-सुविधांच्या आधारे, एका
अभ्यासपूर्ण संहितेची विवेकी हाताळणी करून काहीतरी अभिजात घडवता येते याचा वस्तुपाठ
आम्हाला ज्या अनेक उपक्रमातून मिळाला त्यात ‘भारत एक खोज’चे नाव नेहमीच अग्रभागी राहील.
आणि हे नमनाला घडाभर तेल ज्यासाठी घातले ते ‘भारत एक खोज’चे शीर्षक गीत अर्थात टायटल
सॉन्ग...
एवढ्या सशक्त रचनेला, तत्कालीन भारतीय
मनाला पटेल, पचेल आणि रुचेल असे नाट्यरूपांतरण करणे हेच अत्यंत अद्भुत, उल्लेखनीय आणि
वंदनीय कार्य, त्याला चार चाँद लागले ते त्याच्या शीर्षक गीताने. ब्रह्मांडच्या निर्मितीचा
ऊहापोह करणाऱ्या, ऋग्वेदातील नासदीय सूक्ताच्या एका ऋचेची यासाठी योजना करण्याची कल्पना
ज्याला सुचली त्या निर्मात्याच्या संवेदनशील प्रज्ञेची केवळ कल्पनाच करता येईल आणि
तिला शतश: नमन करता येईल! सृष्टीचा कर्ता कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी ही
ऋचा खऱ्या अर्थाने आदिम – आद्या, आत्मरूपा, स्वसंवेद्या आणि वेदप्रतिपाद्या ठरावी.
शब्दांनीच गारुड करावे अशी ही रचना पण तिची मोहिनी अधिकच गर्द गहीरी केली ती तिला लाभलेल्या
अक्षरश: स्वर्गीय स्वरसाजाने! ही किमया साधली ती अलौकिक प्रतिभेचा धनी असलेल्या अवलिया
संगीतकार वनराज भाटीया यांनी... काल वयाच्या
९३ व्या वर्षी या किमायागाराने या जगाचा निरोप घेतला आणि त्या निमित्ताने, लहानपणी
एका वर्षात ५२ वेळा ऐकलेला आणि संगणकावर हवे ते बघण्याची, ऐकण्याची युक्ती सापडल्यावर
आम्ही प्रभातगीतांची जी सूची बनवली त्यात मानाचे स्थान मिळवल्याने, गेली सुमारे १२-१५
वर्षे जवळपास रोज सकाळी कानावर पडणाऱ्या या फिलॉसॉफिकल लीरिक्स आणि फिनॉमिनल मेलडीनीने
आठवणींचा आणि ‘मना’चाही तळ ढवळून काढला...
जे आमच्या भावनांशी तादात्म्य पावू
शकतील त्यांच्यासाठी निखळ आनंदाचा पुन:प्रत्यय म्हणून आणि ज्यांना अद्याप या विषयाची
ओळखही नाही त्यांच्यासाठी एका अमूल्य खजिन्याची चावी म्हणून, भारत एक खोज चे संपूर्ण शीर्षक
गीत इथे देत आहे... त्याचा शब्द अन् शब्द आणि स्वर अन् स्वर रंध्री भरून घेणे हीच त्या
अगाध प्रतिभेच्या संगीतकाराला स्वरांजली...
सृष्टी से पहले सत् नहीं था
असत् भी नहीं
अन्तरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या?
कहाँ? किसने
ढका था?
उस पल तो अगम अतल जल भी कहाँ था?
रविवार, २ मे, २०२१
कानूस...?
साक्षर म्हणजे सुशिक्षित नव्हे. सुशिक्षित म्हणजे सज्ञान असे नाही. सज्ञान व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही आणि सुसंस्कृत म्हणजे सूज्ञ नव्हे. सूज्ञ असूनही संवेदनशील असणे जसे वेगळे तसेच संवेदनशील असून सजग असणे महत्वाचे. शिवाय केवळ सजग असणे पुरेसे नाही तर सक्रीय असणे अधिक श्रेयस्कर!
तद्वतच निरक्षर म्हणजे अडाणी नव्हे आणि अशिक्षित म्हणजे अनभिज्ञ किंवा अविवेकी नव्हे. याच कारणाने ‘सखाराम बाईंडर’ मधली चंद्राची भूमिका, ती साकारणाऱ्या लालन सारंग यांना समजावून सांगतांना तेंडूलकर म्हणाले, ‘पुस्तकी ज्ञान नसेल पण चंद्राची जगण्याची जाण आणि भान मोठे आहे...!’
आमच्या खान्देशी बहिणाबाई निरक्षर आणि अशिक्षित जरूर होत्या पण त्यांचे जगण्याचे भान असीम तर होतेच पण त्यांची ‘माणसा’ची जाण किती अलौकिक आणि कालातीत होती हे, आजच्या दाहक वास्तवावर परखड भाष्य करणाऱ्या, त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या तंतोतंत कवितांवरून निर्विवाद सिद्ध होते.
‘टिळक गेल्यानंतर, ज्याला समोरून येतांना बघून हातातली विडी टाकून द्यावी असा माणूस पुण्यात उरला नाही...’ अशी ‘खंत’ व्यक्त करणारे एकमेवाद्वितीय आचार्य अत्रे, बहिणाबाईंची प्रतिभा बघून, ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे हे बावनकशी सोने आहे...!’ असे म्हणतात यावरून बहिणाबाईंच्या रचनांचा दर्जा लक्षात यावा.
बहिणाबाई ‘निरक्षर’ असल्याने त्यांनी स्वत: यातले काहीही लिहून काढले नाही, त्या सुचेल तसे गात गेल्या आणि ऐकणाऱ्यांनी जमेल तसे उतरवून घेतले त्यामुळे बहिणाबाईंची कविता जशी ‘आधी कळस मग पाया...’च्या धर्तीवर ‘आधी गीत मग कविता’ असा अध्यात्मिक (उलटा?) प्रवास करते तसेच तुकोबांची गाथा जशी लोकगंगेने तारली (इति: पुलं) तशीच केवळ त्यांच्या तोंडून निघणारा शब्द उतरवून पुढल्या पिढ्यांवर उपकार करणाऱ्यांचे ऋणही मानायलाच हवे !
आणखी एक - खान्देशी ‘अशिक्षित’ असल्याने बहिणाबाई आपल्या मायबोली अर्थात ‘माझी माय सरसोती’च्या भाषेत म्हणजे आमच्या अहिराणीत गात असल्याने, मराठीचाच एक अवतार असला तरी, यातील काही शब्द समजणार नाहीत, पण भाव जाणून घेतला तर अर्थ लागायला हरकत नसावी. शिवाय, कानाला अतिशय गोड वाटणाऱ्या आमच्या अहिराणीचा, त्यानिमित्त अभ्यास केलात तर मराठी भाषा मुळातच किती समृद्ध आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या विनंत्या करण्यापेक्षा तिचा स्वाभिमानी बाज समजावून घेऊन व्यवहारात वापर वाढवला तर ही जनसामान्यांची आणि छत्रपतींची भाषा कधीही कुणाची मिंधी होणार नाही... असो! तो एक वेगळाच विषय आहे...
साऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींनीही माणूस म्हणून सूज्ञ, सुसंस्कृत, संवेदनशील आणि सक्रीय असण्याची अपेक्षा असेल तर समाजधुरीण, धोरणकर्ते आणि उच्चपदस्थ यांच्याकडून ही अपेक्षा शतपटीने वाढल्यास नवल नाही. सर्वच आलबेल असतांना आणि परिस्थिती अनुकूल असतांना धोरणीपणाचा, नेतृत्वाचा कस लागेलच असे नाही पण आणीबाणीच्या प्रसंगी शीर्षस्थ व्यक्ती किती सर्वसमावेशक विचार करू शकते आणि आपल्या धोरण-निर्णयांचा साधक-बाधक विचार करतांना किती संवेदनशीलता दाखवते यावरून नेतृत्वगुणांचा कस तर लागतोच पण या निमित्ताने त्या माणसाच्या व्यक्तित्वाचा पोत आणि दर्जा जसा दिसून येतो तसे ‘जगण्या’ची जाण आणि भानही समजते.
आजच्या अत्यंत बिकट परिस्थितीत, जगण्यासाठी धडपडणाऱ्या अगतिक बहुसंख्यांची विवंचना एकीकडे आणि अशाही परिस्थितीत, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या आपमतलबी अविवेकी संधिसाधूंची वखवख दुसरीकडे, अशा विदारक परिस्थितीत बहिणाबाईंच्या या दोन रचना कसा प्रकाश टाकतात बघा. बहिणाबाईंनी कुठल्याही रचनेचं बारसं केलं असण्याची शक्यता नसल्याने, त्यांची ही दोन ‘गाणी’ त्यांच्याच शब्दात...
१