चित्र सौजन्य: स्त्रोत
दुर्लभं भारते जन्म मानुष्यं तत्र दुर्लभम् II
‘मुळात या भारतवर्षात जन्म मिळणे हेच दुरापास्त आणि त्यात मनुष्य जन्म मिळणे हे तर अहो भाग्यम्!’ अशा अर्थाचा एक श्लोक वेदांमध्ये असल्याचे स्मरते. अगदी परवा परवापर्यन्त आमची या गृहितकावर गाढ श्रद्धा होती... ७ वर्षांपूर्वी आम्हीच बघितलेल्या (कर्म आमचं !) कुणी दाखविलेल्या नव्हे (जैसे ज्याचे कर्म...?) स्वप्नावर होती तेवढीच... तंतोतंत ! आणि आमच्यासारख्या दुर्लभ भारतीय मनाची स्वप्ने काय, ‘उद्या लस मिळेल..!’ अशी अप्पलपोटी संकुचित मध्यमवर्गीय असेल म्हणता... नाव नको ! जरा एक नजर टाका आमच्या स्वप्नसूचीवर...
‘आपण आपल्याकडील थोर ज्ञानसंपदेचा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि होतकरू तरुणाईचा जगाला फायदा करून देणार... सारे जग, जे आज आपल्याकडे ‘एक निरंतर वाढणारी अधाशी बाजारपेठ’ (बघा: ‘अपने ॲमेझॉनपे...? अमेझिंग !') म्हणून बघतेय ते लवकरच आपल्या अतुलनीय ज्ञानाची, अद्भुत कला-कौशलयांची आणि अथक उत्पादनक्षमतेची जाणीव झाल्याने आपल्याकडे केवळ ग्राहक वा वितरक म्हणून नाही तर सृजनशील निर्माता, कुशल संघटक तथा स्वयंपूर्ण उत्पादक म्हणून आदराने बघणार... नव्या रचनेतील नव्या बाजारपेठांच्या नव्या व्यवस्था आपण, ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें...’ म्हणत सहज काबीज करणार... आणि ‘हे विश्व माझेची घर !’ या उदात्त, उन्नत भावनेने साऱ्या जगाचे, उपकारकर्ते पोशिंदे होणार... अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ठेका केवळ प्रगत राष्ट्रांकडेच का असावा, आपण आपल्या देशातही अतिप्रगत तंत्रज्ञानाचे चित्तचक्षुचमत्कारिक प्रयोग लावून साऱ्यांचे मनोरंजन करणार... शिवाय, या सगळ्या भौतिक साधनांच्या पलीकडे, जे आपले युएसपी आहे, ते जीवन तत्वज्ञान आणि अध्यात्मदर्शन यांच्या साधनेतून, शारीर गोष्टीत अडकलेल्या अजाण, विषयासक्त, मर्त्य मानवाला त्याचे बोट धरून विकारातून विचाराकडे नेणार आणि निखळ आनंदाची अप्राप्य अशी प्रचिती देणार... सारे सारे सच्चिदानंद करून टाकणार आणि आपल्यावर पडलेल्या विश्वकल्याणाच्या जबाबदारीमुळे स्वाभाविकपणे विश्वगुरु होणार…!’
पण हाय रे दैवा ! मुल्ला नसीरउद्दीन अधिक शेखचिल्ली गुणिले मुंगेरीलाल अशा समिकरणाच्या साखरझोपेतल्या हसीन सपन्यांवर कुणीतरी घागर उताणी करून स्वप्नभंग करावा आणि रिॲलीटी चेक अर्थात भकास वास्तवाचे प्रच्छन्न दर्शन घडावे तसे आम्ही दाणकन् जमिनीवर आदळलो आणि पार्श्वभागाची कळ मस्तीष्कापर्यंत पोहचल्याने, करोंना घालवायला थाळ्या झंकारल्या तसे, आपादमस्तक झंकारलो ! ‘बुलेट ट्रेन’, ‘हायपरलूप’ने क्षणार्धात इथून तिथे पोहचण्याची आणि ‘५ जी’ने इफेक्टिव्हली कम्युनिकेट करण्याची स्वप्ने बघता बघता आम्ही ‘उघडा डोळे, बघा नीट’ हा उपदेश शिरसावंद्य मानून भोवताली नजर फिरवली तर आम्ही उभे आहोत रांगेत आणि ती रांग, गोगलगायसुद्धा युसेन बोल्ट ठरावी अशा वेगाने सरपटते आहे म्हणतांना जीवनाच्या वास्तव-दर्शनाने आमची (तळपत्या उन्हात) लाही लाही होऊ लागली !
बरे, दुर्लभ भारतीय असण्याचे बाळकडू आम्हाला चांगलेच पचले असल्याचे गुटगुटीत बालक स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवून सिद्ध केलेले आम्ही, ‘रांग दिसली की नंबर लावायचा, ती कशासाठी आहे हे कळेपर्यंत उशीर होतो...’ या आजवरच्या संचित व्यावहारिक ज्ञानाने या कामी अजिबात हयगय करीत नाही. दोन-तीन वेळा भलत्याच रांगेत लागल्याने थोडा कालापव्यवय झाला आणि सामाजिक प्रतिष्ठा(?) धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली पण एवढयातेवढ्या घटनांनी आमचा वर्षानुवर्षीच्या शहाणिवेतून आलेला दृढनिश्चय ढळतो की काय ? तर आम्ही नेट लावून (फोनवर) नेमस्तपणे रांगेत उभे राहिलो आणि आपल्या तोंडावर खिडकी बंद होण्याची प्रतीक्षा करू लागलो. हो, साऱ्याच गोष्टी नशिबाने मिळाव्या लागतात, ‘हम जहां खडे होते है लाईन वही से शुरू होती है...!’ हा कॉन्फीडन्स येण्यासाठी जी उंची गाठावी लागते ती, कुठल्याही क्षेत्रात सोडा, नैसर्गिक वाढीनेसुद्धा गाठू न शकल्याने, आमच्या नशिबी, ‘हमारा नंबर जब आता है, खिडकी तब ही बंद होती है !’ एवढेच विदारक सत्य…
तर साक्षात्कार झाला तो असा की सांप्रत काळी महामारी पसरवणारा जो काही विषाणू कार्यरत झाला आहे म्हणे, त्याला अटकाव करण्यासाठी जी काही लस मिळणार आहे म्हणे, तिच्या नावनोंदणीसाठी भल्या पहाटे जे काय टोकन मिळणार आहे म्हणे, ते हस्तगत करण्यासाठी ही रांग आहे... आपलं, होती म्हणे, जी, आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या सेवेचे असिधारा व्रत घेतलेल्या टोकन वितरकाच्या हस्तकांनी सारे (अवघे ५०... अबब !) टोकन हस्तगत केल्याने अप्रस्तुत ठरल्याने आता लांबवली न जाता पांगवली जात आहे... म्हणे !
आजचे आपले ‘आत्मनिर्भर’ असण्याचे कर्तव्य बजावल्याने कृतकृत्य होत्साता आम्ही, ‘हाच खेळ उद्या पुन्हा...’ या, दुर्दशन वाहिन्यांवर पोसलेल्या आमच्या पिंडाला समजावत आणि धीर देत स्वत:ला पुन्हा एकदा २४ तास स्थानबद्ध करून घेण्यासाठी स्वगृही परतलो. वेळ घालविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी बातम्या बघाव्या म्हणून टीव्ही लावला तर पुण्याचा लस निर्माता साहेबाकडे जाऊन राहिल्याची बातमी. अलीकडे कुणीही लंडनला (पळून ?) गेलाय म्हटलं की आम्हाला आमच्या बँकेतल्या ठेवी आठवतात. हो, असेना का त्या हजारात, आमच्यासाठी त्या लंडनला पळून जाणाऱ्यांच्या हजारो कोटींइतक्याच मौल्यवान आहेत. आणि आमचा हा खारीचा वाटा त्यांच्या कोटीच्या कोटी उड्डाणांची भरपाई करायच्या कामी येणारच नाही असेही नाही... कुणी सांगावे...?
टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये ‘टीआरपी’मुळे काही राम उरला नाही असे म्हणत आम्ही आमचा मोर्चा वर्तमानपत्रांकडे वळवला (हो, आयुष्यात आम्हाला एवढा एकच मोर्चा काढता आणि वळवताही येतो, उगाच शेतकऱ्यांचे, उपेक्षितांचे नेतृत्व करायच्या गमजा कशाला मारा ?) तर वर्तमानपत्रात मती गुंग करणारी आकडेवारी ! फक्त २५ चा 'कोटा' करूनही आपल्या जवळच्या(?) नातेवाईकांची, झालंच तर आमच्या राहत्या सोसायटीची लोकसंख्या मोजतांना आम्ही चार वेळा चुकतो तिथे आपल्या शहराची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची आणि जगाची लोकसंख्या आणि त्यातील टेस्टेड, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, होमक्वारंटाईन्ड, हॉस्पिटलाईज्ड, रिकव्हर्ड आणि डिसीज्ड असे सारे आकडे बघून आम्हालाच डिस-ईज व्हायला झाले !
परवा एका मित्राचा फोन आला, फारच काळजीत होता, आम्हाला वाटलं पॉझिटिव्ह झाला की काय ? काय दैवदुर्विलास आहे पहा, निगेटिव्ह असणं ही पॉझिटिव्ह न्यूज झालीय आणि पॉझिटिव्ह ‘निघालो’ तर ऊर्ध्व लागायची वेळ, याहून अधिक घोर कलियुग काय असणार ? गेल्या वर्षभरात – एक अदृश्य पण सर्वव्यापी (हे वर्णन पूर्वी ऐकल्यासारखे का वाटतेय?) विषाणू, त्याचे लगेचच जाणवणारे आणि दूरगामी परिणाम, त्याने माणसाच्या आयुष्यात केलेली अभूतपूर्व उलथापालथ, त्यावर आधारित अर्थकारण आणि त्यामुळे ओघानेच येणारे राजकारण – या इतका दुसरा कुठलाही विषय (खुद्द तो तथाकथित व्हायरस देखील) व्हायरल झाल्याचे आम्हाला स्मरत नाही ! सारे काही अनित्य असणाऱ्या या जगात (बघा: बुद्ध आणि विपश्चना), ‘पुरून उरणे’ म्हणजे काय याचा वस्तुपाठ ठरत चाललेला हा विषाणू आता, मोंघलांना संताजी-धनाजी दिसायचे तसा, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसू लागल्याने इतर क्षुल्लक गोष्टी जसे की – शिक्षण, रोजगार, कला-क्रीडा, मनोरंजन आणि जिचा विनाकारण स्तोम माजवून ठेवलेय ती लोकशाही (म्हणजे काय रे भाऊ?) – यांनी बॅकसीट घेतलीय की स्टँडिंग आहे तेच कळेनासे झालेय ! हे असे होते, विषय कुठलाही काढा, तो फिरून त्याच ठिकाणी येतो, श्वास घ्यायलाही फुरसत देत नाही... अर्थात ऑक्सीजन तरी कुठे शिल्लक आहे म्हणा...?
ते असो! मुद्दा... मित्राचा फोन... तर सकाळ-संध्याकाळ नित्यनेमाने संध्या करणारा नेमस्त मित्र म्हणाला,
‘तुला महितेय, पुण्याचा पॉझीटीव्हीटी रेट जास्त वाटला तरी रिकव्हरी रेट पण ॲव्हरेजपेक्षा लिटिल बीट हाय आहे आणि डेथरेट तर ग्लोबल ॲव्हरेजच्या कितीतरी खाली आहे, कम्पैरीझनमध्ये ऑलमोस्ट झिरो, यू नो !’
‘असणार तर, आपण पुणेकर आहोतच क्रिटीकली पॉझिटिव्ह... त्याशिवाय का पुण्याने होकारलं ते जगाने स्वीकारल अस म्हणतात !’
आम्ही त्याही परिस्थितीत क्षीण विनोद करून पाहिला (नाहीतरी विनोदबुद्धी शिवाय आता हाती काय उरलंय ? अर्थात काही लोकांच्या नाकाचा वास आणि तोंडाची चव जाण्याआधी डोक्याचा सेन्स ऑफ ह्युमर गेल्याचेही अनुभव आहेत म्हणा) पण तोही पडला... मित्र नव्हे, आमचा क्षीण विनोद ! सांख्यिकीवाला मित्र भडकलाच...
‘तुझ्या या अशा कशावरही बाष्कळ विनोद करण्यामुळे तुझी प्रगती होत नाही. आपल्या अवतीभोवती काय चाललय याचा जरा बारकाईने अभ्यास करायला शिका आणि आपल्या वयाला शोभेलसे वागा... आयुष्य जरा सिरियसली घ्या, यू हॅव नो मॅच्युरिटी ॲट ऑल, रबीश ! जग कुठे चाललयं बघा...’
‘मसणात...’ आम्ही मनातल्या मनात हजरजबाबीपणा करून घेतला, हो, पुन्हा कोण लेक्चर ऐकणार ? तरी बरं थोड्या वेळाने आम्हाला लाडीगोडी लावण्यासाठी हाच मित्र ‘गण्या आणि मास्तर’वाले जोक पाठवणार आणि ‘महाराष्ट्राची हस्यजत्रा’ किंवा ‘कॉमेडी बिमेडी’, अगदीच गेला बाजार ‘चला हवा येऊ द्या...’ (अक्षरश: ... दुसरा कुठलाही कार्यक्रम आपल्या नावाला इतका जागल्याचे आमच्या तरी पाहण्यात नाही !) यातील ‘दर्जेदार’ विनोदांच्या क्लिप्स आम्हाला धाडणार. त्यातल्या त्यात एमएचजे तरी ठीक, तिथे बाकी काही नाही तरी प्राजक्ताचा सडा पडतो... पण मुद्दा प्राजक्त फुलण्याचा किंवा खुलण्याचा नसून, ‘एवढी प्रखर बुद्धिमत्ता, जाज्वल्य पक्षनिष्ठा, निष्पक्ष विवेकविचार आणि उच्च अभिरुची जोपासणाऱ्या मित्राने आमच्या बाणेदार विनोदाला बाष्कळ म्हणावे का ?’ हा आहे.
खर तर मुद्दा तो ही नाही... मुद्दा एवढाच आहे की सार्वजनिक आरोग्य हा चर्चा करण्याचा, धंदा करण्याचा, राजकारण करण्याचा किंवा विनोद करण्याचा विषय आहे का ? या संदर्भात आपल्या सर्व सार्वजनिक व्यवस्था आणि लोकाभिमुख नियोजन यांचे जे पितळ उघडे पडले आहे तो हसून सोडून द्यायचा विषय आहे का ? मुळात या सर्व जगजाहीर नाचक्कीला जबाबदार कोण आणि का यावर चिंतन करून काही योजनाबद्ध धोरणे आखावी जेणे करून भविष्यात याची पुनरावृत्ति होणार नाही याची आपण खबरदारी आणि जबाबदारी घ्यायला नको ?
‘सॉरी, आमचं... रादर आपलं… चुकलंच जरा’ एवढी छोटीशी प्रामाणिक कबुली देऊन प्रायश्चित्त घ्यायला कुणीच पुढे येऊ नये ? साऱ्यांनी एकमेकांना ट्रोल करून आपण (ॲन्टी) सोशल (मीडिया) ॲनिमल आहोत हे सिद्ध करण्याचा चंगच बांधावा…? आम्ही बघितलेली स्वप्ने आभासी नाहीत, खोटी नाहीत. फक्त ते स्वप्नरंजन आपण डोळे मिटून व्यक्तिनिष्ठ अंधश्रद्धेने न करता, सतर्क जागेपणी, विचारनिष्ठ विवेकाने केल्यास त्यातील प्रत्येक स्वप्न हे केवळ संभाव्य नाही तर संभावित आहे हे सूज्ञ मनाला कळून येईल. मुद्दा एवढाच की ते वेदवचन पुराणोक्त ठरवायचे की शास्त्रोक्त हा निर्णय आपलाच, आपल्या सर्वांचा आहे... असावा !
‘अहो, लक्ष कुठेय तुमचं...? आजही लस संपलीय म्हणे, उद्या या म्हणताय. मी काय म्हणते, कोवैक्सीन चालणार असेल तर ताईला विचारून बघू का...?’
तोंडाला फेस आणणाऱ्या विषाणूची लस आणि तोंडाला पाणी सुटण्यास भाग पाडणारा हापूस (देवगड की रत्नागिरी ?) यात फरक न करणाऱ्या आणि कुठल्याही टेस्टच्या हवाली नसलेल्या पॉझीटीव्हीटीने सर्वकाळ भरून वाहणाऱ्या आपल्या गृहस्वामिनीकडे ऋणाईत लाभार्थ्याच्या कौतुकभरल्या स्नेहादराने पाहत आम्ही पुन्हा एकदा घरचा रस्ता धरला...
Critical positivity
उत्तर द्याहटवा