साक्षर म्हणजे सुशिक्षित नव्हे. सुशिक्षित म्हणजे सज्ञान असे नाही. सज्ञान व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही आणि सुसंस्कृत म्हणजे सूज्ञ नव्हे. सूज्ञ असूनही संवेदनशील असणे जसे वेगळे तसेच संवेदनशील असून सजग असणे महत्वाचे. शिवाय केवळ सजग असणे पुरेसे नाही तर सक्रीय असणे अधिक श्रेयस्कर!
तद्वतच निरक्षर म्हणजे अडाणी नव्हे आणि अशिक्षित म्हणजे अनभिज्ञ किंवा अविवेकी नव्हे. याच कारणाने ‘सखाराम बाईंडर’ मधली चंद्राची भूमिका, ती साकारणाऱ्या लालन सारंग यांना समजावून सांगतांना तेंडूलकर म्हणाले, ‘पुस्तकी ज्ञान नसेल पण चंद्राची जगण्याची जाण आणि भान मोठे आहे...!’
आमच्या खान्देशी बहिणाबाई निरक्षर आणि अशिक्षित जरूर होत्या पण त्यांचे जगण्याचे भान असीम तर होतेच पण त्यांची ‘माणसा’ची जाण किती अलौकिक आणि कालातीत होती हे, आजच्या दाहक वास्तवावर परखड भाष्य करणाऱ्या, त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या तंतोतंत कवितांवरून निर्विवाद सिद्ध होते.
‘टिळक गेल्यानंतर, ज्याला समोरून येतांना बघून हातातली विडी टाकून द्यावी असा माणूस पुण्यात उरला नाही...’ अशी ‘खंत’ व्यक्त करणारे एकमेवाद्वितीय आचार्य अत्रे, बहिणाबाईंची प्रतिभा बघून, ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे हे बावनकशी सोने आहे...!’ असे म्हणतात यावरून बहिणाबाईंच्या रचनांचा दर्जा लक्षात यावा.
बहिणाबाई ‘निरक्षर’ असल्याने त्यांनी स्वत: यातले काहीही लिहून काढले नाही, त्या सुचेल तसे गात गेल्या आणि ऐकणाऱ्यांनी जमेल तसे उतरवून घेतले त्यामुळे बहिणाबाईंची कविता जशी ‘आधी कळस मग पाया...’च्या धर्तीवर ‘आधी गीत मग कविता’ असा अध्यात्मिक (उलटा?) प्रवास करते तसेच तुकोबांची गाथा जशी लोकगंगेने तारली (इति: पुलं) तशीच केवळ त्यांच्या तोंडून निघणारा शब्द उतरवून पुढल्या पिढ्यांवर उपकार करणाऱ्यांचे ऋणही मानायलाच हवे !
आणखी एक - खान्देशी ‘अशिक्षित’ असल्याने बहिणाबाई आपल्या मायबोली अर्थात ‘माझी माय सरसोती’च्या भाषेत म्हणजे आमच्या अहिराणीत गात असल्याने, मराठीचाच एक अवतार असला तरी, यातील काही शब्द समजणार नाहीत, पण भाव जाणून घेतला तर अर्थ लागायला हरकत नसावी. शिवाय, कानाला अतिशय गोड वाटणाऱ्या आमच्या अहिराणीचा, त्यानिमित्त अभ्यास केलात तर मराठी भाषा मुळातच किती समृद्ध आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या विनंत्या करण्यापेक्षा तिचा स्वाभिमानी बाज समजावून घेऊन व्यवहारात वापर वाढवला तर ही जनसामान्यांची आणि छत्रपतींची भाषा कधीही कुणाची मिंधी होणार नाही... असो! तो एक वेगळाच विषय आहे...
साऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींनीही माणूस म्हणून सूज्ञ, सुसंस्कृत, संवेदनशील आणि सक्रीय असण्याची अपेक्षा असेल तर समाजधुरीण, धोरणकर्ते आणि उच्चपदस्थ यांच्याकडून ही अपेक्षा शतपटीने वाढल्यास नवल नाही. सर्वच आलबेल असतांना आणि परिस्थिती अनुकूल असतांना धोरणीपणाचा, नेतृत्वाचा कस लागेलच असे नाही पण आणीबाणीच्या प्रसंगी शीर्षस्थ व्यक्ती किती सर्वसमावेशक विचार करू शकते आणि आपल्या धोरण-निर्णयांचा साधक-बाधक विचार करतांना किती संवेदनशीलता दाखवते यावरून नेतृत्वगुणांचा कस तर लागतोच पण या निमित्ताने त्या माणसाच्या व्यक्तित्वाचा पोत आणि दर्जा जसा दिसून येतो तसे ‘जगण्या’ची जाण आणि भानही समजते.
आजच्या अत्यंत बिकट परिस्थितीत, जगण्यासाठी धडपडणाऱ्या अगतिक बहुसंख्यांची विवंचना एकीकडे आणि अशाही परिस्थितीत, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या आपमतलबी अविवेकी संधिसाधूंची वखवख दुसरीकडे, अशा विदारक परिस्थितीत बहिणाबाईंच्या या दोन रचना कसा प्रकाश टाकतात बघा. बहिणाबाईंनी कुठल्याही रचनेचं बारसं केलं असण्याची शक्यता नसल्याने, त्यांची ही दोन ‘गाणी’ त्यांच्याच शब्दात...
१
साक्षर म्हणजे सुशिक्षित नव्हे. सुशिक्षित म्हणजे सज्ञान असे नाही. सज्ञान व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही आणि सुसंस्कृत म्हणजे सूज्ञ नव्हे. सूज्ञ असूनही संवेदनशील असणे जसे वेगळे तसेच संवेदनशील असून सजग असणे महत्वाचे. शिवाय केवळ सजग असणे पुरेसे नाही तर सक्रीय असणे अधिक श्रेयस्कर!
उत्तर द्याहटवाहे खूप आवडलं.थोडं युरेका सारखं झालंय ...
Marathi Motivation
तब्बल दोन वर्षांनी उत्तर देतोय याबद्दल सर्वप्रथम मन:पूर्वक क्षमायाचना! काय आहे की आम्हाला आमच्या पोस्टवर कॉमेंट्सची सवय नाही त्यामुळे तिकडेही लक्ष पुरवायचे असते याचे कंडीशनींगच झालेले नाही. शिवाय गुगलने, 'तुमच्या पोस्टवर कॉमेंट आली की तुम्हाला सांगू...' अशी कितीही ग्यारंटी (हल्ली हा शब्द असा'च' लिहिण्याची नव्याने 'विकसित' प्रथा आहे!) दिली तरी बऱ्याचदा मॉडरेशनचा आपो'आप'(?)च झाल्याचे आढळते आणि हळहळण्याशिवाय हाती काही उरत नाही. असो. तर आपल्या 'युरेका' प्रतिसादाबद्दल 'मना'पासून धन्यवाद! आम्हाला अगदी आर्किमिडीज झाल्यासारखे वाटले... पण आमच्याकडे बाथटब आणखीन हिज हायनेस महाराज दोन्ही नसल्याने आम्ही दिगंबर अवस्थेत रस्त्यावरून धावत सुटणार नाही... काळजी नसावी!
हटवा