शनिवार, २६ जून, २०२१

गोधडी...!

प्रिय दिना,

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥

ज्याला हे समजते, उमजते आणखीन साधते तोचि एक समर्थ बाकी सगळेच असमर्थ! जगात असे काय आहे ज्याला समर्थ-स्पर्श झालेला नाही…?तरीदेखील आपल्या अल्पबुद्धीनुसार या अनंत अनाकलनीय पसाऱ्याचा अर्थ लावतांना कधी कधी विपर्यास होणार तर कधी बुद्धिभेदहेतू प्रामाणिक आहे आणि प्रयत्नात खोट नाही तोवर सारेच क्षम्य आणि स्वीकारणीय देखीलतेव्हा अप्रिय निसर्गक्रमाची फार विषादात्मक उजळणी नको आणि तपशिलांची अतिचिकित्साही. न पेक्षा चिंतन आणि प्रकटनाचे अधिष्ठान इतरत्र हलवावे आणि चपळ मनास अन्य विषयी गुंतवावे

सध्या एका प्रदर्शनानिमित्त सौ. स्वाती, आदित्य आणि काकूंसह पुण्यास वास्तव्यास आहे आणि त्यांचा मुक्काम १८ पर्यंत असेल असे 'विश्वसनीय' सूत्रांकडून समजते. कुमार काका स्वत:हून अशा सुवर्ण संधीचा लाभ घेतील व ती साजरी करण्यास मित्रांना आमंत्रित करतील अशी अपेक्षा करणे म्हणजे 'मी शाकाहारी आहे म्हणून सिंह मला खाणार नाही' अशा आत्यंतिक भाबडेपणाच्या कल्पनारंजनासारखे ठरावे. तेव्हा आपल्या अति महत्वाकांक्षी सवंगड्यांकडून अधिक अपेक्षा न करता आपण स्वत:हून नासिक वारी करावी काय असा विचार होतोयआपली काय भूमिका…?

बदलेल्या विषयाच्या उत्तरार्थ 'वेगळ्या' प्रतिसादाच्या अपेक्षेत… 

मनीष   

----------------------------------------------------------------------- 

उपरोक्त पत्राच्या मायन्यातील दिना म्हणजे आमचा जीवलग, प्राणसखा, परममित्र दिनेश मनोहर चंद्रात्रे जो आज पन्नाशीचा होतोय! (त्याच्या नावाआधी लावलेल्या प्रत्येक विशेषणाला एक वेगळा, सघन आणि हृद्य संदर्भ आहे, त्यांचे प्रयोजन साहित्यिक सौंदर्यापेक्षा आत्मिक अनुभूतीशी जवळीक सांगणारे असल्याने साऱ्यांनाच त्यांची स्पंदने जाणवतीलच असे नाही आणि म्हणूनच तशी अपेक्षाही नाही!) आमच्या जवळपास चाळीस वर्षांच्या मैत्रीच्या सप्तरंगी गोधडीत सगळ्यात ठसठशीत रंग असेल तर तो निरंतर (अक्षरश:!) संवादाचा आणि साऱ्या तुकड्यांना घट्ट धरून ठेवणारा धागा असेल तर तो निर्हेतुक (तंतोतंत!) स्नेहाचा... बंधुसखा कुमार, दिना आणि मी हे त्रिकूट शालेय जीवनापासून एकत्र होते आणि आज कुमार आणि मी आपापल्या प्राक्तनाने (की कर्माने?) धुळ्याच्या विरहात इतरत्र स्थायिक असतांनाही दिना, त्याच्या धारणांवर असतो तसाच, धुळ्यात ठाम आहे! मी नव्वदच्या सुमारास पुण्यास आल्यापासून आमचा पत्रसंवाद सुरु झाला आणि आज गेली तीन दशके तो शेकडो पत्रांच्या माध्यमातून निरंतर सुरु आहे आणि... राहील! वरील पत्र हे त्याच मर्मबंधातल्या ठेवीतील एक मोरपीस...

कुमारला जन्मत:च कलेची अलौकिक दैवी देणगी लाभल्याने त्याला अविष्कारांसाठी साधनांची कधीच कमतरता नव्हती... नाही, आम्हां दोघांचे तसे नव्हते. शाळेत निबंध लिहिण्याची आवड आणि वक्तृत्व, रंगमंचीय अविष्कार यातील गोडी यामुळे माझी हाती लेखणी आली आणि मी अखंड बोलू आणि मनसोक्त लिहू लागलो. दिनाने यथावकाश या दोन्ही माध्यमात मुशाफिरी केली आणि त्याच्या काही स्केचेस आणि विशिष्ट कवितांनी कुमारला आणि मलाही भुरळ घातली. दिनाच्या अत्यंत संवेदनशील मनाची तेवढीच आर्त ही एक अभिव्यक्ती बघा...    

दोन शब्द बोलण्यास येथे त्यांना उसंत नाही
माझी ही कहाणी कुणास ही पसंत नाही

सुई धाग्याने विणू म्हटले नात्यांचे वस्त्र
टोचून घेण्यास माझ्या, जरा ही अंत नाही

पानगळ, झळांची मला झाली पुरती सवय;
ऋतुचक्रात माझ्या आता उरला वसंत नाही

परिघाकडून केंद्राकडे प्रवास हा अटळ
सहनशील क्षितिज माझे अनंत नाही

कर्म-भोग घेऊन शिरी, जरी चालतो एकला;
क्रुसावर हासणारा, मी मुळीच संत नाही!

या बरोबरच दिनाने मला लिहिलेली असंख्य पत्रे हा मराठी भाषा समृद्ध करणारा वस्तुपाठ ठरावा. कविता आणि पत्रे याबरोबर दिनाने काही ललित लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो समृद्धी अर्थात ‘समू’साठी असल्याने जेवढा भावविभोर तितकाच उत्कट आणि संवादी झाला नसता तरच नवल...

 गेल्या वर्षीपासून मनुष्य जमातीवर विषाणूचे जे अभद्र सावट पडले आहे त्याची झळ दिनालाही बसली आणि त्याच्या अतिसंवेदनशील मनाने त्याची नोंद घेतांना त्याच्या मूळ विरक्त वृत्तीने उचल खाल्ली. या संदर्भात त्याने अगदी अलीकडे लिहिलेल्या ‘काही नोंदी समूच्या...’ ला दाद देण्यासाठी जी कविता मी त्याला धाडली होती ती आजच्या दिवसासाठी मी राखून ठेवली होती... आज दिनाच्या पन्नाशीनिमित्त त्याला या कवितेची सस्नेह भेट...

लयाची खंत नको

मागे उत्पत्ती उभी

सूर्य अस्तास जाता

नवी चंद्रकोर नभी...!

 

ओहोटी अन पानगळ

ऋतुचक्र अक्षत राहे

भरतीचा वसंत येता

चैतन्य भरून वाहे...!

 

काही लयास जाते तसे

उगवते रोज नवे काही

शून्यातून उमलते

शून्यातले अर्थवाही...!

 

दिना, आज सकाळच्या संदेशात म्हटले तसे...

“पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि

नाबाद शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!”

 

नेहमीप्रमाणे... अजून बरेच बोलायचे, लिहायचे, सांगायचे, ऐकायचे आहे... 

पुन्हा कधीतरी...

५ टिप्पण्या:

  1. अप्रनिम मनीष..... दिनू अण्णा बद्दल लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे. प्रत्येकाला दिनू सारखा एक तरी मित्रा असावा... अन्यथा मैत्रीचा खरा अर्थ कळणार नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद, मिलिंद! मैत्रीचा अर्थ कळावा नाही तर आकळावा लागतो आणि मैत्री करावी नाही तर निभवावी लागते हे आजच्या ब्ल्यू-टूथ जगात कुणास सांगावे आणि कसे...? असो.

      हटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा