तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच
पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही
रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला
मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही
म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही
कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच
एकटेपण...
- अरुण कोलटकर
ज-आगतिक महिला-दीन-विशेष...!
कोलटकर आपल्या धारणांना काव्यमय कोलतात 😎डॉ सचिन चिंगरे
उत्तर द्याहटवा...आणि साऱ्यांना रुचेलच असे नाही पण डाचेल असे बोलतात !
हटवा