रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

गाभारा...!


(स)माजमाध्यमाने चांगलीच सोय करून दिल्याने स्वतः:ला लेखक अथवा त्याहून सुलभ म्हणजे कवी समजणाऱ्यांचे अक्षरश: पेव फुटलेले असतांना भाषेच्या भवितव्याबद्दल एवढी तळमळ, कळकळ आणखीन हळहळ व्यक्त करणारे मान्यवर व्यवहार कुठल्या भाषेतून करतात याचा धांडोळा घेतल्यास बरेच जावईशोध लागल्यामुळे भोवळ आल्याशिवाय राहणार नाही.

वरील प्रकटनातील भाषाविशिष्ट स्वर-व्यंजन,  उपरोध आणि त्यांच्या उपयोजनाचे प्रयोजन अर्ध्या जरी प्रस्तुत भाषाभिमान्यांस समजले, उमजले तरी, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माऊलींच्या आणि छत्रपतींच्या प्राकृत भाषेचे प्राक्तन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि 'अभिजातते'च्या नावाने गळे काढण्याची कदापि गरज पडणार नाही.

याबाबतीत अल्लामा इकबाल यांचा 'खुदीको कर बुलंद इतना...' सल्ला शिरोधार्य मानायलाच हवा. वापर नसलेल्या गोष्टी कालौघात नामशेष होतात हे सांगायला आजच्या ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या काळात डार्विनची गरज नसावी. वापर हा सवयीतून येतो आणि सवय संस्कारातून येते. संस्कारासाठी अध्ययन, चिंतन, मनन, प्रकटन यांचा परिपाठ असावा लागतो. अन्यथा, तथाकथित भाषाभिमान्यांचे अरुण्यरुदन हे आज महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय शिमग्याइतकेच निंदनीय तथा शोचनीय ठरल्यास नवल नाही.  असो!

'शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस...'

असा वस्तुनिष्ठ सल्ला देणाऱ्या आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ जाणिवांचा धनी आणि शब्दरत्नाकराचा महामेरू, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे वैभव कुसुमाग्रज यांचा आज ११० वा जन्मदिवस. या निमित्ताचे औचित्य साधून हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करणे अभिमानास्पदच पण केवळ सोहळ्यांच्या परंपरेने संस्कृती विकास पावत नसते, त्यासाठी काही तत्वांचा, मूल्यांचा, संस्कारांचा वसा घ्यावा लागतो. कथनी आणि करणी मधला फरक राजकारण्यांना शोभत असला तरी रयतेने तरी त्या वाटेने जाऊ नये. अन्यथा 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने समाजात दांभिकता बोकाळण्यास वेळ लागत नाही. 

आजच्या निमित्ताने, ज्यांच्या नावाने हा जयघोष चालला आहे त्या कुसुमाग्रजांनी समाजव्यवस्थेतील  दोषांवर आणि दांभिकतेवर कोरडे ओढण्याची एकही संधी कधी हातची जाऊ दिली नाही. त्यासाठी त्यांच्या अखेर कमाईस्वातंत्र्यदेवीची विनवणीसहानभूतीसिंहस्थ या कविता जरूर वाचाव्या मात्र आजच्या परिस्थितीला अगदीच समर्पक असणारी कुसुमाग्रजांची ही कविता... सामाजिक-राजकीय उद्बोधनासाठी.

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाहीगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
- कुसुमाग्रज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा