रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

भावगर्भ...!


उद्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र वैभव, मराठी भूषण, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे ऋषितुल्य कविवर्य कुसुमाग्रज यांचा १११ वा जन्मदिवस आणि त्या औचित्याने साजरा होणार मराठी भाषा दिन. या निमित्ताने यापूर्वी इत्यादीवर ३ वेळा प्रकटन झाले आहे - मीच...! (२७ फेब्रुवारी २०१७)एक तरी ओवी अनुभवावी...! (२७ फेब्रुवारी २०१८) आणि गाभारा...! (२७ फेब्रुवारी २०२२).

आजही भावना त्याच, तेवढ्याच, किंबहुना वयोमानानुसार अधिकच उत्कट असल्या तरी या लिखाणाचे प्रयोजन (खरं तर उर्मी... की उबळ?) मिळाले ते आमचे धुळ्याचे आणखी एक रसिकोत्तम सन्मित्र शाम वाघ यांनी या निमित्ते पाठवलेल्या, ‘हिरवळ आणिक पाणी, तेथे मजला सुचती गाणी...’ म्हणणाऱ्या भावकवी बाकीबाब अर्थात कविश्रेष्ठ बा.भ. बोरकर यांच्या अत्यंत सटीक, समर्पक आणि समुचित कवितेचे !

आता ही कविता, भावगर्भतेचे प्रमाण असलेल्या बाकीबाब यांनी, संतांच्या मांदियाळीचा पाया रचत, 'विश्वाचे आर्त माझ्या मनी  प्रकाशले...' म्हणणाऱ्या आणि अवघ्या जगास 'भावार्थदीपिके'च्या माध्यमातून प्रकाशित करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानियांचा राजाच्या वियोगाच्या विवशतेतून लिहिली असतांना, त्यावर आपल्या अल्पमतीने एवढ्या विवेचनाची गरज नाही हे शामने सूचित करून देखील, 'त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना...!'

'भाषेची अवस्था' हा फावल्या वेळातील चर्वितचर्वणासाठी एक खमंग विषय असतो आणि 'अभिजातता' यावर देखील बराच खल निरंतर चालूच असतो. अशा निमित्ताने तर मोसमी भाषाभिमान्यांच्या प्रतिभेला अधिकच धुमारे फुटतात. त्या साऱ्यांना मराठी भाषेची महती कळावी आणि, ज्या कलाकृतीने कंठ दाटून येतो आणि डोळ्यांच्या कडा पाणवतात ती 'अभिजात' हे आकळावे म्हणून बाकीबाब यांची 'ज्ञानदेव गेले तेव्हा...' ही अत्यंत भावस्पर्शी रचना आणि, विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त चालविलेल्या, 'रोज एक कविता' उपक्रमादरम्यान आम्हाला गवसू न शकलेली दुसरी विंदांची कविता - 'तेथून दूर जावे...'  दोन्ही रचना सन्मित्र शामच्या सौजन्याने साभार !

ज्ञानदेव गेले तेव्हा

ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत।
वेद झाले रानभरी, गोंधळले संत ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी ।
मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ती ।
आसवांच्या डोही, झाली विझू विझू ज्योती।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, तडा विटे गेला ।
बाप रखमा देविवरु, कटीत वाकला ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।
लागोपाठ भावंडें, तीं गेली निजधामा।।

माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।
भरदुपारीं ही तशी, झाली तीनसांज।।

तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।
भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।

इथे आळंदीत , आतां ऊर फाटे।
पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।

कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।
एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।

- बा. भ. बोरकर

तेथून दूर जावे

सर्वस्व अर्पिती जे, त्यांचेच गीत गावे;
त्याची घडे टवाळी, तेथून दूर जावे.

नसता विनोद काही हसतात, लोक सारे;
चाले असा तमाशा, तेथून दूर जावे.

संगीत ज्या ठिकाणी, रसहीन चाललेले;
बुद्धीस खाजवाया, तेथून दूर जावे.

विद्वान कल्पनांचा, काढीत कीस जेथे,
सामान्य माणसांनी, तेथून दूर जावे.

जनतेस नागवूनी, बनतात जे पुढारी,
त्यांचा झडे नगारा, तेथून दूर जावे.

बागेत हिंडताना, कुंजात लाडकीशी,
कुजबुज कानि येता, तेथून दूर जावे.

मोहान्ध होऊनिया, जे दार गाठलेले,
ते उघडण्याच पूर्वी, तेथून दूर जावे!

- विंदा करंदीकर

मराठी भाषा गौरव 'दिना'च्या 'मना'पासून शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन !

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

स्मरणगाथा...!



कुणी विचारलं काय आवडेल, आठवणी की साठवणी तर शहाणीव म्हणेल ‘आठवणींच्या साठवणी…!’

विस्मृती हे वरदान वाटावे अशा घटनांचे, जाणिवांचे, अनुभवांचे प्राबल्य वाढले तरी स्मृतींची ओढ आगळीच. अन्यथा, एका मनोवैज्ञानिक प्रयोगात, स्मृतीशिवाय आनंदयात्रेवर जाऊन हवी ती मजा करायला बहुतांनी, अगदी संधिसाधूंनीही, साफ नकार देण्याचे कारण नव्हते. जे अनुभवले ते आठवणीच्या रूपाने जाणिवेत राहणार नसेल तर क्षणभंगुर आनंदही नाकारण्याचा सूज्ञपणा दाखवणारा तो खरा होमो सेपियन… द वाईज मॅन !

अलीकडे सर्वत्र बोकाळलेले सेल्फीचे फॅड आणि कुठल्याही सादरीकरणामध्ये मोमेण्ट क्रिएट करण्याचे वाढलेले स्तोम हे ठसठशीतपणे एकाच गोष्टीचे समर्थन करते… माणसाचे आठवणीत रमण्याचे वेड. अलीकडे तर बऱ्याचदा तो मोमेण्ट, ते क्षण जगून हर्षित होण्यापेक्षा तो गोठवून प्रदर्शित करण्याकडे वाढलेला कल पाहता सारा अट्टाहास केवळ दिखाव्यासाठीच आहे की काय अशी शंका यावी.

ते काही असले तरी आठवणींच्या बाबतीत आपल्याला सिलेक्टिव्ह, चोखंदळ होता येत नाही हे खरेच. वपुंच्या शब्दात सांगायचे तर, ‘सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? फक्त आठवणींच्या राज्यातच तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेल्या भूतकाळ आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले, म्हणून त्रास.’

पण वपुंच्याच ‘पार्टनर’चा सल्ला शिरोधार्य मानायचा तर, ‘देअर इज नॉट अ सिंगल एक्साम्पल ऑफ अ हॅपी फिलॉसॉफर!’ मग नेहमीच एवढं निराशावादी तत्वचिंतक होण्याचं कारण नाही कारण आठवणी हे नाशवंत दुनियेतील एकमेव चिरंतन सत्य. आठवणींना वार्धक्य नसतं, ययातीसारखं दिवसेंदिवस तरुण होत जाण्याचं भाग्य फक्त आठवणींच्याच नशिबी. उदबत्ती लावल्यावर आसमंत सुगंधाने भरून जावा, अत्तराच्या स्पर्शाने पुलकित व्हावे तशा आठवणी हवेत तरतात आणि हळूच मनात उतरतात.

चंद्रमोहन कुळकर्णींची ‘बिट्वीन द लाईन्स’ असो, लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’ असो, की सुनीताबाईंचे ‘आहे मनोहर तरी’ सारा अस्पर्श जाणिवांचा आणि अव्यक्त संवेदनांचा आठवणींच्या माध्यमातून घेतलेला धांडोळा. तेव्हा, स्मृती या आवडत्या असू शकतात, नावडत्या असू शकतात पण अटळ कधीच नसतात. आणि कुणाच्याही आठवणींनी साकार होऊ शकते एकेक स्मरणगाथा… आजचा विषय आणि एवढे पाल्हाळ लावण्याचे निमित्त

आमचे धुळ्याचे सन्मित्र, उमद्या कविमनाचे सर्जक वैद्यविशारद डॉ. सचिन चिंगरे यांची एक ताजी, हळुवार आणि हृद्य रचना सादर करण्यासाठी नमनाला एवढे घडाभर तेल… आता वैद्यराजांना मोठ्या मनाने, ‘कविता आपलीच समजा’ अशा दिलदारपणाने दिलेल्या अनुमतीचा मनस्वी पश्चाताप होण्यापूर्वी आणि वाचकाने कंटाळून निघून जातांना आमची अवस्था, ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी शोचनीय करण्यापूर्वी, फाफटपसारा आवरून मूळ प्रयोजन सादर करावे हे उचित. बऱ्याच काळानंतर, एका प्रदीर्घ अभिजात उर्मीतून साकारलेली डॉक्टरांची ही भावविभोर गज़ल...

स्मरणगाथा

झाडांसम आठवणी शहाण्या, महापुरे मोठ्या वाहून गेल्या 
वेड्या होत्या लहान लव्हाळी, वाचल्या, मागे राहून गेल्या I

तीव्र वाढला ग्रीष्म भोवताली, पाझरली आत शीतल वर्षा
गोड आठवणी उष्णजलात खाऱ्या सचैल नाहून गेल्या I

परक्या होऊन पार पाडला काहींनी पुनर्भेटीचा तो उपचार 
माहेरवाशीण लेकी, आठवणी लाडक्या, काही अंमळ राहून गेल्या I

फूल काही आठवणी ताज्या, दरवळल्या अत्तर होऊन आता
राख मानून उचलाया गेलो, होत्या निखारा, दाहून गेल्या I

कुरुप, नकोशा म्हणून होतो विसरलो मी स्वार्थासाठी ज्यांना 
अबोल प्रीतीसम आठवणी त्याच नेमक्या निर्मळ मोहून गेल्या I

सिनेतारका नखरेल काही, राहिल्या दूरातच स्वप्ननभी 
सोज्वळ गृहिणीसम काही आठवणी आजन्म लाहून गेल्या I

सांत्वन केले आठवणींनी, दिला दिलासा, मी दु:खार्त तळमळताना
अंतर राखून नुसत्या काही दुरुन कोरडेच पाहून गेल्या I

काळ इंद्रायणीडोही बुडवली, तरीही तरली सनातन स्मरणगाथा 
आहेत आठवणी आणखीही, कविते, सांगणे राहून गेल्या I

डॉ सचिन

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

विराम...!


जगण्याची सक्ती
सक्तीची भक्ती
भक्ती विकारी
साराच अनर्थ...!

फळाची अपेक्षा
अपेक्षेची उपेक्षा
उपेक्षाचा भारा
निव्वळ स्वार्थ...!

अव्यक्त भाव
भावाचा डाव
डावावर घाव
मांडणे व्यर्थ...!