शुक्रवार, ६ मे, २०१६

समाजमाध्यमे...?

साधन-शुचितेच्या यादीत भाषेचाही समावेश असावा हा आमचा अट्टाहास याचसाठी की भाषा हे संवादाचे एक प्राथमिक तथा प्रभावी साधन (माध्यम) आहे. 'भाषा भ्रष्ट झाल्याने आचार विचारात भ्रष्टता आली (आणि जोपासली गेली!) कि व्यवहारातल्या भ्रष्टतेने भाषा भ्रष्ट केली?' हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. आजच्या सरमिसळी(fusion)च्या युगात शास्त्रार्थ, बौद्धिक किंवा जुगलबंदीची जागा वादावादी, मौखिक आणखीन सुंदोपसुंदीने घेतल्यालाही बराच काळ लोटला आणि दूरचित्रवाणीच्या काउंटरवरून रोजच त्याचे दुर्दर्शन झाल्याने, इतर अनेक अनुचित पण सोयीच्या गोष्टींप्रमाणे, तेही आमच्या अंगवळणी पडले. एकूणच सकस, सात्विक आणि मूल्याधिष्ठित गोष्टी वा कल्पनांकडे समाजाने पाठ फिरवल्यामुळे, जो समाज तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही त्याच्या भाषेची वाताहत होण्यास आधुनिक समाजमाध्यमेच कारणीभूत ठरली. समाजमाध्यमांनी, त्यांच्या अत्यंत सुलभ आणि किफायतशीर उपलब्धतेमुळे, जनसामान्यांना वाचाळ केले याहून चिंतनीय बाब अशी कि त्यांनी समाजमानसास अविवेकी केले शिवाय त्या योगे भाषा अत्यंत वेगाने भ्रष्ट होण्यात या शीघ्र व्यापी (viral) आणि अल्पजीवी (momentary) साधनांनी मोलाची कामगिरी बजावली. (आ)वेग, उथळपणा आणि अविवेक अशा व्यवच्छेदक लक्षणांनी युक्त अशा या साधनांच्या अतिरेकी वापराने अजून काय अघटीत होईल हे कल्पनातीत असले तरीही अटळ आणि म्हणूनच क्रमप्राप्त देखील आहे…

नमनाला एवढे घडाभर तेल घालण्याचे कारण, आमच्या या भाषा संस्कारांमुळे (किंवा वेडामुळे म्हणा!) आम्ही किमान आमच्या स्वत:च्या समाजमाध्यमी लेखनात शुचिता पाळण्याचा, आमच्या अल्पमती तथा सामान्य कुवतीनुसार यथार्थ प्रयत्न करतो असा आमचा समज (दावा नव्हे) आहे. आता हे आम्ही काही विशेष करतो असे नव्हे, शिवाय ते विनासायासच घडत असल्याने खास उल्लेखनीय किंवा दखलपात्र (चांगल्या अर्थाने!) आहे असाही आमचा दावा नाही, नव्हे असूच शकत नाही याची आम्हांस पुरेपूर कल्पना आहे. मुद्दा असा की आम्ही काही लोकप्रिय समाजमाध्यमांचे, माउलीच्या अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माय मराठीत 'बारसे' अर्थात नामानिधान केले आणि त्यावर आमच्या काही मान्यवर संपर्क (contacts) आणि सख्यांनी (friends या अर्थाने, स्त्रीलिंगी नव्हे, गैरसमज नसावा) अतिशय कौतुक मिश्रित अभिप्राय दिल्याने आमचा हुरूप वाढला. (नाहीतरी 'अशा बिनकामाच्या उद्योगांचा आम्हाला फार उरक…' इति आमच्या अन्नपूर्णा अर्धांगिनी!) तेव्हा कल्पनाशक्ती पणास लावून आम्ही शक्य तेवढ्या समाजमाध्यमांचा हा रुपांतरीत केलेला मऱ्हाटी तोंडवळा… बघा तुम्हाला कसा वाटतो… 

रविवार, १ मे, २०१६

जय महाराष्ट्र…?


'गर्जा महाराष्ट्र माझा', संतांची पावन भूमी
ज्ञानबा, तुकाराम आणि नामदेव… इत्यादी

अस्मितेचे प्रतिक आमचे शिव छत्रपती
फुले, शाहू आणि आंबेडकर… इत्यादी

साहित्य-कला-क्रीडा परंपरा उज्ज्वल बावनकशी 
गदिमा-भालबा, 'तें', खाशाबा-सचिन… इत्यादी

'मोडेन पण वाकणार नाही' बाणा माणदेशी
बुद्धिनिष्ठ, प्रज्ञावंत अन विवेकाग्रही… इत्यादी

आमचा धर्म, आमचा मान, आमची शान ही
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा… इत्यादी

कुणी भांडवलवादी, कुणी धूर्त अन कुणी उपाशी
तरी स्वातंत्र्य-समता-बंधुता तत्वे आमची… इत्यादी

आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे, मनसे हटवादी
विभक्त 'अणे' कुणी अन कुणी 'राष्ट्रवादी'… इत्यादी

गौरवशाली परंपरेचा वसा मागते महाराष्ट्राची माती
आज्ञापत्रांची ओळख व्हावी ही श्रींची इच्छा… इत्यादी!

गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

उमेद...!


दिसो एक कवडसा भेदून मेघ

फिरो अन कधी तुझीही लहर...

क्षणीक उमेदही पुरे या जन्मास

येवो वेदनांना खुशाल मग बहर...!

रविवार, १७ एप्रिल, २०१६

कैवल्य...!


जगणे जाणून घेता
मर्म अलगद उमजावे,
शोध विश्वाचा घेता...
मीपण त्यात उजवावे

अशांत जना मनात
माया ममत्व रुजवावे,
मायावी असुरास आणि
कैवल्य-सुरात भिजवावे

कर्मठतेच्या अंध:कारास
ज्ञान तेजाने खिजवावे,
प्रज्ञेच्या सूज्ञ फुलास...
विवेक वेलीवर सजवावे

रात्रीच्या गूढ अंगणास
मंगल प्रभाते सारवावे,
सोहमच्या अनुभूतीत
माझे मीपण हरवावे...!

शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६

चैत्र पालवी...!


नवे वर्ष,
नवा हर्ष
शुष्क जगण्यास
चैतन्याचा स्पर्श…

नवा उन्मेष,
नवी लव्हाळी
चैत्र पालवीची
नवी नव्हाळी…

नवे सृजन,
नवी नवलाई
चैत्र स्पर्शाने
सजली हिरवाई…

नवीन जरी सारे
सृष्टी तीच आहे,
वसंत फुलतांना
कोकीळ गात राहे…

नवे जग,
नवे जगणे
गुढीसह जपू या
समिष्टीचे तगणे…!

रविवार, ३ एप्रिल, २०१६

कफल्लक...!


मी, तू , हा आणि तो
माझे, तुझे अन त्यांचे,
जगण्याचे भान हरता
उरती पोकळ खाचे…

जगणे साधेच होते
अन खूप सोपेही…
प्रवाहास बांध घालता
डबक्यात शेवाळ साचे!

विवेकाची केली शांत
प्रज्ञेचे घातले श्राद्ध…
मूल्यांच्या कर्मकांडाला
सोवळ्याचा काठ काचे!

प्रगतीच्या गप्पा अन
समृद्धीची मैफल…
प्रतिष्ठेच्या दरबारात
कफल्लक सचोटी नाचे!

गुरुवार, २४ मार्च, २०१६

रंगोत्सव...!


प्रत्येक जन्मणारा क्षण
शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो…

उमलती फुले इथे जी, ती ती अखेर वठती
लावण्य रंग रूप, सारे झडून जाती
तो गंध तो फुलोरा, अंती धुळीस मिळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…

जी वाटती अतूट, जाती तुटून धागे
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…

तरीही फिरुनी बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरुनी श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरुनी अंत, उगमाकडेच वळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…

- सुधीर मोघे -

निसर्गाचे रंगवैभव उधळणाऱ्या उन्मेषी
वसंताच्या रंगोत्सवाचे अभिष्टचिंतन…!

मंगळवार, २२ मार्च, २०१६

आणिबाणी...!


पाण्यातून जन्मले, पाण्यात वाढले
पाण्यावीन जीवन, नाही नाही…

पाणी जलचरास,पाणी वनस्पतीस
पाणी सर्व सृष्टीस, जीवनदायी…

पाणी सृष्टीमर्म, पाणी परब्रह्म
पाणी नाही केवळ, पाणपोई…

रस्त्यांचे पापुद्रे, पाणी परावर्ती
पाणी शोषून घेई, विकासगती…

कुणी नाहती, कुणी वाहती
पाणी नासती, मूढ मती…

टैंकर सम्राट, कुणी पाणीवाही
त्याच्यापाशी तहानेस, माया नाही…

स्विमिंग पूल तुडुंब, भरूनी वाही
पाणी वाचविण्याची, देतात ग्वाही…

खेळ रंगांचा की मेळा कुंभांचा
पाणी नासविती, साधू-बापू-भाई…

भूमी हवा पाणी, गरज जगण्याची
त्याचाही ठेका, विकती बारभाई…

कुठे पाण्याची, सजते आरास
कुठे वांझ होऊन, भेगाळते भुई…

कुणी उधळीतो, पाणी मौजेसाठी
कुणास पाण्याचा, घोट नाही…

कसले अध्यात्म, कुठली संस्कृती
अध्यात्माचा सोहळा, सरितानाशी…

पाणी वाचवावे, पाणी साचवावे
पाणी वाढवावे, नाश विनाशी…!

आज जागतिक जलदिन. या निमित्त राष्ट्रभाषेतील दोन अत्यंत समर्पक संदेश -

जल है तो कल है…I
आज तो है पानी, कल सुनोगे इसकी कहानी…II

शुक्रवार, ११ मार्च, २०१६

त्रिशंकू...!


क्षितिजाच्या सांजरेषेवर टेकले
वर्तुळाकार सिंहासन नामधारी…
आरूढ जीवात्मा एकटा सर्वत्र
त्रिशंकू तरी भासतो अधिकारी…!

मंगळवार, ८ मार्च, २०१६

८ मार्च


विश्वाची निर्मिती की विश्वनिर्माती तू
आदिमाया की सर्व शक्ती भक्ती तू
जगण्याचा मूळ स्त्रोत बीजवासिनी
की पूजण्याची सवाष्ण सुवासिनी तू

जगा रक्षिण्या प्रकटली ती काली तू
की त्यांच्या विलासाची भोगदासी तू
धर्मकर्मास वाहिलेली अखंड बंदिनी
की विद्याप्रचुर अष्टावधानी नंदिनी तू

उत्सवासाठी सजवली लक्ष्मीगौरी तू
की रहाटगाडग्यास जुंपलेली भैरी तू
आई, बहीण, लेक, सखी, अर्धांगिनी
की स्वयंपूर्ण आत्मसिद्ध कामिनी तू

सहनशीलतेची परिसीमा सेवाव्रती तू 
की मनूजाच्या धारणेची नित्य क्षती तू
सर्वसंगपरित्यागी मीरा, रण-रागिणी
की लखलख चमकणारी दामिनी तू

महिषासुरमर्दिनी दुर्गा, प्रेममयी राधा तू
मंत्री-दासी-रंभा क्षणी की नित्य माता तू
भूमातेची लेक तू सर्वव्यापी गजगामिनी
तुझ्या तनमनधनाची स्वयंभू स्वामिनी तू

उत्पत्तीचा बीजमंत्र, अनादी अनंताचा प्रवाह 
आणि सर्व धारणेचा निर्वाह अशा स्त्रीत्वास प्रणाम!