मंगळवार, २ जानेवारी, २०१८

तुझ्या स्वागता...!


ज्येष्ठ कवयित्री शांताताई शेळके यांनी बरोब्बर २१ वर्षांपूर्वी आपल्या रोजनिशीच्या पानावर स्वहस्ताक्षरात केलेले नववर्षाचे स्वागत. कितीही काळ लोटला तरी या भावना जून न होता अधिकच परिपक्व आणि समर्पक भासतील!

मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

प्राक्तन...?


निर्माल्य हाती फुलांचे 
तळवे सुगंधात न्हाले
सुकण्यातच त्या अन्
जगणे फुलून आले...!

मनास यातना नित्य
व्यथांचे मनोरे झाले
शल्य मनीचे तरीही
ओठी कधी न आले...!

योध्यास न तमा येथ
शर रूतो की भाले
जिंकण्यातही सदा
हरणेच हाती आले...!

पाण्यास शाप वाहण्याचा
ओढे असो वा नाले
साचण्याच्या नशिबी
नाव डबकेच आले...!

हा खेळ प्राक्तनाचा
शर्थ वांझोटी चाले
वेड्या मुसाफिराच्या
वाट्यास द्वंद्व आले...!

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

'मेरे पास माँ हैं...!'


आमची जडण घडण ज्या चार घटकांवर झाली त्यातले पहिले होते आमचे कुटुंब, स्नेही, मित्रपरिवार - म्हणजे रूढार्थाने समाज, दुसरी होती शाळा - म्हणजे शिक्षण, तिसरे होते वाचन, लिखाण - म्हणजे साहित्य आणि शेवटचे चवथे पण अतिशय महत्वाचे आणि आत्यंतिक आवडीचे म्हणजे नाटक - सिनेमा! त्यातही, सोईस्कर, किफायतशीर आणि भव्य-दिव्य यासह इतर अनेक व्यावहारिक कारणांसाठी सिनेमा अधिक प्रिय आणि जवळचा! ६५ पैसे तिकिटावर आम्ही समोरच्या पडद्याला नाक लावून, मान उंचावून सिनेमा बघितला आहे हे आता कुणाला खरे देखील वाटणार नाही. आमच्या काळात 'मूल्य शिक्षणा'ची टूम निघाली नाही त्याचे कारण या सगळ्या घटकांच्या एकत्रित अस्तित्वाने आमचे 'मूल्य शिक्षण' अत्यंत सापेक्षभावाने अष्टौप्रहर चाललेले असे. 

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे शशी कपूर यांचे निधन! अमिताभने आम्हाला व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध उभे रहायला आणि निर्भीडपणे लढायला शिकविले तर शशी कपूर यांनी आम्हाला, 'हमारे खयालात कितने मिलते है...' म्हणत लोभसवाणे फ्लर्टींग करत 'मोहोब्बत बडे कामकी चीज है...' हे तर शिकवलेच पण त्याबरोबरच खाण कामगारांच्या हक्कासाठी इंजिनियरच्या नोकरीत असून खाण मालकाशी लढायला शिकवले आणि सांस्कृतिक अभिजातता म्हणजे काय याचा सर्वोत्तम नमुना 'उत्सव'च्या रूपाने सादर केला. 

हे सगळे असले तरी, आमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा, आयुष्याकडे बघण्याच्या परिप्रेक्ष्याचा आणि एकूणच अस्तित्वाचा डोलारा ज्या प्रसंगावर आणि डॉयलॉग वर उभा राहीला तो होता... 'मेरे पास माँ हैं...!' आमच्या हृदयांचा अनभिषिक्त शहेनशहा असलेला अमिताभ या प्रसंगात खजील आणि निरुत्तर होत असला तरी आम्हाला हा प्रसंग त्याच्या, ...'मैं आजभी फेके हुए पैसे नही उठाता...' इतकाच प्रभावशाली आणि प्रेरणादायक ठरत आलेला आहे, आणि हे कसब जेवढे लेखक-दिग्दर्शक यांचे आहे तेवढेच, तो खुद्दार प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्ष करारीपणा, संयमी दृढनिश्चय आणि नीतिमत्ता सांभाळणारे चारित्र्य, केवळ चार शब्दांच्या एका डॉयलॉग डिलिव्हरीतून व्यक्त करू शकणाऱ्या शशी कपूर यांचे आहे. आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून एवढेच म्हणावेसे वाटते... 'हमारे पास आपके दिये हुए आदर्श है...!'

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

शुभास्ते पंथानः संतु...!

विंदांच्या जन्मशताब्दी निमित्त सुरु केलेल्या 'रोज एक कविता'मधील आज ही १०० वी कविता! विविध कारणांस्तव, ३६५ कवितांचे लक्ष्य पूर्ण होईलसे वाटत नाही; तथापि विंदांच्या अत्यंत लोकप्रिय तथा अजरामर अशा कविता ज्यांना अजून इथे स्थान मिळालेले नाही त्यासाठी मनात काही योजना आहे. तेंव्हा विंदांच्या उत्कट काव्यप्रतिभेचे अजून काही नमुने रसिकांना इथे रसग्रहणासाठी जरूर मिळतील. शिवाय, आजवर इथे प्रकट न झालेली आणि आपल्याला माहीत असलेली विंदांची कुठलीही रचना अथवा स्त्रोत आपल्याला माहीत असल्यास खाली प्रतिक्रियेत जरूर लिहावा. पडताळणीअंती तो ऐवज वैध ठरल्यास, प्रेषकाला यथोचित श्रेय देवून, त्यास इथे प्रसिद्धी मिळेल. 

आजच्या मुहूर्तावर शतकी कविता... 


...पुतळा... 



माझ्याच उंचीचा एक पुतळा, 
माझेच नाक,
माझेच डोळे,
आणि छाताड पुढे झुकवण्याची पद्धतही माझीच.

त्या तोतयाला मी माझे कपडे चढवले.
पॅण्टची बटणे लावली, 
डोक्यावर टोपी ठेवली.
हातामध्ये काठी दिली.
आणि मग जोडासुद्धा त्याच्या पायापुढे नीट मांडून 
मी सर्वस्वी विधीमुक्त झालो. हसलो. 

माझा जोड पायात घालून तो झपाझप निघून गेला.

शेवटी अटळ ते करावेच लागते :
त्याच्या चबुतऱ्यावर मी मख्खपणे उभा राहिलो.

----------------

गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०१७ साठी कविता...

...शाप...


सर्व जगाला जिंकुन नंतर
मदन लागला जिंकाया शिव;
शाप शिवानें दिधला त्याला
“विजयामध्यें तुझा पराभव”.

----------------

बुधवार, दि. २९ नोव्हेंबर २०१७ साठी कविता...

...क्षण... 


क्षणांत आहे अद्भुत शक्ति
आकुंचित–प्रसृत होण्याची;
‘आदि’ला हाणुनियां लाथा
‘अंता’ला ठोसा देण्याची.

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

मानवांनो आंत या रे !

आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विंदांची ही विश्वाचे आर्त मांडणारी कविता...

मानवांनो आंत या रे !


पर्वतांनो दूर व्हा रे ! सागरांनो दूर व्हा रे !
उघडिलें मी दार माझें; मानवांनो आंत या रे.

वादळांची काय भीती?
तींच माझें गीत गाती;
वादळांना जन्म देती श्वास माझें पेटणारे.

भूक माझी वाढलेली;
प्राण माझा वाढलेला;
वाढलेलें पंख माझें या नभीं ना मावणारे.

कालसर्पाला अतां मी
जिंकिलें जावूनी व्योमीं !
वीज ही रे चोंच माझी, मेघ हे माझी पिसें रे.

आज माझा देह साधी
विश्वऐक्याची समाधी;
कोंडले जातील आतां मानवा या कोंडणारे.

दुर्बलांना, दु:खितांना,
शापितांना, शोषितांना
आज क्षितिजाच्या करांनी देत मी आलिंगना रे.

पर्वतांनो दूर व्हा रे ! सागरांनो दूर व्हा रे !
उघडिलें मी दार माझें; मानवांनो आंत या रे.

आसुड...!


नीतीविना तत्व गेले,
तत्वाविना विवेक गेला,
विवेकाविना विचार गेला,
विचाराविना विकार वाढले,
विकारांनी सत्ता भ्रष्टली,
‘लोक’ खचले ‘शाही’ राहिली;


परचक्र गेले गुलामी राहिली!

‘शेतकऱ्याचा आसुड’ आणि ‘गुलामगिरी’कर्त्या महात्म्याची क्षमा मागून;
त्याच्या युगप्रवर्तक स्मृतीस सादर समर्पित...

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

विंदा जन्मशताब्दी...!

२४ ऑगस्ट २०१७ रोजी विंदांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु केलेला ‘रोज एक कविता...’ उपक्रम लवकरच शंभरी गाठेल (एकूण ९५ कविता झाल्या, आजची ९६वी!) माझा हा उपक्रम आता माझ्या या ब्लॉगवरून अव्याहत सुरु राहील. तथापि, मी वेगवेगळ्या माध्यमातून या कविता मिळवून, त्यातून माझ्या काही विशिष्ट निकषांवर निवडून, त्यांचे शक्य तितक्या शुद्धतेने टंकलेखन करून हा उद्योग करीत असल्याने, रोज एक कविता इथे सादर होईलच असे नाही. तेंव्हा जसे जमेल तसे प्रकटण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल याबद्दल विंदांच्या चाहत्या काव्यरसिकांनी खात्री बाळगावी व लोभ असू द्यावा... आज ‘काजवे’ मधील शलाका

...असेंच जग हें !...
सत्कार्यास्तव अधम नरांचा
अनुनय करिती जगतीं सज्जन
असेंच जग हें ! शिवालयांतहि
नंदिस्पर्षाविण ना दर्शन !

Photo Credit - Mukund Utpat

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

प्रिय पालक,


आपल्या पाल्याच्या कुतुहलात आणि जिज्ञासेत शाळा आणि अभ्यासाचा अडसर होऊ देऊ नका आणि तुमच्या महत्वाकांक्षांसाठी त्याला काही कमी न पडू देण्याच्या नादात त्याची वाढ खुरटवून त्याला कायमचे पंगू करू नका...! 

बस, इतकेच...

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

चित्रपती...!

महाराष्ट्राच्या औंध संस्थानामध्ये साताऱ्याजवळ, खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेल्या सहा कैद्यांचे पुनर्वसन करून त्यांना आणखी एक संधी देण्याच्या, ‘स्वतंत्रपूर’ अशा अत्यंत समर्पक नाव धारण केलेल्या ‘मुक्त कारागृह’ अर्थात ‘Open Prison’ या मानसशास्त्रीय प्रयोगाबद्दल संवेदनशील साहित्यिक गदिमा (ग. दि. माडगुळकर) यांनी प्रतिभावान आणि सामाजिक जाणिवांचे भाष्यकार निर्माते-दिग्दर्शक शांताराम बापू अर्थात व्ही. शांताराम यांना सांगितले आणि जन्म झाला एका अजरामर चित्रकृतीचा – ‘दो आंखे बारह हाथ!’ १९५७ साली प्रदर्शित झालेल्या या भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात कलाकृतीला बर्लिनच्या ८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिल्व्हर बीअर’ पुरस्कार मिळाला आणि ‘गोल्डन ग्लोब अवार्ड’ मधील ‘सैम्युअल गोल्डविन अवार्ड’ या श्रेणीत नामांकन देखील मिळाले. १९७५ साली या चित्रपटाचा तामिळ रिमेक ‘पलांदू वाझगा’ (एम. जी. रामचंद्रन व लता) आणि १९७६ साली तेलगु रिमेक ‘मा दैवम्’ (एन. टी. रामाराव व जयचित्रा) प्रदर्शित झाला.

या चित्रपटातील एका दृष्यात व्ही. शांताराम एका बैलाशी झुंज देतांना दिसतात. हा प्रसंग चित्रीत करतांना शांताराम बापूंच्या डोळ्याला इजा झाली पण सुदैवाने त्यांची ‘नजर’ अखेरपर्यंत शाबूत राहिली! ‘ऐ मलिक तेरे बंदे हम’ ही भरत व्यासांची जेवढी निर्मळ तेवढीच व्याकूळ रचना वसंत देसाईंच्या आर्त सुरांनी, लतादिदींच्या स्वर्गीय स्वराने आणि संध्याच्या अप्रतिम मुद्राभिनयाने अजरामर केली ती याच चित्रपटात. ‘इंडिया टाईम्स मुव्हीस्’ने २००५ साली प्रकाशित केलेल्या ‘भारतीय चित्रपट सृष्टीतील चुकवू नये असे २५ चित्रपट’ या यादीत ‘दो आंखे बारह हाथ’ला मानाचे स्थान देण्यात आले असले तरी माझ्यासाठी या चित्रपटाचे स्थान कायम अविस्मरणीय, अतुलनीय आणि अलौकिक असे आहे व राहील. त्याची कथा पुन्हा कधीतरी...

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आज चित्रपती व्ही. शांताराम अर्थात शांताराम बापूंचा ११६ वा जन्मदिन! कृष्ण-धवल चित्रीकरणाच्या (आणि आणखी विविध) मर्यादांमध्ये, मानवी आयुष्याचे इतके कंगोरे, कुठल्याही मोठ्या ‘स्टार’शिवाय, इतके लख्ख उजळवून दर्शकांचे डोळेच नव्हे तर भानही दिपवून टाकणाऱ्या आणि ‘चित्रपती’ अशी सार्थ उपाधी धारण करणाऱ्या शांताराम बापूंना... सलाम! असे चित्रकर्ते आणि त्यांच्या संवेदनशील मुक्त अभिव्यक्तीला ‘श्वास’ घेण्याचे स्वातंत्र्य, स्वतंत्र भारताला निरंतर लाभो हीच प्रार्थना...


जब जुल्मोंका हो सामना
तब तूही हमे थामना...
वो बुराई करे हम भलाई भरे 
नही बदले कि हो कामना...
बढ उठे प्यारका हर कदम 
और मिटे बैरका ये भरम...

ऐ मलिक तेरे बंदे हम 
ऐसे हो हमारे करम
नेकीपर चले और बदिसे टले 
ताकी हसते हुयें निकले दम...!

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

मन निर्भय जेथे...!

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, स्वतंत्र भारताचे स्वप्न अनेक लोकांनी अनेक पद्धतीने पाहिले होते. नोबेल पारितोषिक विजेते विश्वकवि रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारताची प्रतिमा मात्र खरोखर नि:स्वार्थ, सर्वसमावेशक, जन-गण-मनास अधिनायक मानणारी अशी उद्दात असल्याने ती अद्वितीय तर आहेच पण, अद्यापही साध्य झालेली नसल्याने, निरंतर देखील आहे. तेव्हा स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आपण त्या दिशेने किती वाटचाल केली याचा आढावा सगळ्याच राष्ट्रभक्तांनी घ्यावा...

१९०१ साली मूळ कविता 'चित्त जेथा भयशून्य’ ही गुरदेवांनी बंगालीत लिहिली, त्याचा रवींद्रनाथांनी स्वत:च केलेला अनुवाद गीतांजली मध्ये १९१२ साली प्रकाशित झाला ज्याला नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर या कवितेचे अनेक भाषात अनुवाद झाले. मराठीतील अनुवाद अद्याप (मला तरी) आढळलेला नाही पण झाला असावा अशी खात्री आहे. इथला माझा हा प्रयत्न भाषांतर, अनुवाद किंवा रुपांतर असा नसून, मनाला अत्यंत भावलेल्या या स्वप्नरंजनातील भावार्थाचा गोषवारा मुक्त भावानुवादातून मांडण्याचा प्रयत्न (गुरुदेवांची क्षमा मागून) आहे, तो भावनेनेच समजून घ्यावा...


...मन निर्भय जेथे...

मन निर्भय जेथे आणि शीर्ष उंचावलेले
भांडार ज्ञानाचे आणि उघडुन मांडलेले I

नांदती सुखाने सर्व, आचार भले स्वतंत्र
जाती धर्म पंथ प्रांत एकत्र सांभाळलेले I

शब्द उमटती नित्य सत्याच्या गर्भातून
परिपूर्णतेसाठी जेथे अथक कर श्रमलेले I

गतानुगतिक कर्मकांडे रूढी त्याज्य जेथे
तर्काचे अधिष्ठान सद्-विवेकाने मानलेले I

तुझ्या सारथ्याने धावे मनोरथांचे वारू
क्षितीज दिव्य कार्यकारणात विस्तारलेले I

अशा स्वयंभू स्वयंपूर्णतेच्या आनंदवनात
माझ्या देशाचे उत्थान, प्रभू मी पाहिलेले I