शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५
पणती जपून ठेवा...!
वाटेत फार काटे अंधार दाट दाट I
जाणे तुम्हांस पुढती शोधून त्यात वाट II १ II
म्हणुनीच लाविली मी पणतीत ज्ञानज्योत I
ही मार्गदर्शिका जी दावी तुम्हांस वाट II २ II
भडकावू नाही शकला भुरटा खट्याळ वारा I
विझवू बघे परंतु तिजला सुसाट वारा II ३ II
परि ना विझू दिली मी यत्ने कधी तियेला I
जपतो सदैव ज्योती देऊनिया निवारा II ४ II
देवो प्रकाश सर्वां पणती दिली तुम्हांला I
मंदावतेय ज्योती पणतीत स्नेह घाला II ५ II
वारा सुसाट सुटला हा दीप ना विझावा I
अंधार दाट आहे पणती जपून ठेवा II ६ II
टीप: गुरुवर्य डॉ. वि. ना. श्रीखंडे यांनी केलेल्या 'अंधार फार झाला - पणती जपून ठेवा' ह्या काव्यमय उपदेशाचा काव्यमय कल्पना विस्तार.
- डॉ. हेमंत विंझे, मुंबई
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५
"ऎकतोयस ना…?"
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कवीनां उपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः । शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥
"बाप्पा, आलास खरा पण मनाची तयारी केली आहेस ना…!
आता १० दिवस हे मोठे लोक तुझे काय काय करतील माहितेय?
दागिने वस्त्रे फुलं घालून तुझा श्वास कोंडतील,
नाका-सोंडेत कशा कशाचा धूर सोडतील,
तुला नैवेद्य म्हणून काय काय आणतील आणि स्वत:च फस्त करून तुला बनवतील,
सकाळ संध्याकाळ तुझ्या आरतीच्या नावाने आणि एरवी उत्सवाच्या नावाने ढोल बडवून, सिनेमाच्या गाण्यांच्या गोंगाटाने उच्छाद मांडतील,
त्यातून तुझे हे सुपाएवढे कान… बघ बाबा कसं सहन करायचं ते…!
आणि हो बाप्पा, आम्हां मुलांना तुझ्याकडून काहीच नको.
धम्माल करायला आणि मोदक खायला मिळतात ते बास आहे.
परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करायला लागतो,
तो आम्ही करूच आणि छान मार्कांनी पासही होऊ…
तुझा आशीर्वाद असतोच याची आम्हाला खात्री आहे.
पण बाप्पा एक सांगू, तू ना या वर्षी जातांना या मोठ्या लोकांना जरा सुबुद्धी देवून जा.
नाही, तुम्हाला आवडतात आणि परवडतात म्हणून हव्या त्या वस्तू वापरा म्हणावं…
आणि कमवता तर खर्चही करा म्हणावं… चंगळ म्हणून का असेना…
पण याबरोबरच थोडासा विवेकही वापरा म्हणावं…
लहान तोंडी मोठा घास… पण ही वेळ आणलीच मुळी या मोठ्या माणसांनी
भूक लागली की खाणे ही प्रकृती… भूक नसतांना खाणे ही विकृती आणि
आपल्यातली अर्धी भाकरी उपाशी माणसाला देणे ही संस्कृती…
हीच खरी संस्कृती… हा असा धांगडधिंगा म्हणजे संस्कृती नव्हे…
हे सांग त्यांना जरा समजावून… सांगशील ना…?
आम्ही तर बोलूच शकत नाही… आम्हाला काय कळतय? बच्चे आहोत ना आम्ही…!
पण तुझं तर ऎकतील. बाप्पा आहेस ना तू…?
ऎकतोयस ना…?"
मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५
बाप्पा रे …!
जमविल्या मायेचा सोडून मोह
देशांतरा धावती सारे सान थोर,
प्रवास जिकिरीचा, मुक्काम गूढ
मरण्याहून जीवा, जगण्याचा घोर...
'बाप्पा येणार बाप्पा येणार'
ओरडती सारे दांभिक जन,
भक्ती सरली सक्ती उरली
वर्गणी-खंडणीचे करती धन...
बळीराजा उपाशी म्हणून
'बाप्पा' ना खुश, ना राजी,
'मरणारे मरती आपल्या मरणे'
उत्सवे नाचती निर्ल्लज पाजी...
प्रत्येकाला हवी 'स्पेस' आणि
करमणुकीचे साधन स्वतंत्र,
आस्वादण्या आधी काहीही
'शेअर' करण्याचे अजब तंत्र…
माणसांच्या बेटांत हल्ली
नाही मने जोडणारे सेतू,
संभावित 'विवेकी'ही बघती
पत्रिकेतले मंगळ, राहू-केतू...
विकासाच्या विनाशकारी गप्पात
माणूसपण काय शिल्लक राहील,
मढविलेल्या सालंकृत बाप्पात
नवी पिढी कुठले 'मूल्य' पाहील…?
शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५
सिंहस्थ...!
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले...
रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला...
बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंतासी...
आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची?
कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची...
असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे...
जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची...
क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची...
साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी...
येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे...
यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी...
येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश, फक्त जातो...
अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी...
तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद
त्यापाशी गोविंद, नाही नाही...!
- कुसुमाग्रज
बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५
दिवस असे की...!
उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये,
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...
नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार,
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे,
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार,
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव,
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ,
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...!
- संदीप खरे
बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)








