रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

आरसा...!


तुपात तळली,
साखरेत घोळली
इतकी साजूक नाही
कविता माझी...

दु:ख कुरवाळेल
वेदना जोजवेल
तितकी नाजूक नाही
कविता माझी...

उगा विभोर होईल 
फुलापानी गाईल 
इतकी भावूक नाही
कविता माझी...

विवेक जागवेल 
विचार पेटवेल
तितकी घाऊक नाही
कविता माझी...

माझी कविता
माझ्यासारखी
‘मना’चा आरसा
कविता माझी...!

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

पर्याय...?


काळ चालला पुढे अन्
त्यासह सृष्टि सारी
जो बदलत नाही
त्याने घ्यावी खबरदारी..!

फुटतो बीजास अंकुर
कळीतून उमले फूल
फुलाचे होतेची फळ
जर खुडले ना मूळ..!

कालगती ही न टळे कुणा
रंक असो वा राजा
साऱ्यांना रोजच मिळतो
एक नवा दिवस ताजा...!

कुठला दिवस कुणाचा
हे ठरवितो काळ
कुठे हार जीवघेणी
कुणा विजयाची माळ...!

संधी जेव्हा चालून येते
सोने कसे होईल पाहणे
पर्याय नेहमीच असतो
संयमाने अजिंक्य राहणे...!

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

अनुबंध...!


सृजनाचा आरंभ
तेजाचा समारंभ
तीळगुळाची गोडी
अन् स्नेहाचा अनुबंध...!

रविवार, १० जानेवारी, २०२१

अज्ञ...?


स्वाभिमानी नकारांची परंपरा कालबाह्य झाली आणि
षंढ होकारांचा परिपाठ प्रचलित तथा प्रतिष्ठित झाला
त्या अर्धसत्याच्या क्षितिजावर बसलेल्या कावळ्यांना
रोजच कुठल्याशा पिंडाला चोच मारायची मुभा मिळाली
आणि रोज एक बळी देणे भाग झाले कुठल्याही घराला…

आज जे सुपात ते उद्या जात्यात एवढेही कालभान नाही
काळामागे धावणाऱ्या गांधारीच्या औक्षहीणी पौत्रादिकांना
आणि जेता म्हणून मिरविणाऱ्याचा अंगुलीमाल झालाय म्हणून
पोरगेल्या अभिमन्यूचा वध झाला की हत्या ते ठरायचेय अजून... 

अमरत्वाच्या शापाने कपाळमोक्ष झालेला अश्वत्थामा
आजही कामी येत नाही अधर्मी सुतपुत्र कर्णाच्या, कारण
मैत्र-माणुसकी-दातृत्व प्रथाच नाहीत कुठल्याच धर्माच्या
आणि कुठलाच रंग आपलासा न करणारा नकोसा होतो
प्रस्थापितांच्या लालसेला आणि स्थितिगमनी व्यवस्थेला...

या साऱ्या परात्पर असंक्रमणाच्या केंद्रस्थानी उभा
निर्माता, संचालक, प्रशासक की निव्वळ प्रतिहारी
याचे परिघावरील साऱ्यांनाच भान येत नाही तोवर
विकेंद्रीकरण देखील स्वकेंद्रितच आणि नियमनही
भले जागराचा चालो अट्टाहास जागल्याच्या स्वप्नीलतेतून...

‘परिवर्तनही संसारका नियम है... ’ म्हणून बदल क्रमप्राप्त
फक्त त्याचे मोजमाप दंडसंहिता ठरविणारे विधाते भलतेच
नियतीच्याही नियतीवर नियंत्रण मिळवू पाहणारे नियामक
छद्मविज्ञानाचे साधक म्हणून सत्ताधीशांना सहज भुलणारे
तर तत्वचिंतक डोंबाऱ्याच्या पोरासारखे… दोरीवर झुलणारे!

नेमका कुणाचा पक्ष घ्यावा की दक्ष राहावे या संभ्रमात मी...
आदिम...
अनंत…
की अज्ञ...?

Image Credit: http://www.jantakiawaz.org/category/article/news-622782

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

उन्मेष...!


कलाकार तो अदृश्य सर्वभर
ओळ उमटते कधी झर झर
पडद्यामागून रेखितो कुंचला
कधी चित्रातून निसर्ग निर्झर

गतस्मृतींनी दाटता गहिवर
उमटते भयचित्र पटलावर
नव्या चित्रात भरू रंग नवे
फुलपाखरांचा मुक्त वावर

सोसाट्याचे वारे नी वादळ
झाडे साहती जरी पानगळ
वसंताची लागताच चाहूल
कोंब नवा गर्भात सळसळ

नवा जन्म मनाच्या कुशीत
नवे कूजन नव्याने खुशीत
होऊ या सज्ज घडविण्या
येणाऱ्या वर्षा नव्या मुशीत

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

निरोप...!


मित्राशी सुखदु:खाच्या मनसोक्त गप्पा झाल्यावर तो दिवेलागणीच्या वेळी घराकडे परत जायला निघाला. मित्र म्हणाला, आता थोड्या वेळातच अंधार पडेल, रात्रीचा अंधारात प्रवास करण्यापेक्षा मुक्काम कर. रात्री आणखी थोडे हितगूज करू, सकाळी ताजेतवाने होऊ आणि मग जा तू आपल्या मार्गाने...

तो म्हणाला, ‘नको! कारण, दोन गोष्टी – एक म्हणजे समारोप कधी लांबवू नये, निरोप नेहमी चटकन घ्यावा म्हणजे सहवासांच्या क्षणांचा मिळालेला आनंद दीर्घकाळ टिकतो. आणि दुसरे म्हणजे अंधाराची तमा त्यांना ज्यांना उजेडाची सवय आहे. माझ्यासारख्या जन्मांधाला कसला दिवस आणि कुठली रात्र, रात्रंदिन आम्हां तमाचाच सहारा...!’

त्याच्या स्वरातला विषाद मित्राला हेलावून गेला आणि मैत्रीच्या पोटी असलेल्या मायेच्या उबेतून मित्र म्हणाला, ‘ठीक आहे, जशी तुझी इच्छा पण थांब मी कंदील पेटवून देतो तेवढा सोबत ठेव म्हणजे माझ्या जीवाला घोर लागणार नाही.’
‘चेष्टा करतोयस का? अरे जिथे मला दिसतच नाही तिथे कंदिलाचा उजेड काय प्रकाश पाडणार...?’ तो म्हणाला.
‘मित्रा, तुला दिसत नाही हे मान्य पण तुझ्या समोरून कुणी अंधारातून आला तर कंदिलामुळे त्याला तर तू दिसशील...’

मित्राचा युक्तिवाद पटल्याने मित्राच्या इच्छेला मान देवून तो कंदील घेऊन मार्गस्थ झाला. रस्ता सवयीचा असल्याने तो झपाझप चालू लागला. बरेच अंतर पार केल्यावर आणि रात्र बरीच झाल्यावर अंधारातून अचानक कुणीसे त्याच्या अंगावर आदळले आणि तो भेलकांडला. अत्यंत सात्विक संतापाने तो ओरडला, ‘मुर्खा, दिसत नाही का...’

आपल्या अशा उद्धाराने चिडलेला वाटसरू म्हणाला,
‘हेच मीही तुला विचारू शकतो, डोळे फुटलेत का तुझे...?’
‘अरे बाबा, मी जन्मांध, माझे डोळे जन्मत:च गेलेले पण तुझ्या दृष्टीला काय झालं? तू तर बघू शकतोस ना?’
‘हो तर, मी बघू शकतो पण अमावस्येच्या रात्रीच्या एवढ्या मिट्ट काळोखात दिसायला दिव्यदृष्टी नाही मला!’
‘मित्रा, त्याची कल्पना आहे म्हणून मी हातात पेटता कंदील घेऊन चाललो आहे ना, त्याचा उजेड नाही दिसला?’
‘कंदील? कुठे आहे कंदील? अच्छा हा इकडे पडलेला होय?
त्याची वात केव्हाच निवलीय बुवा, तुम्हाला पत्ताच नाही!’

-------------------------------------------------------------------------------------
कुणाच्याही उसन्या प्रकाशाने आपला मार्ग थोडा काळ उजळल्यासारखा वाटू शकतो. मात्र वाटेतले अडथळे, खाच-खळगे टाळून दूरचा पल्ला गाठायचा तर उसना प्रकाश फार उपयोगाचा नाही, त्यासाठी ‘अप्प दीपो भव’ अर्थात ‘तूच तुझ्या मार्गाचा प्रकाश हो’ हा बुद्धाचा सल्ला मानायलाच हवा.
 
शेवटचे चार दिवस शिल्लक असलेले २०२० हे वर्ष त्या हितचिंतक मित्रासारखे आहे जे आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतील अशी साधने देऊ इच्छिते. आपला पुढचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून या मित्राने आपल्याला त्यासाठी सिद्ध करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

अगदी कठीण अशा घटक चाचण्या (आठवा: लॉकडाऊन), सहामाही परीक्षा (बघा: कोरोना चाचण्या) आणि आता वार्षिक परिक्षा (पक्षी: लसीकरण) घेऊन त्याने आपली चांगलीच तयारी करून घेतलेली आहे. आता आपली तयारी कितपत झाली आहे याचीच खरी परीक्षा आहे. आपण आपल्या अंत:चक्षुनी गेल्या वर्षभरातील अनुभवांकडे डोळसपणे पाहून काही शिकणार आहोत की आपल्या चर्मचक्षुंना दिसते तेच खरे मानून आंधळेपणाने भौतिकातच गुंतून पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकणार आहोत हा निर्णय सर्वस्वी आपला आहे.

एक वर्ष सरते आणि दुसरे सुरु होते म्हणजे खरतर फक्त भिंतीवरचे कालनिर्णय बदलते. वर्ष ‘बदलले’ किंवा ‘नवे’ वर्ष सुरु झाले असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा आपला दृष्टीकोन बदलेल, सवयी बदलतील, जीवनशैली बदलेल. दिवस तर रोजच नवा असतो पण त्या नव्या दिवसाचे आपण काय करणार हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर कुठल्याही पुस्तकात तर सोडा, गुगलकडे पण असू शकत नाही... ज्याचे त्यालाच शोधावे लागते. ज्याला सापडते तो सुखी-समाधानी होतो ज्याला नाही सापडत तो टीकाकार '(अतृप्त आत्मा?) होतो... बघा तुम्हाला कोण व्हायचे आहे?

...आणि हो, आपण जन्मांध असलो म्हणून काहीही बिघडत नाही, विवेकाने जगायला दूरदृष्टी लागते, डोळ्याने तर प्राण्यांनाही दिसते! दुसरे, आपल्या कंदिलाची वात विझली आहे हे समजायला उजेडाचीच गरज असते असे नाही, कंदिलाच्या काचेची ऊब कमी झाली यावरूनही ते समजायला हरकत नाही. पण त्यासाठी मन संवेदनशील हवे आणि जाणीवा प्रगल्भ... नव्या वर्षाचा कुठलाही दिखाऊ अल्पजीवी संकल्प करण्यापेक्षा हे साधता येईल...? आलेच तर सच्चिदानंद...

सरत्या वर्षाचा निरोप घेतांना त्याने दिलेला प्रकाश साठवून ठेवून स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करू या... शुभम भवतु !

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

(जाय)बंदी...!

विकासाची हाव करी
नष्ट वने घनदाट...
दिशाहीन भटकता
प्राणी रोज चुके वाट !

'निती’च्या राज्याची
वाट चुकला रानगवा...
त्याला धडा शिकविण्या,
उन्मादी माणसांचा थवा !

बेबंद शहरीकरण
घुसमटतो रोज श्वास...
मृगजळामागे धावता
होती नित्य नवे भास !

कुणी गाठतो मरणा
ऊरस्फोड धावून...
अन कुणी साधतो ते
गळा फास लावून !

बहुतांचे आशास्थान
तरी वाटे मुक्ती हवी…
बदलता रचना सारी
व्यवस्थाही रोज नवी !

कोठे परंपरांचे जोखड
भक्तीची रिकामी कोठी…
तत्व हळूच गळून जाता
समष्टिहून व्यक्ती मोठी !

हत्येला वध म्हणण्याची
पुराणोक्त परंपरा आहे...
स्वसंरक्षणार्थ हिंसा येथे
सर्वच धमन्यांतून वाहे !

उरेल सापळाच फक्त
विरता मूक आकांत...
अन्वयार्थ समजविण्या
‘नीती’मान एक कांत !

सारे साऱ्यांच्या भल्याचेच
खोट संकल्पात नाही...
आमच्या नेक इराद्यांना
नडते अतिलोकशाही !

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

पन्नाशी...!


नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे
निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?

फुलांस नसते चिंता आपल्या प्रारब्ध योगाची
तळवे सुगंधीच करते निर्माल्यही सहज भावे!

क्षण थांबत नाही पळभर, काळ चालतो पुढे
सुखांनाही लागते जागा हे का मनास न ठावे?

चाफ्याच्या अबोल्याची नाळ बांधलेली वेदनेशी
मोहरण्याच्या चाहूलीने मुक्त गाणे स्वच्छंद गावे!

फुलं गळतात म्हणून कळीचं राहत नाही फुलणं
रिकाम्या गाभाऱ्यातही भक्तिरसच सर्वभर धावे!

प्रवास हा कोहम पासून सोहम पर्यंत एकलाच
‘नेती नेती’चे भान जपत प्रपंचात वैराग्य ल्यावे!

रंगूनी रंगात साऱ्या रंग असावा वेगळा
मुक्तात्मा स्वयंभू, जाणतो सारेच कावे!

निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?
नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे...

प्रिय बंधुसखा योगाचार्य कुमार अर्थात रंगांचा किमयागार वैभव पुराणिक याचे
नाबाद अर्धशतकाबद्दल मनस्वी अभिनंदन आणि निरामय शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

दुभंग


चित्रपट या सर्वात लोकाभिमुख आणि लोकप्रिय प्रबोधन मंचावर बुद्धीचा कस आणि जाणिवांची मशागत करीत पोसलेल्या समाजाला, ‘मेरे पास मां है...’ चा सोयीस्कर विसर पडला पण ‘जब तक एक भाई बोल रहा है एक भाई सुन रहा है, जब एक मुजरीम बोलेगा तब एक पुलीस अफसर सुनेगा...!’ यातील दुभंग मात्र चांगलाच मानवला. म्हणजे एकतर भावनावश होऊन इमोशनल ब्लैकमेल नाहीतर थेट कर्तव्य कठोरता... एक संवेदनशील माणूस दुसऱ्या संवेदनशील माणसाशी केवळ माणूस म्हणून, कुठलीही संधी न साधता, थेट संवाद साधू शकत नाही...?

नैतिकता, सचोटी, नीतिमूल्ये अशी सामाजिक लक्षणे कधीच कालबाह्य झाल्याने व्यवहारात कुचकामी ठरु लागली आणि बाजारशरणता, नफेखोरी, चंगळवाद आणि या सगळ्याला एका सूत्रात बांधून आधुनिक जगण्याची जणू काही संहिताच ठरलेली ‘हमाम मे सब नंगे...’ ही प्रगत मान’सिक’ता ‘नव-मूल्यव्यवस्थे’ची धरोहर ठरली. या व्यवस्थेमध्ये मूळ संतवचनाचा ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ किंवा होऊ श्रीमंत...’ असा पंथ-विचार प्रचलित झाला आणि नैतिकतेची केवळ व्याख्याच नव्हे तर परिमाण, आयाम आणि अर्थात परिणामही पूर्णत: बदलले.

अशा सभोवतालात, व्यक्ती, वृत्ती आणि कृती यात अभंग राहून, ‘मी आणि माझे कर्म’ म्हणजेच ‘माझे अस्तित्व आणि माझे कर्तृत्व’ या दोन निराळ्या गोष्टी नसून माझीच अभिन्न अभिव्यक्ती आहे असे मानणारे; तळ्यातल्या सुरेख  बदके पिल्लातले कुरुप वेडे पिल्लू ठरले नसते तरच नवल! स्वत:च्या सचोटीचा अभिमान बाळगणे म्हणजे अत्यंत मागासलेपणाचे लक्षण ठरणाऱ्या आजच्या अधिभौतिक काळात प्रामाणिकपणा जपणे हे निखालस धाडसाचे काम ठरावे... ही या सर्वात प्रगत जीव – होमो सेपियन अर्थात ‘शहाण्या माणसा’ची शोकांतिका!

सांप्रत सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर अत्यंत निर्भीडपणे परखड भाष्य करण्याची एकही संधी न सोडणारे आणि समाजातील सर्व स्तरातील घडामोडींवर आपल्या चाणाक्ष नजरेने बारीक लक्ष ठेवून त्यातील विसंगतीवर प्रत्यही मर्मग्राही विवेचन करणारे आमचे धुळ्याचे सन्मित्र वैद्यराज डॉक्टर सचिन चिंगरे यांची एकूणच साहित्यिक प्रतिभा आणि विशेषत: काव्यप्रतिभा हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय असल्याने प्रस्तुत प्रस्तावना आटोपती घेऊन मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम. आज आमच्या या प्रिय वैद्यराजांची एक अगदी रोखठोक, करकरीत आणि प्रत्येक विवेकी माणसाला विचार करायला भाग पाडणारी आणि संवेदनशील माणसाच्या काळजाला हात घालणारी रचना... विकार मर्यादेपलीकडे बळावला की त्याला शल्यकर्म हाच उपाय याची जाणीव करून देणारी, कोडग्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आणि सुखासीनतेला कडूजहर डोस पाजणारी...

एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा...
साऱ्या ऋतुंमध्ये तेवढ्याच घोटवलेल्या व्यावसायिक उत्साहाने ओथंबून 
तो येतो औपचारिक अदबीने माझ्या केबिनमध्ये. 
नीटनेटका पोशाख, चेहेरा व देहाच्या मर्यादित हालचाली,
भाषेची सफाई आणि विक्रेत्याला आवश्यक आग्रही वृत्ती नी आर्जव या आयुधांनी सज्ज! 
भांडवलशाहीचा दूत, जागतिकीकरणाचा प्रतिनिधी, चंगळवादाचा चेला, 
व्यापाराचा नोकर, आणि प्रवाहपतीततेचा एक संसारी गृहस्थ गुलाम! 
तो वितरण व प्रबोधनाची फॅन्सी झूल पांघरुन येतो. 
मी पोटापाण्याच्या धंद्याला सेवेचा पांढराशुभ्र मुलामा पांघरुन बसलेलो...

पावसाळ्यात डायरिया-मलेरिया, उन्हाळ्यात डिस्-युरिया (उन्हाळी लागणे), हिवाळ्यात न्यूमोनिया... 
साऱ्या रोग-राक्षसांवर चालणारी अस्त्रं दाखवतो त्याच्या भात्यातली.
पूर्वी मुली भरपूर होत्या तेव्हा उपवर कन्येची गरजू माता
मुलीत असले-नसलेले सारे गुण खुलवून सांगायची,
तसं तो कौतुक करतो त्याच्या कंपनीच्या औषधांचं...
कधी किंमत, कधी चव, कधी वेष्टन, कधी नाविन्य, कधी उपयुक्तता, कधी काही... 
मग त्याच्या मजबूत चामडी बॅगेतून तो काढतो काही सँपल्स् आणि 
फळविक्रेता फळं छान रचून ठेवतो, तशी लयबद्ध सराईतपणे मांडतो माझ्या काचेच्या टेबलावर. 
सणासुदीला तो आणतो मिठाई, कधी दिवाळीत दिवे, पणत्या,अत्तर, परफ्यूम. 
अधूनमधून आणतो तो छानश्या भेटवस्तू... 
कधी पेन, कधी फुलदाणी, कधी किचनवेअर 
सतत आठवण येण्यासाठी त्यावर छापलेल्या कंपनीच्या नावासह.

मग तो सांगतो मला काही प्रोफेशनल स्कीम्स. 
इतकं लिहिल्यावर इतके भरपूर.. 
तितकं लिहिल्यावर या वस्तू पुरेपूर
आणि तितकं टार्गेट केलंत तर बँकॉक पट्टाया सिंगापूर...
त्याच्या परीटघडीच्या वस्रांतून पाझरत असतो आसमंतात एखादा मंद व्यावसायिक सुगंध. 
त्याच्या आशाळभूत नजरेत चमकतात आकर्षक आमिषं.

तसं सोपं असतं!
अ‍ॅसिडिटी नसतानाही प्रत्येकाला लिहिली अँटासिड कॅप्सूल, 
किंवा कमतरता नसूनही प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लिहीलं एखादं सीरप, 
किंवा हिमोग्लोबिन कमी, अशक्तपणा पटवून देऊन लिहीलं एखादं टॉनिक 
सातत्याने, आयेदिन लिहीलं सर्वांना एखादं महागडं व्हिटॅमिन, किंवा प्रोटीन, 
तर अगदीच सोपं!
थेंबे थेंबे तळे साचे. 

पण नेमकं त्या क्षणी 
मला आठवतो जवळच्या खेड्यातून विश्वासाने लहानग्या नातवाला माझ्या दवाखान्यात आणणारा, 
भर उन्हात अनवाणी चालणारा कळकट मळकट पारधी पेरु भोसले... 
मला आठवते मायबाप सरकारच्या दोन चारशे रुपयांच्या पेंशनची चातकासारखी वाट पाहणारी 
आणि मग अशक्तपणासाठी एखादी 'शक्तीची सलाईन' लावून दे म्हणणारी भागिरथी आजी... 
किंवा डाळीसाळीच्या गुप्त डबाबँकेतून काढलेल्या दहावीसच्या नोटा पुन्हा पुन्हा मोजून,
चंची रिकामी करुन, मला देणारी एखादी गरीब मंगला गृहलक्ष्मी... 
कधी जुगारात हरलेल्याने निराश संथपणे पत्ते टाकावेत टेबलावर,
तसे जड हातांनी खिशातल्या आजच्या शेवटच्या नोटा काढून देणारा बाप राजू हमाल. 

त्यांना लिहू मी एखादं जास्तीचं औषध? 
त्यांच्या घाम रक्तावर की डोळ्यात तरळलेल्या पाण्याच्या इंधनावर 
उजळवू मी माझ्या उंची ऐषआरामी स्वप्नांचे दीप ? 
त्या अनवाणी, सायकलवर, लाल डब्याच्या एसटीत, 
जनावरासारखी माणसं कोंबलेल्या जीपगाडीत प्रवास करणाऱ्यांकडून
वसूल झालेल्या छोट्या छोट्या अनैतिक वर्गणीवर फिरु मी विमानात? 
त्या झोपडीवासियांच्या किंचित पण निरंतर शोषणाने फुलवू माझ्या बंगल्यात मी सुखाचा मळा? 

हिपोक्रॅटीस दु:खी होतो, भगवान धन्वंतरी डोळे वटारतो... 
नाही होता येत डॉक्टर आमटे, 
पण झालंच पाहिजे का डॉक्टर भामटे ? 
नाही तर नाही सिंगापूर 
पण होईल ना सहज शनी शिंगणापूर. 
आणी मी नम्रपणे नाकारतो ऑफर.
छोट्याश्या धैर्याने मी नाकारतो 
एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन...

...डॉ सचिन चिंगरे, धुळे 
७४९९६१३९१२, ९४२३४९३२१८

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

कविता...!


दिवाळीचे चार दिवस आणि इतरही बऱ्याच वेळा माझ्या व्हॉट्सऍप स्टेट्स मध्ये ज्या सजीव चित्रांची मुक्त पखरण असते त्या कलाकृतींमागचा सर्जक हात आणि योगगुरू असलेला माझा बंधुसखा कुमार हा नेमस्त गृहस्थ एरवी गंभीर भासत असला तरी आयुष्याकडे बघण्याची एक अम्लान, निकोप आणि मार्मिक दृष्टी बाळगून आहे हे त्याच्या अत्यंत निकटवर्तीयांना चांगलेच ठाऊक आहे. हे महाशय कधीतरी कविताही करतात हे गुपित मी फारसं कुणाला सांगू नये असा त्याचा आग्रह असल्याने मी ते कुणालाच न सांगता फक्त इथे इत्यादीवर प्रकाशित करतोय कारण इकडे फारसं कुणी फिरकत नाही असं मी त्याला पटवलयं आणि त्यालाही ते पटलंय! 

तेव्हा, कुणाला काही कळण्याच्या आत पटकन त्याची एक छोटीशी कविता...

पाऊस माती वारा पाणी...
पक्षी गातात सुरेल गाणी...
हिरवा निसर्ग निळे आकाश...
थांबून जरा पाहू सावकाश...
अरे ही तर कविताच झाली...
लिहू चार ओळी खाली...
-
-
-
-
खालच्या ओळी नाहीच सुचल्या...
वरच्या ओळी चिंब भिजल्या...
एक गोष्ट मात्र जाणवली...
एखादीच ओळ अगदी मनातली...
-       वैभव पुराणिक, नासिक