अलीकडे
१ ऑगस्टला टिळकांची आठवण काढण्याची वेळ सहसा येत नाही. बाळ गंगाधरांनी कोकणातल्या
चिखलीला जन्म घेवून आमची मोठीच सोय केली होती. ‘चिखलात जसे कमळ उगवते...’ या
भांडवलावर आम्ही टिळक पुण्यतिथीची बरीच
वर्षे काढली आणि बक्षिसेही जिंकली. शिवाय जोडीला ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी
टरफले उचलणार नाही!’ हा बाणेदारपणा आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे
आणि तो मी मिळवणारच!’ या जाज्वल्य देशाभिमानाचा आधारही होता. आजच्या ‘संपूर्ण
स्वराज्य’ लाभलेल्या काळात कमळ, बाणेदारपणा, देशाभिमान आणखीन आधार साऱ्याच्याच
बदलेल्या संदर्भात टिळकांनी काय केले असते ठाऊक नाही. कमळाबद्दल काहीही बोलून
चिखलफेक चुकायची नाही, शेंगा टरफलांसकट खाण्याची नवीन पद्धत रूढ झाली असल्याने
फुकटचा बाणेदारपणा दाखविण्याची कटकट नाही, देशाभिमान आणि तत्सम अनुत्पादक जाणिवांचे
राष्ट्रीयीकरण केल्याने अतोनात मूल्यवर्धन झाले असून ‘आधार’ शिवाय अस्तित्वच
निराधार होऊन समर प्रसंग उभा राहण्याच्या काळात टिळकांच्या अग्रलेखाचा मथळा काय
असता याची कल्पनाच केलेली बरी! तथापि ‘टिळक गेल्यानंतर ज्याला समोरून येतांना बघून
हातातली विडी टाकून दयावी असा माणूस पुण्यात उरला नाही...’ हे आचार्यांचे (प्रल्हाद
केशव अत्रे! हो, अलीकडच्या फट् म्हणता वाल्याचा वाल्मिकी होण्याच्या काळात निव्वळ आदरार्थी
संबोधनाने, ‘म्हणजे नक्की कोण’ हे चटकन समजत नाही!) विधान मात्र तंतोतंत खरे तर
आहेच आणि, टिळकांच्याच श्रेणीतल्या अटलजींसारख्या ऋषीतुल्य नेत्यांच्या निवर्तण्याने
लोक–नेते यांच्यातील दिवसेंदिवस रुंदावत जाणाऱ्या पोकळीत, अधिकच ठळक होत चालले
आहे. आजच्या झटपट प्रसिद्धी आणि रातोरात नेतृत्व उदयाच्या काळात कुठल्या
‘फेस-ऑफ-चेंज’चा ‘चेंज-ऑफ-फेस’ होवून नावापुढे (आणि मागे) काय उपाधी-उपसर्ग लागून
त्याचा जनसामान्यांस उपसर्ग होइल आणि ‘ही काय उपाधी...?’ म्हणायची वेळ येईल, काही सांगता
येत नाही. किंबहुना स्वत:च्या स्वाक्षरीतच हे स्वघोषित आचार्य, बाबा, गुरुदेव आणि
तत्सम उपाध्यांचा अंतर्भाव करण्यास सदर पुण्यात्मे कचरतीलच असे नाही. असो.
‘येथे
बसून क्रिकेट व राजकारण याविषयी चर्चा करू नये’ अशी अमृततुल्य
विनंती-वजा-सूचना-अधिक-धमकी देणाऱ्या पुण्याचा रहिवासी असल्याने ‘येथे राजकारण
चर्चू या नको’ अशी खूणगाठ खरतर मी हा ब्लॉगिंगचा उपदव्याप सुरु करतांनाच मनाशी
बांधली होती. पण, ‘सगळ्याच गोष्टी ठरविल्याप्रमाणे झाल्या असत्या तर सांप्रत
युगांस ‘कलियुग’ कशास म्हटले असते गाढवा...!’ असे तत्वज्ञान परवाच मला एका सुबुद्ध
राष्ट्रप्रेमी मित्राने कसल्याशा समर्थनार्थ अमृततुल्यचा चहा पितांना सांगितले. माझ्या
या सशक्त व सश्रद्ध भाविक सन्मित्राने निदान, ‘कलियुग केव्हाच संपून पुन्हा सतयुग
सुरु झाले आहे तेव्हा वत्सा, तुजप्रत कल्याण असो!’ असा आशावाद-वजा-ताकीद देवून मी
ती मुकाट्याने स्वीकारावी अशी आज्ञा दिली नाही यानेच मी धन्य झालो आणि ‘आता त्याने
मला दिलेले माझे भाग्य बदलण्याचे वचन काही पुरे होत नाही’ एवढाच त्याचा अर्थ काढून,
समोरच्या घोटभर चहाचा घोट घेतला. मुद्दा असा की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्या
अनुषंगाने आलेले सर्व उल्लेख यांचा खरतर कुठलाही राजकीय संदर्भ इथे अपेक्षित
नव्हता. परंतु, अपरिमित जंगलतोड होऊन शहरे जंगलात शिरल्याने ‘वन्य’ जनावरे वनांचा
संकोच झाल्याने जशी ‘अन्य’ भागातही आढळू लागली तद्वतच सार्वजनिक जीवनात खासगीपण
आणि विवेकाचा संकोच झाल्याने, तुमची इच्छा असो वा नसो, राजकारण हे तुमच्या
आयुष्यात पार आतपर्यंत शिरले आहे, तुमच्या ‘स्मार्टफोन’च्या ‘डंबयुज’मधून! तेव्हा
कुठल्याही अभिव्यक्तीत त्याचे प्रतिबिंब पडणे तुम्ही काही केल्या टाळू शकत नाही.
त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे हे असे मूळ विषय सोडून इतस्तत: भरकटत राहणे आणि
कुणी काहीही विचारले तरी आपलाच प्रचारकी मुद्दा रेटत राहणे हे खास राजकारण्यांचे
व्यवच्छेदक लक्षण सामान्य माणसांत (पक्षी: माझ्यात) सुद्धा दिसू लागणे. तेही असो.
महात्मा
फुल्यांपासून डॉक्टर आंबेडकरांपर्यंत या देशाला स्वातंत्र्य व इथल्या समाजाला गौरव
मिळवून देण्यासाठी झटलेल्या लोकोत्तर व्यक्तींना राजकारणी म्हणावे की समाजकारणी
असल्या दूरदर्शनीय चर्चेच्या गुऱ्हाळात न पीचता आपण लोकमान्यांचे हेतू आणि उद्देश
जाणून घेतले तर ‘भारतीय असंतोषाचे जनक’ आणि ‘जहाल गटाचे अध्वर्यू’ अशी सार्थ ओळख
लाभलेल्या टिळकांनी गुलामगिरीची सवय झालेल्या आणि दास्यत्वाची वल्कले नेसलेल्या
भारतीय मनांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले याबद्दल दुमत नसावे. लोकमान्यांनी
१८९५ साली इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारण्यासाठी आणि त्यांच्या
जमावबंदीच्या कायद्याला शह देण्यासाठी शिवजयंती या सांस्कृतिक आणि गणेशोत्सव या
धार्मिक कार्यक्रमांना सार्वजनिक व्यासपीठ देण्यास सुरवात केली. सांस्कृतिक परंपरा
आणि धार्मिक भावनांना इंग्रज देखील वचकून असल्याने या प्रकारच्या सार्वजनिक
उपक्रमातून लोकांना एकत्र आणून जनजागृती करून स्वातंत्र्य चळवळ बळकट करण्याचा
टिळकांचा इरादा होता.
माणूस
म्हणून टिळक किती संवेदनशील होते याचा एक किस्सा म्हणजे टिळकांच्या एका स्नेही
निवर्तले आणि समाचारास जाण्यास टिळकांना कार्यबाहुल्यामुळे अंमळ विलंब झाला. टिळक
त्या स्नेह्यांच्या घराजवळ गेले असता आतून त्यांना मनमोकळ्या गप्पांचे आणि निखळ
हास्याचे आवाज आले. टिळकांनी विचार केला की त्यांच्या स्नेही तर निवर्तले, त्यास
काही काळ लोटला आणि त्यांच्या घरचे आता त्या दु:खातून सावरून पुन्हा नवउन्मेषाने
जगण्याचा प्रयत्न करीत असता मी त्यांना भेट देवून केवळ रीत म्हणून, पुन्हा तेच
दु:ख उगाळून त्यांच्या जखमेवर नुकत्याच धरलेल्या खपलीस काढणे उचित होईल? असा
अत्यंत समर्पक आणि समायोजनी विचार करून टिळक आल्या पावली परत फिरले.
सुमारे
१२५ वर्षांपूर्वीचे जहाल गटाचे प्रतिनिधित्व करणारे टिळक आजच्या राष्ट्रवादी
मवाळांपुढे सौम्यच ठरले असते आणि भलत्याच कारणांनी प्रेरित होणारा जमाव आणि त्याचे
पर्यवसन पाहता टिळकांनीच जमावबंदीचा कायदा करण्याची मागणी केली असती. पण मुद्दा
तोही नाही. मुद्दा आहे तो लोकमान्य बाळ गंगाधर पंत टिळकांचे आभार मानावे की कसे?
गैरसमज नको, विशद करतो...
अभ्यासक अर्थतज्ज्ञ, साक्षेपी संपादक, निस्पृह देशाभिमानी, अध्यात्मिक भाष्यकार आणि भारताच्या
स्वातंत्र्य चळवळीचे आद्य प्रणेते असलेल्या लोकमान्यांप्रती समस्त भारतवर्षाने अनेकानेक
कारणांसाठी नतमस्तक व्हावे आणि कृतज्ञ रहावे हे नि:संदेह. परंतु माझे कारण थोडेसे
निराळे आणि अनवट आहे. नाही, ती शालेय स्पर्धेत बक्षिसे मिळविण्यात टिळकांची झालेली
मदत किंवा त्यांच्या हिमालयाएवढ्या कर्तुत्वातून सतत मिळणारी प्रेरणाही नव्हे, ते
तर आहेच. तुम्हाला आठवत असेल तर ‘वय’ या पोस्टमध्ये मी भारतात जन्म घेण्याचा एक
फायदा सांगितला होता... दोन
वाढदिवस साजरे करण्याचा, तारखेने आणि तिथीने! तर माझा तो दुसरा (की पहिला?) तिथीने
येणारा वाढदिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला असतो. या वर्षी
त्या दिवशी देखील अर्धा डझन फोन आले आणि काही संदेशही. माझ्या भौतिक समृद्धीत जरी
फारशी वाढ होत नसली तरी लौकिकात होतेय की काय अशी शंका घेण्यास जागा आहे, असा
सोयीस्कर निष्कर्ष मी यावरून काढला. राजकारण्यांचा सामान्य जनांस झालेल्या
प्रादुर्भावाचे आणखी एक उदाहरण – कुठल्याही घटनेतून आपल्याला सोयीस्कर निष्कर्ष
काढणे!
आणि टिळकांचे काय? तर, त्यांनी १२५ वर्षांपूर्वी हा मुहूर्त,
एका उद्दात ध्येयाने प्रेरित होऊन, एका महान (खरोखर) लोकोपयोगी कार्यासाठी निवडला
आणि कोकणातल्या घराघरात बसणारा गणपती सार्वजनिक होऊन त्याचा एक उत्फुल्ल सोहळा
झाला! त्याच मुहूर्तावर अस्मादिकांनी जन्म घेतल्यामुळे आमचा तिथीने येणारा वाढदिवस
केवळ महाराष्ट्रच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे अगदी
ढोल-ताशांच्या गजरात समारंभपूर्वक साजरा होतो याचे संपूर्ण श्रेय लोकमान्यांना!
जणू काही या श्रेयसासाठीच गंगाधरपंतानी केशवास जन्म दिला होता!
विनोदाचा भाग सोडला तरी आजच्या काळात, माझ्या जन्माची तिथी
वाजत-गाजत साजरी होते हा क्षुद्र आत्मकेंद्री विचार थोडा बाजूला ठेवला तर, आपण
ज्या पद्धतीने हे उत्सव साजरे करीत सुटलो आहोत त्याबद्दल टिळकांना काय वाटत असेल
आणि त्यांचा या परंपरा सुरु करण्यामागचा जो कार्यकारणभाव होता त्याचा थोडा विचार
करू या? लोकांनी एकत्र येवून काही सर्जनशील घडवावे आणि लोकाभिमुख कार्यांचा
प्रारंभ करावा, जनहिताच्या, समाजोद्धाराच्या उपक्रमांचा या निमित्ताने, या
मुहुर्तांवर संकल्प करता येईल? केवळ मंडपांची वाढती लांबी रुंदी, मुर्त्यांची वाढती
उंची आणि वाढत्या आवाजांची अहमहिका असे उत्सवाचे स्वरूप कुठल्याही सुज्ञ, विचारी मनास
अपेक्षित नसेल, नसावे! गणनायक म्हणजे गणांचा नायक, अधिपती. गण म्हणजे जन-गण-मन
मधले ‘गण’ म्हणजे आपण सारे! आणि त्याच्याकडे मागायची ती सुबुद्धी म्हणजे सद्सद’विवेक’बुद्धी...
कुठल्याही झुंडीत सामील न होता स्वत:च्या बुद्धीने विवेक विचार करून जे पटेल
त्याची कास धरण्याची वृत्ती आणि आपल्या ‘स्व’पेक्षा मोठ्या सामाजिक उद्देशासाठी कटिबद्ध
राहून समर्पण करण्याची प्रवृत्ती. हे प्रत्येक गणास जमेल तेव्हाच तो गणराज मोदाने
रंगून नर्तन करेल, सहस्त्र मोदकांनी तृप्त होवून ढेकर नाही देणार! प्रत्येक
नागरिकाचा अन्यायाशी प्राणपणाने लढणारा मावळा झालेला पहिला तरच जाणत्या राजाचा उर
अभिमानाने भरून येईल. त्याच्या पुतळ्याची उंची वाढवण्यापेक्षा त्याच्या प्राणप्रिय
गडकोटांची संवर्धन केले तर त्याची उंची आपोआपच वाढेल. टिळकांनी जुलमी राजवटीत देखील आपला
आवाज बुलंद ठेवला होता, कल्याणकारी लोकशाहीत तो क्षीण झाला तर ‘हेची फळ काय मम
तपाला...?’ असे त्यांना वाटणार नाही...?
बघा, विचार करा. गणाधीशाला अपेक्षित असलेले गण, शिवाजीला
पोटच्या मुलांप्रमाणे प्रिय असलेले मावळे आणि टिळकांना हवे असलेले अन्यायाविरुद्ध पेटून
उठणारे देशबांधव जेव्हा प्रत्येक स्वतंत्र भारतीयांत दिसतील त्या प्रत्येक दिवशी शिवजयंती,
तो प्रत्येक मुहूर्त गणेशोत्सवाचा! अन्यथा, तेच ढोल-ताशे, तेच प्रदूषण, तीच
पिळवणूक आणि तेच राजकारण... विंदांच्या भाषेत ‘तेच ते आणि तेच ते!’
आणि हो, नवनिर्माणासाठी 'अभियंता दिवस' अर्थात 'इंजिनीअर्स डे'च्या मन:पूर्वक शुभेच्छा! आओ बनाये एक बेहतर कल...