बुधवार, २० मार्च, २०१९

चिऊताई...!


माझी मुलगी लहान होती तेव्हा तिला मांडीवर थोपटवून झोपाविण्यासाठी अंगाई गीतांची बिनाका गीतमाला गायला लागत असे. हे माझे रोजचे अत्यंत आवडते काम ‘आ चलके तुझें...’ ने संपन्न व्हायचे. आजही ‘आ चलके तुझें...’ ने झालेल्या ‘क्लासिकल कंडीशनिंग’मुळे, ते गुणगुणले तर आम्हांला पेंग यायला लागते! पण या ‘बिनाका अंगाईमाला’ची सुरवात ज्याने व्हायची ते बडबडगीत काळाच्या उदरात, त्याच्या नायकिणीसारखेच, लुप्त झालेले दिसते. आज ‘वर्ल्ड स्पैरो डे’ अर्थात ‘जागतिक चिमणी दिन’ आहे म्हणे, असो बिचारा! मदर्स, फादर्स आणि टीचर्स नामशेष होत त्यांचे ‘डे’ साजरे करण्याच्या काळात, पूर्णत: लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या चिऊताईंची त्यानिमित्ताने आठवण आणि होईल तेवढा सन्मान!


कितीही बोलावलं तरी मोबाईल टॉवरच्या धाकाने चिऊताई आणि काळाच्या धाकाने गेलेले दिवस, मुलांचे बालपण तर काही परत यायचे नाही; निदान 
‘...दिन जो पखेरू होते
पिंजरेमें मै रख लेता...
पालता उनको जतनसे,
मोतीके दाने देता, 
सीनेसे रहता लगाये...’
म्हणणाऱ्या कवीसारखी त्यांची आठवण म्हणून आमच्या अंगाई गीतमालेची सुरवात करून देणारे हे बडबडगीत आज ‘चिऊ-काऊ’चे ‘बिते हुये दिन’ आणि समस्त चिऊताईंच्या आठवणीत...        

चिऊ चिऊ चिमणी
गाते गाणी...
बांधले घरटे
झाले उलटे!
पडले पिलू
पहाते निलू...
निलूने बोट लावलं
पिलूने बोट चावलं!
निलू लागली रडायला,
आई समजूत घालायला
आईने दिला खाऊ,
निलू लागली हसायला...!

शनिवार, १६ मार्च, २०१९

विवेक...!

विचाराने विकारावर विजय मिळवला तेव्हा पशूचा माणूस झाला.
अस्तित्वाला विचाराचा स्पर्श झाला तेव्हा अभ्यासाचे बीजारोपण झाले.
अभ्यासातून नवकल्पनांना अवकाश मिळाले आणि नवसृष्टी निर्माण झाली.
हे सर्व होण्यासाठी ज्या तपस्व्यांनी आयुष्याचा यज्ञ केला ते शिक्षक!
समाजाला सुयोग्य दिशा देण्याबरोबरच नीती, मूल्ये, सचोटी, चिकाटी अशा संस्कारांचे स्वत:च्या जगण्यातून वाण देणारी ही प्रजाती अलीकडे लुप्त होत चाललीय हे केवळ ठळक बातम्यांकडे बघितले तरी लक्षात यावे. मग ते न्यूझीलंडमधील नृशंस हत्याकांड असो की मुंबईतीलपादचारी पूल दुर्घटना! बाह्यात्कारी या दुर्घटना भासल्या तरी यामागे जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे तिचे मूळ, संकारक्षम वयात मानवतेचा, सहवेदनेचा आणि सहजीवनाचा योग्य संस्कार न होणे हे आहे आणि मूल्यसंस्कार, मूल्यशिक्षण हे तासिका पद्धतीने किंवा 'आउटसोर्सिंग'ने होत नसते; त्यासाठी तसे आदर्श, रोल मॉडेल सतत समोर असावे लागतात. आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी याबाबतीत अतिशय भाग्यवान!
आज न्यू सिटीचे विद्यार्थी जगभरात विखुरले आहेत आणि विविध संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या अत्यंत महत्वाच्या उच्च पदांवर आपापली भूमिका यथोचित पद्धतीने पार पाडीत आहेत, त्या सर्वांचा शाळेला अभिमानच आहे, पण हे सर्व त्यांचे प्रेयस आहे. सामान्यत: न्यू सिटी हायस्कूलच्या आणि विशेषत: दाबके सरांच्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये, गिरीश म्हणाला तसे, 'आम्ही चालवू हा पुढे वारसा...' हे ज्या विद्यार्थ्याने तन-मन-धनाने स्वीकारले आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले तो, न्यू सिटी हायस्कूलचे श्रेयस म्हणून ज्याच्या नावावर शाळेच्या तमाम विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचेही एकमत होईल असा विद्यार्थी म्हणजे श्री. विवेक पोंक्षे सर! पुण्यासारख्या शहरात ज्ञान प्रबोधिनीसारख्या संस्थेची धुरा इतकी वर्षे समर्थपणे सांभाळणे केवळ कौतुकास्पद, अभिमानस्पदच नाही तर वंदनीय आणि अनुकरणीय आहे. ज्ञानाच्या प्रबोधनास पोंक्षे सरांनी कायमच योग्य दिशा आणि प्रभावी परिमाण दिले असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये!
माझा आणि पोंक्षे सरांचा प्रत्यक्ष संबंध [संभाषण या अर्थाने] तसा केवळ तीन-चार प्रसंगी आला आणि गिरीशने वर्णन केला तो 'मॅजीन इंडिया' निमित्त महिनाभरापूर्वी झालेल्या आमच्या भेटीचा शेवटचा प्रसंग. परंतु पंचतत्वांचे अस्तित्व जसे चराचरात आणि आपल्या कणाकणात असते, ते वेगळे दाखवता येत नाही आणि त्याची गरजही नसते, तसेच आपले शिक्षक (ज्या ज्या व्यक्ती, वृत्ती, निसर्ग आणि घटना यांच्याकडून आपण शिकतो ते सारे शिक्षकच, म्हणूनच दत्तगुरूंनी देखील २४ गुरु केल्याचे दाखले दिले जातात!) हे सहावे, नेहमीच भासमान न होणारे पण आपल्या अस्तित्वाचे धरोहर असलेले सहावे तत्व! आज अशा शिक्षकांची समाजाला जेवढी गरज आहे तेवढी कधीच नव्हती, नसेल! या पार्श्वभूमीवर पोंक्षे सरांचे अकाली जाणे हे केवळ पोकळी निर्माण करणारे नाही तर समाजाची अपरिमित हानी करणारे ठरते. ‘लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ हे सरंजामशाहीचे प्रमेय इथे वेगळ्या अर्थाने मांडावेसे वाटते...
नेते, उद्योगपती, धनिक येतील आणि जातील, शिक्षक जगाला पाहिजे कारण मनांची मशागत करायलाच हवी. कसे जगायचे हे शिकण्याबरोबर का जगायचे हे शिकवणारा गुरु हवाच! म्हणूनच एकांगी ‘विकास’ नाही झाला तरी चालेल सद्सद‘विवेक’ जगायलाच हवा.
सरांचे संपूर्ण आयुष्य हाच संदेश आहे त्यामुळे त्यांच्या जाण्याचा विषाद वाढविण्यापेक्षा त्यांच्या विचाराचा वसा घेऊन विवेक वाढवू या म्हणजे, पंचतत्वातून मिळालेले शरीर पुन्हा पंचतत्वात मिसळले तरी सहावे तत्व चिरंतन आहे व राहील, फक्त समाजमन तेवढे प्रगल्भ व्हावे!

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः।

गुरुवार, १४ मार्च, २०१९

'आशा चिरंतनाची...'


आज १४ मार्च २०१९. विंदांचा नववा स्मृतिदिन. अर्थात स्मृतिदिवस त्यांचा साजरा करावा लागतो जे विस्मृतीत जातात. जे आपल्या आठवणीच काय आपल्या जाणिवेचा कण अन कण व्यापून दशांगुळे उरतात त्यांच्या केवळ स्मृती नसतात तर ते श्रुती-स्मृती होऊन आपल्या कर्म-संस्काराचा भाग बनतात, आपल्या अस्तित्वाला, व्यक्तित्वाला आगळे परिमाण देतात!

विंदांच्या जन्मशताब्दी निमित्त मी 'रोज एक कविता...' असा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम चालविण्याचा प्रयत्न केला आणि विंदांच्या अगदी ३६५ जरी नाही तरी १०० एक कविता इत्यादीवर आणून शतक गाठू शकलो. या उपक्रमाच्या समारोपात मी माझी भूमिका प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला, तो आपण इथे वाचू शकता.

'हम आपके है कौन' या अनेक अर्थाने विक्रमी ठरलेल्या चित्रपटात डॉक्टर दाम्पत्य हिमानी शिवपुरी व सतीश शहा यांच्यातील नोक-झोक लोभस आहे. एका प्रसंगात, शायर असलेल्या डॉक्टर सतीश शहाला काही सादर करून दाखविण्याची 'शिक्षा' मिळते तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणते, 'किसी और शायर का कलाम सुनाईये, एक शायर के लिये इससे बढकर 'सजा' और क्या हो सकती है...?'   

त्या क्षणी झालेल्या सतीश शहाच्या मनोवस्थेशी तादात्म्य पावत मी पुढील 'विंदांचा अल्प परिचय' सादर करतोय कारण तो मी लिहिलेला नाही! पुन्हा एकदा आमचे जळगावचे स्नेही, हितचिंतक आणि माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे प्रदीप रस्से सर यांच्यामुळे हा अलभ्य लाभ झालाय. त्यांना रुचणार नसले तरी त्यांचे आणि मुख्य म्हणजे ज्यांनी विंदांचा इतका सूक्ष्म तरी विस्तृत, सघन तरी तरल आणि 'वर्णनात्मक' किंवा 'विश्लेषणात्मक' असे आरोप होऊ शकणार नाही असा सटीक, समर्पक आणि समावेशक परिचय करून देत प्रसंगाचे औचित्य आणि प्रकटनाचा उद्देश यांचे गांभीर्य टिकवत जी उंची गाठलीय तिला सलाम आणि या परात्पर मित्र, शब्दगीर श्री. योगेश शुक्ल यांचे मन:पूर्वक अभिनंदन, आभार आणि स्वागत! प्रमुख पाहुण्यांचे मनोगत ऐकायला श्रोतृवृंद अधीर झालेला असतांना, मिळालेल्या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात परिचयकर्त्याने विनाकारण पाहुण्यांच्या बालपणापासून सुरवात करून फुटेज खात रसभंग करू नये हा अत्यंत मुलभूत शिष्टाचार पळत मी आवरते घेतो आणि मूळ मसुदा 

उद्धृत

करतो... 
 
'गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी अशा संमिश्र भावनांच्या कल्लोळ करणार्‍या कविता लिहिणारे विंदा करंदीकर. १४ मार्च त्यांचा स्मृतिदिवस. मुक्त सुनीतांचा केलेला प्रयोग हे या प्रयोगशीलतेचे एक उदाहरण होय. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

विंदा ‘ज्ञानपीठ’ चा बहुमान मिळवणारे तिसरे मराठी साहित्यिक, दुसरे कवी! यांचा मूळ पिंड कवीचा. त्यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील घालवळ गावचा. घरची परिस्थिती तेव्हा अत्यंत हलाखीची, वडील गरीब शेतकरी. पण एका स्नेह्यांमुळे विंदांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. इंग्रजी घेऊन एम.ए. झाल्यावर त्यांनी मुंबईला शिक्षकी पेशा स्वीकारला.

इंग्रजी काव्याचा अभ्यास करताना ब्राऊनिंग, हॉपकिन्स, एलिएटस् यांच्या कवितांनी ते खूप प्रभावित झाले. तसेच मराठीतील माधव ज्युलियन, बा. सी. मर्ढेकर यांच्या काव्याचाही त्यांच्यावर पडलेला प्रभाव त्यांच्या प्रारंभीच्या काव्यातून जाणवतो.

चिंतनशीलता हा मूळ पिंड असल्याने विश्र्वरहस्याचा शोध, पार्थिवतेचे आकर्षण, विज्ञाननिष्ठा, आध्यात्मिक कुतूहल असे वैचारिक विषय त्यांच्या काव्याचा आत्मा बनले. प्रयोगशीलता हे त्यांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. गझल, गीत, मुक्त सुनीत, तालचित्रे, विरूपिका असे काव्याचे जुने-नवे रचनाबंध त्यांनी स्वीकारले. स्वच्छंद हा नवा छंद निर्माण केला. त्यांचे स्वेदगंगा (१९४९), मृद्गंध (१९५४), ध्रुपद (१९५९), जातक (१९६८) आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. विंदा करंदीकरांचे स्पर्शाची पालव (१९५८), आकाशाचा अर्थ (१९६५) हे लघुनिबंधांचे संग्रग्रहसुद्धा त्यांचे वैचारिक वेगळेपण आणि बुद्धीची चमक अधोरेखित करतात. त्यांनी लिहिलेल्या ‘परंपरा आणि नवता’ (१९६७) या समीक्षणात्मक लेख संहाचे मराठी समीक्षा ग्रंथांमधे महत्त्वाचे स्थान आहे.

विंदांच्या बालकविताही पारंपरिक बालगीतांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या अद्भूतरम्य, गमतीदार व वैचित्र्यपूर्ण कल्पनांमुळे या बालकविता रसिकांवर छाप सोडून जातात. बालविश्र्वाशी समरसून नावीन्यपूर्ण कल्पनाशक्ती वापरून अनेक भन्नाट बालकविता त्यांनी लिहिल्या आहेत. एटू लोकांचा देश, पिशी मावशी आणि तिची भुतावळ या दीर्घ कवितांचा त्यात समावेश आहे. राणीचा बाग, एकदा काय झाले, अजबखाना, सर्कसवाला, परी गं परी, टॉप ह्यांसारख्या त्यांच्या बालकविता संग्रहांनी मुलांचे भावजीवन समृद्ध केले आहे.

त्यांच्या सर्वच लिखाणामधून संत तुकाराम महाराजांच्या काव्यातला परखडपणा व आशयघनता दिसून येते. त्यांच्या वेगळ्या जाणिवा, वेगळ्या प्रतिमा रसिकांना खिळवून ठेवतात.

‘मी च्या वेलांटीचा सुटो सुटो फास’ किंवा ‘अगा क्रियापदा, तुझ्या हाती अर्थ। बाकी सारे व्यर्थ, भाषेलागी।’
यातून त्यांचे वेगळेपण स्पष्ट होते.
‘देणार्‍याने देत जावे - घेणार्‍याने घेत जावे , घेता घेता एक दिवस - देणार्‍याचे हात घ्यावे’ 
किंवा
‘तीर्थाटन मी करीत पोचलो, नकळत शेवट तव दारी, अन् तुझिया देहात गवसली, सखये मज तीर्थे सारी’
या त्यांच्या कविताही विलक्षण परिणाम साधतात.

विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर व वसंत बापट या तीन कवींमुळे मराठी कविता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. हे तिघेही आपल्या कवितांचे एकत्रितपणे कविता वाचनाचे कार्यक्रम करत सार्‍या महाराष्ट्रभर फिरले.

विंदा करंदीकरांना त्यांच्या साहित्यातील देदिप्यमान कारकीर्दीसाठी जनस्थान पुरस्कार, कबीर पुरस्कार, सिनियर फुलब्राईट बहुमान असे अनेक पुरस्कार मिळाले. पण सर्वांत महत्त्वाचा, मानाचे पीस खोवणारा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार! या पुरस्काराने मराठी साहित्याचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय स्तरावर, खर्‍या अर्थाने फडकला.'

- योगेश शुक्ल 

सदर लिखाणास कुठे पूर्वप्रसिद्धी मिळाली असल्यास आणि येथे पुनःप्रकाशित करीत असतांना काही चूक झाली असल्यास, आपल्या अभिप्रायासह अवश्य कळवावे. धन्यवाद!

सोमवार, ४ मार्च, २०१९

कढीपत्ता...!



वाढदिवसांनी खचाखच भरलेला फेब्रुवारी तसाही उत्साहाचा, धावपळीचा आणि गडबडीचा असतोच. या वर्षी कौटुंबिक सोहळ्यांना सामाजिक क्षेत्रातील कामांची जोड मिळाल्याने उण्या-पुऱ्या २८ दिवसांचा फेब्रुवारी ४० दिवसांचा भासला नसता तरच नवल. त्यात स्थानिक, राज्य, राष्ट्र आणि जागतिक स्तरावरील आर्थिक, राजकीय अन ऐतिहासिक घडामोडींची भर! अर्थात ट्रम्प पुतीनना किंवा किमला काय म्हणाले आणि त्यांनी त्यांना (?) काय प्रतिसाद दिला याहून आमच्या कामवाल्या मावशी दोन दिवस न आल्याने घरातील महिला काय म्हणाल्या याकडे अधिक लक्ष दिले तर पोटापाण्याची सोय होवू शकते एवढा क्षुद्र स्वार्थ जपण्याचे किमान व्यवहारज्ञान आम्हाला असल्याने आम्ही ट्रम्पकडे खर म्हणजे थोडा कानाडोळाच केला. त्याचा वचपा काढण्यासाठी ते त्यांच्या ‘न्यूक’चे टोक नॉर्थ कोरिया कडून आमच्याकडे तर हलवणार नाहीत ना अशा धास्तीने काही काळ आमची झोप उडाली होती पण या दोन बाहुबलींचा एका गोल मेजाच्या दोन विरुद्ध स्पर्शरेषांना (मराठीत टैन्जंट) टेकून, वर्तुळ या आकाराला आणि गोलमेज परिषद या संकल्पनेला एकसमयावच्छेद करून निष्प्रभ करणारा कॅमेरा-फेसिंग फोटो पहिला आणि आम्ही सुटकेचा (नि)श्वास सोडला!

बाकी ‘अभिनंदन’ला इतक्या अल्प काळात आपल्या मायदेशात बिनशर्त अन अ-क्षत परत धाडून कुणी कुणावर राजकीय कुरघोडी केली याबद्दल आमच्या पानवाल्या आणि भाजीवाल्या मध्ये मतभेद असले तरी, ‘अरे, कौनू फर्क नाही पडता इनको, इधर सबको विलेक्शनकी पडी है और उधर फटी पडी है, क्या साब...’ म्हणणारा परीट मला जास्त मध्यममार्गी आणि विवेकी वाटतो. उत्तरेकडचा असल्याने राजकारणाची जाण हा देखील, त्याच्या इस्त्रीच्या लांबड्या टेबलप्रमाणे, त्याचा ‘ठेका’ आहे. असो! न असू द्यायला आपण काही ‘राज’कारणी नाही! शिवाय वेळीप्रसंगी आपल्या डागाळलेल्या आणि चुरगळलेल्या वस्त्रांचा कायापालट करून आपली प्रतिमा संवर्धन करण्यात आणि आपली तिळाएवढी सामाजिक प्रतिष्ठा जपण्यात त्याचा मोलाचा हात असतो हे विस्मरून कसे चालेल...?

हा महिना म्हणजे अक्षरश: रोलर कोस्टर राईड होता यात काहीच वाद नाही. नेहमीच वेगवेगळ्या निमित्ताने अनेक लोकांशी भेटीगाठी या होतच असतात. परंतु बहुदा त्यामागे काही वैयक्तिक स्वार्थ, समाईक उद्देश असतो, मग तो अगदी ‘निधी उभारणी’च्या गोंडस नावाखाली होणारा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी का असे ना. पण या महिन्यात खरोखरच काही सम्यक उद्दिष्टांसाठी काही खऱ्याखुऱ्या मोठ्या माणसांना भेटण्याचा योग आला आणि गडकरी साहेबांच्या भाषेत ‘चहा पेक्षा किटलीच गरम’ याचा पुरेपूर प्रत्यय देखील! काही नेहमीच्याच माणसांचा मोठेपणा वेगळ्याच संदर्भात जाणवला आणि अतिपरिचयात अवज्ञा तर घडली नाही ना अशी शंका देखील आली. आणि अर्थातच काही संभावित मोठ्यांचा छोटेपणा, खरतर क्षुद्रत्व, नेहमीप्रमाणे खूप खूप खुपले. हे सगळे असले तरी आम्ही या सर्व बऱ्या-वाईटातून जे मिळाले असे नेहमीच समजत आलो आहो ते नक्कीच मिळाले – खूप काही शिकायला मिळाले!

अक्कलखाते वाढून त्याचा उदरनिर्वाहाला उपयोग नाही आणि ‘तुमच्यासारख्या तरुणांची देशाला गरज आहे’ किंवा ‘खूप मोठे आणि चांगले काम करताय’ या शब्दांनी धीर येत असला, बळ मिळत असले आणि अहं सुखावत असला तरी एक तारखेला येणाऱ्या बिलांना तो मोठेपणा दाखवता येत नाही ही वस्तुस्थिती बदलत नाही. सर्वच हाडाच्या ‘कढीपत्ता’ कार्यकर्त्यांची ही खंत आम्हाला नवी नाही. किंबहुना स्वानुभवामुळे आम्ही त्यांच्या या कुतरओढीशी अगदी तादाम्य देखील पावू शकतो पण परिस्थिती बदलू शकत नाही ही आमची वैयक्तिक खंत! पण आमचे (नेहमीचेच) रडगाणे हे या लिखाणाचे उद्दिष्ट नव्हे, तेव्हा कुणा शायराच्या... 
‘कुछ रीश्तोंमें मुनाफा नहीं होता
मगर जिंदगीको अमीर बना देते है !’
...या फीलॉसॉफिकल ओळी आठवून पुढे चलावे हे उत्तम!

गेल्या महिनाभरात बरच काही गमावलं आणि खूप काही कमावलं. आता यात नवीन काय असं कुणीही म्हणेल. ‘याला जीवन ऐसे नाव!’ अशी दार्शनिक प्रतिक्रिया देखील मिळेल. पण बहुतेक माणसांचे पाय मातीचेच असतात पण क्वचित काही माणसे अगदी वेगळ्याच मातीची घडलेली असतात आणि आपण या दोन टोकांच्या मध्ये हिंदोळण्यात नेमकं काय साधतो आहोत असा नेहमीचाच सैद्धांतिक प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. ‘कोहम’ ने सुरु झालेला प्रवास ‘सोहम’ पर्यंत नेण्यासाठी ‘मैत्र’ आवश्यक असते हे निश्चित पण व्यवहार जेव्हा ‘मैत्र’चा मुखवटा घालून समोर येतो तेव्हा नेमका कुठला धर्म पाळावा या भ्रमात पडून किंकर्तव्यदिग्मूढ व्हायला होते. आमचे असे वारंवार अर्जुन होणे आता समस्तांच्याच अंगवळणी पडले असल्याने तेही एक असो!

आत्मरत समाजाच्या मृतवत संवेदना जागवून त्याला आपल्या सभोवतालचे साक्षेपी भान यावे या चिरंतन प्रयासात अजून इतस्तत: भरकटण्यापूर्वी या लेखाचा मूळ उद्देश जो की ‘बाबा’ची अर्थात अनिल अवचटांची कविता या निमित्ताने आठवणे, पाठवणे आणि साठवणे... बऱ्याच दिवसांपासून हे ‘जिंदगीको अमीर बनाने’ वालं काम बाकी होत, आज मौकाभी है, दस्तूर भी और तकाजा भी...

बिनहिशोबी लोकांचेही, वेगळे काही हिशोब असतात,
कॉम्प्यूटरच्या तुमच्या आमच्या, डोक्यात ते उमटत नसतात.

...धुंदावलेल्या कॉफीहाउसात, सिगारेटच्या उबेमध्ये,
किंवा बियरच्या निथळत्या फेसाबरोबर,
अथवा, लायब्ररीच्या जाड भिगातून,
आस्तिक्यवाद ते मार्क्सबाबापर्यंत
आमच्या गप्पा बेभान रंगतात;
तेव्हा सायकलला लावून झोळी,
खांद्यावर मावळत्या दिवसाची मोळी,
ते कुठेतरी क्षितिजावरून,
घरट्याकडे परतत असतात;
कदाचित एखादा पराभव विणत.
पण तरीही त्यांच्या दिवसाला
आशेच्या रवळ्या पडतच असतात,
बिनहिशोबी लोकांचेही, वेगळे काही हिशोब असतात II १ II

आमची डिग्री, फ्रेमच्या कोंदणात
चकमक चकमक मिरवत असताना,
आम्ही खुराड्यातल्या भविष्यभीतीने,
वाराआधीच नामोहरम होताना...
त्यांची डिग्री केव्हाचीच,
हरवून फाटून गेलेली असते.
डिग्रीचे ओझे टाकून दिल्यानेच
ते कसे नेहमी मोकळे भासतात,
बिनहिशोबी लोकांचेही, वेगळे काही हिशोब असतात II २ II

कॅमेराच्या क्लिक् क्लिकाटात
आमची ‘सोशल सर्विस’ खुलते.
टीव्हीचा मूव्ही अडून बसला
तर ओठावरची लिपस्टिक रुसते.
आमची यादी संपते तिथून,
त्यांचा प्रदेश सुरु होतो...
त्यातल्या बातम्या अन हेडलायनींचं 
आमच्या पेपरांना वावडं असतं.
आमचे ‘सोशल सायंटिस्ट’ लोक
तिथं फारसे फिरकत नसतात...
लठ्ठ आकाराचे परदेशी चेकही,
त्यांच्या प्रदेशात पोहचत नसतात,
आणि खांद्यावर थाप मारल्याच्या बदल्यात
शिक्क्यातून मैत्री ते वदवत नसतात,
बिनहिशोबी लोकांचेही, वेगळे काही हिशोब असतात II ३ II

आमच्या जगण्यातले सारेच क्षण
आम्ही गाळून पारखून घेतो.
अक्स्माताची त्यातली गरळ
सरळ सरळ फेकून देतो.
आणि ते तर सदाचे तिकडे
आमच्या दृष्टीने दिशाहीन वेडे
कुठल्याशा परिवर्तनाची धरून आशा,
रखरखीत रस्त्याचे सोसत चटके,
चालताना हरायचं नाकारत असतात,
बिनहिशोबी लोकांचेही, वेगळे काही हिशोब असतात II ४ II

त्यांनी जेव्हा आपलं जगणं        
टांगून ठेवलं खुंटीवर...                      
वास्तवाच्या छिन्नीने अन
जळमटं ठोकली पोथीवर.
तेव्हा आमचे पोकळ संताप  
त्यांच्या हातात निखारे बनले,
तेव्हा आमचे अनाडी विचार,   
त्यांच्या कवेत राबू लागले.
तरीही त्यांच्या शर्टावर,
‘पहुंचे हुए’ रंग नसतात.
बिनहिशोबी लोकांचेही, वेगळे काही हिशोब असतात II ५ II

ते कधी त्यांची दु:खं
माईकवरून सांगणार नाहीत.
त्यांच्या घराची उसवली शिवण,
चुकूनही समोर आणणार नाहीत.
पण आम्हीच आमच्या मेकपचे थर
स्वत:हून अगदी स्वच्छ धुवून,
आमच्या संवेदनांवर जमलेली
बुरशी सारी साफ करून,
जर त्यांच्या जवळ गेलो,
तर त्यांना निदान कळेल तरी;
की ते तितके एकटे नाहीत,
आमचे सारे सारे रंग
फक्त नटव्या सरड्याचे नाहीत.
बहुतेक त्यांना आभाराची
भाषणं करता येणार नाहीत,
आणि त्यांच्या आठवणींचे
खंडही प्रकाश पाहणार नाहीत.
मात्र, त्यांच्या श्रांत रात्रीला
मऊ उबेचा किनारा असेल,
आणि त्यांच्या निमित्ताने
आमचाच चेहरा आम्हांला दिसेल. II ६ II
          
कविता स्त्रोत – अनिल अवचटांचे मितुले आणि रसाळ’

रविवार, ३ मार्च, २०१९

स्मृतीचिन्ह...!


विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यास कटिबद्ध असलेले आशा फाउंडेशनचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन सेन्टर. या सेंटरद्वारे आयोजित, ‘I have no special talent, I am only passionately curious!’ म्हणणारा जगविख्यात शास्त्रज्ञ Albert Einstein जे तत्व सांगू पाहतो ते, ‘विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देवून त्यांची creativity प्रत्यक्ष प्रयोगात आणणे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘इमॅजीन इंडिया’ ही राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा! ‘इमॅजीन इंडिया’ या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या पहिल्या वर्षीची theme ही ‘पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधून त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन करणे’ अशी असल्याने या पहिल्यावहिल्या प्रयोगाची सांगता पुण्यात व्हावी आणि या समारंभाला शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभावे अशी आमची इच्छा होती.

 


आमच्या इच्छेनुसार खरोखरच, पुण्यातील भारतीय विद्या भवनची ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ Exploratory, वर्ध्याचे ‘बजाज सायन्स सेंटर’ यांच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले आणि Olympiad साठी हजारो विद्यार्थ्यांना तयार करणारे श्री. सी. के. देसाई सर विज्ञान शिक्षक म्हणून तर Persistent समूहाचे CSR Projects Director श्री. श्रीपाद जोशी सर व्यवसाय व्यवस्थापन तज्ञ म्हणून लाभले. शिक्षण आणि व्यवसाय यांचा मेळ घालून समाजोपयोगी कार्यास वाहून घेतलेल्या संस्थांचे प्रतिनिधी म्हणून महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव श्री. पी. व्ही. एस शास्त्री सर आणि समाजातील सर्व थरातील, विविध पातळ्यांवरील भिन्न भिन्न क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आणि परस्पर समन्वयन हे अत्यंत कौशल्याचे काम विवेकाने करणारे विवेक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेशजी पोहनेरकर हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.


 
जवळपास दोन महिने चाललेल्या या प्रकल्पातील अगदी संकल्पनेपासून समारोपापर्यंत माझा सक्रीय सहभाग ही खरतर कर्तव्यपूर्ती. त्यात माझे वेगळे विशेष असे योगदान काही नाही. तथापि केवळ माझ्यावरील निरपेक्ष स्नेहापोटी आणि व्यावहारिक संबंधांपेक्षा ‘न्यू सिटी हायस्कूलचे विद्यार्थी’ म्हणून झालेला संस्कार आणि गुरुबंधू हे नाते अधिक दृढ असल्याने गिरीशने माझाही सन्मान करणे उचित समजले असावे. खरे तर उपचार हा काही माझा प्रांत आणि मला मानवणारा विषय नव्हे. पण अशा प्रकारच्या प्रोत्साहनाने केलेल्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते हे नाकारून कसे चालेल? शिवाय स्पर्धेत सहभागी जिज्ञासूंच्या कल्पना आणि त्यावर अथक परिश्रम घेण्याची तयारी यामुळे तर सगळ्याच उपक्रमाचे चीज झाल्यासारखे वाटते आणि कितीही समस्या असल्या तरी त्यांवर उपाय शोधणारे नवसंशोधक innovators होतच राहतील याची ‘आशा’ वाटते आणि यंग ‘इंडिया’ सक्षम आहे या जाणीवेने अशा अजून शंभर उपक्रमांसाठी हजार हत्तींचे बळ मिळते!


रीत म्हणते की या (अनावश्यक) सन्मानासाठी गिरीश आणि ‘आशा’चे आभार मानावे, पण पुन्हा एकदा नाशिकच्या कविमनाच्या कलाकार मित्राचा सहारा...
आभाराचा भार कशाला,
आता फुलांचे हार कशाला!
हृदयामध्ये घर बांधू या,
अशा घराला दार कशाला!

आणि हो, जाता जाता एक महत्वाचा मुद्दा... आभार राहू देत पण ‘आशा’च्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि कौतुक! एका वेगळ्या मोठ्या, चिकित्सक आणि चोखंदळ शहरात जाऊन पहिलाच कार्यक्रम इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणे म्हणजे चेष्टा नव्हे! केवळ ६ लोकांच्या टीमने हे साधणे म्हणजे टीम SHARP असावी लागते आणि ‘महोत्सव’ व ‘मेळावे’ यात आपापली भूमिका ‘अभिनित’ करण्याची कला साधलेली असावी लागते. Well done Team ‘आशा’, ‘Indeea’ is with you!
 
Thank you very much, All the best and a Very Long Way to Go…!