मी मांडत रहातो शब्द
एकामागे एक
आणि कधी बनते कविता
कधी स्फुटं, कधी अस्फुट...
भावना असतील माझ्या किंवा
कोलाहलातील जगण्याच्या मौनाचे
किंवा मौनाच्या कोलाहलाचे असेल
प्रकटन... दर्शन वगैरेही म्हणेल कुणी
आणि एक दिवस या उपदव्यापाचे
होईल पुस्तक, न जाणो...
पण त्या पुस्तकाला नसेल कॉपीराईट
प्रकाशकही नसेल म्हणून नसतील आवृत्या
पण असेल एक वाचक... नक्की असेल तो किंवा ती
त्याला नसेल तमा त्या पुस्तकाच्या
‘बेस्टसेलर’ असण्या-नसण्याची... कारण
त्याच्या आयुष्यात डोकावणारा सापडेल त्याला
एक प्रहर, एक कटाक्ष, एक प्रवास अन किमान एक
शब्द...
त्या एका शब्दासाठी
ही सारी धडपड... व्यर्थ नाही आणि वांझही...
अंकुरेल!
आज जागतिक पुस्तक दिन आहे, म्हणे... त्याला
समर्पित हे ‘अमुकचे चऱ्हाट’!
...पुस्तकाचे पान...
सुंदर
उत्तर द्याहटवा