मंगळवार, २ एप्रिल, २०१९

सृजन...!



काही सांगू या नको
फार मागू या नको,
रात्रीची कूस उजवावी
आणि काही नको...

तांबडे फुटता दिशा नहाव्या,
चिमणपाखरांना चारा मिळावा.
मोत्याचे नसू देत दाणे, फक्त
पेरल्या दाण्यास गर्भ रहावा...

घंटा शाळेची देवघरात ऐकू यावी,
नांदत्या गोकुळाने श्रीरंग ल्यावा.
अंगणातल्या तुळशीवृंदावनाने
परीक्षा बघता आशिर्वाद द्यावा...

करू नये कुणी कुणाचा हेवा
द्वेष तर निषिद्धच ठरावा,
शस्त्रांचे साऱ्या व्हावेत मंत्र
अन दंभ सौहार्दाशी हरावा...

भूक सर्वत्र एक अन
रक्ताचा एकच रंग,
बंधुभाव असा नांदावा
व्हावे जगणे अभंग...

होवो रंग सारे मुक्त
झेंड्याच्या काठीवरून,
उतरावे सारेच शहाणे
उंटाच्या पाठीवरून...

मैत्र जीवलगांच्या साथीने फुलता
बोलत्या शब्दांचे सुखमंत्र व्हावे.
भावनांचे हरवू नयेत हिंदोळे कधी,
कवितेने नित्य वळचणीस रहावे...

क्षितिजाने बदलता कूस
संध्येस अमृताचा गंध यावा,
उत्कटतेच्या रममाण देहधूनीतून
मोहरल्या गात्रांचा फुलोरा धुंद व्हावा...

काही सांगू या नको
फार मागू या नको,
रात्रीची कूस उजवावी
आणि काही नको...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा