रविवार, २८ एप्रिल, २०१९

मनुष्यजन्म...!


माणसाच्या आयुष्याचे ध्येय काय, माणसाला नेमके काय आणि कसे साध्य करायचे आहे या बद्दलचे A Life of Purpose हे चिंतन मी परवाच ‘रिसर्च गेट’वर प्रकाशित केले, ते इथे वाचू शकता. पण मुळात माणूस इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत इतके जास्त का जगतो आणि त्याने तसेच जगणे का अपेक्षित आहे या बद्दलची एक रंजक बोधकथा, जी स्पष्ट करते की मुळात तुमच्या आयुष्यातील बरीचशी वर्षे ही तुमची नाहीतच...

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. समुद्र, नद्या, हिरवीगार कुरणे, वाहता वारा, खळाळते पाणी आणि या सगळ्यांना अखंड उर्जा पुरविणारा तेजस्वी सूर्य! एवढे झाल्यावर चित्र तर सुंदर सजले पण त्यात जीव आहे असे काही वाटे ना. काही चालते-बोलते-हलते सजीव प्राणी या सृष्टीला अधिकच बहार आणतील अशा कल्पनेने ब्रह्मदेवाने काही विशिष्ट कार्य करू शकतील असे प्राणी घडवायचे ठरविले.

सर्वप्रथम ब्रह्मदेवाने तयार केला एक घोडा – अत्यंत उर्जाशील, मेहनती, वेगवान आणि आपल्या स्वाराला वायुवेगाने येथून तिथे पोहचविणारा. त्याला आयुष्य दिले २० वर्षांचे! घोडा म्हणाला, ‘देवा, मला एव्हढे धावपळीचे आयुष्य देताय तर ते १० वर्षांचे पुरे, १० काढून घ्या.’ देव म्हणाला, ‘ठीक, तू म्हणतोस तर तसे...’

मग देवाने तयार केला एक बैल – अत्यंत कामसू, कष्टाळू, इमानी आणि मिळेल त्यावर गुजराण करीत आपल्या धन्यासाठी पडेल ते कष्ट करणारा. त्याला आयुष्य दिले ५० वर्षांचे! बैल म्हणाला, ‘देवा, दया करा. मला एव्हढे कष्टाचे आयुष्य देताय तर निदान ते लांबवू तरी नका, २० वर्षे पुरे, ३० कमी करा.’ देव म्हणाला, ‘ठीक, जशी तुझी मर्जी.’

या नंतर देवाने निर्मिती केली कुत्र्याची! कुत्र्याने मिळेल ते खायचे होते, मालकाच्या चीजवस्तूंची राखण करायची होती आणि दारावर बसून येणाऱ्याजाणाऱ्यावर नजर ठेवायची होती आणि वेळप्रसंगी भुंकायचे होते, आयुष्य २५ वर्षे. कुत्राही म्हणाला २५ वर्षे खूप होतात १५ ठीक आहेत, देवाने त्याचीही १० वर्षे काढून घेतली.

नंतर देवाने घडविला वानर अर्थात माकड! त्याला सांगितले तुझ्या पाठीला कायम बाक राहील, तू फक्त केळी खाशील, इथून तिथे उड्या मारशील आणि माकडचेष्टा करून इतरांचे मनोरंजन करीत २० वर्षे जगशील. माकड म्हणाले, ‘देवा, २० वर्षे खूप होतात, १० पुरे, १० परत घ्या.’ देव म्हणाला, ‘ठीक, जशी तुझी इच्छा.’

एवढ्या सगळ्या निर्मितीनंतर देवाने माणूस घडवायला घेतला... देवाला माणूस हा सर्व प्राण्यात उत्तम, श्रेष्ठ आणि रचनात्मक हवा होता. देवाने माणसाला सर्वपथम दोन पायावर ताठ उभे राहण्याचे वरदान दिले ज्यामुळे माणसाचा पाठीचा कणा पृथ्वीशी काटकोनात ऊर्ध्वगामी म्हणजे आकाशाकडे पहाणारा सरळ झाडाप्रमाणे घडला. या एका बदलामुळे पुढे अनेक उत्क्रांतीच्या पातळ्या शक्य झाल्या. देवाने माणसाला सांगितले ‘तू माझा मानसपुत्र आहेस तू या सर्व प्राण्यांचा स्वामी असशील, हे सर्व तुझी सेवा करतील. तू खा, पी, मजा कर, आनंदात रहा, सृजनशील कलाकार हो आणि अधून मधून माझे नामस्मरण कर. तुला मी २० वर्षे आयुष्य देतोय...’

अशा सुखासीन आणि ऐषारामाच्या आयुष्याच्या कल्पनेने, मुळातच लोभी असलेल्या माणसाला स्वामित्वाच्या आणि स्वर्गसुखाच्या कल्पनेचा मोह पडला, तो तक्रारीच्या सुरात देवाला म्हणाला, ‘फक्त २० वर्षे? प्रभू, मला जगण्याचे सुख भोगण्यास २० वर्षे फारच कमी होतात. तुम्ही असं करा ना, ते घोड्याला नको असलेले १०, बैलाने नाकारलेले ३०, कुत्र्याने परत केलेले १० आणि माकडाने नको म्हटलेले १० अशी ६० वर्षे मला द्या म्हणजे मी किमान ८० वर्षे जगू शकेल.’ देव म्हणाला, ‘बघ, नीट विचार करून ठरव. मी एकदा हो म्हणालो तर तुला तेवढे जगावेच लागेल!’ देवाच्या सावधानतेच्या इशाऱ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत, स्वप्नरंजनात रममाण झालेला माणूस म्हणाला, ‘हो, चालतंय की...!’

अशा प्रकारे इतर प्राण्यांनी नाकारलेली वर्षे लोभी माणसाने स्वत:च्या आयुष्याला जोडून घेतली पण त्यामुळे आयुष्याची सुरवातीची स्वत:ची २० वर्षे माणूस देवाला अपेक्षित होते तसा जगतो – खातो, पितो, मजा करतो, सृजनशील असतो, आनंदात रहातो. कुठलीही काळजी नाही, कशाची विवंचना नाही आणि देवाची आठवणही नाही.

पुढील १० वर्षे म्हणजे वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत घोड्याचे आयुष्य जगतो. घोड्यासारखा अतिशय स्फूर्ती आणि जोश असलेला पण कशा न कशाच्या मागे सतत धावत असलेला दिसतो. ३० ते ६० ही ३० वर्षे माणूस बैलासारखा घाण्याला जुंपून आणि डोळ्यांना झापड लावून गोल गोल फिरत ढोर मेहनत करीत असतो. आयुष्यातला हा काळ माणूस खूप मेहनत करतो पण त्याचे जगणे हे बहुदा इतरांसाठीच असल्याने अधिकाधिक उद्देशहीन, साचेबद्ध आणि म्हणून निरस, कंटाळवाणे होऊन जाते.

६० ते ७० ही दहा वर्षे कुत्र्याप्रमाणे त्याने जमविलेल्या मायेचे राखण करीत बसतो, येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाकडे संशयाने बघतो, शंका वाटली तर भुंकतो. जो आपल्याला खाऊपिऊ घालेल, आपली काळजी घेईल, आपले लाड करेल, त्याच्याशी इमानदार राहून आपल्या साऱ्या निष्ठा त्याला वाहतो. ७० ते ८० ही दहा वर्षे माकडाप्रमाणे पाठीत बाक घेऊन, सहज चावता, गिळता येतील असे मऊ पदार्थ खात, आपल्या नातवंडांच्या मनोरंजनासाठी माकडचेष्टा करत, या मुलाकडून त्या मुलीकडे असे भटकत रहातो.

वयाच्या ८० वर्षानंतरही आयुष्य लाभले तर माणसाला पुन्हा आपले माणूसपण आठवते आणि देवाच्या आपल्याकडून असलेल्या शेवटच्या अपेक्षेचे स्मरण होते. म्हणून ८० नंतरचा उरलेला काळ तो देवदेव करण्यात आणि नामस्मरण करण्यात अधिकाधिक देऊळी-राउळी, मठ-आश्रमात, तीर्थक्षेत्री असा व्यतीत करतो...

इसापनीती, पंचतंत्र, जातककथा अशा सुरस आणि चमत्कारिक कथा प्रवाहांचा मूळ उद्देश हा मनोरंजन नसून प्रबोधन हा असतो. माणसाच्या आयुष्यातील वाढीव वर्षांची प्राण्यांशी सांगड घालणारी वरील बोधकथा ही देखील त्यापैकीच असली तरी त्यातील तत्वचिंतन निश्चितच चिंतनीय आहे. विविध भाषांमध्ये ही कथा वेगवेगळ्या स्वरुपात आढळते, वेगवेगळ्या प्राण्यांचे दाखले देते. पण तपशिलापेक्षा आशय महत्वाचा! आत्ता तुम्ही वाचताय हे खास लोकाग्रहास्तव(?), उपलब्ध साऱ्या संदर्भांवरून बनविलेले, माझे स्वत:चे व्हर्जन आहे... आता हे माझे व्हर्जन असल्याने त्याचा समारोपही माझ्या पद्धतीनेच होणार... वरील ब्रह्मदेव आणि पशु यांची कथा उद्बोधक, रंजक आणि मर्मग्राही असली तरी मला याबाबत थोडे वेगळे म्हणावेसे वाटते...

मुळात मनुष्य प्रजातीचे प्रयोजन हे जग अधिक सुंदर करण्यासाठी, जगणे अर्थपूर्ण आणि सृष्टी समृद्ध करण्यासाठी आहे असा माझा ठाम विश्वास आहे. ते तसे नसते तर मनुष्याला विचार करण्याची क्षमता, भाषा, वाणी आणि संवाद साधण्याची कला देण्मायागे निसर्गाचा दुसरा काय हेतू असावा? माणसाने केवळ इतर प्राण्यांवर स्वामित्व गाजवावे, त्यांच्या नैसर्गिक क्षमतांचा उपयोग करून घ्यावा आणि स्वत: सुखासीन आयुष्य कंठावे ही प्रतिमा केवळ बोधकथेतील भाबड्या कल्पनाविश्वात असू शकते, प्रत्यक्षात ती अतिशय अव्यवहार्य ठरावी, ठरतेय...

म्हणूनच या कथेच्या संदर्भात मला असे वाटते की मनुष्यजीवन हे घोड्याच्या उमेदीने आणि उर्जेने कला-कौशल्य ज्ञान-भान मिळवून, बैलाप्रमाणे आपले विहित कर्तव्यकर्म निष्ठेने पार पाडीत, कुत्र्याप्रमाणे सजग, सतर्क, इमानी आणि मिळाल्याप्रती कृतज्ञ राहून, माकडाप्रमाणे सदा उत्साहाने इतरांचे, विशेषत: मुलांचे, मनोरंजन करीत सुखासमाधानात व्यतीत करावे आणि हे सर्व करतांना मनी सदोदित नामस्मरण करावे याहून कृतार्थ मनुष्यजन्म होणे नाही... 
तुझें रूप चित्ती राहो
मुखी तुझें नाम
देह प्रपंचाचा दास
सुखे करो काम... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा