सोमवार, २० मे, २०१९

विचलन...!



‘सामाजिक प्रश्नांसाठी संवेदनशीलतेचे पाझर खूप लोकांना फुटतात पण आपलं प्रोफेशनल डोकं मात्र नॉर्मल करियरमध्ये पैसा कमविण्यासाठीच वापरायचं असा डायव्हर्जन्स खूप आहे...’
 - 'अमृत'वचन!


आजच्या नवमूल्यव्यवस्थेतील तत्वहीन, अंधानुकरणी, चंगळवादी आणि बाजारशरण मानसिकतेला सरळ सरळ 'दांभिक' न म्हणता, त्या जीवांच्या अगतिक अवस्थेचे आणि परस्परजीवी समाजव्यवस्थेचे इतके सहानुभूतीपूर्वक, प्रत्ययकारी आणि यथार्थ वर्णन, शाळेत न जाताही, (किंवा म्हणूनच?) इतक्या समर्पक शब्दात करायला, 'I and Rani are blessed with lack of personal ambition…’ म्हणणारे, मानणारे आणि जगणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचेच पालकत्व लाभावे लागते...

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, सुखासीन जगण्यासाठी आणि नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रमपूर्वक घडविलेले सोशल स्टेट्स जपण्यासाठी आपण निवडलेल्या आपापल्या व्यावसायिक बांधिलकीत [Professional Commitment] अहोरात्र व्यस्त असाल मान्य, पण कधीतरी थोडा वेळ काढून आनंदवन, हेमलकसा आणि गडचिरोली इथे जे वेगळ्याच ‘विकास’ ‘प्रकाश’ आणि ‘निर्माणा’चे काम चालते त्याचा अमृतानुभव घेऊन थोडीशी सामाजिक बांधिलकी देखील जपता आली तर पहा... जाणीवा समृद्ध होऊन प्रगल्भ जगण्याची अगदी अनुभूती नाही तरी प्रचीती यायला प्रत्यवाय नसावा!

आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: |

शुक्रवार, १७ मे, २०१९

सांग...



रसिक साहित्य’चे हे ३९वे वर्ष असले तरी ‘साहित्य सूची’ हा दिवाळी अंक तसा न(व)वाच (पण दुर्दैवाने शेवटचा) असल्याने त्याचे ‘ताजेपण’ जाणविण्याइतके रिफ्रेशिंग आहे. संजय भास्कर जोशींसारखा मर्मग्राही, विचक्षण आणि साक्षेपी संपादक लाभल्याने इतर सुस्थापित आणि (म्हणूनच?) साचलेल्या दिवाळी अंकांमधील प्रस्थापितांच्या रचलेल्या कथा कवितांचा अजीर्ण ढिगारा उपसून तळाशी लपून बसलेला एखादा मोती (पुरुषस्य भाग्यं!) शोधण्याच्या वैराग्यपूर्ण निष्काम कर्मयोगातून हा अंक वाचकाची सुटका करतो. एवढेच नव्हे तर साहित्याला लाभलेले ‘रसिक’ कोंदण आणि आशयातील तपशिलाची ‘सूची’ या दोन्ही विशेषांची बूज राखत असे काही सादर करतो की रसिकाला साहित्याची रुची लागावी आणि या अर्थगर्भ सूचीच्या योगे वाचकाचा शब्दांशी स्नेह जडावा, भाषाप्रेम समृद्ध व्हावे आणि शेवटचा दिस गोड व्हावा...!

‘संभा’विताचे बोल’ अशा काहीशा अनवट आणि वाचकाला सावरून बसायला भाग पाडणाऱ्या मथळ्याच्या ‘संपादकीय’नेच, ही रुळलेली (आणि मळलेली?) पायवाट (किंवा पळवाट!) नव्हे तर, रानवारा नाकात भरून घेवून डोंगरवाटांच्या नागमोडी वळणांनी वनविहार करीत मुक्कामाला निघालेली धाडसी पण निग्रही आडवाट आहे हे जाणवते. या प्रवासात कथा, कादंबरी, कविता, अनुवादित, वैचारिक अशी ओळखीची वळणे दिसली तरी त्यातील बहुतेक वळणे ही हेअरपिन टर्न असल्याने वेगळेच काही समोर येवून वाचकाची उत्कंठा पदोपदी जोपासण्यास मदत होते. याखेरीज, ‘साहित्यिक चर्चा’ अशा एरवी केवळ उच्चारातच प्रचंड बोजड, दुर्बोध आणि कंटाळवाण्या वाटणाऱ्या उपक्रमाला, आजच्या ‘लाव रे तो व्हीडीओ...’ने करमणूक प्रधान करण्याच्या डिजिटल काळात, साहित्यिक, समीक्षक, अभ्यासक यांचा लाइव्ह परिसंवाद रेकॉर्ड करून तो रसिकांसाठी लिखित स्वरुपात सादर केला आहे – ‘एकविसाव्या शतकातील कथात्म साहित्य – एक परिसंवाद’.

यातील प्रत्येक प्रकटनाबद्दल बरेच काही लिहिण्यासारखे असले तरी त्यासाठी तेवढ्याच लांबीचा दुसरा एक अंक काढायला लागेल. शिवाय, ‘इत्यादी’ला समीक्षणाचे वावडे असल्याने तिचा पिंड ज्यावर पोसला आहे त्या ‘अभिजाताचे रसग्रहण’ आणि ‘अनुभूतीचे रसास्वादन’ या करिता मी या अंकातील, कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या, बालाजी सुतार यांच्या ‘संधिकाळाचे जहरी प्रहर’ या, ‘अस्वस्थ नायक’, ‘उपरा’, ‘कोसला’, ‘नांगरणी’, ‘बाकी शून्य’ व अशा इतर अनेक अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी ठेवणाऱ्या लेखनांच्या मार्गाने जात झोंबणाऱ्या वास्तवदर्शी कथेतील कविता निवडली आहे, तूर्त तेवढीच वाचू या, बाकी पुन्हा कधीतरी...

या नदीतून पाऊस वाहील
असं एक आभाळ सांग...
या झाडानं गर्भार व्हावं
अशी एक भुई सांग...
या गावाचा कणा टिकेल
अशी एक पांढर सांग...
हे कोलाहल रिते करावे
अशी एक ओंजळ सांग...
हा अंश रुजवून घेईल
अशी एक माती सांग...

ही दमदार, कसदार आणि बाणेदार मागणी आहे बालाजी सुतार यांची... मी तो केवळ भारवाही. आपला अभिप्राय या कवि-लेखकाला जरूर कळवा... ९३३५० ४७८८३ majhegaane@gmail.com

रविवार, ५ मे, २०१९

अंधा-धुंद...!

राज्याच्या दुष्काळी भागात बायका हंडाभर पाण्यासाठी हिरकणी बनून विहिरींचा तळ गाठून स्वतःसह आपल्या पोटच्या गोळ्यांचाही जीव धोक्यात घालताय आणि शहरी चंगळवादी, 'कॉर्पोरेशन एकच वेळ पाणी देणार तर गाडी आणि कुत्रे कधी आणि कसे धुवायचे' या विवंचनेत! एकीकडे 'मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करा...' असे संदेश स्टेट्स मध्ये ठेवणारे आणि फॉरवर्ड करण्यात मुळीच कसर न करणारे नागरिक, अनायसे सुट्टी मिळाली असतांना मतदानासाठी उन्हात बाहेर पडणे टाळणारे उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि सूज्ञ चिकित्सक भर दुपारी रांग लावूनही 'एव्हेंजर्स एन्डगेम'ची तिकीट मिळतील ना या चिंतेने काळवंडलेयत. विसुभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगलंय काव्यात' या मराठी संस्कृतीचं प्रतिक असणाऱ्या कुटुंबवत्सल कार्यक्रमाच्या उत्क्रांत अवस्थेत शहरी, सुखासीन नवश्रीमंत कुटुंब दंग आहे एका विदेशी कल्पनारंजनाच्या विनाशकारी खेळासाठी झुंबड करण्यात आणि 'एव्हेंजर्स एन्डगेम'ला २४ तास चालवायला लावून पहिल्या तीनच दिवसात २६० कोटीचा गल्ला जमा करून देण्यात. एवढ्या एकाच भगभगीत विरोधाभासावरून राज्याचे, देशाचे, जगाचे आणि त्यायोगे माणुसकीचे विदारक चित्र, विषमतेचे दाहक वास्तव आणि एका महाभयंकर जागतिक षडयंत्राचा अंदाज यावा... 

या चिंतनीय परिस्थितीच्या मुळाशी आहे ते झापडबंद अंधानुकरण आणि त्या लांगुलचालनात स्वत्व गमावून झुंडीचा भाग होऊन स्वत:ला सुरक्षित, आरक्षित आणि लब्धप्रतिष्ठित समजण्याच्या भ्रमात रमणारी स्वार्थी आणि दांभिक मानसिकता. पण ही मानसिकता नैसर्गिक किंवा उपजत नसते, जाणीवपूर्वक रुजवली जाते आणि निष्ठापूर्वक वाढवली जाते. कशी ते समजून घ्यायचे म्हणजे कष्ट आले, अभ्यास आला आणि मुख्य म्हणजे विचारपूर्वक कृती करणे आले. एव्हढा वेळ कुणालाय...? त्यापेक्षा आपल्या स्क्रीनवर चमकलेला मेसेज पुढे ढकलणे सोपे आणि सोयीस्कर नव्हे काय? आता त्यानिमित्ताने आपण परपरागकण (cross-pollination, you know!) होण्याचे माध्यम बनून काही विघातक पसरवत असू, कोवळ्या संस्कारक्षम मनांमध्ये रुजवत असू हे लक्षात कोण घेतो...? शिवाय 'आम्ही इथे काही व्यवस्था बदलायला नाही आलोय, मज्जा करायला आलोय...!' हा बाणेदार अभिनिवेश आहेच जोडीला...!

'व्हॉट्सअपवर रोज ओतल्या जाणाऱ्या विविध रंगी आणि विविध ढंगी मेसेजेसमध्ये कधी कधी सुखद धक्का देणारा एखादा अत्यंत विवेकी, सूज्ञ आणि विचारघन मेसेज प्रकटतो आणि स्मार्टफोन आणखीन व्हॉट्सअप दोन्ही बाळगल्याची, 'याचसाठी केला होता अट्टाहास...' अशी सठीसामाशी उंबराच्या फुलासारखी उगवणारी धन्यता लाभते. परवा असाच एक मेसेज वाचण्यात आला. त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला पण ज्या समुपदेशकाच्या नावे त्याचे हक्क सुरक्षित आहे त्यांच्या ब्लॉगवर तो प्रकाशित झालेला नाही, कदाचित फक्त व्हॉट्सअप फॉर्वर्डसाठीच लिहिला असावा. तो एका फेसबुक पेजवर इथे वाचू शकता. 'मला फक्त मज्जा हवीये...!'

अपूर्व विकास यांचा हा मेसेज, आजच्या लोकसत्तेतील गिरीश कुळकर्णींचे 'मी आणि माझा माठ' हे मर्मग्राही स्फुटं आणि त्याच्याच आधीच्या पानावरील कौस्तुभ केळकर-नगरवाला यांचं 'हाताची घडी, तोंडावर बोट' हे गावाकडच्या दादासाहेब गावकर याने आपला शहरी मित्र सदू धांदरफळे याला लिहिलेले निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीचे विश्लेषण करणारे मार्मिक पत्र ही सारे संप्रेरके कारण ठरली या कवितेच्या जन्माला. म्हणून या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार आणि वाचक सूज्ञ आहेतच, तेंव्हा हे सारे केवळ एन्टरटेनमेन्ट मटेरियल म्हणून न मोजता शिबिराशिवाय काही चिंतन करावे आणि प्रबोधन झालेच तर थोडेफार आत्मनियमन देखील...

Credit: https://damcidomyslenia.pl

'उपभोगा'त क्षणिक सुख
'उप' आहे, 'भोग' निरंतर,
उमजायला हे लांघावे लागते
भोगाभोगातले अंतर...!

उपभोगामध्ये रमते मन
जेव्हा विवेक पडतो गहाण,
भेदाभेदाच्या समीकरणात
हाती उरते फक्त वहाण!

आयुष्याच्या इतिकर्तव्याचा
जेव्हा हरवतो मतितार्थ,
मी-माझे-मला जगण्यात
भरून उरतो केवळ स्वार्थ!

जगण्याचे मर्म तुझ्या
'बाजार'च परस्पर ठरवतो,
चंगळवादाचा घास तुज
व्यापारी मायेने भरवतो!

विकासाच्या गप्पांत
स्वत्व आणि सत्वही हरवते,
साजरेपण उन्मादाचे
जाणिवांस अभक्ष्य भरवते!

सत्तेच्या घातसूत्राने
मानवा तू न मनांस भुलवावे,
ओळखून साऱ्या क्लृप्त्या
तू मनुष्यपण फुलवावे...!

गुरुवार, २ मे, २०१९

दृष्टीमोचक...?


अलीकडे मला टीव्हीवरील सबटायटल्स,
दुरून येणाऱ्या बसवरील गंतव्यस्थान,
रस्त्याच्या पलीकडील दुकानाची पाटी,
आणि काही काही पुस्तकांमधल्या
झुळझुळीत शुभ्र पानांवरील करडी अक्षरे
वाचायला थोडा त्रास जाणवतो...
स्मार्टफोनच्या किंवा संगणकाच्या स्क्रीनवर
लिहिण्या-वाचण्याचा त्रास नाही होत,
तिथे कदाचित स्वयंप्रकाशित असण्याचा फायदा असेल!  

हे बदल जेवढे बाह्य परिस्थितीतील
तेवढेच आंतरिकही असावे... बहुदा!
जमाना बदल गया है हे तर खरेच,
पण आपलेही वय झालेय हे मान्य करावे, म्हणे
आणि घ्यावा बसवून नाकावर एक दृष्टीमोचक कानटोच्या...

पण केवळ चष्मा लावल्याने दृष्टी बदलेल... आणि
दिसू लागेल सारेच जे माझ्यासारख्या पढतमूर्खाला
आजवर कधीच दिसले नाही...?
रस्त्यातील खड्डे, अचानक कोसळणारे पहाड
धोक्याची वळणे आणि घोंघावत येणारी वादळे?
माणसांच्या विचार-आचार-व्यवहार-विहार,
लिहिणे-भेटणे-बोलणे-मिटणे यातील प्रच्छन्न पोकळ्या...?
नेमक्या किती पॉवरच्या लेन्सने दिसते हे सगळे...?

आणि समजा समाजाच्या दडपणास बळी पडून घेतलाच मी निर्णय एकदाचा,
माझ्या गरजेपेक्षा मोठ्या आणि तिखट नाकावर उपनेत्र बसविण्याचा...
ते बायफोकल असावे की प्रोग्रेसिव्ह... हे पर्याय आहेत की पायऱ्या, कसे कळणार?
शिवाय मला एक नवीन दूरदृष्टी मिळाल्याने नेमके किती लांबपर्यंतचे दिसेल...
इतरांसारखे पुढल्या दोन-पाच नको पण निदान माझ्या स्वत:च्या पिढीपर्यंत...?
त्यातून, माझीही नजर तयार झाल्यावर
माझ्या जन्मजात ओरीजनल नजरेला कसे दिसेल, काय वाटेल...?

आणि हल्ली टेक्नो-सैव्ही लोक जसे,
गरज पडली कीब्ल्यू टूथने  कनेक्ट व्हावे
आणि गरज भागली की ब्ल्यू टूथ ऑफ करावा
तसे, जे अर्वाच्य असेल ते वाचण्यासाठी चष्म्याचीही सारखी काढ-घाल करत असतात
त्यामुळे त्या रीम्ड, हाफ-रिम, रिमलेस काचांची किती घालमेल होत असेल...
ती तशी दृष्टीआड करायला जमेल मला...?

बाय वे, संवेदनशील असणं शाप आहे की पाप आहे...?

कालानुक्रमे आपल्यात निर्माण झालेल्या दृष्टीदोषाला,
कालौघात मिळविलेल्या आपल्या सामजिक प्रतिष्ठेला शोभेलसा,
कालाय तस्मै नम: म्हणत आपली प्रतीमावर्धन करणारा चकचकीत उपाय करावा,
तर किती यक्षप्रश्न...? कठीण आहे!
म्हणूनच विचार करतोय,
तसल्या बेगडी दागिन्याच्या भानगडीत पडता
बुबुळाच्या आतल्या पडद्यावर जेथे प्रतिमा उलट्या उमटतात
त्याच ऑपरेशनने सरळ करून घ्याव्या म्हणतो...

कसे...?

बुधवार, १ मे, २०१९

महाराष्ट्र धर्म...!



ज्ञानियाचे पसायदान आणि तुकोबाची गाथा
शिव-पराक्रमाने उन्नत माय मराठीचा माथा!

इये मराठीचिये नगरी वाहते पंढरीची वारी
वैराग्य सन्मानीत उभी गजान्तलक्ष्मी दारी!

इतिहास संस्कृती कलाकौशल्याची बहुपेडी वेणी
गाणारे दगड अन त्यात साकारली बोलकी लेणी!

अस्मितेस आमच्या साथ रामशास्त्री बाण्याची,
वीरांच्या शौर्यास झालर गंधर्वांच्या गाण्याची!

संस्कृतीची उज्ज्वल परंपरा गाते शारदेचे गान
शब्द्प्रभूंच्या किमयेवर घेतो कोकीळही तान!

कलावंत रसिक खेळाडू अन प्रज्ञावंत सारे,
एकाच नभांगणी नांदती सूर्य-चंद्र नी तारे!

पक्वान्नांची शहजादी पुरणपोळी सणावारी
वस्त्रांच्या महाराण्या पैठणी अन नऊवारी!

गणेशविसर्जनास उफाळता सागरकिनारा
किल्ल्यांच्या बुरुजांवरून विहंगम नजारा!

समाजसुधारणेची धुरा सांभाळते इथलीच माती
जन्मोजन्मी निभविण्यासाठी घडतात इथे नाती!

केशरी रंगाची न होवो कधी शौर्यास बाधा
केशरिया रंगात रंगू दे घननिळ्याची राधा!

स्वातंत्र्य-समता-बंधुतेची नित्य होवो अर्चना
मानवतेच्या धर्माचीच फक्त इथे उरो प्रार्थना!

हुतात्म्यांची बलिदानाची चाड सर्वांस राहू दे,
महाराष्ट्र धर्म वाढविण्यास पहाट नवी पाहू दे!

संतांची पावन भूमी सांगे महाराष्ट्राची यशोगाथा,
माती ही लावू भाळी अन या धरणीवर टेकू माथा!