‘रसिक साहित्य’चे हे ३९वे
वर्ष असले तरी ‘साहित्य सूची’ हा दिवाळी अंक तसा न(व)वाच (पण दुर्दैवाने शेवटचा) असल्याने त्याचे ‘ताजेपण’
जाणविण्याइतके रिफ्रेशिंग आहे. संजय भास्कर जोशींसारखा मर्मग्राही, विचक्षण आणि साक्षेपी
संपादक लाभल्याने इतर सुस्थापित आणि (म्हणूनच?) साचलेल्या दिवाळी अंकांमधील प्रस्थापितांच्या
रचलेल्या कथा कवितांचा अजीर्ण ढिगारा उपसून तळाशी लपून बसलेला एखादा मोती
(पुरुषस्य भाग्यं!) शोधण्याच्या वैराग्यपूर्ण निष्काम कर्मयोगातून हा अंक वाचकाची
सुटका करतो. एवढेच नव्हे तर साहित्याला लाभलेले ‘रसिक’ कोंदण आणि आशयातील तपशिलाची
‘सूची’ या दोन्ही विशेषांची बूज राखत असे काही सादर करतो की रसिकाला साहित्याची रुची
लागावी आणि या अर्थगर्भ सूचीच्या योगे वाचकाचा शब्दांशी स्नेह जडावा, भाषाप्रेम
समृद्ध व्हावे आणि शेवटचा दिस गोड व्हावा...!
‘संभा’विताचे बोल’ अशा
काहीशा अनवट आणि वाचकाला सावरून बसायला भाग पाडणाऱ्या मथळ्याच्या ‘संपादकीय’नेच,
ही रुळलेली (आणि मळलेली?) पायवाट (किंवा पळवाट!) नव्हे तर, रानवारा नाकात भरून
घेवून डोंगरवाटांच्या नागमोडी वळणांनी वनविहार करीत मुक्कामाला निघालेली धाडसी पण
निग्रही आडवाट आहे हे जाणवते. या प्रवासात कथा, कादंबरी, कविता, अनुवादित, वैचारिक
अशी ओळखीची वळणे दिसली तरी त्यातील बहुतेक वळणे ही हेअरपिन टर्न असल्याने वेगळेच
काही समोर येवून वाचकाची उत्कंठा पदोपदी जोपासण्यास मदत होते. याखेरीज, ‘साहित्यिक
चर्चा’ अशा एरवी केवळ उच्चारातच प्रचंड बोजड, दुर्बोध आणि कंटाळवाण्या वाटणाऱ्या उपक्रमाला,
आजच्या ‘लाव रे तो व्हीडीओ...’ने करमणूक प्रधान करण्याच्या डिजिटल काळात, साहित्यिक,
समीक्षक, अभ्यासक यांचा लाइव्ह परिसंवाद रेकॉर्ड करून तो रसिकांसाठी लिखित स्वरुपात
सादर केला आहे – ‘एकविसाव्या शतकातील कथात्म साहित्य – एक परिसंवाद’.
यातील प्रत्येक
प्रकटनाबद्दल बरेच काही लिहिण्यासारखे असले तरी त्यासाठी तेवढ्याच लांबीचा दुसरा
एक अंक काढायला लागेल. शिवाय, ‘इत्यादी’ला समीक्षणाचे वावडे असल्याने तिचा पिंड
ज्यावर पोसला आहे त्या ‘अभिजाताचे रसग्रहण’ आणि ‘अनुभूतीचे रसास्वादन’ या करिता मी
या अंकातील, कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या, बालाजी सुतार यांच्या ‘संधिकाळाचे
जहरी प्रहर’ या, ‘अस्वस्थ नायक’, ‘उपरा’, ‘कोसला’, ‘नांगरणी’, ‘बाकी शून्य’ व अशा इतर
अनेक अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी ठेवणाऱ्या लेखनांच्या मार्गाने जात झोंबणाऱ्या वास्तवदर्शी
कथेतील कविता निवडली आहे, तूर्त तेवढीच वाचू या, बाकी पुन्हा कधीतरी...
या नदीतून पाऊस वाहील
असं एक आभाळ सांग...
या झाडानं गर्भार व्हावं
अशी एक भुई सांग...
या गावाचा कणा टिकेल
अशी एक पांढर सांग...
हे कोलाहल रिते करावे
अशी एक ओंजळ सांग...
हा अंश रुजवून घेईल
अशी एक माती सांग...
ही दमदार, कसदार आणि
बाणेदार मागणी आहे बालाजी सुतार यांची... मी तो केवळ भारवाही. आपला अभिप्राय या कवि-लेखकाला जरूर कळवा... ९३३५० ४७८८३ majhegaane@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा