राज्याच्या दुष्काळी भागात बायका हंडाभर पाण्यासाठी हिरकणी बनून विहिरींचा तळ गाठून स्वतःसह आपल्या पोटच्या गोळ्यांचाही जीव धोक्यात घालताय आणि शहरी चंगळवादी, 'कॉर्पोरेशन एकच वेळ पाणी देणार तर गाडी आणि कुत्रे कधी आणि कसे धुवायचे' या विवंचनेत! एकीकडे 'मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करा...' असे संदेश स्टेट्स मध्ये ठेवणारे आणि फॉरवर्ड करण्यात मुळीच कसर न करणारे नागरिक, अनायसे सुट्टी मिळाली असतांना मतदानासाठी उन्हात बाहेर पडणे टाळणारे उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि सूज्ञ चिकित्सक भर दुपारी रांग लावूनही 'एव्हेंजर्स एन्डगेम'ची तिकीट मिळतील ना या चिंतेने काळवंडलेयत. विसुभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगलंय काव्यात' या मराठी संस्कृतीचं प्रतिक असणाऱ्या कुटुंबवत्सल कार्यक्रमाच्या उत्क्रांत अवस्थेत शहरी, सुखासीन नवश्रीमंत कुटुंब दंग आहे एका विदेशी कल्पनारंजनाच्या विनाशकारी खेळासाठी झुंबड करण्यात आणि 'एव्हेंजर्स एन्डगेम'ला २४ तास चालवायला लावून पहिल्या तीनच दिवसात २६० कोटीचा गल्ला जमा करून देण्यात. एवढ्या एकाच भगभगीत विरोधाभासावरून राज्याचे, देशाचे, जगाचे आणि त्यायोगे माणुसकीचे विदारक चित्र, विषमतेचे दाहक वास्तव आणि एका महाभयंकर जागतिक षडयंत्राचा अंदाज यावा...
या चिंतनीय परिस्थितीच्या मुळाशी आहे ते झापडबंद अंधानुकरण आणि त्या लांगुलचालनात स्वत्व गमावून झुंडीचा भाग होऊन स्वत:ला सुरक्षित, आरक्षित आणि लब्धप्रतिष्ठित समजण्याच्या भ्रमात रमणारी स्वार्थी आणि दांभिक मानसिकता. पण ही मानसिकता नैसर्गिक किंवा उपजत नसते, जाणीवपूर्वक रुजवली जाते आणि निष्ठापूर्वक वाढवली जाते. कशी ते समजून घ्यायचे म्हणजे कष्ट आले, अभ्यास आला आणि मुख्य म्हणजे विचारपूर्वक कृती करणे आले. एव्हढा वेळ कुणालाय...? त्यापेक्षा आपल्या स्क्रीनवर चमकलेला मेसेज पुढे ढकलणे सोपे आणि सोयीस्कर नव्हे काय? आता त्यानिमित्ताने आपण परपरागकण (cross-pollination, you know!) होण्याचे माध्यम बनून काही विघातक पसरवत असू, कोवळ्या संस्कारक्षम मनांमध्ये रुजवत असू हे लक्षात कोण घेतो...? शिवाय 'आम्ही इथे काही व्यवस्था बदलायला नाही आलोय, मज्जा करायला आलोय...!' हा बाणेदार अभिनिवेश आहेच जोडीला...!
'व्हॉट्सअपवर रोज ओतल्या जाणाऱ्या विविध रंगी आणि विविध ढंगी मेसेजेसमध्ये कधी कधी सुखद धक्का देणारा एखादा अत्यंत विवेकी, सूज्ञ आणि विचारघन मेसेज प्रकटतो आणि स्मार्टफोन आणखीन व्हॉट्सअप दोन्ही बाळगल्याची, 'याचसाठी केला होता अट्टाहास...' अशी सठीसामाशी उंबराच्या फुलासारखी उगवणारी धन्यता लाभते. परवा असाच एक मेसेज वाचण्यात आला. त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला पण ज्या समुपदेशकाच्या नावे त्याचे हक्क सुरक्षित आहे त्यांच्या ब्लॉगवर तो प्रकाशित झालेला नाही, कदाचित फक्त व्हॉट्सअप फॉर्वर्डसाठीच लिहिला असावा. तो एका फेसबुक पेजवर इथे वाचू शकता. 'मला फक्त मज्जा हवीये...!'
अपूर्व विकास यांचा हा मेसेज, आजच्या लोकसत्तेतील गिरीश कुळकर्णींचे 'मी आणि माझा माठ' हे मर्मग्राही स्फुटं आणि त्याच्याच आधीच्या पानावरील कौस्तुभ केळकर-नगरवाला यांचं 'हाताची घडी, तोंडावर बोट' हे गावाकडच्या दादासाहेब गावकर याने आपला शहरी मित्र सदू धांदरफळे याला लिहिलेले निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीचे विश्लेषण करणारे मार्मिक पत्र ही सारे संप्रेरके कारण ठरली या कवितेच्या जन्माला. म्हणून या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार आणि वाचक सूज्ञ आहेतच, तेंव्हा हे सारे केवळ एन्टरटेनमेन्ट मटेरियल म्हणून न मोजता शिबिराशिवाय काही चिंतन करावे आणि प्रबोधन झालेच तर थोडेफार आत्मनियमन देखील...
Credit: https://damcidomyslenia.pl |
'उपभोगा'त क्षणिक सुख
'उप' आहे, 'भोग' निरंतर,
उमजायला हे लांघावे लागते
भोगाभोगातले अंतर...!
उपभोगामध्ये रमते मन
जेव्हा विवेक पडतो गहाण,
भेदाभेदाच्या समीकरणात
हाती उरते फक्त वहाण!
आयुष्याच्या इतिकर्तव्याचा
जेव्हा हरवतो मतितार्थ,
मी-माझे-मला जगण्यात
भरून उरतो केवळ स्वार्थ!
जगण्याचे मर्म तुझ्या
'बाजार'च परस्पर ठरवतो,
चंगळवादाचा घास तुज
व्यापारी मायेने भरवतो!
विकासाच्या गप्पांत
स्वत्व आणि सत्वही हरवते,
साजरेपण उन्मादाचे
जाणिवांस अभक्ष्य भरवते!
सत्तेच्या घातसूत्राने
मानवा तू न मनांस भुलवावे,
ओळखून साऱ्या क्लृप्त्या
तू मनुष्यपण फुलवावे...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा