‘मिलॅनियम इयर’चा मान मिळालेलं २००० साल अनेक अर्थाने विलक्षण, वैशिष्ट्यपूर्ण आणि म्हणून संस्मरणीय ठरलं. या सहस्त्रकाच्या अंतिम वर्षाने ‘इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी’ अर्थात माहितीजालाच्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवली आणि एका नव्या, माणसांस पूर्णपणे अज्ञात असलेल्या, वेगळ्याच विश्वाची दारे उघडून 'ग्लोबल व्हिलेज'ची झलक दाखवली आणि आधुनिक माणूस अधिकच बहिर्मुख झाला. याच वर्षी हॉलीवूडने जगाला एक नितांत सुंदर चित्रपट दिला – 'कास्ट अवे'. या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आणि ‘बेस्ट इनअॅनिमेट ऑब्जेक्ट’ (सर्वोत्तम अचल वस्तू) या, यापूर्वी कधीही न बघितलेल्या, श्रेणीचा पुरस्कारात अंतर्भाव करायला भाग पाडून इतिहास घडवला. या पुरस्काराचा पहिला, एकमेव आणि शेवटचा (अद्याप तरी!) मानकरी होण्याचे भाग्य लाभलेलं ‘विल्सन’ हे पात्र (?) समजून घेण्यासाठी 'कास्ट अवे' बघायलाच हवा. पण मुद्दा तो नाही, ‘कास्ट अवे’बद्दल बोलण्या-लिहिण्यासारखं खूप काही असलं तरी इथे त्याचा संदर्भ द्यायचा आहे तो माणसाने कालौघात हरविलेल्या अंतर्मुखतेसाठी.
‘कास्ट अवे’ची थोडक्यात कथा अशी की ‘फेडेक्स’ या जगविख्यात कुरियर कंपनीचे एक विमान पॅसिफिक समुद्रात कोसळते आणि फेडेक्सचा त्या विमानातील एक अधिकारी ‘चक नोलॅण्ड’ एका तराफ्याच्या आधार मिळाल्याने समुद्रात बुडून जलसमाधी मिळण्यापासून वाचतो आणि एका निर्जन बेटावर पोहोचतो. अस्वीकार – संताप – तडजोड – हतबलता – स्वीकार या मनोवस्थांच्या चक्रात अनादी अनंत भासणाऱ्या काळासाठी अडकलेल्या 'चक'च्या, वेळोवेळी बदलणाऱ्या मनस्थितीचे चित्रण, माणसांस ग्रासणारे षडरिपू आणि मोहविणाऱ्या नवरसांची अनुभूती देऊन जाते. त्या अर्थाने ही कलाकृती अभिजात आहे हे निर्विवादच, पण केवळ इतकेच नाही.
आजवर मी जितक्या वेळा हा चित्रपट बघतो त्या प्रत्येक वेळी मला नवीन काही समजते, उमजते. आणि कितीही वेळा बघितला तरी आणखीन एकदा पाहण्याची उर्मी जरा देखील कमी होत नाही. असे दुसऱ्या कुठल्याही चित्रपटाच्या बाबतीत सहसा घडत नाही. मग 'कास्ट अवे' मध्ये नेमके असे काय आहे?
हॉलीवूडच्या चित्रपटांच्या मानाने बरीच अधिक, साधारणपणे भारतीय चित्रपटांची असते तेवढी, म्हणजे अडीच तास लांबी असूनही हा चित्रपट लांबलेला तर वाटत नाहीच उलट, कुठलेही फाजील अंगविक्षेप आणि लिंगबदल केलेली हिडीस पात्रे यांच्या माध्यमातून विनोदनिर्मितीचा केलेला किळसवाणा प्रयत्न, भडक, उत्तान आणि कर्णकर्कश्श 'आयटम नंबर्स' आणि ‘लास्टची फाईट’ यांच्या भडिमाराशिवाय देखील एवढा वेळ कसा गेला याचा पत्ताही लागत नाही. याचे कारण आशयाचा आवाका, विषयाचा विस्तार आणि सादरीकरणातला प्रामाणिकपणा! पण याहूनही महत्वाची आणि विलक्षण गोष्ट म्हणजे त्यात सांगितलेल्या गोष्टीचा गाभा आणि विवेचनाचा अन्वयार्थ!
२० वर्षांपूर्वी प्रथम आणि गेल्या २० वर्षात असंख्य वेळा बघितलेल्या या चित्रपटाबद्दल मला नेहमीच असे वाटते की मनुष्य प्राणी अर्थात होमो सेपियन या सजीवाच्या ‘उगम, विकास आणि स्थिती’ची इतकी समर्पक, इतकी मर्मग्राही आणि तितकीच निरुपणात्मक कहाणी दुसरी असू शकत नाही. मॅश्लोने सुचविलेल्या माणसाच्या गरजांच्या मनोऱ्याचे इतके प्रत्ययकारी चित्रण आणि नाट्यरूपांतरण माझ्या पाहण्यात तरी दुसरे नाही. स्ट्रगल फॉर एग्सिस्टन्स अर्थात जगण्यासाठीची धडपड, जीवंत रहाण्याची अहमहिका ते अस्तित्वाचे प्रयोजन शोधण्याची जिज्ञासा या माणसाच्या आयुष्याच्या प्रवासाचे आदिम प्रेरणा ते आध्यात्मिक तितिक्षा असे अत्यंत प्रभावशाली आणि प्रबोधनकारी चित्रण म्हणजे 'कास्ट अवे'!
याच नवीन सहस्त्रकाच्या आरंभीच्या वर्षाने म्हणजे २००० सालाने प्रगत आणि संगणक साक्षर माणसाला एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले – सोशल मिडिया अर्थात समाज माध्यम! तसा १९९७ पासूनच ‘सिक्स डिग्रीज’च्या माध्यमातून सुरु झालेला हा प्रवास ओपन डायरी (१९९८), मायस्पेस/फ्रेंडस्टर/लिंक्डइन (२००३), ऑर्कुट (२००४) या मार्गाने २००५ साली ‘फेसबुक’च्या रूपाने प्रस्थापित झाला. आजच्या तारखेला अक्षरश: शेकड्याने असलेल्या समाज माध्यमांनी वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन अशा पारंपारिक माध्यमांना केवळ स्पर्धा दिली आहे असे नाही तर त्यांचा अवकाश संकुचित करण्यास सुरवात केली आहे. आज कुठलीही बातमी दुसऱ्या कुठल्याही माध्यमास समजण्यापूर्वी समाजमाध्यमावर दाखल होते आणि अक्षरश: निमिषार्धात व्हायरल होऊन लाखो, करोडो लोकांच्या हाती पडते.
व्हॉटस्अॅप या समाजमाध्यमाने फेसबुक या सर्वाधिक वापराच्या समाजमाध्यमाशी हातमिळवणी करून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे आणि आज प्रत्येक स्मार्टफोनधारकाकडे हे आयुध असणे क्रमप्राप्त झाले आहे. जनमानसातील या साधनाची लोकप्रियता आणि लोकांचे त्यावरील अवलंबित्व याची उपयुक्तता अत्यंत चाणाक्षपणे हेरून त्याचा ‘योग्य तो’ उपयोग करण्यात दोन समाजघटकांनी तत्परता दाखवली – जाहीरातदार विक्रेते आणि धूर्त राजकारणी! अर्थात नवमूल्यव्यवस्थेत आणि आधुनिक समाजरचनेत एकूणच (मूल्य?)व्यवस्था याच दोन ‘समाजधुरीणां’च्या हाती असल्याने या नव्याने सापडलेल्या सोयीस्कर आणि प्रभावी माध्यमाचे ‘उपयोजन’ त्यांनी ‘यथोचित’ पद्धतीने केले नसते तरच नवल!
मुळात सोशल नेट्वर्किंग अर्थात समाजातील व्यक्तींनी विविक्षित प्रेरणांनी, विशिष्ट उद्देशांनी आणि काही एक धोरणाने एकत्र येण्यासाठीचे एक व्यासपीठ आणि त्यातून घडणाऱ्या सामाजिक अभिसरणातून समाजाला काही उपयुक्त मूल्ये, सेवा मिळाव्या अशा समन्वयी विचाराने सुरु झालेला हा प्रवास आज ज्या अवस्थेत आहे ते केवळ चिंतनीयच नाही तर अत्यंत शोचनीय आहे. काही सन्मानीय अपवाद वगळता या माध्यमाचा उपयोग विधायक कारणांसाठी, लोकहिताच्या कार्यांसाठी, सकलजनहितार्थ तर राहू दे, निदान एका समाजाच्या, एका वर्गाच्या, एका व्यक्तीच्या का होईना भल्यासाठी केला जातो आहे असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरावे. एकमेकावर कुरघोडी करण्याची चढाओढ, युयुत्सु वृत्तीने केलेली स्पर्धा, सवंग लोकप्रियतेच्या नादाने आपल्या सुमार अभिव्यक्तीचे निलाजरे प्रदर्शन आणि या सगळ्यावर मात करणारे गलिच्छ राजकारण या पलीकडे या, अन्यथा अत्यंत प्रभावशाली, माध्यमाचा सदुपयोग क्वचितच होतांना दिसतो.
मुळात सोशल नेट्वर्किंग अर्थात समाजातील व्यक्तींनी विविक्षित प्रेरणांनी, विशिष्ट उद्देशांनी आणि काही एक धोरणाने एकत्र येण्यासाठीचे एक व्यासपीठ आणि त्यातून घडणाऱ्या सामाजिक अभिसरणातून समाजाला काही उपयुक्त मूल्ये, सेवा मिळाव्या अशा समन्वयी विचाराने सुरु झालेला हा प्रवास आज ज्या अवस्थेत आहे ते केवळ चिंतनीयच नाही तर अत्यंत शोचनीय आहे. काही सन्मानीय अपवाद वगळता या माध्यमाचा उपयोग विधायक कारणांसाठी, लोकहिताच्या कार्यांसाठी, सकलजनहितार्थ तर राहू दे, निदान एका समाजाच्या, एका वर्गाच्या, एका व्यक्तीच्या का होईना भल्यासाठी केला जातो आहे असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरावे. एकमेकावर कुरघोडी करण्याची चढाओढ, युयुत्सु वृत्तीने केलेली स्पर्धा, सवंग लोकप्रियतेच्या नादाने आपल्या सुमार अभिव्यक्तीचे निलाजरे प्रदर्शन आणि या सगळ्यावर मात करणारे गलिच्छ राजकारण या पलीकडे या, अन्यथा अत्यंत प्रभावशाली, माध्यमाचा सदुपयोग क्वचितच होतांना दिसतो.
उण्यापुऱ्या २० वर्षांच्या आयुष्यात समाजमाध्यम या एका अतिशय प्रत्ययकारी ठरू शकणाऱ्या साधनाची संधीसाधूंनी जी अवस्था केली आणि त्याच्या मूळ उद्देशालाच केवळ हरताळ फासला एव्हढेच नाही तर त्याची ‘उपयुक्तता’ ज्या मार्गांनी आणि ज्या उद्देशांसाठी वापरली त्याने साधन-शुचिता तर विन्मुख झालीच पण अनेक विवेकी आणि सत्शील व्यक्तींना ‘सोशल मिडिया सुईसाईड’ अर्थात ‘समाजमाध्यम आत्महत्या’ करून या लोकाभिमुख व्यासपीठाकडे पाठ फिरवण्यास भाग पाडले. ‘कोण होतास तू, काय झालास तू...?’, ‘याजसाठी केला होता अट्टाहास...?’ आणि ‘नरेची केला किती हीन हा नर!’ असे सारे ज्यांच्याबद्दल एकाच वेळी वाटावे असे माध्यम(कु)कर्मी या, अन्यथा लोकशाहीस पोषक ठरू शकणाऱ्या, अत्यंत उपयोगी साधनाची जेवढी हानी करतात तेवढी दुसरे कुणीही ठरवून सुद्धा करू शकणार नाही. प्रगत अवस्थेतील माणसाने काय करू नये याचा वस्तुपाठ म्हणजे आजच्या अविवेकी समाजमाध्यमींची लाजिरवाणी अवस्था!अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरविल्या जाणाऱ्या मुख्य प्रवाहातील माध्यमींची अवस्था फार भूषणवाह किंवा कौतुकास्पद आहे असे मुळीच नव्हे पण तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, तो असू दे...!
आज ‘कास्ट अवे’ आणि सोशल मिडीयाचा उदय-विकास-स्थिती या दोहोंचा एकत्र उहापोह करण्याचे प्रयोजन – करोना! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूने दोन गोष्टी पुन्हा एकदा सिद्ध केल्या – फक्त निसर्गाने भाग पाडल्यास आणि केवळ मृत्युभयानेच माणूस ‘रॅट-रेस’मधून तात्पुरता पॉज घेतो आणि सदोदित ‘बाहेर’ भिरभिरणारी नजर ‘आत’ वळवून थोडा अंतर्मुखही होतो, हे एक. दुसरे म्हणजे ‘डेथ इज अ ग्रेट इक्विलायझर’ म्हणजे मृत्यु दारात उभा राहिल्यावर स्त्री-पुरुष, काळे-गोरे, उच्च-नीच, जाती-धर्म, गरीब-श्रीमंत, शोषित-शोषक, राजा-प्रजा सारे सारे भेद गळून पडतात आणि माणूस अत्यंत मुलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून अनावश्यक गोष्टींवर काट मारायला शिकतो. या दरम्यान, किती गोष्टी खरोखरच निकडीच्या आहेत आणि आपण किती अनावश्यक गोष्टींच्या मागे धावतो, त्या जमा करून आपल्याच गरजा विनाकारण किती वाढवून ठेवतो याचे त्याला जे क्षणिक भान आणि (दांभिक का असेना) विरक्ती येते, तो बोनस किंवा... बोधी!
या शिवाय आपल्या खऱ्या-खुऱ्या सुखाच्या जागा सापडायला मदत होते ते समाधान निराळे आणि... आत्मिक! या निमित्ताने, धूळ खात पडलेल्या पुस्तकांवरची धूळ झटकली जाते आणि आपला तरुणपणीचा फेव्हरीट लेखक नव्याने भेटतो... लहानपणी जे वाद्य वाजवतांना तहानभूक हरपून तंद्री लागायची त्यावरची गवसणी काढली जाते आणि ‘सूर तेचि छेडीता, गीत उमटले नवे...’ ची अनुभूती मनाला प्रसन्न करून जाते... कॉलेजमधील कवितांची वही आणि तिच्यातील खुण करून ठेवलेले पान मनावर मोरपीस फिरवून जाते तर वाळून गेलेल्या रंगपेटीत पाणी घालून रंगांना जीवंत करण्यात आणि नव्याने निसर्गचित्र रंगविण्यात वेगळीच समाधी लागते... पुरुषांना घरकाम करण्याचा, आपले पाककौशल्य दाखविण्याचा आणि स्त्रियांना वाचन-लिखाणाचा अवसर मिळतो.. आपल्या जिवलगांना मनसोक्त वेळ देता येतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंदाने आपलेच मन फुलून येते... एक ना दोन!
करोना व्हायरस जीवघेणा ठरू शकतो आणि त्याच्या विरुद्ध लढायला हवेच. या विषाणूला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वास्थ्यकर्मींना त्यांच्या कामात शक्य ती मदत करणे, प्रोत्साहन देणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्यच आहे आणि ते आपण जरूर करू या... फक्त एक विनंती आहे – त्या निमित्ताने मिळालेल्या निवांतपणाचा सदुपयोग करण्यासाठी ‘ये कहां आ गये हम...’ याचा विचार जरूर करावा आणि ‘ये वो मंजिल तो नहीं...’ असे, मनाच्या कुठल्याशा अंधाऱ्या कोपऱ्यात, जरी वाटले तरी त्या ‘मंजिल’चा, त्यासाठी ज्या मार्गावर चालतोय त्या मार्गाचा आणि त्यामागील अंत:प्रेरणेचा एकदाच, फक्त एकदाच फेरविचार जरूर करा... मी म्हणतोय म्हणून नव्हे, तुम्ही स्वत:ला तेवढे देणे नक्कीच लागता म्हणून. कारण आपण आपले मार्ग बदलले नाही तर निसर्ग सर्वशक्तिमान आहे आणि तो त्याचे निर्णय घ्यायला मुखत्यार आहे हे आपण पाहतो आहोतच...
अरे हो, एक सांगायचं राहीलच, ‘कास्ट अवे’ ज्याच्या कल्पनेतून जन्मला आणि जो त्यातील ‘चक नोलॅण्ड’च पात्र अक्षरश: जगला तो 'टॉम हॅन्क्स' आणि त्याची पत्नी 'रिटा विल्सन' करोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत आणि आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात सुधारणा होते आहे...! आणि हो, आता हाताशी वेळ आहेच तर या करोनाला इष्टापत्ती समजून टॉम हॅन्क्सचा ‘कास्ट अवे’ बघाल तेव्हा जमलच तर ‘जेम्स कॅमेरून’चा ‘द अॅबीज’ ही बघून टाका... मनात आणलं तर निसर्ग काय करू शकतो याची आणखी एक झलक...!
बाय द वे, २ जी, ३ जी, ४ जी या मालिकेतील ‘५ जी’च्या आगमनाचा करोनाशी संबंध आहे असेही एक गृहीतक मांडले जात आहे! नेचर्स वेज आर नेचर्स वेज...
शुभम भवतु!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा