परवा दिनाने त्याच्या मनोगतात सांगितल्याप्रमाणे माझे पत्र ता.क. (PS - Post-Script, you know!) शिवाय पूर्ण होत नाही. जगातील सर्वात मोठा, दोन पानी, ता.क. लिहिण्याचा विश्वविक्रम माझ्या नावावर आहे हे दिनाने परवाच्या व्हिडीओत सप्रमाण दाखवले आहेच. तेव्हा गेले तीन दिवस, 'लव्ह यू जिंदगी...'च्या ट्यूनवर तरंगणाऱ्या या 'आज मै उपर...'चा समारोप एका प्रसंगोचित 'ता.क.'नेच करावा असे वाटते.
पन्नाशीच्या आदल्या दिवशी... 'आपणही गेल्या काही काळापासून पोटार्थी गरजेने 'रॅट रेस'मधील उंदीर झालो आहोत आणि त्यामुळे वेगळे काही करण्याची आपली उमेद आणखीन उर्मी झपाट्याने लोप पावत चालली आहे...' अशा विचारांत 'देणं...' लिहिली गेली; त्यात निराशेपेक्षा विषाद अधिक होता. शिवाय 'पिंडी ते ब्रह्मांडी' पाहण्याच्या तात्विक सवयीमुळे 'सूक्ष्म बदलल्याशिवाय स्थूल बदलणार नाही' या पक्क्या धारणेने, शेवटच्या माणसात मुलभूत बदल घडत नाही तोवर समाज बदलणार नाही ही विचारधारा माझ्या सीएसआर - कम्प्लीट सोशल रिफॉर्म मधून प्रत्यही डोकावत असतेच.
तथापि डॉक्टर कणेकरांसारखा एक प्रश्न मला नेहमी पडत असे, 'मि. शिरी(मनी)ष , तुम्ही एवढं लिहिता, पण वाचतं का कुणी...?' समाजमाध्यमांचा (आणि खरतरं कुठल्याच माध्यमाचाच काय साधनाचासुद्धा) प्रोफेशनल वापर करण्याची कला आणि कुवत कधीही साध्य न झाल्याने आपल्या लिखाणाचे बाकी काही नाही तरी, 'लगता है तुम्हारे लिखनेसे गलत लोग जाग गये है...' ही 'क्रांतीवीरा'ची भीती खरी ठरू नये याची काळजी. पण ते तसे नाही असे समजते.
माझ्या लिखाणाला बरेच वाचक लाभतात आणि त्यातील बऱ्याच वाचकांना ते, लाईक करण्याइतके नसले तरी, शेअर करण्याइतके आवडते याचे दाखले मला हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळत होतेच, कबुलीही मिळाली ! पूर्वी मी 'इत्यादी'वरच्या पोस्टची केवळ दुवा (लिंक) फेसबुकावर डकवत असे, तथापि बरेच लोक लिंक क्लिक करत नसल्याने मूळ पूर्ण मजकुरापर्यंत ते पोहचत नाहीत तेव्हा मी संपूर्ण पोस्ट फेसबुकावर कॉपी-पेस्ट करावी असा मोलाचा सल्ला मिळाला जो मी शिरसावंद्य मानून विनाविलंब तंतोतंत अंमलात आणला.
आता माझ्याच ब्लॉगवरचे लिखाण मीच कॉपी-पेस्ट करत असल्याने त्याखाली आपले नाव घालावे आणि - 'मूळ पोस्ट कुठल्याही फेरबदल न करता माझ्या नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही' - असा शहाजोगपणाचा व्यावहारिक सल्लाही द्यावा हे काही मला सुचले नाही, किंबहुना असे काही सुचत नाही हीच आणखी एक मूळ समस्या. परिणामी, मजकूर कॉपी-पेस्ट करणाऱ्यांनी, त्यात मुळातच नसलेले लेखकाचे नाव स्वत:हून टाईप करून पुढे पाठवावे ही अपेक्षा किती बाळबोध आहे याचे प्रत्यंतर आले जेव्हा एका ग्रुपवर माझ्याशी ओळखदेखही नसलेल्या एका 'मित्रा'ने 'माझ्या मित्राची पोस्ट' अशा टिप्पणीसह छातीठोकपणे माझी पोस्ट शेअर केली. यानिमित्ताने जगन्मित्र असल्याचा अभिमानास्पद फील दिल्याने मी त्याचा ऋणीच आहे पण 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही काळ सोकावतो...' या तत्वाने, जे आपले नाही त्यावर क्षणिक सुखा-समाधानासाठी हक्क सांगण्याची वृत्ती अवघ्या मानव्याला अंती घातक ठरू शकते याची चिंता, बाकी काही नाही.
स्वामित्वाची, हक्काची भावना प्रस्थापित करून प्रबळ होण्यासाठी बीज-क्षेत्र न्याय अस्तित्वात आला आणि रानटी माणूस सिव्हीलाईज्ड झाला तेव्हापासून आपल्या 'निर्मिती'ला आपले नाव देण्याची प्रथा रूढ झाली. राजे-रजवाड्यांनी आपल्या नावाच्या मुद्रा चलनात आणल्या, संस्थानिकांनी आपली संस्थान वसवली, सामान्यांनी जमिनीचे तुकडे आणि दारांवर आपल्या नावाची तोरणं लावली, एवढेच काय, रस्त्यावर राहणाऱ्यांनी सुद्धा आपापला कोपरा आरक्षित केला. जेथे जेथे व्यवहाराची शक्यता निर्माण झाली त्या प्रत्येक ठिकाणी स्वामित्वाची, हक्काची नोंदणी आली. यातून 'कले'सारख्या अभिजात आणि कालातीत क्षेत्राचीही सुटका झाली नाही. कलाकृतीला बाजारात किंमत मिळू शकते हे समजल्यावर 'सिग्नेचर आर्ट'चे लोण पसरले. थेट पिकासोपासून खडूंनी रस्त्यावर चित्र काढणारे कलाकार त्याखाली आपले नाव टाकून आपली कला मॉनीटाईज करू लागले... आणि यात काहीही चूक नाही.
मला प्रश्न पडतो तो फक्त एवढाच की पुरातन काळापासून लेण्यांमध्ये कोरलेली भित्तीचित्रे, सर्वांगसुंदर शिल्पे, भव्य-दिव्य दगडी मंदिरे आणि तत्सम इतर वास्तू, शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून आणि कल्पकतेतून साकारलेले प्रचंड आणि अभेद्य किल्ले आणि अशा इतर अनेक सार्वजनिक कलाकृती या अनामिक कलाकारांनी कोणत्या प्रेरणेतून घडवल्या असतील? आपल्या अलौकिक कलाकृतीवर आपले नाव टाकण्याची इच्छा त्यांना झाली नसेल? इतिहासाच्या पानांनी आपली दखल घ्यावी अशी ओढ त्यांना का लागली नसेल?
याचे मी माझ्या अखंड चिंतनातून माझ्यापुरते शोधलेले उत्तर असे आहे की जेव्हा तुमचे धोरण सर्वसमावेशक असते, उद्देश स्वार्थाच्या पलीकडे असतो आणि मार्ग सेवाभावाचा असतो तेव्हा सर्वकालिक सामूहिक उपलब्धी ही तुमच्या क्षणिक प्राप्तीपेक्षा वरचढ ठरते आणि तुमच्या स्वीकृत कार्यात, कर्तव्यात व्यवहार आड येत नाही... येऊ नाही!
या ता.क.ने माझ्याच ता.क.चा पूर्वीचा विक्रम मोडण्या अगोदर थांबावे हे उत्तम... वाचत रहाल आणि आवडेल, पटेल ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवत रहाल ही अपेक्षा... नाव टाकलं नाही तर मुळीच हरकत नाही पण फेरबदल मात्र करू नये एव्हढीच माफक अपेक्षा!
शुभम भवतु !