रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

संस्कार...!


काल आमच्या विवाहसंस्काराला २५ वर्षे पूर्ण झाली, सिल्व्हर ज्युबिली अर्थात रौप्य महोत्सव का म्हणानात ! तब्बल २५ वर्षे म्हणजे दोन तपांहून अधिक काळ... दोघांच्या तपश्चर्येची दोन आवर्तने झाली की... बघता बघता ! आणि या सहप्रवासात जगाला दाखवण्यासारखी लौकिक जमापुंजी फारशी नसली तरी मर्मबंधात जपण्यासारखी उपलब्धी अक्षरश: अगणित ठरावी. मात्र आम्हाला अभिमान आणि समाधान वाटावे अशी दृष्य प्राप्ती म्हणजे आमचे कन्यारत्न - मैत्रेयी ! 

डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असतांना, डोळ्यांवर काळा गॉगल चढवून मुलीने आमच्या मैरेजच्या ट्वेन्टी फिफ्थ एनिवर्सरीचा जो नेत्रदीपक सोहळा ऑर्गनाईज केला तो अगदीच संस्मरणीय झाला - एकदम एपिक, यु नो ! व्हेन्यूच्या निवडीपासून मेन्यूच्या संयोजनातील केवळ टेस्टच नाही तर विवेक-विचारही आम्हाला स्पर्शून गेला. त्यातून, आमच्या २५ वर्षांच्या सहप्रवासाच्या क्षणचित्रांचे कोलाज, त्याला रोमँटिक फील देणारी सजावट आणि गुलाबपाकळ्यांच्या वृष्टीपासून, २५ दिव्यांचे औक्षण आणि २५चा फ्रूटकेक असा दोन्ही संस्कृतींचा संगम केवळ समर्पकच नाही तर आत्यंतिक मनोहारी ठरला. या सर्व संयोजनात तिला तिचे दोघे भाऊ आणि दोन्ही मावशांची मोलाची साथ लाभली.

२८ वर्षांपूर्वी आईपपांच्या लग्नाला २५ वर्षे झाली तेव्हा, धुळ्याच्या घरातच आमच्या वकुबानुसार आम्ही एक छोटेखानी रौप्य महोत्सव साजरा केला होता. काल मुलीने असाच कार्यक्रम अतिशय कलात्मक आणि आधुनिक पद्धतीने साजरा केल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे अतीव समाधान तर आहेच शिवाय यथोचित संस्कार संक्रमित झाल्याचा मन:पूर्वक आंनद !

असाच सुवर्ण, अमृत आणि हिरक महोत्सवही साजरा करण्याचे बळ आणि संधी मिळो हीच प्रार्थना ! 

शुभम भवतु !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा