डॉक्टर सचिन चिंगरे ! जुन्या शाळूसोबत्याची प्रौढपणी, कळत्या(?) वयात नव्याने झालेली हीच खरी ओळख. सचिन आणि मी इयत्ता दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकलो असलो तरी शाळेतला सचिन मला फारसा आठवत नाही. आम्हा लिंबूटिंबू मुलांच्या मानाने किंचित मोठा दिसणारा आणि पौरुषाच्या खुणा पौगंडावस्थेपासून बाळगणारा सचिन माझ्या मैत्र परिघात (आजच्या भाषेत रेंजमध्ये!) असणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे आमच्या बालमैत्रीचे योग नसल्याने त्याचे त्या वयातले अनेक भोग टळले ! (शंका असल्यास जाणकारांस विचारा !) पण राशीला असलेले ग्रह सहसा पिच्छा सोडत नाहीत तद्वत मी त्याच्या राशीला बसणे हे त्याचे भागधेयच होते आणि माझे पुरुषस्य भाग्यमं !
अत्यंत व्यावहारिक (व्यावसाईक म्हणणे सिर्फ बेवकुफीही नहीं, बे(ई)मानी होगी ! आठवा: ‘नाजायज प्रिस्क्रिप्शन’!) कारणाने सुमारे ३० वर्षांच्या खंडानंतर आम्ही सन्मित्र दिनेशच्या सदिच्छेने भेटलो त्याला आज सुमारे ७ वर्षे लोटली. माझ्या नेहमीच हुळहुळणाऱ्या हृदयाच्या निमित्ताने २०१५ च्या दिवाळीत मी सचिनला खऱ्या अर्थाने ‘भेटलो’ आणि आजवर केवळ ऐकलेले आणि सहसा पहिल्याच भेटीत जवळपास अशक्य असणारे ‘हृदया हृदय येक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले। द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना।’ अनुभवले... तंतोतंत! असे होण्यामागे – सौख्य, आनंद आणि उन्मेष बहुरंगी, बहुढंगी असले तरी सद्भाव, आर्त आणि विवेक एकरंगी असतात (मोनोटोनोस का म्हणानात) – हे एक कारण असावे का ? ते काहीही असले तरी चिंगरेंच्या सौख्यपंचकाला भेटल्यावर लगोलग मला जे सुचले ते असे...
शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५सर्वव्याधिप्रमोचकं I
परिस्थितीची सम्यक जाण
सहजीवनाचा निकोप वसा
बहुतांच्या स्वास्थ्यावर दोघे
सोडत जाती निरामय ठसा…!
वैद्यकव्यवसायाप्रती माझ्या अस्वस्थ जाणिवांमध्ये वैद्यकशास्त्रायोगे मुलभूत परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या धुळ्याच्या डॉ. सचिन व डॉ. सौख्या चिंगरे (नावात अर्थाबरोबरच सौ. देखील अनुस्यूत असणे किती विलक्षण!) या सुविद्य वैद्यक दंपतीस सस्नेह. माझ्या शतायुषाच्या संकल्पास दृढ करणारा सचिन आपला वर्गमित्र आहे याचा अवर्णनीय आनंद आणि सार्थ अभिमान येथे प्रकट करणे प्रस्तुत ठरावे. शुभम भवतु…I
येथून सुरू झालेला प्रवास कवितेच्या माध्यमातून नित्य नवी वळणे घेत काव्य-शास्त्र-विनोदाच्या मार्गाने मैत्र जुळवून गेला आणि फोनवर तासंतास बोलणाऱ्या माझ्या मित्रमंडळात आणखी एक मूल्यवर्धक भर पडली. आम्हाला चर्चेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसल्याने, स्कुल ऑफ थॉट भिन्न असल्या तरी मानवी आयुष्याच्या मूलभूत धारणा आणि कवीमनाला शाप असणाऱ्या संवेदनशील जाणिवा समांतर असल्याने आमच्या सहवेदना एकरूप होत राहिल्या... राहतील !
आज डॉक्टरला वाढदिवसाच्या निमित्ताने काही काव्यात्म शुभेच्छा द्याव्या अशी उर्मी खूप होती पण सूर्याला काजवे दाखविण्यात काय हशील या विचाराने आणि 'कविता विचारप्रधान की भावनेचे प्रकटन...?' या आमच्या दिनाच्या घरी रंगलेल्या चर्चेत भावनाविवशतेला माझा कौल मिळाल्याने मला डॉक्टरबद्दल उचंबळून आलेल्या साऱ्याच भावना आज, आत्ता ताबडतोब व्यक्त करायला जमेल असे नाही... त्यासाठी लागणारी प्रतिभा काही वेगळीच असते !
तेव्हा 'गेले द्यायचे राहूनी...' ही खंत उराशी बाळगून, या पोस्टचे शीर्षक सार्थ ठरवणारा, डॉक्टरने मला दिलेला मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला...
इत्यादीवर डॉक्टरचे इत्यादी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा