तथापि, बहुसंख्यांनी डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीचे सोंग घेतले आणि तारस्वरात, 'ऑल इज वेल...' अशी बोंब ठोकली तरी, दुधाची राखण करण्यासाठी सदैव दक्ष राहण्याचा वसा घेतलेल्या विवेकबुद्धीला झोपेचे सोंग घेता येत नाही. मग अशी तर्कनिष्ठ विवेकबुद्धी कधी बुद्धाच्या, 'अप्प दीपो भव:...' या स्वयंभू मार्गदर्शनातून, कधी तुक्याच्या, 'बुडतां हे जन, न देखवे डोळां...' अशा मायाळू कळवळ्यातून, तर कधी समर्थांच्या, 'मूर्खांची लक्षणे...' या प्रच्छन्न उपदेशातून व्यक्त होते तर कधी जॉर्ज ऑर्वेलच्या, 'बिग ब्रदर इज वॉचिंग यू ...' आणि दिलीप कुलकर्णींच्या, 'नो एनर्जी इज ग्रीन (ऑर 'क्लीन', फॉर दॅट मॅटर!) एनर्जी !' अशा चेतावणीतून डोळ्यात झणझणीत अंजन घालते.
बहुतांनी या साऱ्याकडे, आपल्या क्षुद्र, क्षणिक आणि दांभिक स्वार्थासाठी दुर्लक्ष केले आणि, आज कोंबडा झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी 'उद्या' सूर्य उगविल्याशिवाय रहायचा नाही...! सृष्टी सर्वतोपरी आहे आणि तिच्या चक्राला बाधा आणणाऱ्या प्रजातींचा योग्य तो समाचार घेण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी नसते तर तिने मुळात जीवसृष्टी निर्माणच केली नसती. मुद्दा (आणि प्रश्न!) आहे तो आपल्या अस्तित्वाचा. आणि अजूनही आपण, 'ही व्यवस्था काही मी तयार केली नाही, मी एकटा त्यात काय करू शकणार आहे...?' असा मध्यममार्गीय, कातडीबचाऊ पवित्रा घेणार असू, तर एवढेच सांगावेसे वाटते कि...
निदान भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचे किमान भान येण्यासाठी, तिच्या नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या पर्यवसनाची जाण होण्यासाठी; सो कॉल्ड बेस्ट सेलर्स, बिकाऊ मीडिया आणि पकाऊ व्हॉट्सअँप फॉर्वर्ड याशिवाय, आपल्याशी, आपल्या पुढच्या पिढ्यांशी थेट निगडित असे काही तर्कशुद्ध, विवेकी, समर्पक वाचण्याची सवय लावून घेऊ या...
आज हे सारे नव्याने उगाळण्याचे कारण म्हणजे, काल 'अनंत यशवंत' उर्फ 'नंदा खरे' यांचे झालेले निधन. ज्या नावाने 'गुगल सर्च'वर एक प्रतिमा देखील मिळणे अवघड, त्याची दखल 'डिजिटल' प्रगत महाराष्ट्राने का घ्यावी हा प्रश्नही रास्तच. मुळात संत-महंत, सुधारक-वैज्ञानिक, विद्वान-विचारवंत, लेखक-साहित्यिक अशा महानुभावांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा नावाची लेखिका(?) पण होती हे आम्हाला ठाऊक असण्याचे कारणच काय, आमच्या कधी ऐकण्यात सुद्धा नाही आले असे काही नाव ! प्रसिद्धीपरांग्मुखता अनसोशल ठरल्याने तो मोठाच व्यक्तीदोष असण्याच्या काळात समाजविन्मुख राहणे हे पापच... मान्य, अगदीच मान्य. स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण आणि व्यवसाय असणाऱ्या नागपूरच्या कोणा एका गृहस्थाने, पुणेरी प्राध्यापकीय अभिनिवेशाने चिंतन आणि लेखन करणे हे महाराष्ट्राच्या सहजी पचनी पडण्यासारखे नाही, अगदीच मान्य ! त्यामुळे प्रस्थापित वर्तमानपत्रांनी खरे सरांच्या निधनाची घेतलेली छोटीशी का होईना दखल 'मना'ला स्पर्शून गेली.
आता तुम्हाला या नावाची ओळख झाली आहेच तर खरे सरांच्या न चुकता वाचाव्या अशा पाच पुस्तकांची नावे सांगून तुमचे गुगलण्याचे कष्ट वाचवतो...
१. कहाणी मानवप्राण्याची
२. अंताजीची बखर
३. बाजार
४. ऐवजी
५. उद्या
शिवाय यामुळे उत्सुकता वाढलीच, तर समग्र नंदा खरे साहित्य येथे पहा...
https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4930282049228319742
माणसे आणि व्यक्ती येतात आणि जातात, विचार आणि वृत्ती चिरकाल राहतात. तेंव्हा खरे सरांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली वगैरे म्हणण्याचा किंवा सरांना श्रद्धांजली वगैरे वाहण्याचा प्रश्नच नाही, त्यांच्या विचाराचा शक्य होईल तेवढा प्रचार आणि प्रसार हीच त्यांची स्मृती जपणारी आदरांजली...!
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा