विंदांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २४ ऑगस्ट २०१७ ते २३ ऑगस्ट २०१८ या वर्षात, विंदांची 'रोज एक कविता' असा उपक्रम राबवितांना, कशा कुणास ठाऊक पण विंदांच्या काही अत्यंत मार्मिक आणि 'मना'ला अतिप्रिय असणाऱ्या कविता निवडायच्या राहून गेल्या, आवड आणि निवड यात कदाचित हाच फरक असावा ! 'गेले द्यायचे राहूनी...' ची ही आर्तता आज आषाढीच्या निमित्ताने अधिकच हुरहुरली ती चक्क विठ्ठलाची कविता या उपक्रमातून निसटल्याने !
श्वास देखील फार काळ धरून ठेवता येत नाही, तो ही सोडूनच द्यावा लागतो... पुन्हा श्वास घेण्यासाठी ! श्वास धरून ठेवण्याचा 'प्राणायाम' करण्यासाठी (सहज)'योग' साधावा लागतो आणि तो साधला तर (जीवन)'सिद्धी' अप्राप्य नाही एवढे सोपे अध्यात्म ज्याला कळले त्याला स्थूल-सूक्ष्माचा पोथीबाध्य उहापोह करण्याची गरज नाही.
विद्वानांनी पोथी-पुराणात कैद करून ठेवलेले अद्वैत तत्वज्ञान संतवाणीने जनसामान्यांसाठी सहज सोपे करून भक्तिरसात वर्णिले म्हणूनच तुक्याची गाथा इंद्रायणीत बुडवूनही लोकगंगेने तारली. त्याच संतसंप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या साहित्यिकांनी आपल्या अत्यंत व्यावहारिक आणि मार्मिक प्रकटनातून हे तत्वज्ञान वाहते ठेवले.
अद्वैत सिद्धांताचे आणि, 'वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...' या अध्यात्मिक प्रकटनाचे, जनसामान्यांस सुचेल, रुचेल आणि पचेल अशा सहज मार्मिक स्वरूपात निरूपण करणारी विंदांची ही रचना, आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने !
पंढरपूरच्या वेशी बाहेर
एक आहे छोटी शाळा..
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा...
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय ?
न जाणो , असेल ' विठ्ठल '...
- विंदा करंदीकर
पुराणिकांनी विं दा करंदीकरांची आठ ओळींची ( दोन कडव्यांची ) कविता पाठवली. आवडली. विंदांची माफी मागून आणि संपूर्ण मान राखून आणखी आठ ओळी जोडल्या आहेत.
उत्तर द्याहटवापंढरपूरच्या वेशी बाहेर
एक आहे छोटी शाळा..
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा...
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय ?
न जाणो , असेल ' विठ्ठल '...
विंदा म्हणती मास्तरांना
म्हणून काय झाले
विठ्ठल असला तरी
कळू द्या त्याचे काय चुकले
मनात किंतु नको मास्तर
शिष्य सर्व एकसमान
विद्यादान कार्य तुमचे
'त्याचे'च हे दैव विधान
- जयंत पाटील, पुणे