रविवार, २ जुलै, २०२३

उष:काल होता होता...?


बरोब्बर एक वर्षांपूर्वी लिहिलेल्या '...हम नहीं तोडेंगे?' या 'ये दोस्ती...?' च्या उत्तरार्धाचा तिसरा अंक लिहिण्याची वेळ इतक्या लवकर येईल अशी कुशंकाही 'मना'ला आली नव्हती. 'वर्षभरात मूलबाळ झालं नाही म्हणून तुमची मुलगी नांदवत नाही...' असं म्हणणाऱ्या पारंपरिक खाष्ट आणि नेमस्त आक्रस्ताळ्या सासवा हल्ली सीरियलमध्ये सुद्धा न दाखविण्याइतका महाराष्ट्र नक्कीच पुरोगामी झालाय. त्यामुळे, आधी नाकारलेल्या गर्लफ्रेंडशी मुलाचे लगोलग दुसरे लग्न लावून, अजून संसारात नीटशा न रुळलेल्या सुनेला सवत आणण्याचा खटाटोप तर विचारांनी गतानुगतिक आणि जीवनशैलीत अत्याधुनिक अशा सोशलमिडिऑकर सासवा देखील करणार नाहीत... अगदी मालिकांमध्ये सुद्धा ! तशी केवळ कल्पनाच नाही तर लगे हातो कृती देखील करून मोकळ्या झालेल्या महाराष्ट्र शासनाला आता कुणीही, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...?' विचारण्याचे धाडस करू नये. याहून अधिक झोपमोडीचे, स्वप्नभंगाचे आणि कुठंही पोहचण्याचे भोग समृद्ध, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या नशिबी असू नये.

कहानीमें ट्विस्ट असा आहे की या लोकांनी केवळ कथा, पात्र आणि विषयच नाही तर अख्खा सिनेमाच बदलून टाकलाना राव ! आम्ही हिंदी 'शोले' म्हणून जो समजून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करत होतो तो यांनी रविवारच्या भर दुपारी मराठी 'सिंहासन' करून टाकला ! चव्वेचाळीस वर्षांपूर्वी अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यावर आधारित विजय तेंडुलकरांनी लिहिलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला 'सिंहासन' हा चित्रपट केवळ अभिजातच नाही तर अजरामर आहे आणि यातील 'दिगू' हा सप्तचिरंजीवांनंतर जन्मलेला आठवा चिरंजीव आहे हे आज महाराष्ट्राच्या राजकारणाने सिद्ध केलं !

या निमीत्ताने रुमीची एक गोष्ट आठवली...

काहीच कारण नसतांना उंटाची आणि कोल्ह्याची दोस्ती जमली. दोघे आता पोटापाण्यासाठी सोबतच हिंडू लागले. जंगलात भटकतांना आपापल्या आहारानुसार आणि पचविण्याची ताकदीनुसार अन्न शोधू लागले. एकदा उंटाने मन वर करून बघितले तर त्याला नदीच्या पलीकडे उंचच उंच उगवलेले उसाचे शेत दिसले. ऊस दोघांना अतिप्रिय असल्याने त्यांनी पलीकडे जाऊन मेजवानी झोडाण्याचा बेत आखला.

कोल्ह्याला पोहता येत नसल्याने त्याने उंटाला विनंती केली की उंटाने त्याला पाठीवर घेऊन नदी पार करून द्यावी. दोस्तीखातर एवढे करणे काही फार मोठे काम नसल्याने उंटाने सहज कोल्ह्याला पाठीवर बसवले आणि नदी ओलांडली. दोघे उसाच्या शेतात शिरले आणि मनसोक्त चरले. पोटभर ऊस खाऊन झाल्यावर कोल्ह्याला कोल्हेकुई करण्याची हुक्की आली. त्याने सुरवात करताच काकुळतीला येऊन उंट म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस...? अशाने उसाच्या मालकाला जाग येईल आणि तो आपल्याला बदडून काढेल !'

कोल्हा आपल्याच तंद्रीत असल्याने उंटाला म्हणाला, 'जेवण झाल्यावर कोल्हेकुई करण्याची माझी सवय आहे त्याला मी काय करू? तसे केल्याशिवाय माझा जेवणाचा आनंद पुरा होत नाही...!' आणि त्याने सूर लावला. त्याच्या आवाजाने शेतकरी लाठ्या-काठ्या घेऊन धावत आले. त्यांना बघून कोल्ह्याने पळ काढला आणि झुडपांमध्ये लपून बसलं.. उंटाला न पळणे शक्य होते न लपणे. शेतकऱ्यांनी उंटाला चांगला चोप दिला आणि शेतातून हुसकावून लावले.

संध्याकाळ होत आली तशी जंगलाकडे परतण्याची वेळ झाली. आता कोल्ह्याला उंटाची विनवणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो खजील चेहऱ्याने उंटाला म्हणाला, 'मित्रा, माझ्याकडून चूक झाली खरी, पण आपली दोस्ती सच्ची असली तर तू मोठ्या मनाने मला नक्कीच माफ करशील आणि मला आपल्या पाठीवरून नदी पार करून जंगलात परत नेशील, हो ना?'

मोठ्या मनाचा उंट म्हणाला, 'हो तर! आपण पक्के मित्र आहोत, मी तुला असा एकटाच सोडीन होय? चल बैस माझ्या पाठीवर !' आणि दोघे जंगलाकडे परत निघाले. नदीच्या प्रवाहाच्या मधोमध आल्यावर उंट अचानक खाली बसू लागला आणि कोल्ह्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. कसाबसा जीव मुठीत धरून तो उंटाला म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस? अशाने माझा जीव जाईल ना !'

उंट म्हणाला, 'माफ कर, मित्रा, मी तुला सांगायचे विसरलो, जेवण झाल्यावर पाण्यात डुंबायची मला सवय आहे, तसे केल्याशिवाय मला जेवल्याचे समाधान मिळत नाही...!'

----------------------------------------------------------------------------------------------------

उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्राने रविवारच्या दुपारच्या झोपेचे खोबरे करून घेऊन एका अजब सोहळ्यात 'गुरुची विद्या गुरूला...' याची याची देही याची डोळा प्रचिती घेतली एवढाच काय तो या साऱ्या जांगडगुत्त्याचा अन्वयार्थ...

छत्रपती ते बाळासाहेब, साऱ्यांच्या आत्म्यांस शांती लाभो...
---------------------------------------------------------------------------------------------------

२ टिप्पण्या:

  1. सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वांचाच दिगु टिपणीस झालाय. हताश आणि असहाय्य

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 'म्हातारी (लोकशाही) मेल्याचे दु:ख आहेच पण काळ (कोडगेपणा) सोकावतोय ते फार वाईट...!

      हटवा