अण्णांच्या १२१वी जयंती, भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमी तथा ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीची पूर्वसंध्या असा चौरस मुहूर्त असल्याने असा योग पुन्हा जुळून येणे शक्य नव्हते म्हणून हा सोहळा याच दिवशी करण्याचे अनेक दिवसांपासून योजिले होते आणि तो संकल्प सिद्धीस जाण्यास अनेकांचा हातभार लागला, त्या सर्वांचा हा ‘मना’तला…
ऋणनिर्देश
आपल्या आजच्या या अनौपचारिक कौटुंबिक सोहळ्याला लाभलेले अभ्यासू, व्यासंगी पाहुणे, सर्व गीताप्रेमी रसिक आणि केशवतनय परिवाराचे सदस्य, त्यांचे आप्त, स्नेही व सुहृद, नमस्कार!
कौरवांचे ११ आणि पांडवांचे ७ असे १८ औक्षहिणी सैन्य सलग १८ दिवस लढले ते महाभारताचे युद्ध संपले. पांडवांनी युद्ध जिंकले असले तरी पार्थसारथी श्रीकृष्णाने आपला रथ भरधाव वेगाने दौडवत कुरुक्षेत्रापासून बऱ्याच लांब अंतरावर नेऊन एका निर्मनुष्य ओसाड-उजाड माळरानावर उभा केला आणि अर्जुनाला आज्ञा केली, “पार्था, सर्वप्रथम रथाच्या शीर्षस्थानी लावलेली हनुमंताची पताका उतरव आणि ती हातात घेऊन तू पायउतार हो. हनुमंताची पताका घेऊन रथापासून दूर सुरक्षित अंतरावर जाऊन उभा रहा.”
गेले अठरा दिवस भगवंताच्या अगाध लीलांसह त्याचे विराटरूप दर्शन याची देही याची डोळा घेतले असल्याने, यामागेही त्याची काही योजना असेल याची खात्री असल्याने, रथावरील हनुमंताची पताका उतरवून अर्जुन दूर जाऊन उभा राहिला. श्रीकृष्णाने रथातील एक पाऊल उचलून जमिनीवर ठेवले तसे रथ डगमगू लागला. मोडेल की काय असे वाटू लागले. भगवंताने जसे दुसरे पाऊल उचलले तसा रथ उन्मळून पडला, कोसळला. भगवंतांचे दुसरे पाऊल जमिनीवर टेकून भगवंत जसा एक पाऊल पुढे सरकला तसा अर्जुनाचा रथ भस्म झाला, रथ उभा होता त्या जागी राखेचा एक मोठा ढीगारा तेवढा उरला!
निमिषार्धात घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमाकडे भयचकित होऊन पाहणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्ण कधी त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला त्याचा पत्ताही लागला नाही. पार्थाकडे नेहमीच्या सुस्मित वदनाने आणि स्नेहार्द नजरेने पाहणाऱ्या स्थिर-चित्त भगवंताला अर्जुन विचारता झाला, “योगेश्वरा, हा रे काय आणखीन एक चमत्कार?”
तेव्हा शांत, संयमित स्वरात कृष्ण म्हणाला, “हा शेवटचा चमत्कार! पार्था, तुला काय वाटले तू धुरंधर, रणवीर, सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलास तरी कौरवांकडे महायोद्धयांची कमी होती काय? अरे, सूर्यपुत्र कर्ण हा युद्धकौशल्यात तुझ्यापेक्षा तसूभरही कमी नव्हता. त्याने आणि त्याच्या तोडीच्या योद्धयांनी डागलेल्या सर्व अस्त्र-शस्त्रांचा तुझ्या रथावर प्रभाव होता. केवळ सर्व देव-देवतांचा प्रतिनिधी हनुमंत त्यांच्या आशीर्वादरूपाने रथावर उंच फडकत होता आणि साक्षात मी रथाचे सारथ्य करीत होतो म्हणून ती सारी शस्त्रे त्याक्षणी निष्प्रभ ठरत होती. पण हनुमंताची पताका उतरवल्याने आणि मी पायउतार होताच त्या सर्व अस्त्र-शस्त्रांचा परिणाम एकाएकी प्रभावी होऊन तुझा रथ त्यात भस्म झाला...”
कुठलीही गोष्ट यशस्वी झाली तर ती मी केली हा माणसाचा भ्रम दूर होऊन त्याचे पाय जमिनीवर रहावेत म्हणूनच योगेश्वराने ही माया रचली असावी. सर्वप्रथम ‘अहं’चा त्याग करायला शिकायचे आहे आणि तेव्हढी एकच गोष्ट साधण्यासाठी मनुष्य जन्म अपुरा पडतो…
या तथाकथ्य प्रसंगातून कृष्णाने दिलेली ही शिकवण मला माझ्यापुरते गीतासार वाटते. संसारातही असेच अनेक अदृष्य हात आपल्या रथाचे रक्षण करीत असतात, आपल्याला मार्ग दाखवीत असतात. म्हणूनच समर्थ म्हणतात,
सामर्थ्य आहे चळवळीचे I
जो जो करील तयाचे I
परंतु तेथे भगवंताचे I
अधिष्ठान पाहिजे II
जय जय रघुवीर समर्थ!
कदाचित यासाठीच आपल्या संस्कारात चार प्रकारचे ऋण सांगितले आहे - देव ऋण, ऋषी ऋण, मातृपितृ ऋण आणि समाज ऋण. हे ऋण फेडण्यापेक्षा ते जाणणे, मानणे आणि त्या ऋणात रहाणे अधिक श्रेयस्कर कारण त्यामुळे ऋणानुबंध दृढ होतात असे आपली संस्कृती सांगते. तेव्हा आम्ही या ऋणात राहू इच्छित असलो तरी ऋणनिर्देशास प्रत्यवाय नसावा.
समर्थांनी मूर्ख लक्षणांमध्ये ‘सांगे वडिलांची कीर्ती…’ असेही एक लक्षण सांगितले असले तरी आजोबांबद्दल काही म्हटल्याची कुठे नोंद आढळली नाही तेव्हा ते धारिष्ट्य करायला हरकत नसावी. शिवाय या उद्योगाला स्वार्थाबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक किनारही आहे.
अण्णांनी ‘केशवतनय’ या उपनामाने अध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विषयांवर विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले. धुळ्याच्या मीरा धाराशिवकर यांनी २५ वर्षं संशोधन करून अथक मेहनतीने लिहिलेल्या आणि राजवाडे संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘खान्देशातील साहित्यिक व त्यांचे साहित्य – एक अवलोकन’ या शोधनिबंधात अण्णांच्या कार्याची दखल घेतली आणि गेल्या हजार वर्षातील खान्देशातील साहित्यिकांच्या यादीत अण्णांच्या साहित्याला चार विभागात स्थान मिळाले ही आमच्यासाठी भूषणावह बाब!
दुसरे म्हणजे मराठी भाषा जगविण्याबद्दल जे ‘राज’कारण चालते त्यात ‘वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे…’ असेही एक पालुपद असते. यासंदर्भात पुलंचा एक किस्सा सांगतात. पुलंनी ही ओरड ऐकली तेंव्हा ते म्हणाले, ‘वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असे मला वाटत नाही, फक्त वाचण्याचा क्रम चुकतो. तारुण्यात फॅन्टसी वाचण्यात काय हशील, तेव्हा ती घडविण्याची रग असते, असायला हवी. आणि आयुष्य कसे जगावे सांगणारा दासबोध म्हातारपणी वाचून काय उपयोग? तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि फॅन्टसी वाचण्याशिवाय गत्यन्तर नसते!’
पुलंना चुकीचा वाटलेला हा क्रम ठिक करायचा तर योग्य वयात सुयोग्य गोष्टी वाचायला हव्या आणि त्यासाठी त्या आकर्षक स्वरुपात सहज उपलब्ध असायला हव्या. आजच्या, एआय कडून अतार्किक मालिकांच्या सुमार भागांचा रतीब घालण्याच्या काळात सृजनशील नवनिर्मितीवर किती विसंबून रहावे हा प्रश्नच असल्याने, आपल्यापाशी जे काही अभिजात उपलब्ध आहे त्याची पुनर्निर्मिती करावी असे वाटले. पण ही सदिच्छा झाली, तिचा उपक्रम करण्यासाठी अनेक हातांची गरज होती. कुठलाही विधायक, सर्जक उपक्रम सिद्धीला नेण्यासाठी अनेकांच्या आशीर्वादाची, आधाराची, सहकार्याची, किमान सदिच्छांची गरज असते.
ओवी-गीतेची छापील प्रत काढण्याचे ठरविले तेव्हा अनेक प्रश्न होते, शंका होत्या आणि अर्थातच थोडीशी हुरहुरही होती. हो, अण्णांनी बऱ्याचदा निभावली असली तरी आम्ही ही प्रकाशकाची भूमिका पहिल्यांदाच निभावणार होतो! विद्याताई, तिचे यजमान मदनराव यांनी त्यांचे चिरंजीव हर्षदच्या मदतीने संपूर्ण ओवीगीता स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर टाईप करून मोठेच काम केलेले असले तरी त्याला पुस्तकरूपात आणणे सोपे नव्हते. पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी करावयाचे मुद्रित शोधन अर्थात प्रूफ रिडींगचे अत्यंत जिकिरीचे काम अण्णांचा नाशिकस्थित नातू वैभव शामकांत पुराणिक अर्थात आमचा बंधुसखा कुमार याने नेहमीच्या नेमस्तपणे पार पाडले. एव्हढी सगळी सिद्धता झाल्यावर मुखपृष्ठ, मलपृष्ठाचे डिझाईन आणि पृष्ठ-मांडणीचे छोटेसे पोषाखी काम अस्मादिकांनी पार पाडले.
मुद्रण व्यवसायाची तोंडओळख असली तरी बारकावे माहीत असण्याचे कारण नव्हते. या कामी मदतीला धावून आला अण्णांचे बंधू अप्पाकाकांचा नातू प्रसाद प्रभाकर पुराणिक. धुळ्याच्या का. स. वाणी संस्थेशी अनेक वर्षे निगडित असल्याने आणि मुद्रण व्यवसायातील अभ्यासक्रमांना मार्गदर्शनाचा अनुभव असल्याने त्याने मुद्रणाची जबाबदारी समर्थपणे पेलली. निर्मितिमूल्यात कुठलीही तडजोड न करण्याची कल्पना कितीही रम्य असली तरी वपुंच्या पार्टनरने, ‘काव्याची दुसरी बाजू व्यवहाराचीच’ असे बजावले असल्याने जमाखर्चाचा ताळमेळ जमविण्यासाठी काही एक देणगी-मूल्य ठरविणे क्रमप्राप्त असले तरी ते पुस्तकावर छापू नये, आपण हवे ते योगदान करू असे सर्वानुमते ठरल्याने पुस्तकावर कुठेही किमतीचा उल्लेख नसला तरी या आवृत्तीसाठी एक प्रत १०० रुपयांना असे मूळ देणगीमूल्य आणि अधिक प्रतींसाठी यथोचित सवलत देण्याचे ठरले.
पुस्तकाचे साहित्यिक मूल्य ठाऊक असले तरी त्याचे भौतिक वजन किती असते याबद्दल अनभिज्ञ असल्याने या छापील पुस्तकांचे गट्ठे अंदाजे १५० किलो भरल्याने ते धुळ्याहून पुण्याला आणणे हे एक दिव्यच होते. ती जबाबदारी स्वखुशीने स्वीकारून नेहमीप्रमाणे काळजीपूर्वक पार पाडली ती आमचे साडू मकरंद शिंगणवाडे यांनी! पुण्यासारख्या ठिकाणी कार्य सिद्धीस नेण्याचे सामर्थ्य ‘श्रीं’नी व्यवस्थापकाकंडे आऊटसोर्स केलेले असते. या कार्यक्रमासाठी हे सभागृह सर्व सुविधांसह उपलब्ध करून देणारे देशपांडे दाम्पत्य देखील मूळ खान्देशचेच आहे आणि या कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्यासाठी लाभलेला युवक हा एरवी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या ‘कीर्तनविश्व’ या युट्युब चॅनलसाठी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळतो हा एक सुभग योगायोग!
साहेबाच्या भाषेत सांगायचे तर ‘लास्ट बट नॉट द लिस्ट’ म्हणजे आमचे सर्व कुटुंबीय ज्यांनी आपापल्या परीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. त्यातही साहेब म्हणतो तसे, ‘बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन, देअर इज अ वुमन… टेलिंग हिम यू आर रॉंग!’ आता साहेबाने ही वुमन नक्की कोण, म्हणजे आई, बहीण, मैत्रीण की बायको याचा खुलासा केला नसला तरी आपल्या संस्कृतीत तिला ‘गृहिणी’... संपूर्ण गृह जिचे ऋणी आहे ती गृहिणी, असा मान देण्याची पद्धत आहे! नित्य दिनक्रमात आमचे घर आणि अशा प्रासंगिक उपक्रमात त्याच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या माझ्या बेटर हाफच्या भक्कम आधाराशिवाय असे धाडस करणे तर लांब, त्याची कल्पनाही करता येणे मला शक्य नाही. तेंव्हा या उपक्रमाला आई-पपा, बायको-मुलगी यांची साथ अमूल्य!
जाता जाता…
द्वितीय आवृत्ती विमोचनाच्या आठवडाभरात संपली आणि तृतीय आवृत्तीची नोंदणीही सुरु झाली आहे…
भगवंताची कृपा, अण्णांचा आशीर्वाद, कुटुंबीयांचा पाठींबा आणि आपला स्नेह यामुळेच हे शक्य झाले…
…अजून काय हवे!
धन्यवाद!
शुभम भवतु !
धुळ्याच्या दैनिक आपला महाराष्ट्र आणि पुण्याच्या लोकमतने या कार्यक्रमाची घेतलेली दखल