रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

ज्ञानपीठ...!


आम्ही शाळेत असतांना एका टप्प्यावर संपूर्ण १०० मार्कांसाठी हिंदी किंवा संस्कृत अथवा ५० मार्कांसाठी संस्कृत आणि ५० मार्कांसाठी हिंदी निवडण्याचा पर्याय होता. पर्याय असण्याचे, ते दिले जाण्याचे आणि समोरच्याची निवड स्वीकारली जाण्याचा तो काळ होता.

शिवाय घरात वडीलधारी माणसे असल्याने, कुठलेही धोरणात्मक निर्णय हे प्रथम हायकोर्टाकडे आणि यथावकाश सुप्रीम कोर्टाकडे नेण्याची आणि त्यांचे निर्णय शिरसावंद्य मानण्याचाही काळ होता - अगदी रामराज्यच का म्हणानात.

स्वत:च्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना परदेशी धाडून सोयीनुसार इथल्या व्यवस्थेवर ताशेरे ओढण्याचा किंवा तिचा उदो उदो करण्याचा आणि इथल्या वंचितांसाठी गळे काढण्याच्या अमेरिकन 'मार्क्स'वादी मध्यमवर्गीय (आणि मार्गीय!) वृत्तीच्या पायाभरणीचा तो काळ.

तेंव्हा 'संस्कृत' हा 'स्कोअरिंग सब्जेक्ट' असल्याने तो १०० मार्कांसाठी घेऊन आपले (गुण)मूल्य वाढवून घ्यावे या मताचा रेटा प्रबळ होता. पण आम्ही पहिल्यापासूनच पुलंचे चाहते (भावनावेगात 'भक्त' लिहिणार होतो!) आणि त्यामुळे 'मार्क्सविरोधी' गटात असल्याने विषयांचा उपभोग मार्कांसाठी असतो हा मूल्यवर्धित विचार आमच्या 'मना'ला आजही समजलेला नसल्याने आणि विषय, त्यातही भाषा, अभ्यासण्यात अधिक रुची असल्याने आम्हाला 'बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस'चा पर्याय मोहवत होताच.

त्याच आशेने सदर मामला सुप्रीम कोर्ट अर्थात आमचे आजोबा अण्णा यांच्याकडे गेला असता, आम्ही काही वकिली करण्याअगोदरच अण्णांनी नेहमीच्या धोरणी, करारी, आणि नि:संदिग्धपणाने आपला फैसला सुनावला - 'संस्कृत सर्व भाषांची जननी आणि आपल्या संस्कृतीची धरोहर असल्याने ती अवगत असलीच पाहिजे तथापि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याने आणि बहुतांश भारतीयांची बोलीभाषा असल्याने ती देखील सवयीची असली पाहिजे. तस्मात, दोन्ही भाषांच्या ५०-५० मार्कांचा पर्याय निवडावा!'

आमची अवस्था 'आज मैं उपर...' अशी झाली नसती तरच नवल! पुढे या निर्णयाचा मान राखून आम्ही शाळेत असतानाच, अण्णांनी लिहिलेल्या संस्कृत 'जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' हे प्रकटन आणि 'परदेसी पोस्टमन' या नाटुकलीतील हिंदी भाषिक पोस्टमनच्या भूमिकेतून, आमच्या दोन्ही भाषांवरील शालेय प्रभुत्वाचा दाखला देऊन अण्णांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची काळजी घेतली. शिवाय दोन्ही विषयात अगदी स्कोअरिंग नसले तरी गौरवास्पद मार्क्स मिळवून त्याही आघाडीवर तो निर्णय सार्थ ठरवला.

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे काल जाहीर झालेले ५८वे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार - उर्दू साहित्यातील कार्याबाबत गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासोबतच संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

भाषा हे विचारांचे माध्यम असले तरी ती तुम्हाला समृद्ध कशी करते याची दोन उदाहरणे म्हणजे या दोन भाषा. संस्कृतने आम्हांला संस्कार दिले, आणि आधी हिंदी आणी नंतर उर्दूने आमच्या संवेदना, जाणिवा समृद्ध केल्या. संस्कृतने आईच्या शिस्तीने वाढवले तर उर्दूने मावशीची प्रेमळ माया केली. या दोन्ही भाषांचा एकत्र होणारा सन्मान बघून आपल्या आजोबांच्या द्रष्टेपणाची पुन्हा एकदा प्रच्छन्न प्रचिती तर येते आहेच शिवाय स्वतःच्या भाग्याचा हेवा देखील वाटतो आहे. अगदी, '... पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति, कुतो मनुष्य:' असा !

या निमित्ताने 'अंधार सरो आणि उजेड पडो' या एकाच आशादायी भावनेचे या दोन्ही भाषांतील प्रकटीकरण किती मनोज्ञ आहे पहा...

‘असतो मा सत् गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय।’

आणि कोव्हीडच्या अत्यंत निराशेच्या काळात मानवी मनाला उभारी देण्यासाठी गुलज़ारांनी लिहिलेले 'धूप आने दो...'

धूप आने दो

मीठी मीठी है
बहुत खूबसूरत है
उजली रोशन है
जमीं गुड़ की ढेली है
गहरी सी सहमी हवा उतरी है
इस पर लगेना धुंध से
हटकर जरा से एक और ठहरो

धूप आने दो

आफताब उठेगा तो
किरणों से छानेगा वो
गहरी गहरी नीली हवा में
रोशनी भर देगा वो
मीठी हमारी जमीं
बीमार ना हो
हट के बैठो जरा
हटके जरा थोड़ी जगह तो दो

धूप आने दो...

तळटीप: गुलज़ारांबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडावे आणि 'दुबळी माझी लेखणी...'ची प्रचिती यावी अशी परिस्थिती. पण सर्व काही आपणच करावे / लिहावे असा 'अहं ब्रह्मास्मि...' अविर्भाव निदान या विषयात तरी असू नये. तेंव्हा, प्रथितयश लेखक त्यांच्या समर्थ लेखणीतून, जिवंत जाणिवेतून आणि नित्य प्रवाही संवेदनांतून जे लिहितात त्यानेही समृद्ध व्हावे म्हणून आतंरजालावरील हे दुवे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा