मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

दीन...!


सहानुभूती 

उभे भंवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाटी गर्दी
प्रभा दीपांची फुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी !
कोपर्‍यासी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हांचा एक तो अपंग
भोवतींचा अंधार जो निमाला
ह्रदयि त्याच्या जणु जात आश्रयाला !
जीभ झालेली ओरडून शोष
चार दिवसांचा त्यातही उपास
नयन थिजले थरथरति हातपाय
रूप दैन्याचे उभे मूर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनि पसरल्या कराला
तोच येई कुणि परतुनी मजूर
बघुनि दीना त्या उधाणून ऊर
म्हणे, राहिन दिन एक मी उपाशी
परी लाभू दे दोन घास यासी
खिसा ओतुनि त्या भुक्या ओंजळीत
चालु लाग तो दीनबंधु वाट !
आणि धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात !

- कुसुमाग्रज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा