गुरुवार, २९ मार्च, २०१८

सुपारी...!

फट म्हणता प्राण कंठाशी आणणारी ती एक कोकणी सुपारी, चांगल्या वाईट कामांसाठी विसार म्ह्णून द्यायची ती मतलबी सुपारी आणि विंदांची कवितेला लागणारी ही वात्रट सुपारी! हा माणूस कशाच्या रूपकाने कुठले तत्व उलगडून दाखवेल त्या विश्वेशरास ठाऊक! बघा तुम्हीच ही संवादिक तात्विक कविता, विरूपिका मधील आणि एक मासलेवाईक नमुना...!

“कवितेला काय लागते?”
“काहीतरी लागावे लागते.”
“उदाहरणार्थ?”
“सुपारी!”
“गंभीरपणे बोला; विनोद नको.”
“प्रश्नच विसरलो.”
“कवितेला काय लागते?”
“कागद आणि ‘पेन’ ‘शील’”.

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

माझी माय सरसोती...!

जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना १५ ऑगस्ट १९९० रोजी करण्यात आली. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. या विद्यापीठाच्या स्थापनेनतंर काही वर्षांनी विद्यापीठाला कवयत्री खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी अनेक आंदोलनेदेखील करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली. बातमी वाचा.

या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन व आभार आणि
माझी माय सरसोती बहिणाबाईंचे अभिवादन व स्मरण...!

माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!

माझ्यासाठी पांडुरंग तुझ गीता – भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!

आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरुपाच रूप !!

तुझ्या पायाची चाहूल लागे पानपानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!

फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनिले त्याचं काय !!

किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!

गुरुवार, २२ मार्च, २०१८

क्रांती वगैरे

‘एखादा भावलेला अनुभव, विचार किंवा अवस्था विरूपाच्या आधाराने काव्यरूप झालेली दिसली की त्या कवितेला मी विरूपिका म्हणतो’, अशी विरुपिकेची व्याख्या सांगून आणि ‘गद्यपद्यविवेक बाजूला ठेवून’ विंदांनी ज्या ‘रचना’ केल्या त्या म्हणजे विरूपिका!

विंदा जन्मशताब्दी महोत्सवाच्या उत्तरार्धातील उर्वरित पाच महिन्यांस उद्यापासून सुरवात होईल. विंदांच्या खोडकर तत्वचिंतकाच्या भाषेत सांगायचे तर... ‘सात गेले अन पाच राहिले...!’ या मुहूर्तावर विरूपिका मधली एक रचना आज आणि आणखी काही जेव्हा आणि जशा जमतील तशा...


छत्री शिवण्याचा उपक्रम
मी हाती घेतलेला
आणि तेवढ्यात
घनघोर पावसातून भिजत आलेले
तीन विद्रोही
माझ्यापुढे दत्त.

मी त्यांना स्पष्टपणे सांगितले,
क्रांती वगैरे कशालाच माझी ना नाही;
पण त्या आधी
माझी छत्री मला शिवावीच लागेल.

रविवार, १८ मार्च, २०१८

नवसाज...!

नवी प्रभा, नवी सांज
नवा सूर्य, नवी हवा;
नवा स्पर्श, नवा हर्ष
उगवता दिवस नवा!

नवउन्मेषाची नव्हाळी,
फळाफुलांना गंध नवा;
नवी स्वप्ने, नव्या दिशा,
नवतेला नवसाज हवा!

रेशीम वस्त्र, कडुनिंब लेणं,
तांब्याला साखरेचा गोडवा;
गुढी नटून जाता गगनावरी,
नववर्ष आले सांगे पाडवा!



हे मावळतीला आलेल्या संवत्सरा, तू आम्हाला तुझ्या छत्र छायेत जोपासले त्यासाठी आम्ही तुझे ऋणी आहोत. तुझ्या वाटचालीत तू आम्हाला चांगले शिकवलेस, सुखाचे दिवस दाखवलेस हा तुझा प्रसाद म्हणून आम्ही जपू. तू आम्हाला जे कांही दुःखाचे दिवस दाखवलेस त्यातून आम्हाला बरेच शिकायला मिळाले. हे सर्व आम्ही कर्म भोग म्हणून स्वीकारतो.

येणाऱ्या नवीन संवत्सरात आम्हाला सुकर्म अन् सत्चारित्र्याचं जीवन लाभू दे. येऊ घातलेल्या नवीन संवत्सरात सकल विश्व आनंदी, शांत अन् समृद्ध होवू दे. उत्तम पर्जन्य, विपुल धान्य या सृष्टिला लाभू दे. विवेकबुद्धी आणि प्रेमभाव वाढून, वैरभाव व युद्धजन्य परिस्थीती दूर कर. सकल जीव सृष्टीमध्ये सहवेदना वाढीस लागून सामंजस्य, समायोजन व सख्यभाव वाढू दे.

हे मावळत्या संवत्सरा तुझा निरोप घेतांनाच नवीन येणाऱ्या संवत्सराच्या स्वागतासाठी आम्हाला सज्ज होण्याचा आशिर्वाद लाभू दे. 

शुभम् भवतु ।

रविवार, ११ मार्च, २०१८

चौथरा...!


घडणारे पुतळे
घडविणारे पुतळे!

बोलणारे पुतळे
बोलविणारे पुतळे,
ऐकणारे पुतळे
ऐकविणारे पुतळे!

बघणारे पुतळे
दाखविणारे पुतळे,
विचारमग्न पुतळे
अंतर्बाह्य भग्न पुतळे!

फोडणारे पुतळे
फोडविणारे पुतळे,
पूजणारे पुतळे
‘पूज्य’ ही पुतळे!

प्रेरणा ही पुतळे
धारणा ही पुतळे,
उर्जा देती पुतळे
दर्जा देती पुतळे!

तारिती पुतळे
मारिती पुतळे,
रक्षती पुतळे
भक्षति पुतळे!

साध्य पुतळे
साधन पुतळे,
साधक पुतळे
साधना ही पुतळे!

पुतळ्यांचीच दुनिया सारी
रिकाम्या डोक्यांचा पसारा
नुरता विवेक माणसापाशी
उभा चौकात भुंडा चौथरा!

बुधवार, ७ मार्च, २०१८

श्री...?

मी खर तर तिचा काही निस्सीम चाहता नव्हे, ‘भक्त’ तर नाहीच नाही. पण तिने आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडलं ते ‘सदमा’मधल्या तिच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अदाकारीनं. समोर खुद्द कमल हसन सारखा चतुरस्त्र, अभिनय निपुण आणि यशस्वी अभिनेता असतांना या (हिंदीमधील) नवशिक्या परकरी (अक्षरशः) पोरीने त्याला केविलवाणा दाखविण्यात जे काही सहाय्य केलं ते केवळ उल्लेखनीय नव्हे तर अक्षरश: माईल-स्टोन ठरलं. तोपर्यंत असा करुण रसाचा मक्ता मीना कुमारी, शबाना, स्मिता आणि खास दाक्षिणात्य पठडीतील सिनेमांतून रेखा आणि जयाप्रदा यांनी घेतला होता.

तिचं सौंदर्य हे लौकिक अर्थाने तिचं बलस्थान नव्हतं, असू शकलही नसतं! कारण हिंदी सिनेमांत हिरो आणि हिरोईन यांची जी ठोकळेबाज प्रतिमानं निश्चित झाली होती त्यांच्याशी ती फारशी जुळत नव्हती. तिच्या मूळच्या दाक्षिणात्य कांतीचा इथल्या गौरांगनांपुढे पाड लागणं तस कठीणच होतं. शिवाय नकट्या नाकाची मुमताज इथे सुंदर म्हणून खपू शकत होती पण चाफेकळीसारखं नाक नसणं हा तिचा दोष ठरू शकत होता. आपण केवळ सौंदर्याच्या जोरावर इतर बाहुल्यांसारखं इथे टिकू शकणार नाही याची खात्री असल्याने तिने, नृत्य आणि अभिनय या आपल्या उपजत गुणांना विनोद आणि वैविध्य यांची जोड दिली कारण तिला फक्त टिकायचं नव्हतं तर स्वत:ला सिद्ध करायचं होतं.

‘सदमा’ नंतर ढीगभर सिनेमात तिने, दाक्षिणात्य पद्धतीने कवायती करत बायकी नाचणाऱ्या आणि अत्यंत बथ्थड किंवा एकदम बटबटीत अभिनयातून भावना व्यक्त करण्याचं नाटक करणाऱ्या हिरोंबरोबर निखालस बेगडी भूमिका बिनदिक्कत केल्या. सातत्य आणि टिकून राहणं महत्वाचं ही मुलभूत सूत्र तिला पक्की उमगली होती. शिवाय या प्रयोगांदरम्यान आपल्या सहकलाकारांची कुवत लक्षात आल्याने आपण या ठोंब्यांपेक्षा सगळ्याच बाबतीत सरस आहोत याची जाणीव तिला जशी होत गेली तसा तिचा ‘त्या’ पदाकडे प्रवास आपोआपच चालू झाला. शेखर कपूरच्या ‘मि. इंडिया’ मध्ये तिच्या सर्व कलागुणांना आणि तिच्या अभिनयातील खोडकरपणाला पुरेसा वाव मिळाला. अन्नू कपूरच्या प्रगल्भ साथीने तिच्या खट्याळपणाला खुलवले तर अनिल कपूर या तेव्हाच्या आघाडीच्या नायकाने तिच्यातील स्त्रीत्व फुलवून त्याच्या लोभस दर्शनाने युवकांना घायाळ केले तर युवतींना आव्हान दिले. एवढे होईपर्यंत तिचा हिंदी चित्रपट सृष्टीतील पत्ता निश्चित झाला होताच, आता फक्त दारावरील पाटीवर नावापुढे काय लिहायचे एवढाच प्रश्न होता!

दोन वर्षांनी लागोपाठ आलेल्या तिच्या दोन चित्रपटांनी त्या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्ट, ठसठसशीतपणे आणि बोल्ड टाईपमध्ये दिले. नर्गिस-मधुबालापासून, मीनाकुमारी-वहिदा आणि हेमामालिनी-रेखा यांच्या, एकटीच्या ताकदीवर सिनेमा यशस्वी करण्याच्या कौशल्याला इतक्या वर्षात जे साधता आलं नाही ते तिने जमवून दाखवलं. ‘चांदनी’ आणि ‘चालबाज’ या एकाच वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी तिला केवळ सुपरस्टार नाही तर महानायिका बनवलं. ‘चांदनी’ ही आपल्या नेत्रपल्लवी आणि नृत्यनिपुणतेने कुणालाही भुरळ पाडावी अशी पण प्रसंगवशात द्विधा झालेली नायिका आणि तिची घालमेल तिने अत्यंत ताकदीने साकारली तर ‘चालबाज’ हा अनेक अर्थाने वेगळा असलेला सिनेमा तिला आयुष्यात बरच काही देवून आणि शिकवूनही गेला! ‘सीता और गीता’वरून बेतलेला असल्यामुळे, मुळात चक्क ‘ड्रीमगर्ल’शी तुलना या क्रमप्राप्त आव्हानाला जोड होती ती, दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत आणि ‘ढाई किलोका हाथ’वाला सनी देवोल या दोन्ही हिरोंना एकदम पुरे पडण्याची. अर्थात या दोघांतही अभावानेच आढळणारी वैशिष्ट्ये – वैविध्यपूर्ण चतुरस्त्र अभिनय आणि शास्त्रीय नृत्यकलेतील निपुणता – या तिच्या जमेच्या बाजू होत्याच. परिणाम, चालबाज लक्षात राहतो तो ‘दो बिअर देना, प्लीज...’ म्हणणाऱ्या आणि ‘किसीके हाथ ना आयेगी...’ गाणाऱ्या या ’लडकी’ मुळे, त्यातील कुठल्याही ‘पुरुषा’मुळे नाही. अनिल कपूर बरोबर तिची जोडी हिट ठरते हे सिद्ध झाले तिच्या दोन वर्षांनी आलेल्या ‘लम्हे’ने. यामधील दुसरी दुहेरी भूमिका तिने तेवढ्याच ताकदीने साकारल्याने, प्रेक्षक थियेटरमधून बाहेर पडला तो ‘मोरनी बागांमां...’ गुणगुणतचं!

तद्दन बाजारू, निव्वळ गल्लाभरू, व्यावसायिक चाकोरीबद्ध या बरोबरच प्रायोगिक, थोडेसे धाडसी आणि तरल भावस्पर्शी असे सर्व प्रकार हाताळत, आपले अढळ स्थान आणि अभिनय सामर्थ्य ती अशा टप्याटप्यावर सिद्ध करत गेली. ‘जुदाई’ मधील लौकिक समृद्धीच्या लोभापायी आपला नवरा एका गर्भश्रीमंत तरुणीशी वाटून घेणारी, प्रसंगी खंबीर तर कधी अत्यंत आगतिक आणि वैषम्यग्रस्त होणारी सामान्य मध्यमवर्गीय स्त्री अतिशय ताकदीने रंगविल्यानंतर तिने चंदेरी पडद्यावरून बरीच मोठी, जवळपास १५ वर्षांची, एक्झिट घेतली. या दरम्यान एक दोन फुटकळ सिनेमात तिने किरकोळ भूमिका केल्या पण तिचे पुनरागमन जाहीर केले ते गौरीने! गौरी शिंदे या मराठी दिग्दर्शिकेने ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाची संहिताच तिचे आयुष्य समोर ठेवून लिहिली कि काय असे वाटावे इतकी ती या भूमिकेशी तादाम्य पावली, नव्हे यातील ‘शशी गोडबोले’ सर्वार्थाने जगली. 'जजमेंटल' शब्दाचा अर्थ समजावून घेणाऱ्या शशीच्या माध्यमातून ‘श्री’चं, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय असं वाटत राहतं आणि ‘मुझे प्यारकी जरुरत नही है, थोडी इज्जत चाहिये!’ हे आपल्या भाचीला सांगणारी शशी, संसारात स्थिरावलेल्या, घरातल्या निर्जीव वस्तूंसारख्या सवयीच्या पण म्हणूनच दुर्लक्षित राहणाऱ्या, चाळीशीतील सगळ्याच प्रौढ स्त्रियांची कैफियत मांडते.

तिचा शेवटचा ‘मॉम’ तिच्या, आणि प्रत्येकच स्त्रीच्या, शेवटी इतर सर्व भूमिकांवर मात करीत वरचढ ठरणाऱ्या मातृत्वाच्या, मायेपोटी वाट्टेल ते, अगदी गुन्हेगारी धाडस करण्यास धजावणाऱ्या अनाठायी खंबीरपणाचा, पण इतरांनी घेऊ नये असा, वस्तुपाठच जणू!


तिच्या ७२ हिंदी सिनेमांच्या कारकिर्दीत या केवळ ८ सिनेमांनी तिला ते पद बहाल केलं जे मधुबालापासून माधुरीपर्यंत आणि नर्गीसपासून विद्या बालनपर्यंत अनेकींना भुरळ पाडून हुलकावणी देवून गेलं. अभिनयाचं बावनकशी वरदान लाभलेल्या मीनाकुमारी, नूतन, शबाना, स्मिता, रेखा यांनाही जो बहुमान मिळाला नाही तो तिला न मागताच मिळाला. 

तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून दाक्षिणात्य चित्रपटात काम सुरु केलं त्यामुळे ती शाळा-कॉलेज काही शिकलीच नाही, म्हणे! तिने अगदी लहान वयापासून खूप सोसलं, म्हणे! ती फारशी बडबडी नव्हती, म्हणे! सोशल सर्कल, प्रेस मिडिया या पासूनही ती अंतर राखून असायची, म्हणे! आपल्याशी संबंध असलेल्या, नसलेल्या विषयांत तिला कुणी कधी नाक खुपसतांना पाहिलं नाही, म्हणे! आपण आणि आपलं काम यातच ती लक्ष घालायची, म्हणे! काही विशिष्ट कारणांनी, काही अविशिष्ट परिस्थितीत तिला आधी मातृत्व व लगोलग पत्नीत्व बहाल करण्यात आलं, म्हणे! संसाराचा भार पडल्यावर तिला तिच्या स्वनिर्मित, ‘भारताची एकमेव महिला सुपरस्टार’ या अत्युच्च आणि अढळ पदाचा ऐन भरात असतांना राजीनामा द्यावा लागला, म्हणे! आणि आपल्या मुलीच्या याच क्षेत्रातील पदार्पण आणि भवितव्यासाठी पुनरागमन करून वातावरण निर्मितीत प्रमुख भूमिका निभवावी लागली, म्हणे!

या सगळ्याचा ताण आला म्हणून कि खूपच आनंद झाला म्हणून तिला झेपणार नाही इतकी घ्यावीशी वाटली, म्हणे आणि त्यातच ती तोल जाऊन बाथ-टब मध्ये पडून, बुडून मरण पावली, म्हणे!

शेवटच्या दोन परिच्छेदात ‘म्हणे’ ने वाक्याचा समारोप करण्याचे कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी ऐकीव माहितीवर आधारित असून त्यांची शहानिशा होणे शक्य नाही आणि सुज्ञांनी तसा अट्टाहास करू नये ही अपेक्षा! शिवाय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरविणाऱ्या माध्यमांच्या बेताल, निर्ल्लज आणि बाजारू मानसिकतेने या ज्वलंत ‘विषया’चा जो वापर करून घेतला आणि ‘पद्म’ पुरस्काराचीही मर्यादा न ठेवता तिचे मरणोत्तर जे धिंडवडे काढले त्याने काही राजकीय कार्यकर्त्यांनाही लाज आणली, म्हणे!

'समाजमाध्यम' नावाच्या समाजकंटकांचाच अधिक भरणा असलेल्या व्यासपीठाने माध्यमांची विश्वासार्हता कधीच धुळीस मिळवली असल्याने मुळात बातमी खरी आहे किंवा नाही हेच अलीकडे लवकर समजत नाही. पहिले दोन दिवस अनिश्चिततेत गेले, पुढचे दोन अनपेक्षित धक्क्यात आणि आणखी काही असहाय्य आगतिकतेत! तरीदेखील माध्यमांच्या दृष्टीने या 'बातमी'तलं 'कवित्व' अजून संपलेलं नाही!

आपल्याला प्रिय अशा कुणाच्या निधनाचे निखळ दु:खही लाभू नये, त्यातही ओतप्रोत नाट्यमयता भरून ‘दर्शकां’चे ‘मनोरंजन’ करावे असा विडा उचलेल्या (किंवा सुपारी घेतलेल्या) मुक्त माध्यमांच्या काळात हाती विषादाशिवाय काहीही उरत नाही. त्यातूनही वैषम्य याचे की, ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो!’ अशी खंत म्हातारीला मारणारेच चलचित्रमाध्यमावरील आपल्या दुर्दर्शानातून व्यक्त करतात!

देशवासीयांचे 'दर्शक' आणि नागरिकांचे 'उपभोक्ते' करण्याच्या नादात लोकशाहीचे होणारे वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी बघणारे धृतराष्ट्र जोवर कौरव सभेत आहेत तोवर कुठल्याही स्त्रीचे ‘सौ’पण संपणार नाही, अगदी तिच्या नावात ‘श्री’ आणखीन ‘देवी’ असले तरी!

आज जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, श्रीदेवीच्या अकस्मिक, अनाकलनीय, अविश्वसनीय आणि तेवढ्याच असह्य भासणाऱ्या निधनाने, तिच्या आयुष्याचा आढावा घेतांना जाणविलेल्या, स्त्रीत्वाला पुरुषांनी घातलेल्या मर्यादा दृग्गोचर होतांना शतकानुशतकांची प्रगती आणि महिला मुक्तीच्या गप्पा 'श्री'च्या पडद्यावरील रुपासारख्या लोभस पण तेवढ्याच खोट्या वाटत आहेत. ‘महिला दिन’ आणि त्याच्या ‘शुभेच्छा’ यावरही उथळ आणि कणाहीन विनोद करून ते समाजमाध्यमात पसरविण्यात तत्पर असणाऱ्या स्खलनशील पुरुषसत्ताक मानसिकतेला जोवर एक धक्का मिळत नाही तोवर अशा कित्येक ज्ञान-कला-निपुण, कर्तुत्वसंपन्न आणि खंबीर ‘श्री’ या ‘सौ’ म्हणूनच कुढत आणि मरत राहतील.

बीज पोटी फळते तिच्या
अंकुरता मोहरणे मोठे...
पुरुषाला शाप भोगण्याचा
स्खलनातच पौरुष गोठे...! 

सनातन सत्ताकेंद्री पुरुषी मानसिकतेला
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने
परिवर्तनासाठी शुभेच्छा!

शुक्रवार, २ मार्च, २०१८

पुन्हा विंदा - धुळवड स्पेशल!




प्यालों किती तरीही,
प्याले न मोजितो मी;
आहे पिता-पिवविता,
तो एक, मानतो मी.

अवकाश हाच प्याला,
अन् काळ हीच दारू;
थेंबात सांडलेल्या,
ग्रहगोल पाहतो मी.

कक्षेवरी उगा का,
कलते वसुंधरा ही?
झुकली अशी कशाने,
तें एक जाणतो मी.

पापांत पुण्य मिसळी,
सत्यात अन् असत्य;
जो कॉकटेलकर्ता,
त्यालाच मानतो मी.

जो बाटलीत आहे,
आहेच तो बुचात;
हें सत्य नास्तिकांच्या,
डोक्यांत हाणतों मी.

द्राक्षांत आजच्या या, 
दारू असे उद्यांची;
आशा चिरंतनाची,
इतकीच ताणतो मी.

जातक, १९६५. 
सौजन्य - सन्मित्र शाम वाघ

गुरुवार, १ मार्च, २०१८

होळी...!


हिरण्यकश्यपूची भगिनी ही
आत्या विष्णूभक्त प्रल्हादाची
रक्षिते सत्वगुणी सज्जना अन
भक्षिते व्याधी अमंगळाची...!

असत्य, अनैतिक, अश्लाघ्य आणि अशाश्वत 
अशा सर्व अप्रस्तुत तथा अविशिष्ट तत्वांचे दहन करून,
सत्य, सत्व, सदाचार आणि सनातन
अशा सर्व सच्छील तथा सद्-विवेकी तत्वांना,
तप्त अग्नीत तावून सुलाखून उजळविणाऱ्या
होलिका मातेस शत शत प्रणाम 
या,अमंगळ ते सर्व भस्म करीत वसंतोत्सवाची नांदी देणाऱ्या
मंगलोत्सवाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

शुभम भवतु II