खर तर भावनांच्या
सच्चेपणा व्यतिरिक्त कवितेला अधिक निकष असण्याचे कारण नाही.
विंदांच्या भाषेत
सांगायचे तर कवितेला काय लागते – कागद आणि 'पेन' 'शील'!
पन्नास वर्षे वय
वाढल्याने विंदांच्या कवितेच्या निकषात ताल, लय, गेयता आणि आधुनिक ‘मूल्य’ यांची वाढीव भर स्वाभाविकच म्हणायची.
आध्यात्मिक ‘स्वान्त सुखाय’ कर्म जेव्हा लौकिक मोहांकडे झुकते
तेव्हा अभिजाततेचा क्षय होण्याची शक्यता अधिक.
कागदाची जागा
‘स्क्रीन’ने, ‘पेन’ची साजरेपणाने आणि ‘शीला’ची व्यवहाराने घेतल्यावर कविता थोडी
घुसमटली तर नवल काय?
पण अशा घडीव, बांधील,
बेगडी आणि ‘प्रेरित’ काव्यरतिबाच्या काळात काही रानफुले जेव्हा निरपेक्षतेने उमलून
वाऱ्यासोबत नि:संदर्भ डोलतात तेव्हा ते पाहण्याचा आनंद जेवढा निखळ असतो तेवढाच तो अनुभव अभिजात... आजच्या पिढीच्या भाषेत ‘एपिक’!
आज हे सगळे आठवण्याचे
कारण म्हणजे मधुराणी प्रभुलकर यांनी कवितेची निर्मिती प्रक्रिया कवींकडून जाणून
घेण्यासाठी सुरु केलेला उपक्रम ‘कवितेचे पान’ आणि या यू ट्यूब व्यासपीठावर आश्लेषा
महाजन यांच्याशी त्यांच्या शंभर प्रेमकवितांचा काव्यसंग्रह ‘मनभावन’ निमितत्ताने केलेले
हितगूज. खुद्द कवयित्रीकडून प्राप्त झालेल्या या लिंकबद्दल मन:पूर्वक आभार मानून यावर माझी
प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता मी सन्मान म्हणून स्वीकारतो! ‘जन्मजान्हवी’
निमित्ताने झालेला आमचा परिचय ‘वहाण’च्या चर्चेने खुलला तेव्हाचं हे पाणी निराळे
असल्याची चाहूल लागली होती. स्त्री-मनाचे पापुद्रे उलगडून दाखविण्याची कवयित्रीची
हातोटी विलक्षण आहे हे जाणवले होतेच. तथापि स्त्री-वादी लेखिका, कवयित्री किंवा
कुणीही सहसा पुरुषद्वेष्ट्या आणि पर्यायाने विद्रोही आणि म्हणून रुक्ष, परखड तथा अनरोमैंटिकच
लिहितात असा एक समज सर्वत्र पहावयास मिळतो, तो या निमित्ताने गैर ठरला!
उभे-आडवे यमक हा ना. धो.
महानोरांच्या रचनांमधला मोहक ठसका जेवढा गोड तेवढाच झणझणीत! कवयित्रीच्या या
छंदाचे प्रभावी उपयोजन, नावातच ‘तटतटून’ येणारे मेघ आणि...
“घननिळ नभाचा तोल
सुटे, कल्लोळ उफाडा वेडा
कैफात सुखाच्या चूर
नदीला पूर पहा उरमोडा...”
हा अस्सल गावरान विभ्रम प्रेमी
मनाला भावला नाही तरच नवल.
तर, सुमंदारमाला या आडव्या
वृत्तातला विरूपेच्या रूपकाने येणारा तत्वचिंतक प्रेमभाव वेगळा असला तरी तो देखील
विदग्धच आहे. शंभरापैकी केवळ दोनच कविता ऐकून, त्यांच्या उमलण्याच्या प्रक्रियेची उकल
कवियत्रीकडूनच ऐकल्याने, उरलेल्या वाचण्याची / ऐकण्याची ओढ लावणारा हा ‘मनभावन’
अनुभवायलाच हवा!
‘कवितेचे पान’ या
सृजनात्मक प्रवासाचा अदमास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाबद्दल मधुराणी
प्रभुलकर यांचे आभार, प्रेमशतकी काव्यसंग्रह ‘मनभावन’ सादर करणाऱ्या कवयित्री
आश्लेषा महाजन यांचे अभिनंदन आणि अधिक सर्जक प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे आणि बदलत्या मूल्यव्यवस्थांच्या झगमगाटात आजच्या पिढीला ही चित्रफित अनेक अर्थांनी बाळबोध आणि सुमार वाटणे शक्य आहे, तथापि अॅनिमेटेड फिल्म या अभिनव प्रकाराशी आमची ओळख करून देणारी ही चित्रफित आमच्या उमलत्या भावविश्वाचा सुभग भाग असल्याने तिला आमच्या आयुष्यात आणि स्मरणात अढळ स्थान आहे... आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे १९७४ साली, कुठल्याही आधुनिक संगणक प्रणालीशिवाय केवळ चित्रांच्या आणि फिल्मच्या माध्यमातून ही भावस्पर्शी प्रबोधनपर शॉर्टफिल्म बनविणाऱ्या भीमसेन खुराणा यांचे काल वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आमचे बौद्धिक, भावनिक आणि सांस्कृतिक आयुष्य समृद्ध करणारे जे अनेक अदृश्य हात होते त्यातील आणखी एक काल विसावला... हे ऋण जन्मोजन्मी फिटणे शक्य नाही. कृतज्ञतापुर्वक आदरांजली!
भारताच्या कानाकोपऱ्यातून रोज येणाऱ्या भयानक, हिडीस आणि राक्षसी क्रौर्याच्या बातम्या आणि त्यावरून चालणारे राजकारण हे जेवढे लज्जास्पद आहे तेवढेच गर्हणीय! अशा झुंडशाहीच्या आक्रमक वातावरणात श्वास घेणारी पिढी विचारशून्य, विवेकहीन, प्रतिक्रियाजन्य आणि कणाहीन जन्मल्यास राष्ट्र म्हणून आपण कुठल्या तोंडाने 'बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो' गाणार आहोत आणि महासत्ता होण्याचे स्वप्न बघणार आहोत? मानवतेला अभिमान वाटेल असे राष्ट्र घडविणाऱ्या युवकांच्या ओठावर आपल्या गौरवशाली वैभवाची प्रेरणादायक स्तुतीगीते असतात; 'सेल्फी मैने ले लिया' आणि 'पप्पी दे पारूला' असली अभिरुचीशून्य, थिल्लर आणि बीभत्स गाणी सिगारेटबरोबर ओठावर मिरवणारी पिढी विकारच निर्माण करू शकते, विचार नाही...!
सभोवतालच्या अशा अत्यंत भयावह, निराशा आणि उद्वेगजनक परिस्थितीत आपण परिस्थितीशरण तथा हतबल आहोत असे जिथे भल्याभल्या धुरंधरांची भावना आहे तिथे लहानग्या बालिका आणि त्यांच्या तथाकथित आधुनिक (अबला) नारी असलेल्या माता काय करणार...?
पण नाही... झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या या देशात लोकशाही मार्गाने घडणाऱ्या घटनांवर काही विचक्षण भाष्य करण्यास काही महिलाच पुढे आल्या तर त्यात नवल ते काय? हेमा बिसावा यांची ही शॉर्ट फिल्म नाक्यानाक्यावर वासुगिरी करणाऱ्या भामट्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल ही अपेक्षा आणि ज्यांच्या जीवावर ही कीड पोसली जाते त्या सत्तालोलुप, तत्वशुन्य आणि संधिसाधू टोळधाडीचेही डोळे उघडतील ही अपेक्षेची परमावधी! आणि कुणाचेच प्रबोधन नाहीच होऊ शकले तर पुष्यमित्र उपाध्यायांनी चेतावणी देऊन ठेवली आहेच...
छोडो मेहंदी खड्ग संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाये बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे I
कब तक आस लगाओगी तुम,
बिक़े हुए अखबारों से,
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारों से I
स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयंगे I
कल तक केवल अँधा राजा,
अब गूंगा बहरा भी है
होठ सी दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है I
तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे?
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे I
-पुष्यमित्र उपाध्याय
आणि हे कसे करावे यासाठी एक सूचक व्हिडीओ 'शिवाजी ट्रेल'च्या 'हिस्ट्री क्लब' उपक्रमात प्रशिक्षण घेऊन नित्य सराव करणाऱ्या रणरागीणींचा...
मनुष्य कितीही पराक्रमी, धाडसी, करारी आणि कर्तुत्ववान असला तरी आयुष्यात कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या पेचप्रसंगात आगतिक होतोच. अशा दिग्मूढ अवस्थेत अगदी विवेकी, प्रखर बुद्धिवादी आणि टोकाचा प्रयत्नवादी मनुष्यदेखील हतबुद्ध होतो आणि ‘हात दाखवून’ अवलक्षण करून घेतो. गर्भावस्थेतील अर्भकाच्या नखांनी भवतालच्या नाजूक आवरणास इजा होवू नये म्हणून निसर्गत: वळलेली मूठ हातावर निरनिराळ्या रेषा, खळगे आणि उंचवटे तयार करते आणि, स्वावलंबी होण्यास सर्व प्राण्यात सर्वाधिक वेळ घेणारं माणसाचं बाळ या हस्त-सामुद्रिकामध्ये ‘भविष्य’ – जी घडविण्याची गोष्ट असते पाहण्याची नव्हे – ती शोधत बसतं! हेही ठीक. मनुष्यजन्माच्या क्रमप्राप्त अनेकविध अपरिहार्यतांपैकी ती देखील एक मानण्यास प्रत्यवाय नसावा, पण म्हणून कुणी देवाधिदेव जगदीश्वर जो कि साक्षात 'नारायण' त्याचा हात बघून त्याचे ‘भविष्य’ वर्तवले तर...
अशा अचाट कल्पना सुचून त्यांना अफाट परिणाम आणि परिमाणही दिला नाही तर ते विंदा कसले? खुद्द परमेश्वराचे हस्त सामुद्रिक पाहून आकाशवाणी करणाऱ्या विंदांचा हा ‘देवेंद्र’ अविर्भाव पाहून कुणीही म्हणेल... 'नारायण, नारायण!'
'अभिजातता म्हणजे काय?' याची चर्चा आपण या ठिकाणी केली आणि त्याची काही उदाहरणे देखील बघितली. अभिजाततेमध्ये जशा कला, विद्या, संस्कृती आणि प्रकृती येतात तशाच व्यक्ती, वृत्ती आणि प्रवृत्ती देखील येतात. अन्यथा मराठीतील वास्तववादी व विचक्षण लेखकद्वयी अरुण साधू आणि विजय तेंडुलकर यांची अनुक्रमे कथा, पटकथा आणि अत्यंत प्रयोगशील (धाडसी?) दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन लाभलेला, सुमारे ४० वर्षांपूर्वीचा (१९७९) ‘सिंहासन’ हा चित्रपट आणि विशेषतः त्यातील हा प्रसंग आजही ताजा व सुसंदर्भीत वाटता ना! 'स्थळ-काळ-वेळ यांच्या बंधनापलीकडे, माणसाच्या मुलभूत प्रेरणा आणि विकसित प्रवृत्ती यांची नेमकी नस पकडून त्यावर केलेले मर्मग्राही भाष्य' अशी 'अभिजातते'ची आणखी एक अभिनव व्याख्या या निमित्ताने उमजते.
या प्रकटनाला, 'या चित्रफितीतील पात्रे व प्रसंग संपूर्णतः: काल्पनिक असून त्याचा कुणाही जीवित अथवा मृत व्यक्ती, वृत्ती आणखीन प्रवृत्तीशी सुतराम म्हणतात तास संबंध नाही व असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.' असा डिस्क्लेमर अर्थात अस्वीकृती (याला अपरिग्रह हा पर्याय कसा वाटतो?) टाकण्याची निकड प्रतिभावान लेखक आणि चतुरस्त्र दिग्दर्शकांना वाटली नाही तर; आम्ही आज, येथे या प्रसंगाचे 'पुन:प्रसारण' करण्यास 'योगायोगाचे' शेपूट जोडून, 'आज आमचा घसा बरा नसल्याने भीमाण्णांचे गाणे आम्हांला त्यांच्या इतके जमले नाही!' म्हणण्यापैकी आहे. तेव्हा असले काहीही तुणतुणे न वाजवता या लेखक-दिग्दर्शक त्रयींचे अभिवादन करून अभिजाततेची चर्चा चालू ठेऊ या...!
जाता जाता, ‘उष:काल होता होता...’ हे सुरेश भटांचे अभिजात विद्रोही स्फूर्तीगीत याच चित्रपटातील आणि निळू फुले-अरुण सरनाईक, डॉ. श्रीराम लागू-सतीश दुभाषी यांच्या अभिनयाची अभिजात जुगलबंदी देखील याच चित्रपटातील. एकदा अवश्य पहा...