बुधवार, ४ एप्रिल, २०१८

सिंहासन...!



'अभिजातता म्हणजे काय?' याची चर्चा आपण या ठिकाणी केली आणि त्याची काही उदाहरणे देखील बघितली. अभिजाततेमध्ये जशा कला, विद्या, संस्कृती आणि प्रकृती येतात तशाच व्यक्ती, वृत्ती आणि प्रवृत्ती देखील येतात. अन्यथा मराठीतील वास्तववादी व विचक्षण लेखकद्वयी अरुण साधू आणि विजय तेंडुलकर यांची अनुक्रमे कथा, पटकथा आणि अत्यंत प्रयोगशील (धाडसी?) दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन लाभलेला, सुमारे ४० वर्षांपूर्वीचा (१९७९) ‘सिंहासन’ हा चित्रपट आणि विशेषतः त्यातील हा प्रसंग आजही ताजा व सुसंदर्भीत वाटता ना! 'स्थळ-काळ-वेळ यांच्या बंधनापलीकडे, माणसाच्या मुलभूत प्रेरणा आणि विकसित प्रवृत्ती यांची नेमकी नस पकडून त्यावर केलेले मर्मग्राही भाष्य' अशी 'अभिजातते'ची आणखी एक अभिनव व्याख्या या निमित्ताने उमजते.

या प्रकटनाला, 'या चित्रफितीतील पात्रे व प्रसंग संपूर्णतः: काल्पनिक असून त्याचा कुणाही जीवित अथवा मृत व्यक्ती, वृत्ती आणखीन प्रवृत्तीशी सुतराम म्हणतात तास संबंध नाही व असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.' असा डिस्क्लेमर अर्थात अस्वीकृती (याला अपरिग्रह हा पर्याय कसा वाटतो?) टाकण्याची निकड प्रतिभावान लेखक आणि चतुरस्त्र दिग्दर्शकांना वाटली नाही तर; आम्ही आज, येथे या प्रसंगाचे 'पुन:प्रसारण' करण्यास 'योगायोगाचे' शेपूट जोडून, 'आज आमचा घसा बरा नसल्याने भीमाण्णांचे गाणे आम्हांला त्यांच्या इतके जमले नाही!' म्हणण्यापैकी आहे. तेव्हा असले काहीही तुणतुणे न वाजवता या लेखक-दिग्दर्शक त्रयींचे अभिवादन करून अभिजाततेची चर्चा चालू ठेऊ या...!

जाता जाता, ‘उष:काल होता होता...’ हे सुरेश भटांचे अभिजात विद्रोही स्फूर्तीगीत याच चित्रपटातील आणि निळू फुले-अरुण सरनाईक, डॉ. श्रीराम लागू-सतीश दुभाषी यांच्या अभिनयाची अभिजात जुगलबंदी देखील याच चित्रपटातील. एकदा अवश्य पहा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा