गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

भविष्य...?



मनुष्य कितीही पराक्रमी, धाडसी, करारी आणि कर्तुत्ववान असला तरी आयुष्यात कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या पेचप्रसंगात आगतिक होतोच. अशा दिग्मूढ अवस्थेत अगदी विवेकी, प्रखर बुद्धिवादी आणि टोकाचा प्रयत्नवादी मनुष्यदेखील हतबुद्ध होतो आणि ‘हात दाखवून’ अवलक्षण करून घेतो. गर्भावस्थेतील अर्भकाच्या नखांनी भवतालच्या नाजूक आवरणास इजा होवू नये म्हणून निसर्गत: वळलेली मूठ हातावर निरनिराळ्या रेषा, खळगे आणि उंचवटे तयार करते आणि, स्वावलंबी होण्यास सर्व प्राण्यात सर्वाधिक वेळ घेणारं माणसाचं बाळ या हस्त-सामुद्रिकामध्ये ‘भविष्य’ – जी घडविण्याची गोष्ट असते पाहण्याची नव्हे – ती शोधत बसतं! हेही ठीक. मनुष्यजन्माच्या क्रमप्राप्त अनेकविध अपरिहार्यतांपैकी ती देखील एक मानण्यास प्रत्यवाय नसावा, पण म्हणून कुणी देवाधिदेव जगदीश्वर जो कि साक्षात 'नारायण' त्याचा हात बघून त्याचे ‘भविष्य’ वर्तवले तर...

अशा अचाट कल्पना सुचून त्यांना अफाट परिणाम आणि परिमाणही दिला नाही तर ते विंदा कसले? खुद्द परमेश्वराचे हस्त सामुद्रिक पाहून आकाशवाणी करणाऱ्या विंदांचा हा ‘देवेंद्र’ अविर्भाव पाहून कुणीही म्हणेल... 'नारायण, नारायण!'

भविष्य 

छत्रीप्रमाणे अवकाशाची
उघडझाप
करणाऱ्या तुझ्या हातावर

हे परमेश्वरा!

आकाशगंगेची दिगंत धनरेषा,
शुक्राचा उंचवटा,
सर्व ठीक.
पण तुला परदेशगमनाचा योग नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा