'आषाढस्य प्रथम दिवसे...' या कालिदासाने मेघदूतात अजरामर करून ठेवलेल्या काव्यपंक्तींच्या भांडवलावर, 'वर्षा'च्या या काळात, कावळ्याच्या छत्र्यांबरोबर अनेक कवी (आणि कवयित्रीही) उगवत असतात आणि कालिदासाला न्यूनगंड देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतात. ही प्रथा अतिशय प्राचीन असून (कदाचित कालिदासाच्याही पूर्वीपासून) काही अभिनव प्रयोग या निमित्ते साहित्य शारदेस समृद्ध करीत आले आहेत. व्हॉट्सऍप विद्यापीठातून नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार असाच एक प्रयोग इ.स. १९७८ साली झाला होता आणि आपल्या 'जिप्सी' मित्राच्या या 'लज्जत'दार कारागिरीचे, कुठेही डाग पडू न देता, 'ईज्जत'दारपणे भाजके समीक्षण करण्यात शब्दप्रभूंनी खुसखुशीत खमंगपणा आणला होता. प्रस्तुत लेखकास सदर मजकूर कुठेही शंकास्पद, बनावट अथवा खोडसाळ न वाटता, अत्यंत मार्मिक, अभिरुचीपूर्ण तथा उद्बोधक वाटल्याने, 'जसे प्राप्त झाले तसे' येणेप्रमाणे प्रकाशीत करीत आहो, मजकूरातील तपशिलांची सत्यता जिज्ञासूंनीं तपासून बघावी, रसिकांनी मूळ काव्यप्रतिभा आणि विडंबनातील 'लालित्य' याची 'मौज' अनुभवावी आणि पुन्हा एकदा 'तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...' म्हणून विश्वेश्वरास साकडे घालावे! चित्राखालील मजकुराचे श्रेय आणखीन जबाबदारी मूळ संशोधकाची आणि संपादकाची जो या क्षणी तरी आम्हांस अज्ञात आहे, कुणाला ठाव-ठिकाणा माहित असल्यास कळवावे, सदर रत्नपारखी राजहंसाबरोबर आपलेही जाहीर आभार मानण्यात येतील. इति विज्ञापना I
कवी मंगेश पाडगांवकर बरीच वर्षं 'लिज्जत पापड' कंपनीच्या जाहिरातींसाठी कविता लिहीत असत (कवितांचा पापडांशी किंवा त्या कंपनीशी काही संबंध नसे, मात्र कवितेच्या निमित्तानी लोक जाहिरातही वाचतील, या अपेक्षेनी कंपनीनी हे धोरण राबवलं होतं). तर, १९७८ सालच्या 'ललित' नियतकालिकाच्या जून महिन्याच्या अंकात "आनंदाचा घनू" ही त्यांची कविता छापून आली :
आनंदाचा घनू...
बरसला अंगावरी आज आनंदाचा घनू...
आज मन गगनात
आणि गगन मनात
माझे प्राण इंद्रधनू...
रंग श्रवणासि आले
सूर सुवासिक झाले
झाली बासरीच तनू...
नभ झाले मनभोर
मनभर निळे मोर
आणि आतुरल्या धेनू...
कोसळला प्राणभर
सावळा हा अनावर जैसा देवकीनंदनू...
याचं पु.ल.देशपांडेंनी विडंबन केलं, ते 'ललित'च्याच जुलैच्या अंकात, मूळ कवितेसह (मूळ कविता पान २८वर, अन् विडंबन पान २९वर) छापलं...
"पाऊसू पापडू आणि एकू गीतू"
{कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांना त्याच्या 'लिज्जत' पुरस्कृत "आनंदाचा घनू" या वर्षा(सन) गीताला 'सलाम' करून}भूमिका : चुलीवर भाजत टाकलेला पापड आणि वहीवर जुळवत टाकलेली कविता ह्या, महिला गृहउद्योग व काव्योपासना अशा द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीच्या पापडाची आणि कवितेची अवस्था काय झाली, ते टिपण्याचा एक नम्र प्रयत्न.
येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू
आले माझिया मनात आपणही गीत पाडू !
साला बादचा शिरस्ता पाळतात कविजनू
येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू !
शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू...
- घनू, इंद्रधनू, प्राणू, मोरू, देवकीनंदनू,
मनू, गगनू, श्रवणू आणि बासरीची तनू
शब्द टप्पोरे टप्पोरे बोंडे कापसाची जणू !
पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू,
स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू?
घनू गरजो, बरसो, भरो विहिरी गटारू
दिसो घनघोर घटा, गळो छप्परू टप्परू !
हाती धरिताचि पेनू गळे शाईतुनी गीतू...
- गीतातल्या पावसाशी माझी जडलीसे प्रीतू !
झरे कवितेची ओळू, होते गीताचीच शाई !
- सॉरी, शाईचेच गीत - किंवा कशाचे काहीही !
हंबरत्या धेनूबिनू, पंख पिसारून मोरू
मेघूबिघू यथासांग, रांग धरूनिया तरू...
- आणि अचानक कैसा धूर कोंदला खोलीतू !
राही अधुरे अयाई माझे पावसाचे गीतू...
आली जाग एकाएकी नाकी शिरताचि घाणू -
करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू !
कसा वाटोळा वाटोळा स्वर्णवर्णाचा लिज्जतू...
झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू !
- झड पावसाची आली, इथे गीतही भिज्जतू,
आता कुणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू ?
कवयित्री - सौ.तरंगिणी ठिपके
- आणि अचानक कैसा धूर कोंदला खोलीतू !
राही अधुरे अयाई माझे पावसाचे गीतू...
आली जाग एकाएकी नाकी शिरताचि घाणू -
करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू !
कसा वाटोळा वाटोळा स्वर्णवर्णाचा लिज्जतू...
झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू !
- झड पावसाची आली, इथे गीतही भिज्जतू,
आता कुणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू ?
कवयित्री - सौ.तरंगिणी ठिपके
प्रिय संपादक महाराज,
अलीकडेच क-हाड - पुणे एष्टीत आम्हाला ही कविता लिहिलेला कागद सापडला. कवयित्रींच्या क-हाड कवयित्री संमेलनात पावसामुळे भिजलेल्या -आणि काव्यगायनाचा चान्स न मिळाल्यामुळे भाजलेल्याही- भावना ध्यानात घेऊन ही कविता आपल्या लोकप्रिय मासिकात छापावी अशी विनंती आहे.
...आणखीही अश्या ब-याच कवितांचे कागद त्याच एष्टीत सापडले आहेत; पाठवू का ?
आपला नम्र
पु. ल. देशपांडे
'प्रत्यक्षाहून विडंबन किचकट' अशी 'जाणीव जागृती' करणाऱ्या दोन्ही महारथींना साष्टांग दंडवत आणि त्यांच्या जगावेगळ्या 'मैत्रा'स सलाम!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा