गूढ-गंभीर विसंगती दर्शविणारा आशय असो कि चि. वी. जोशी, पु. ल. देशपांडे यांचा निर्मळ विनोद असो, त्याला आपल्या बोलक्या, हसऱ्या चित्रांनी एक निराळाच आयाम प्राप्त करून दिला तो शि. द. फडणीस या महाराष्ट्राच्या जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या व्यंगचित्रकाराने! व्यंगचित्र हे टीकात्मक, कुणाला तरी दूषण देणारे अथवा कुठल्यातरी शारीरिक व्यंगावर व्यक्तिश: आक्रमण करणारे असते हा समज खोटा ठरवला तो शिदंच्या अत्यंत लोभस, निरागस, निर्विष अशा, सामान्य माणसांच्या आयुष्यातील सामान्य घटनांच्या एका मार्मिक पद्धतीने केलेल्या निरीक्षणाने!
मग कधी ते गाण्याचा रियाज करणारी आपली आई का रडतेय हे न उमजून तिला शांत करण्यासाठी आपली खेळणी देवू करणारे निरागस बालक असेल, कधी मालकीण झोपलीय त्यामुळे आपली उपासमार नको म्हणून स्वत:च दुधाचे भांडे दुधवाल्यापुढे धरणारी मनीमाऊ असेल, पाय लांब करण्यात निपुण असलेला एक भक्त देवदर्शनाचे वेळी आपल्या चपला एका पायाने सांभाळीत असेल तर दुसरा पोलीस शिपाई दोन्ही हात पिशव्यांमध्ये गुंतलेले असल्याने साहेब समोर दिसताच एका पायानेच सलाम ठोकत औचित्यभंग होणार नाही याची दक्षता घेत असलेला दिसेल. किंवा ‘बकरी पाला खाते’ या अत्यंत आदिम, साध्या सोप्या सामान्यज्ञानातून साधलेला तरीही, तत्वचिंतक जे हजार शब्दातून सांगू शकणार नाही असे एक विसंगतीपूर्ण जागतिक सत्य, केवळ एका छोट्याशा, कुठेही घडू शकणाऱ्या, वरवर विनोदी वाटणाऱ्या पण मूलत: तात्विक असणाऱ्या प्रसंगातून दृग्गोचर होते.
आज शि. द. सरांचा ९३वा वाढदिवस म्हणजे सरांच्या शतकाला अवघ्या ७ धावा हव्या आहेत. अर्थात सरांची ही अवखळ अर्कचित्रे शतकोत्तरही पहायला मिळावी ही अपेक्षा आहेच. कारण एक वर्ष उलटतांना ज्यांची खरोखर वाढ होते आणि समाजाला आनंदी, समाधानी, सर्वसमावेशक आणि वर्धिष्णू राहण्यासाठी ज्यांच्या विवेकी अभिव्यक्तींची निरंतर गरज आहे अशा संस्कृती समृद्ध करणाऱ्या प्रतीभावंतांनाच...
‘जीवेम शरदः शतम् I
बुध्येम शरदः शतम् ।।
अर्थात 'आपल्याला शंभर वर्षे (तरी) निरामय आयुष्य लाभो आणि शंभर वर्षे बुद्धी शाबित राहो आणि ज्ञानार्जन सुरु राहो’ ही प्रार्थना शोभते आणि लाभते देखील; त्यासाठी कुठल्याही अनुयायाची, चेल्याची अथवा ‘शुभचिंतका’ने फ्लेक्स लावायची गरज नाही...!
सर, आम्हाला अजून खूप समज यायची आहे, खूप शिकायचे आहे आणि माणूस म्हणून उत्क्रांत होतांना सम्यक संवेदनशीलता वाढवणे फार गरजेचे आहे. तेव्हा आपल्या बोलक्या आणि हसऱ्या रेषा आम्हांला अजून खूप काळ लागणार आहेत... त्या आपण समाजमनावर उमटवत रहाव्या ही प्रार्थना आणि सदिच्छा...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा