सोमवार, २३ जुलै, २०१८

आमचाही 'कणा'...!


काल धुळ्याला आपल्या लाडक्या दाबके सरांचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात, आनंदात आणि कृतार्थ भावाने संपन्न झाला. बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत 'शत प्रतिशत हजेरी'मध्ये गुण मिळविणारा मी या समारंभास हजर राहू शकलो नाही याची खंत आहे आणि विषादही! दाबके सरांचे विद्यार्थी अक्षरश: जगभर विखुरलेले असल्याने आणखीनही बऱ्याच जणांना काल हजेरी लावता आली नसेल. अशा सगळ्या, 'नाईलाजाने अनुपस्थित' विद्यार्थ्यांच्या अव्यक्त भावना अनुल्लेखित राहू नये म्हणून हे मनोगत...


"सर, आम्हाला या कौतुक सोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला यायला जमले नसले तरी वारकऱ्याच्या हृदयात पांडुरंग जसा नित्य वास करतो तसे तुम्ही आमच्या ध्यानीमनी सदोदित असता. आमची शाळा आणि आपल्यासारख्या गुरुमाऊलींनी दिलेले बाळकडू यामुळेच आम्ही आजच्या गळेकापू स्पर्धेच्या विधिनिषेधशून्य जगात मूल्ये टिकवून आहोत. जगात आम्ही कुठेही असलो तरी आषाढीच्या मुहूर्तावर आम्हाला आमच्या पंढरीचे – धुळ्याचे – वेध लागलेले असतात. या वर्षी मुख्यमंत्र्यांप्रमाणे आम्हालाही पंढरीची वारी घडू शकली नसली तरी आम्ही देखील आमच्या देवघरात आमचा विठ्ठल पुजला आणि आहोत तेथून त्याला साष्टांग दंडवत घातला... तो पोचला म्हणून आशीर्वाद द्यावा आणि आम्ही कायमच आपले शिष्य होतो, आहोत व राहू म्हणून मार्गदर्शन करावे. आपल्याकडून आमच्यासारखे अजून अनेक विद्यार्थी (परीक्षार्थी नव्हे!) घडायचे आहेत म्हणून आपल्या निरामय शतकोत्तर आयुष्यासाठी पांडुरंग चरणी मन:पूर्वक प्रार्थना!


गुरु-शिष्याच्या अजोड, अनन्य आणि अलौकिक भावबंधावर कुसुमाग्रजांनी ‘कणा’ हा अजरामर काव्याविष्कार करून ठेवला आहे. आजच्या या हृदयस्पर्शी प्रसंगी कविश्रेष्ठांची क्षमा मागून आमचाही ‘कणा’...

विसरला नाहीत न सर आम्हाला येवू न शकलो आम्ही
कशामुळे ते आम्ही सांगू नये, विचारणार नाहीच तुम्ही

क्षणभरच का होईना झाली असती हृद्य भेट पुन्हा
अपराध असेल आमचा हा पण केला नाही गुन्हा

दिवसभर मन होते सैरभैर डोके नव्हते ताळ्यावर
लक्ष वारकऱ्याचे सारे विठूमाउलीच्या हिंदोळ्यावर

खंत वाटली, विषाद दाटला, चित्त भिरभिरे झाले
पापणी भिजली अलगद अन टोचले व्यथेचे भाले 

विहिरीतून जगरहाटीच्या मडके आपले भरतो आहे
जगणे समजून घेतांना जिंकण्यात रोजच हरतो आहे

माऊसकडे हात जाताच हसत हसत उठला
‘लाईक’ नको सर, जरासा एकटेपणा वाटला

मिळवले बाहेर सगळे तरी आत रितेपणा साठला
'शेअर’ करावे वाटले म्हणून तळ मनाचा गाठला

फार काही नकोय सर, टिकवलाय ताठ कणा...
कान पिळून मार्दवाने 'आत्मसन्मान जप' म्हणा!


पोस्टमधील सर्व छायाचित्रे व सरांच्या मनोगताची ध्वनिचित्रफित सन्मित्र दिनेश चंद्रात्रे यांच्या सौजन्याने... आभार!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा